इंदूरचे श्याम खरे


_shyam_khare_1.jpgइंदूरचे श्याम खरे पंच्याऐंशी वर्षांचे आहेत. ते व्यवसायाने सिव्हिल इंजिनीयर; त्यांची निष्ठा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. पण त्यांचे आयुष्य साठाव्या वर्षांनंतर एकाएकी बदलून गेले. त्यांना अचानक पद्य लेखनाचा छंद लागला. ते त्यास गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह असे म्हणतात. खरे यांना अनुग्रह झाला 1995 मध्ये. तोपर्यंत त्यांनी ‘वनवासी कल्याणाश्रमासाठी’ सेल्व्हासा येथे दोन वर्षें काम केले. तेथेच त्यांना गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाची टेप ऐकण्यास मिळाली. ते त्यामुळे इतके भारावून गेले, की त्यांनी 20 फेब्रुवारी 1995 या दिवशी अनुग्रह घेतला आणि ते राममय होऊन गेले! त्यांनी प्रथम लिहिले ते त्यांच्या प्रवचनांचे बाराशेपन्नास ओव्यांचे पुस्तक. परंतु त्याच सुमाराला, त्यांच्या वाचनात हिंदी ‘हायकू’कार भगवतशरण अग्रवाल यांचे हिंदी ‘हायकू’चे पुस्तक आले आणि त्यांना तो हायकू लिहिण्याचा छंद लागला. त्यातून त्यांचा ‘काहूर’ नावाचा कवितासंग्रह निर्माण झाला आहे. त्यांनी शिरीष पै यांच्या ‘हायकू’ वाचल्या आहेत. त्यांनी शिरीष पै यांच्याशी कधी तत्संबंधी संवादही साधला होता. त्यांचा पुण्याच्या ‘हायकू वर्ल्ड’ नावाच्या संस्थेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कारदेखील केला आहे.

खरे यांचे तोपर्यंतचे जीवन ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’च्या विचारांनी भारलेले असले तरी त्यांनी कन्सल्टिंग इंजीनियर म्हणून मध्य प्रदेशात मोठमोठी कामे केली. ते व त्यांच्या पत्नी, दोघेही इंदूरमध्येच ऐंशी वर्षांपूर्वीच्या जुन्या घरात राहतात. त्यांचे दोन्ही विवाहित मुलगे मुंबईत स्वतंत्र राहतात. त्यांचे त्यांचे व्यवसाय, घरसंसार तेथे व्यवस्थित चालू आहेत.

खरे यांनी गेल्या काही वर्षांत गीता मराठीत ओवीबद्ध केली असून ती ‘कुसुमाकर’ नावाच्या कवितेला वाहिलेल्या मुंबईच्या मासिकात क्रमश: प्रसिद्ध होत आहे. खरे म्हणाले, की “मी आणीबाणीत वीस महिने तुरुंगात होतो. मी तेथे दोन गोष्टी साधल्या. एक म्हणजे रोज एकशेएक सूर्यनमस्कार घालून प्रकृती ठणठणीत केली. मला आजतागायत शरीरप्रकृतीचा कसलाही त्रास नाही. दुसरे म्हणजे मी त्या वीस महिन्यांत भगवद्गीता पाठ (‘कंठस्थ’) केली. तीच आता ‘कुसुमाकर’मध्ये मराठी ओव्यांच्या स्वरूपात मालिका रूपाने येत आहे.” खरे यांची भावना ते सारे महाराजांनी करून घेतले अशी आहे. खरे यांना ते आणीबाणीतील बंदिवान म्हणून दरमहा पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळते. ते दोन गोष्टी आग्रहाने सांगतात. त्या बहुधा त्यांच्या या वयात स्वाभाविक आहेत. त्या गोष्टी म्हणजे ते ‘1943 चे स्वंयसेवक’ आहेत आणि दुसरे म्हणजे आम्ही मूळ बेडेकर. मला माझी मावशी, खरे यांच्याकडे दत्तक दिले म्हणून मी खरे यांचा श्याम झालो.

श्याम खरे, संपर्क : 9406667906, shyamskhare@gmail.com

- दिनकर गांगल, info@thinkmaharashtra.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.