फैजपूरचे काँग्रेस अधिवेशन

प्रतिनिधी 12/12/2018

_Faizpur_Village_7.jpgइंडियन नॅशनल काँग्रेसचे पन्नासावे अधिवेशन 27 आणि 28  डिसेंबर 1936 रोजी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी'च्या  (महाराष्ट्र) जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील फैजपूर येथे झाले  होते. त्यात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. फैजपूर अधिवेशन काँग्रेससाठी महत्त्वाचे  होते. ते ग्रामीण भागात भरलेले पहिलेच मोठे अधिवेशन होते. त्यात शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने पावले उचलायला हवीत अशी मागणी केली गेली. कॉंग्रेस शेतकऱ्यांच्या भल्यासाठी संघर्ष त्या काळात करत होती. त्यांनी त्यामुळे अशी मागणी करणे साहजिक होते. फैजपूरचे काँग्रेस अधिवेशन आणखी एका कारणासाठी महत्त्वपूर्ण होते, ते म्हणजे त्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भूषवले होते.

त्या अधिवेशनाच्या तयारीसाठी स्वागत समितीचे गठन करण्यात आले होते. त्या समितीच्या सचिव पदाची जबाबदारी धनाजी नाना चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. गांधीजी स्वतः कार्यक्रमाची तयारी कशी सुरू आहे हे पाहण्यासाठी 22 डिसेंबर रोजीच धनाजी नाना चौधरी यांच्या खिरोदा गावातील स्वराज्य आश्रमात गेले होते. गांधीजी आश्रमातील कार्य आणि व्यवस्थापन पाहून प्रभावित झाले होते. त्यांनी धनाजी नाना चौधरी यांचे कौतुक केले. त्यावेळी त्यांनी शिवाय खिरोदा हे माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे असे उद्गार काढले होते. धनाजी नाना चौधरी यांनी अनेकदा स्वातंत्र्य चळवळीसाठी झालेल्या लढ्यांत सक्रिय सहभाग घेतला होता.

काँग्रेसमधील समाजवादी विचारांचे अच्युतराव पटवर्धन, कमलादेवी चटोपाध्याय व ए. पी. सिन्हा यांनी काँग्रेसच्या जनरल सेक्रेटरींना 1936 च्या मार्च महिन्यात  सूचना केली होती, की काँग्रेसने त्या पक्षाचा लढा अधिक प्रभावशाली करण्यासाठी सर्वसामान्य लोकांना चळवळीशी जोडून घेतले  पाहिजे. तरच काँग्रेस तळागाळापर्यंत पोचू शकेल.

जवाहरलाल नेहरू यांनी तोच धागा पकडून त्यांचे भाषण केले होते. नेहरू म्हणाले,  की भारत हा देश शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे त्यांच्या समस्या या सर्वात महत्त्वाच्या ठरतात. त्या आपण जाणून घेतल्या पाहिजेत. त्यांना आपण आपल्या चळवळीशी जोडून घेतले पाहिजे. 

नेहरूंनी त्यांच्या  भाषणात तत्कालीन सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर अभ्यासपूर्वक आणि परखडपणे मते मांडली आहेत. फॅसिझम कसा वेगाने वाढला आहे. आता तर तो युरोप आणि जगावर प्रभुत्व मिळवण्याची धमक बाळगून आहे? ते समजून घेण्यासाठी, ब्रिटिशांच्या परराष्ट्र धोरणाचा अभ्यास केला पहिजे. त्यांचे धोरण कोणाचीही तमा न बाळगता नाझी जर्मनीचे सातत्याने समर्थन करत आहे, हे त्यांनी नमूद केले आहे.

त्याच अधिवेशनात एम. एन. रॉय यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून त्यांचा उल्लेख 'कॉम्रेड रॉय' असा केला गेला होता. तसेच, त्यांच्या कार्याची वारेमाप स्तुती केली होती. रॉय यांनी त्याला प्रतिसाद देताना सर्व कामगार संघटना, पक्ष यांना काँग्रेस पक्षात विलीन होऊन स्वातंत्र्य चळवळीला बळकटी द्यावी अशी भूमिका घेतली होती.

(संकलन : विकास पालवे)

लेखी अभिप्राय

माहितीपूर्ण !
अधिवेशनाची जागेचा फोटो पाहिला की आता राजकीय पक्षाची अधिवेशन कशी अलिशान असतात हेच समजते, ही मंडळी काय समाजहितासाठी करणार ?

अविनाश बरग15/12/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.