हा देश पायी चालणाऱ्यांचाच आहे!


_Payi_Chalanaryancha_1.jpgप्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या नव्या कवितासंग्रहात एक कविता आहे, ‘कवीला पडलेले पुस्तक प्रकाशनविषयक दु:स्वप्न’. ती कविता वाङ्मयीन व्यवहाराचे अंत:स्तर खरवडून काढते. ती केवळ आजच्या काळातील कवीच्या दु:स्वप्नाचे वेध घेते असे नाही; सर्व काळात परिस्थिती तशीच असते. कविता ही कवीची मूल्यवान निर्मिती असते, तरीही ती लोकांपुढे सादर करताना कवीच्या मनाची स्थिती दु:स्वप्नासारखी का असते? प्रश्न कायम असला, तरी ते वास्तव आहे. कवीला समजून घेणारे, त्याला मनापासून दाद देणारे भोवतालचे लोक, त्यांची कवितेकडे पाहण्याची बरीवाईट दृष्टी या बाह्य गोष्टींचे दडपण कवीवर असतेच; पण त्यापेक्षा कविता लिहिणारे कवीचे नितळ मन त्या सगळ्यात गढूळ होऊन जाईल की काय अशी धास्ती कवीला असते. खरी कविता भिडस्त असते. ती सावधपणे न्याहाळत असते प्रकाशन समारंभाच्या प्रसंगीचा भवताल. संग्रहातील कवीला पडलेले ‘पुस्तक प्रकाशनविषयक दु:स्वप्न’ या कवितेतील कवीसारखे.

त्या पार्श्वभूमीवर ‘पायी चालणार’ या संग्रहातील कविता वाचकांना जणू व्रतस्थपणे आणि शब्दांच्या पलीकडे सांगतात, की ‘आम्ही पायी चालणार!’

‘पायी चालणार’ ही एक मूककृती आहे. कवी कोठलाही आवाज, कोठलीही घोषणा न करता जेव्हा ‘पायी चालणार’ असा निर्धार करतो, तेव्हा वर्तमानातील जे जे अनैतिक आहे, जे जे दुष्ट आहे आणि जे जे मानवतेला काळिमा फासणारे आहे तिकडे पाठ करून कवी नीती, सामाजिक सौहार्द आणि मानवता यांच्या दिशेने पाऊल टाकणार आहे. तेही तो ‘पायी चालणार’ आहे हे अधिक महत्त्वाचे. कवीच्या पायी चालण्याचे सुलभीकरण इतके करता येत नाही. कारण तो तसा काही संदेश देत नाही, आवाहन करत नाही, की उपदेश करत नाही. तसे करणे हेही त्याला कर्कश्श वाटते. त्याला निसर्गाच्या शांततेवर ओरखडा उठेल अशी भीती वाटते.

‘पायी चालणार’मध्ये नितळ व आरस्पानी कविता आहेत. कवी स्वच्छ पाण्याचे नैसर्गिक झरे असावेत तसे अनुभवाचे चित्रण वेगवेगळ्या निमित्ताने करत जातो. त्यातून त्या चित्रणाच्या मागे उभे असलेले प्रदूषणाचे धुरलोट अधिकाधिक गडद होत जातात. ते प्रदूषण केवळ हवेचे नाही, पाण्याचे नाही, तर ते विचारांचे आहे, नीतीचे आहे. माणसाच्या अमर्याद हव्यासातून उद्भवलेल्या एकूणच अस्तित्वाचे आहे. ते केवळ भौतिक अस्तित्वाचे नाही तर सांस्कृतिक व्यवहाराचेही आहे.

मानवी अस्तित्वालाच नख लावणाऱ्या सर्वव्यापी प्रदूषणाचा अनुभव केवळ नव्वदोत्तरी नाही. तो फार जुना, कदाचित प्राचीन आहे आणि ‘पायी चालणार’ हा हट्टही तसा प्राचीनच असणार! पण तो किती पारदर्शीपणे वाचकांपर्यंत पोचतोय हा खरा प्रश्न आहे. प्रफुल्ल शिलेदार यांच्या ‘पायी चालणार’ या संग्रहातून तो अधिक शुद्ध रूपात त्याच्यापर्यंत पोचतो हे मात्र नक्की.

प्रफुल्ल शिलेदार या संग्रहात सातत्याने भाषेच्या, शब्दांच्या व कवितेपलीकडच्या माणसाच्या आतील विवेकाचा किंवा शहाणपणाचा शोध घेतात. कवीची धडपड त्या अदृश्य, पण सनातन शहाणपणाला स्पर्श करण्याची आहे. ते शहाणपण काही रुपकांतूनही कवितेत प्रकट होते. उदाहरणार्थ ‘मुंगी’ ही कविता.

‘एक मुंगी माझ्यासमोर उभी राहून
घसा फोडून ओरडून सांगतेय
माझ्या मागे उभं असलेलं धरण
उंच होत होत वाढतंय
आणि ते फुटणाराय बेडकाच्या पोटासारखं

तिचं सारखं मलाच उद्देशून बोलणं
मला गैरसोयीचं वाटतंय
तिचं हसणं सहन होत नाही मला
पण ती इतकी सूक्ष्म आहे, की
तिला चिरडूही शकत नाही
माझ्या पायाच्या निबर अंगठ्यानं

ती लक्षात एव्हढ्याकरता राहते
कारण तिनं घसा फाडून सांगितलेलं
महत्त्वाचं आणि खरं ठरत जातं.’

कवितेत मुंगी ही ‘पायी चालणार’मधील प्रत्येक कवितेच्या दोन ओळींमधील एक जिवंत धगधगते सत्य म्हणून समोर येते. विकास-विकास असा घोष करणारा माणूस आतून घाबरलेला असतो. तो विकासापेक्षा संरक्षणावर अधिक बळ खर्च करतो. तो त्याचा भ्याडपणा लपवण्यासाठी धर्म, राष्ट्र व संस्कृती यांच्या महात्म्याचा मुकुट सतत धारण करतो. ते महात्म्य अबाधित ठेवण्यासाठी, ते धोक्यात कसे आले आहे याचा सर्व माध्यमातून प्रचार करतो. पण तो त्याच्या पायाच्या क्रूर अंगठ्याने विवेकाच्या मुंगीला चिरडूही शकत नाही, हे वास्तव आहे. ते वास्तव मांडण्याचा अट्टाहास म्हणजे, कवीचा उच्चार आहे, ‘पायी चालणार!’

ती मुंगी ‘जोखीम पत्करून’ या कवितेत परत येते. कवी लिहितो,

‘कविता लिहीत असताना
एक मुंगी टेबलाच्या कोपऱ्यावरून
दबकत, बुजत चालत आली
टेबलावरील पुस्तकांचा ढीग, कागदांची चळत
यांना वळसा घालून
दुसऱ्या कोपऱ्यावरील जुन्या डिक्शनरीकडे वळली

मुंगीला कोठलाही आवाज नसतो
तिला कसलं उपद्रवमूल्य नसतं
तिच्या निर्घृण हत्येनं
मुंग्यांचे लोंढे अंगावर धावून येत नाहीत
तिला अशा पद्धतीनं मारलं गेल्यानं
कोठल्याही गटाच्या, जातीच्या, धर्माच्या
भावना दुखावल्या जात नाहीत

संघटित होणं, प्रतिकार करणं, सूड घेणं, लढा देणं
मुंगीच्या आवाक्याबाहेरचं आहे
कवितेकडून तिला खूप आशा असतात
ती कवितेत शिरण्यासाठीच
लेखकाच्या टेबलावर येते
मात्र तेव्हाही तिच्या अवतीभवती
भय आणि आंधळेपण दाटून आलेलं असतं

तिला कवितेकडून खूप अपेक्षा असतात
म्हणून अभिव्यक्तीची जोखीम पत्करून ती कवितेत शिरण्यासाठी येते
कवितेत प्रवेश मिळण्याआधीच चिरडली जाते.’

_Payi_Chalanaryancha_2.jpgमुंगी ही एक सत्य म्हणून प्रफुल्ल शिलेदार यांच्या कवितेत येते. ती कवितेत प्रवेश मिळण्याआधीच चिरडली जाते हे ‘पोस्ट ट्रुथ’ वास्तव आहे. ती अवस्था जागतिक झाली आहे. त्या अवस्थेत कवितेकडून वाचकाला खूप अपेक्षा असतात; पण कवी किंवा कोणीही अभिव्यक्तीची जोखीम पत्करत नाही. मुंगीला प्रवेश नाही या भगभगीत वास्तवावर ठाम राजकीय विधान ‘पायी चालणार’ या संग्रहातून वाचकापुढे येते.

संग्रहात ‘वाघ’ आहेत आणि ‘गाय’देखील आहे. तेही सत्यापलीकडील सत्याने सर्वांगीण पर्यावरणात कशी वसाहत केली आहे, हे दोन ओळींच्या मधूनच ठामपणे वाचकाला सांगत राहतात. प्रत्येकाजवळ एक वाघ असतो, तसाच माझ्याजवळही कवितारूपात होता. लोक दूरदूरच राहायचे त्याच्यापासून आणि माझ्यापासूनही. पण मी कापली त्याची नखे, काढून टाकले दात आणि मिशीचे ताठ केसही कापले. तर आता वाघ आणि मी खूप आवडू लागलो सगळ्यांना. शेळ्या-मेंढ्यांमध्ये तर आमची तारीफ फारच सुरू आहे. वाघाच्या संदर्भात कवीची ही गोष्ट तशी रोजच्या अनुभवातीलच. पण ‘तेहतीस कोटी अपराध पोटात घालून’ या कवितेत हा कवी गायीसारख्या मुक्या जनावराचे सांस्कृतिक शोषण चितारताना माणसाच्या पराकोटीच्या स्वार्थाचा पंचनामाच करतो.

शहरातील रहदारीच्या रस्त्यावर बसलेल्या गायीकडे जाणारे-येणारे दुर्लक्ष करतात. गायीबद्दलच्या सर्व पवित्र भावना विस्मृतीत गेल्या आहेत. रस्त्यावर बसलेल्या गायीच्या नाका-तोंडात वाहनांचा धूर जात आहे. तिच्यावरूनच झालेल्या दंगलीशी तिला देणेघेणे नसते. घोंघावणाऱ्या माशा शेपटीने हाकलत, तेहतीस कोटी अपराध पोटात घालून रस्त्यात बसलेली गाय प्लास्टिकची कॅरीबॅग चघळत असते. गायीच्या निमित्ताने माणूस किती हीन झाला आहे; त्याने सांस्कृतिक अस्मिता आणि भाबड्या भक्तांचे शोषण यासाठी गायीसारख्या प्राण्यालाही सोडले नाही ही भावना अस्वस्थ करणारी आहे. संस्कार, नीती आणि करूणा वगैरे सर्व पुस्तकी मूल्ये गोठून गेली आहेत. जनावराच्या कातडीपेक्षाही माणसाचे मन निबर झाले आहे. अशी अनेक अर्थवलये शिलेदार यांच्या कवितेतून अस्वस्थ करतात. आकाशात झेप घेणारे मानवी मन मातीपासून तुटल्यामुळे माती माती झाले आहे.

अशीच अनेक परिमाणे असलेली ‘पायी चालणार’ या शीर्षकाची कविता संग्रहाच्या अखेरीस येते, ती समकालीन वास्तवावर काही थेट विधाने करते. पायी चालणे ही सत्याच्या, न्यायाच्या, नीतीच्या, निसर्गाच्या आणि शुद्ध जगण्याच्या जवळ जाणारी जणू स्वाभाविक कृती आहे. पायी चालणाऱ्यांच्या मनात ती वेगळी जाणीव नसेलही, पण कवी लिहितो,

‘हा देश पायी चालणाऱ्यांचाच आहे.
फार कमी लोकांजवळ आहे सायकल
त्याहून कमी लोकांजवळ
मागून येणाऱ्यांच्या नाकात
धूर सोडणारी बाईक
मूठभरच लोक
जमिनीला स्पर्शही न करता फिरतात’

किंवा या ओळी बघा :

‘पायी चालण्यानं हवाच काय
कोणाचं मनही कलुषित होत नाही'
आणखी एक गुपित कानात सांगतात
‘मासेदेखील पाण्यात
पायीच चालतात...’

यावर अजून वेगळे काही भाष्य करण्याची गरजच नाही! अभिव्यक्तीचाच नव्हे तर विचारांचे प्रदूषण टाळून शुद्ध जीवनाचा आग्रह धरण्याच्या संदर्भात मराठी कविता किती आश्वासक आहे याचा ताजा पुरावा म्हणजे प्रफुल्ल शिलेदार यांचा हा कवितासंग्रह.

‘पायी चालणार’
प्रफुल्ल शिलेदार (9970186702, shiledarprafull@gmail.com)
पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
पृष्ठे : 117
किंमत 175 रुपये

- प्रमोद मुनघाटे, pramodmunghate304@gmail.com

लेखी अभिप्राय

अत्यंत सक्षम समीक्षा आहे। मुख्य म्हणजे सध्या सोप्या शब्दांत कवी उलगडून दाखवण्याचे कार्य तुम्ही केले आहे. नवीन अभ्यासकांना आणि वाचकांना या समीक्षात्मक लेखाचा उपयोग नक्की होईल.

Sonia Sawant07/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.