गर्जे मराठीचे शाहीर – आनंद-सुनीता गानू


_Garje_Marathi_1.jpgउत्त्तुंग कर्तृत्वाची शिखरे उभारणाऱ्या आणि ज्ञानव्यासंगाची देदीप्यमान बिरुदे मिरवणाऱ्या परदेशस्थ मराठी व्यक्तिमत्त्वांचा धांडोळा घेणाऱ्या सुनीता आणि आनंद गानू यांनी त्यांच्या ‘गर्जे मराठी’ या पुस्तकाच्या दोन भागांतून मराठी अस्मितेला आगळीवेगळी सुमनांजली वाहिली आहे! दोन पुस्तके इंग्रजीत तयार झाली आहेत. त्यातील एक मराठीत करण्यात आले आहे.

सुनीता गानू या डोंबिवलीच्या सांस्कृतिक वातावरणात वाढल्या. त्यांचे आईवडील शिक्षक; वडील विज्ञान आणि गणित शिकवायचे, आई मराठी-हिंदी-इंग्रजी आणि संस्कृत.  त्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन आणि वाङ्मयीन सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या घरातच अवतरला. सुनीताचे वाचन भरपूर. वि.स. खांडेकर हे लेखक तिच्या विशेष आवडीचे. कवितांवर खास प्रेम- विशेष करून कुसुमाग्रज, पाडगावकर आणि सुरेश भट हे तीन कवी विशेष आवडते. त्यांचे मन वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या पल्लेदार नाटकांनी भारावले जाई. सुनीताने हौशीने एकांकिका आणि नाटके यांतून भूमिकाही वठवल्या.

तिचा नवरा आनंद याला पार्ल्याची समृद्ध सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभली. आई प्रसिद्ध आणि लोकप्रिय बालवाडी शिक्षिका. वडील काटेकोर शिस्तीचे. आनंदचे शालेय शिक्षण ‘पार्ले टिळक विद्यालया’त झाले. त्या काळी विलेपार्ले भाषा-मातृभूमी-देशप्रेम-शिक्षणाचे महत्त्व या मूल्यांनी भारलेले होते. आनंदला नाटके खूप आवडत. विशेष म्हणजे आनंदला नेहमीच काहीतरी ‘वेगळे’ करायला आवडायचे. त्याच्या आईच्या भाषेत ‘आक्रित’. सतत नवे प्रयोग करत राहायचे आणि कोणतीही गोष्ट छोट्या प्रमाणात करायची नाही. आक्रिताला पदर दोन असतात - नादिष्टपणा आणि ध्यास. आनंदचा नादिष्टपणा ध्यासात रुपांतरीत झाला, त्याची गोष्ट म्हणजे ‘गर्जे मराठी’!

सुनीता आणि आनंद, दोघे एकत्र आले ते फार्माशुटिकल्समध्ये पदवी शिक्षण घेताना. ते एकाच कॉलेजमध्ये शिकले. त्यांची मने विवाहबंधनात अडकण्याएवढी तेथेच जुळली. त्यांचा सहप्रवास सुरू झाला, 1979 साली. दोघांनाही कुटुंबाविषयी विलक्षण आस्था. जे करायचे ते दोघांनी मिळून. सर्वोच्च अग्रक्रम मुलांना. शैलेशला मुळाक्षरे शिकवण्यापूर्वी त्याला ‘सारे जहां से अच्छा’ हे गाणे शिकवण्यात देशभक्तीचे खोलवर रुजलेले संस्कार व्यक्त झाले. शैलेश आणि गायत्री ही त्यांची दोन अपत्ये. शैलेशने केमिकल इंजिनीयरिंगमध्ये बी ई केल्यावर ऑस्ट्रेलियामध्ये त्याने एचआर आणि फायनान्स या विषयांमध्ये एमबीए केले व सध्या तो सिंगापूर येथे ‘विलिस टॉवर्स वॅटसन’ या मल्टिनॅशनल कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर व भागीदार आहे. गायत्रीने अंधेरीच्या एस.पी. कॉलेजमधून आयटीमध्ये बी ई केल्यावर कॉम्प्युटर सायन्समध्ये अमेरिकेत एमएस आणि पीएचडी केले व सध्या ती ‘फेसबूक’मध्ये डाटा मॅनेजर म्हणून काम पाहते. मुले पंख लावून उडून गेली तेव्हा आनंद-सुनीता ही दोघे आईवडिलांच्या सेवेत रुजू झाली!

आनंदने त्याच्या करियरचा प्रवास 1980 साली, वयाच्या तेविसाव्या वर्षी झांबिया येथे ‘चिपाटा जनरल हॉस्पिटल’मध्ये सुरू केला. तोपर्यंत त्यांचे फार्मसीचे शिक्षण पूर्ण झाले होते. सुनीताही बरोबर होती. दोघांचे कार्यक्षेत्र एक असल्याने करियरच्या कक्षा एकमेकांशी जुळत होत्या. सुनीता आणि आनंद या दोघांनी मिळून झांबियात नोकरी केली आणि भारतात परत आल्यावर ‘सुनंद फार्माशुटिकल्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी’ स्थापन केली. सुनीताने 1980 ते 1984 या काळात झांबियामध्ये चारशे खाटांच्या ‘चिपाटा जनरल हॉस्पिटल’मध्ये प्रांतीय फार्मासिस्ट म्हणून काम करताना दोन जिल्ह्यांतील हॉस्पिटल्स आणि सत्तावीस ग्रामीण आरोग्य केंद्रे यांचे काम पाहिले होते. ती त्या काळात ‘चिपाटा जनरल हॉस्पिटल’च्या नर्सिंग स्कूलमध्ये फार्माकॉलॉजी हा विषय शिकवतही होती. ती दोघे 1985 साली झांबियातून परतल्यावर 1987 ते 1997 या काळात सुनीता ‘Apothecar’s’ या ओरल लिक्विड्स, कॅप्सूल्स आणि प्रोटीन सप्लिमेंट्स यांचे उत्पादन आणि मार्केटिंग बनवणाऱ्या कंपनीची प्रोप्रायटर होती. आनंद आणि सुनीता या दोघांनी मिळून स्वतःची कंपनी 1992 मध्ये इंजेक्टेबल उत्पादन या क्षेत्रात ‘सुनंद फार्माशुटिकल्स’ या नावाने सुरू केली. त्याशिवाय, सुनीताने ‘नालासोपारा आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज’मध्ये 1996 ते 2006 या काळात फार्माकॉलॉजीचे अध्यापनही केले.

_Garje_Marathi_3.jpgआनंद-सुनीता यांचे आयुष्य घर, प्रपंच, मुलांचे संगोपन, करियर असे सर्व मिळून चारचौघांसारखे सर्वसामान्य, परंतु उच्चस्तरीय होते. पण नंतर ती दोघे लेखक म्हणून घडले हा विशेष आहे. त्याचेही मूळ त्यांच्या बालपणीच्या संस्कारांमध्ये जाणवते. त्यांचे छंद त्या संस्कारांबरोबर जोपासले गेले.

आनंदच्या प्रवासी वृत्तीला झांबियामध्ये असताना बहर आला होता. आफ्रिका हा नैसर्गिक विविधतेचा प्रदेश आहे. त्या दोघांनी आफ्रिकेतील दहा देश पायाखाली घातले. त्यांनी स्वतः जंगलात गाडी चालवत, मधेच जेथे वाटेल तेथे मुक्काम करत यथेच्छ भ्रमंती केली. सुनीताने तिच्या गिर्यारोहणाच्या आवडीला पुरेपूर न्याय दिला. त्या दोघांचे सहजीवन हे इतके सहित होते, की लग्न झाल्यावर त्या दोघांपैकी कोणीही एकट्याने एकदासुद्धा फिरायला किंवा पार्टीला गेलेले नाही असे ती दोघे ठासून सांगतात. त्या दोघांनी जे काही केले ते मिळून. ‘गर्जे मराठी’ हे पुस्तकसुद्धा तसेच घडले. सुरुवातीला आफ्रिकेसारखा भ्रमंतीला वाटा दाखवणारा देश फिरल्यावर भटकंतीचा जणू छंदच जडला. त्यांनी त्यांची इंडिका घेऊन भारतातही मनसोक्त भटकंती केली. जमेल तसे जगाच्या नकाशावरील देशही त्यांच्या टप्प्यात येत गेले. सुनीताने क्रमशः रोजनिशी लिहिली. आनंदने त्याच्या प्रवासाच्या अनुभवांना शब्दबद्ध केले www.diyindiatravels.com वेबसाइटवर. तेथे त्या प्रवासाविषयक माहिती मिळते. वेबसाइटचे स्वरूप फक्त प्रवासवर्णन असे नसून; पर्यटकांनी त्यांचा प्रवास कसा निवडावा आणि तो त्यांचा त्यांनीच कसा आखावा- तेही कमीत कमी खर्चात याची दिशा देणारी अर्थवाही समीकरणे त्यात सापडतील.

असेच एक आक्रित होते, आनंदने लिहिलेले ई बुक ‘Enigma – Secret of GMA’. त्या पुस्तकात गमा या नावाची एक काल्पनिक राणी आहे. ती मनमानी कारभार कसा करते व त्यानंतर दूरदृष्टीची एक व्यक्ती तिच्याकडून चांगला कारभार कसा करवून घेते याचे चित्रण आहे. या आक्रिताबद्दल आनंदकडून ऐकणे मोठे मनोरंजक असते.

आनंदने ‘सुनंद फार्माशुटिकल्स’ ही कंपनी तीन कामगारांना बरोबर घेऊन 1996 मध्ये सुरू केली. सुनीता त्याच्याबरोबर होती. त्याने इंजेक्टेबल्सचे उत्पादन दुसरीकडून करून घेता घेता स्वयंपूर्णतेकडे वाटचाल केली. कंपनीची प्रगती काही काळात सव्वाशे कामगार आणि दहा हजार चौरस फुटांची इमारत दाखवू लागली. पण तो व्यवसाय सुरू करताना, वाढवताना, स्थिर करताना आणि सांभाळून ठेवताना जे अनुभव आले ते आनंदच्या संवेदनशीलतेला आव्हान देणारे ठरले. ट्रेड युनियन चळवळीच्या आरंभकाळात कामगारांच्या हक्कांसाठी कामगार लढ्याचे नेतृत्व करणाऱ्या कॉम्रेड डी.एस. वैद्य यांच्या नातवाला, आनंदला त्याच्या कंपनीतील कामगार आंदोलनाने मात्र कंपनी बंद करण्यास लावली! त्याने कंपनी गुंडाळण्याचा निर्णय 2006 साली विषण्ण मनाने मात्र घेतला. काम बंद झाले. विस्तारणारे क्षितिज सीमित झाले!

आनंद-सुनीता यांच्या जीवनात कंपनी बंद पडल्याने पोकळी निर्माण झाली. मुले मोठी होऊन स्वतंत्र झाली होती. आनंदच्या आईवडिलांनी त्यांना त्यांच्या उतारवयात मुलाप्रमाणे सांभाळण्याची जणू एक संधीच उपलब्ध करून दिली. पुढील तीन वर्षांत, प्रथम वडिलांचे छत्र हरपले. मागोमाग कॅन्सरने आईचा हळूहळू घास घेतला. त्यापूर्वी अतिशय बुद्धिमान अशी मोठी बहीण नीला हिलाही कॅन्सरने गाठले होते. कॅन्सरने जवळच्या व्यक्तींना दूर केल्यामुळे आनंदला कॅन्सरचा खूप राग आला, अगदी संताप झाला. मग त्याने कॅन्सरचा वेळेवर प्रतिबंध आणि निदान यासाठी जागरूकता आणण्याचे प्रयत्न सुरू केले. कॅन्सरच्या नावे दिल्या जाणाऱ्या महागड्या आणि कधी कधी अनाठायी उपचारांचा त्याला राग येऊ लागला. होता. तो कॅन्सरग्रस्त पेशंटना डॉक्टरांकडे घेऊन जाई आणि प्रसंग अक्षरशः भांडणावर जात. त्याने अत्यल्प शुल्कात तीन कॅन्सर निदान शिबिरे 2017 मध्ये आयोजित केली. त्यातील एक शिबिर घरकाम करणाऱ्या स्त्रियांसाठी निःशुल्क होते.

_Garje_Marathi_2.jpgआनंद आणि सुनीता यांच्यासाठी कालपट पूर्णपणे मोकळा झाला होता. पुन्हा दोघांची भ्रमंती सुरू झाली. त्या काळाला रेनेसान्स - नवनिर्मितीचा काळ म्हणावे का असा प्रश्न विचारावा इतकी अनुभवांची अव्यक्त उलघाल, घालमेल आणि उलथापालथ होत होती.  एका हाकेसरशी मदतीसाठी धावून जाणारा असा लौकिक झालेल्या आनंदचा जनसंपर्क दांडगा होता. अनेक माणसे भेटली होती, भेटत होती आणि मुख्य म्हणजे भेटणार होती.  अनेक अनुभव गाठीशी होते. आयुष्यही सर्वांसारखेच शिकवून गेले होते. अशा वेळी तो हरवलेला सूर त्यांच्या कानावर आला. बोर्इंग इंटरनॅशनलचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट डॉ. विजय केसकर भेटले, लोखंडाच्या मळीपासून रनवे आणि हायवे बनवण्याचे तंत्रज्ञान शोधणारे, ऑस्ट्रेलियाच्या सर्वोच्च नागरी सन्मान Order of Australia Medal याने विभूषित डॉ. विजय जोशी भेटले. त्यांची थक्क करणारी विश्वभरारी पाहून आनंदचे मन नादावले. मनात मराठीच्या अभिमानाची संगीत कारंजी फुटू लागली. मॉरिशसच्या पुतळाजी अर्जुन यांनी म्हटलेले आठवले, “शिवाजी महाराज नसते तर आज हिंदुस्थान नसता....” आनंदला बाबांचे शब्द आठवले “आपण कोण आहोत याचा अभिमान असला तरच इतर समाज आणि त्यांच्या आस्था यांना चांगले समजून घेता येईल.” एका रात्रीत, आनंद आणि सुनीता यांनी माहितीजाल पिंजून काढले आणि त्या रात्रीत जन्माला आले एक आक्रित... एका ध्यासाच्या रूपात - जगभर विखुरलेल्या मराठी सुरांना गवसणी घालून ‘गर्जे मराठी’ हा वाद्यमेळ जमवण्याचे!

लोकमान्य टिळक म्हणायचे, ‘सा विद्या या विमुक्तये’. टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी 01 ऑगस्ट 2017 रोजी मुक्त मराठी विद्याव्यासंगींचा पहिला वाद्यमेळ ग्रंथरूपात आकाराला आला. ‘गर्जे मराठी’ या ग्रंथाचे भव्य स्वरूपात प्रकाशन झाले. ती सुरुवात आहे आनंद-सुनीता यांच्या नव्या उद्योगाची.

- शैलजा बकुळ, shailajabakul@gmail.com

(मूळ लेख दैनिक 'दिव्य मराठी'च्या 'मधुरिमा' पुरवणीत पूर्वप्रसिद्ध.)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.