नैवेद्य

प्रतिनिधी 27/12/2018

_Naivedya_1_0.jpgभारतीय संस्‍कृतीमध्‍ये देवाची पूजा नैवेद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. देवी-देवता नैवेद्य दाखवल्‍यानंतर प्रसन्‍न होतात असा समज आहे. काही देवदेवतांचे नैवेद्यही ठरलेले असतात. पोळीचा नैवेद्य, गौरी-गणपतीला भाजी-भाकरीचा नैवेद्य, गणपतीला मोदकाचा नैवेद्य वगैरे.

पूजेमध्ये सोळा उपचार आहेत. त्यामध्ये नैवेद्य समर्पण हा एक उपचार आहे. रोज सकाळी पूजा झाल्यावर दूधसाखर, नुसती साखर, गूळखोबरे किंवा एखादे फळ यांचा नैवेद्य त्या त्या देवतेच्या संकल्पनेनुसार दाखवण्यात येतो. वैश्वदेव झाल्यावर, भोजनास बसण्यापूर्वी देवांना महानैवेद्य दाखवण्याची प्रथा होती. पण तो कुलाचार व्यवसायपरत्वे जवळजवळ लोप पावला आहे. त्यामुळे सणावाराच्या दिवशी देवांना महानैवेद्य दाखवण्याची सोयीची पद्धत रूढ आहे.

‘नेवेदं अर्हतीति’ – निवेद अर्थात निवेदन याला जे योग्‍य त्‍याला नैवेद्य म्हणावे, अशी याची व्‍याख्‍या आहे. त्याचा अर्थ देवाला निवेदनीय असे जे द्रव्‍य ते नैवेद्य होय. नैवेद्य हा पंचविध असावा व तो शुद्ध असावा. त्याविषयी तंत्रसारात पुढील श्‍लोक आहे -

निवेदनीयं यद् द्रव्‍यं प्रशस्‍तं प्रयतं तथा
तद् भक्ष्‍यार्ह पत्र्चविधं नैवेद्यमिति कथ्‍यते
भक्ष्‍यं भोज्‍यं च लेह्यं च पेयं चूष्‍यं च पत्र्चमम्
सर्वत्र चैतं नैवेद्यमारार्ध्‍यास्‍यै निवेदयेत्

अर्थ – जे निवेदनीय द्रव्‍य असेल ते प्रशस्‍त व पवित्र असावे. ते भक्षणास योग्‍य व पाच प्रकारांतील असावे. त्‍यालाच नैवेद्य असे म्‍हणतात. ते पाच प्रकार म्‍हणजे भक्ष्‍य (गिळण्‍याजोगे), भोज्‍य (चावून खाण्‍याजोगे), लेह्य (चाटण्‍याजोगे), पेय (पिण्‍याजोगे) व चूष्‍य (चोखण्‍याजोगे) होत. नैवेद्य अशा पंचविध पदार्थांनी युक्‍त असा असावा. तो नैवेद्य देवाची-देवीची पूजा करून तिला समर्पावा.

नैवेद्य सोने, रूपे, तांबे, दगड, कमलपत्र व यज्ञीय लाकूड यांच्‍या पात्रात ठेवून देवाला दाखवावा. तो देवाच्‍या उजव्‍या हाताला ठेवावा. तंत्रसारात म्‍हटले आहे, की देवाच्‍या वामभागी ठेवलेला नैवेद्य अभक्ष्‍य होतो आणि त्‍याच्‍याबरोबर दिलेले उदक दारूसारखे होते. विष्‍णूला दाखवलेला नैवेद्य यजमानाने स्‍वतः भक्षण करावा. विष्‍णुदत्त नैवेद्य हा चारही आश्रमांतील लोकांना भोज्‍य ठरतो. अन्‍य देवांना दाखवलेला नैवेद्य ब्राम्‍हणाला द्यावा किंवा त्‍या त्‍या देवाच्‍या भक्‍ताला द्यावा असे सांगितले आहे.

देवापुढे नैवेद्याचे ताट ठेवण्यापूर्वी भूमी शुद्धिप्रीत्यर्थ त्या ताटाखाली पाण्याचे चौकोनी मंडल करतात. नंतर तुळशीचे पान अगर दुर्वेची काडी किंवा एखादे फूल घेऊन ते पाण्यात बुडवून पान प्रोक्षण करतात. ‘ॐ प्राणाय स्वाहा, ॐ अपानाय स्वाहा, ॐ व्यानाय स्वाहा, ॐ उदानाय स्वाहा, ॐ समानाय स्वाहा, ॐ ब्रम्हणे स्वाहा’ हा मंत्र नैवेद्य अर्पण करताना पानाभोवती पाणी फिरवत म्हणण्यात येतो. मंत्र एकदा म्हटल्यावर मध्ये ‘पानीय समर्पयामि’ असे म्हणून ताम्हनात उदक सोडून तोच मंत्र पुन्हा म्हटला जातो आणि शेवटी, नैवेद्यं समर्पयामि असे म्हणून देवाला नैवेद्य अर्पण झाला असे समजतात.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.