धर्मनिष्ठा बाद ठरवूया!


_Dharmanishtha_1.jpgजग आधुनिक उपकरणांमुळे जवळ आलेले आहे. मात्र जगाला त्याच्या शोधाद्वारे जवळ आणणारा मनुष्य माणूस म्हणून एकमेकांपासून दूर जात आहे! सर्वसामान्य माणसांस माणसांसोबत राहण्यास आवडते. माणसाने माणुसकीच्या या प्रवृत्तीमुळेच संस्कृती, संप्रदाय व राष्ट्रे उदयास आणली, विकसित केली. माणसे परस्परांपासून कितीही भिन्न असली, तरी ती माणूस म्हणून खोलवर सारखी आहेत. त्या दृष्टीने त्यांना समान लेखले पाहिजे. पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक महामानवाने सर्व माणसांचे कल्याण सारखे व्हावे म्हणून प्राणार्पण केले आहे. चार्वाक, गौतम बुद्ध , वर्धमान महावीर किंवा पाश्चात जगातील, सॉक्रेटिस - त्यांचा शिष्य गण किंवा आशियाई ख्रिस्त वा महंमद पैगंबर. सर्वांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ हीच शिकवण मानवजातीला दिली. त्याची सुरुवात फ्रान्सिस ऑफ असिसि यांनी बाराव्या शतकात केली. त्याचमुळे ‘मॅग्ना चार्टा’ हा सर्व मनुष्याचे हक्क समान आहेत हे सांगणारा कायदा प्रथम इंग्लंडमध्ये झाला. त्याच दरम्यान, तेराव्या शतकात भारतवर्षात ज्ञानेश्वरांनी जगातील सर्व लोकांसाठी ‘पसायदान’ मागितले. पंधराव्या शतकात इरॅस्मससारख्या धर्मगुरूने ख्रिस्ती धर्मसंस्थेच्या शब्दांपेक्षा मानवी विवेकाला जास्त महत्त्व दिले. जागतिक धर्मपरिषद 1893 मध्ये भरण्यापूर्वी अनेक महामानवांनी माणुसकी किंवा मानवतावाद हे मानवजातीच्या कल्याणाचे सूत्र आहे असे अधोरेखित केले. स्वामी विवेकानंद यांनी जगातील सर्वांना ‘बंधूभगिनींनो’ असे संबोधून पृथ्वीवरील सर्व मनुष्यजमात एक कुटुंब आहे याची ग्वाही दिली.

असे मार्गदर्शन मिळत असताना व आधुनिक पथावर प्रगतिशील राहताना मानव माणसामाणसांत धर्म, समाज जात आणि लिंग या मुद्यांवर भेदाची दरी करत राहिला. अशी व्यक्ती तिच्या निष्ठेपायी दुसऱ्या माणसास परका मानते. निष्ठेचे प्रकार भिन्न आहेत - धार्मिक निष्ठा, सामाजिक निष्ठा, राष्ट्रीय निष्ठा, भाषिक निष्ठा... ही यादी अशीच वाढत जाईल. मानवजातीचे सर्वांगीण कल्याण होण्यासाठी कोठली निष्ठा श्रेष्ठ आहे? कोठली निष्ठा योग्य आहे? व्यवहार्य आहे?

स्वामी विवेकानंदांचे ‘माझ्या सर्व जागतिक बंधुभगिनींनो’ हे अभिवादन स्वप्न न राहता व्यवहारात आणण्यासाठी किंवा ज्ञानेश्वर माऊलींचे ‘पसायदान’ पूर्ण व्हावे यासाठी निष्ठा तपासायला पाहिजेत.

निष्ठा तपासण्याचे ठरवले किंवा निष्ठेची चिकित्सा करण्याचे म्हटले, की निष्ठा निर्माण कशा होतात किंवा त्या जोपासल्या जातात त्याची पार्श्वभूमी समजणे गरजेचे आहे.

बुद्धी ही व्यक्तीची नैसर्गिक देणगी आहे. ती उपजत असते. म्हणजेच ती जन्माबरोबर व्यक्तीत असते. त्या बुद्धीतूनच व्यक्तीच्या विचाराची, विवेकाची प्रसवण होत असते. बुद्धी लहान वयात निष्कलंक किंवा भेदविरहीत असते. मात्र बालकाची वाढ होत असताना कुटुंबात, समाजात व धार्मिक संप्रदायात त्याला निष्ठेचे बाळकडू दिले जाते. धर्म, राष्ट्र व जात असा कोठलाही भेद ठाऊक नसलेल्या त्या लहान ‘जागतिक मानवा’ला तू हिंदू आहेस, ख्रिस्ती आहेस, अमूक एक जातीचा आहेस अशा धार्मिक निष्ठा दिल्या जातात. त्याचप्रमाणे तो थोडा मोठा झाल्यावर, त्याला तू भारतीय आहेस किंवा ज्यू आहेस किंवा अरब आहेस किंवा युरोपीयन आहेस असे सांगितले जाते. निष्कलंक असलेले ते बाळ माणूसपण सोडून हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती, भारतीय किंवा युरोपीयन होऊ लागते. जन्माला येताना अखिल मानव जातीचा नागरिक असलेल्या त्या बालकाला या निष्ठेच्या कवचांमुळे भेद दाखवून वेगळे केले जाते.

व्यक्ती निष्ठेमुळे किती क्रूर वागू शकते, अविचारी बनू शकते व दुसऱ्या व्यक्तीवर अन्याय करू शकते त्याचे एक उदाहरण –

प्रमिला जिवंत असल्यास मी तिला पूर्णपणे मारतो, नंतर तुम्ही मला अटक करा. असे पोलिसांना विनंती करणारा प्रमिलाचा बाप, ज्याने प्रमिला गर्भवती असताना तिच्या वाढदिवशी, 18 जून 2013 रोजी गळा दाबून तिचा खून केला, कारण प्रमिलाने जातीच्या नसलेल्या दीपक कांबळे या तरुणाशी लग्न केले. जातीची निष्ठा! परिणाम महाराष्ट्र शासनाने 13 एप्रिल 2016 रोजी सामाजिक बहिष्काराविरूद्ध कायदा केला. न्यायालयाने प्रमिलाच्या बापाला फाशीची शिक्षा ठोठावली.

_Dharmanishtha_3.jpgगांधी म्हणत : मला केवळ भारताचे नव्हे, तर भूतलावरील सर्व मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे. ही उदात्त मानवतावादी भूमिका सहिष्णूतेच्या संकल्पनेचा गाभा आहे. स्वत:चे स्वात्र्य हे इतरांचे स्वात्र्य संकुचित करण्यासाठी नाही हे भान असणे म्हणजे सहिष्णुता. धर्माला तत्त्व असते, नियम नव्हे. तत्त्वाचे पालन करण्यासाठी मार्गदर्शक बाबी म्हणून नियम असणे शक्य आहे, परंतु नियम तत्त्वाशी विसंगत असू शकत नाही.

हिंदू धर्माचे म्हणण्यापेक्षा भारतीय संस्कृतीचे तत्त्व सहिष्णूता आहे. बुद्ध धर्माचे तत्त्व करुणा आहे. जैन धर्माचे तत्त्व अहिंसा आहे. ख्रिस्ती धर्माचे तत्त्व प्रेम आहे. पैगंबराचे तत्त्व समता आहे.

परंतु या सर्व धर्मीयांचे अनुयायी ती तत्त्वे विसरून किंवा सत्तेच्या सोयीसाठी तत्त्वे बाजूला ठेवून, नियमांचे अवडंबर माजवून माणसामाणसांत फूट पाडत आहेत, भेद निर्माण करत आहेत, धर्माची तत्त्वे पायदळी तुडवत आहेत; हे कोणी लक्षातही घेत नाही. माणसाच्या मनात माणसाविषयी प्रेम म्हणजे माणुसकी किंवा मावनतावाद हे धर्माशिवाय असू शकते. कारण प्रेम किंवा अहिंसा किंवा सहिष्णूता हे तत्त्व आहे. त्याला धर्मांचे बंधन येते तेव्हा माणुसकी खुंटते.

खरे म्हणजे धर्म नावाची संघटना व्यक्तीच्या मृत्यूनंतर जीवनाचा हवाला देत माणसाचे जीवन ताब्यात घेते व त्याला धार्मिक गुलामीत ठेवते. नामदार गोखले म्हणाले, “ईश्वराच्या नावाने विषम समाजरचना करून, धार्मिकपणाचा टेंभा मिरवणारे लोभी त्यांच्या स्वार्थासाठी इतरांना वैचारिक गुलामीत ठेवतात. ते गुलाम मग स्वत:च्या बुद्धीने वागण्याचे टाळतात.” भारतात विषमता जातिव्यवस्था व वर्णव्यवस्था या धर्माच्या आधारे प्राचीन काळापासून निर्माण झालेल्या व देवाची मान्यता असलेल्या गृहीत धरण्यात आलेल्या आहेत. ही भारतीय समाजाची शेाकांतिका आहे. प्रत्येकाला सत्ता व संपत्ती हुबेहूब समान प्रमाणात मिळावी असा समतेचा अर्थ असू शकत नाही. कारण तो अर्थ व्यवहार्य नाही, परंतु कोणताही नागरिक/व्यक्ती इतर नागरिकाला/व्यक्तिला खरेदी करू शकेल इतपत श्रीमंत किंवा स्वत:ला विकणे भाग पाडण्याइतपत गरीब असता कामा नये हाच समतेचा अर्थ असू शकतो.

_Dharmanishtha_2.jpgज्योतिबा फुले म्हणतात, “जोपर्यंत ही विषम व विभक्त समाजव्यवस्था तिचे  सनातन स्वरूप ताठरपणे टिकवून आहे तोपर्यंत राज्यकर्ते परकीय असोत, की स्वकीय या देशातील रयतेला तिच्या गुलामीतून सुटका मिळण्याची शक्यता नाही.” माणसाचे माणूस म्हणून असलेले हक्क त्याला कोणीही, कधीही व कोठेही नाकारू शकत नाही. ही आधुनिक जगाची नांदी आहे हे सर्वोच्च न्यायालयाने भारतीय संविधानाच्या आधारे खाजगी जीवन जगण्याचा हक्क जाहीर करताना स्पष्ट केले आहे. जातीची निष्ठा, धार्मिक निष्ठा किंवा इतरही कोठली सामाजिक किंवा कौटुंबिक निष्ठा दोन प्रौढ माणसांना बंधनात ठेवू शकत नाही. कारण तसे करणे म्हणजे माणूस म्हणून त्याच्या स्वातंत्र्यांवर बंधन घालणे होईल. आधुनिक जगात ‘सेक्युलर’ हा शब्द प्रथम 1851 मध्ये वापरण्यात आला. “ज्याने माणसाचे सर्वोच्च कल्याण होते तो नीतीचा धर्म म्हणजे सेक्युलरिझन” असे जॉर्ज जेकब होलिओक या फ्रेंच तत्त्वचिंतकाने मांडले आहे.

दहशतवादी, धर्माच्या निष्ठेमुळे निर्माण झाले आहेत, तर युद्धे ही राष्ट्रीय निष्ठेमुळे! धार्मिक व राष्ट्रीय निष्ठा बाजूला सारल्या तर संपूर्ण मानवसमाज हा एक कुटुंब होईल. भारतीय संस्कृतीला अभिमानास्पद असलेली ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना पुढे नेण्यासाठी मला कोणत्या निेष्ठेची वा श्रद्धेची गरज आहे ते तपासण्याची हीच वेळ आहे. माणूस त्याच्या मी, आम्ही, आपण ह्या निष्ठा तपासणार का? त्याची चिकित्सा करणार का? तसे करणे माणूस म्हणून प्रत्येकाचे कर्तव्य आहे. कारण हिंदू, मुस्लिम, ख्रिस्ती इत्यादी निष्ठा चिकटण्यापूर्वी माणसाचा जन्म माणूस म्हणून झाला आहे हे ध्यानात येऊ द्या.

येणारा काळ नीतीने जगण्याच्या मानवतावादी समाजाचा असेल, ज्या दिवशी धार्मिक, राष्ट्रीय व माणसामाणसांत भेद करणाऱ्या, फूट पाडणाऱ्या भाषिक निष्ठा गळून पडतील त्या दिवसापासून मानवी समूह या पृथ्वीतलावर शांततेने नांदू शकेल.

- अतुल आल्मेडा, atulalmeida@yahoo.co.in 

(जनपरिवार, ३० एप्रिल २०१८ वरून उद्धृत)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.