शरद तांदळे - वंजारवाडी ते लंडन, व्हाया पुणे (Sharad Tandle - Vanjarwadi to London via Pune)


_RR_2.jpgवंजारवाडी (जिल्हा बीड) ते लंडन व्हाया पुणे हा प्रवास आहे शरद उत्तमराव तांदळे या तरुण उद्योजकाचा आणि अर्थातच, हा प्रवास आहे एका यशोकथेचा. वंजारवाडी या छोट्याशा गावातून सुरुवात करून, पुण्यासारख्या ठिकाणी येऊन धडपडत, कष्ट करत, अडचणींना सामोरे जात उद्योजक बनलेल्या शरद तांदळे यांच्या यशावर मोहोर उमटली ती इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून. त्यांच्या हस्ते शरद यांना लंडनमध्ये तरुण उद्योजकतेचा पुरस्कार मिळाला. पुरस्कार मिळाला तेव्हा ते छत्तीस वर्षांचे होते आणि साल होते 2016. शरद यांच्या उद्योजकतेच्या प्रवासातील तो उत्कंठावर्धक क्षण. त्यांनी त्याहून समाधानाचा व कृतार्थतेचा क्षण अनुभवला, जेव्हा त्यांची ‘रावण - राजा राक्षसांचा’ ही कादंबरी 2018 साली प्रसिद्ध झाली व वाचकांनी उत्स्फूर्तपणे तिचे कौतुक केले तेव्हा! कादंबरीच्या अल्पावधीत साडेचार हजार प्रती विकल्या गेल्या.

शरद यांचे वडील उत्तमराव तांदळे यांनी वंजारवाडी सोडून बीड शहर गाठले. ते माध्यमिक शाळेत शिक्षक होते. शरद यांचे बीडच्या ‘सावरकर विद्यालया’त व ‘बलभीम कॉलेज’मध्ये बारावीपर्यंत शिक्षण झाले. नंतर त्यांनी मेकॅनिकल इंजिनीयरिंगसाठी मोठा वाव असल्याच्या ऐकीव माहितीवर औरंगाबाद कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांना लहानपणापासून वेगळे काही करण्याची इच्छा असे. त्यांनी तरुणांनी उद्योजक व्हावे, दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील तरुणांना छोट्या छोट्या उद्योगांची माहिती व्हावी यासाठी ‘विजयी युवक’ नावाचे मासिक कॉलेजात सुरू केले. मासिकामध्ये स्वयंरोजगारांची माहिती दिली जात असल्याने त्याला काही प्रमाणात यश मिळाले. परंतु मासिक आर्थिक अडचणीत सापडल्याने बंद झाले. शरद विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवून त्यांना मदत करत. ते विद्यार्थ्यांमध्ये ‘शरदभाऊ’ या नावाने ओळखले जात. शरद यांना त्यांची ‘भाऊगिरी’ वाढत गेल्याने इंजिनीयरिंगच्या शेवटच्या वर्षी एका पेपरमध्ये अपयश आले, पण त्यांनी जिद्दीने इंजिनीयरिंग पूर्ण केले.

शरद यांनी त्या मधील काळात वेगवेगळे प्रयोग करण्याच्या नादात मोठे कर्ज करून ठेवले व तशा परिस्थितीत पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. तेथे त्यांना चार हजार रुपयांचा जॉब मिळाला. तशात त्यांना एका ‘सॅप कोर्स’ची माहिती कळली व शरद हैदराबादला गेले. आईने सोने गहाण ठेवून कोर्ससाठी पैसे दिले. ते हैदराबादला जाताना औरंगाबाद येथे मित्राकडे थांबले. तर तेथे त्यांनी पैसे ठेवलेली पँटच गायब झाली! सत्तर हजार रुपये चोरीला गेले! मित्राने दिवसभरात अठरा हजार रुपये गोळा करून दिले. शरद तांदळे सांगतात, “हैदराबादला सहा महिने खाण्यापिण्याचे प्रचंड हाल झाले. खिशात पैसे नसल्याने अनेकदा उपाशी झोपावे लागले. मात्र, मी तो ‘कोर्स’ पूर्ण केला.”

_RR_4.jpgत्यांची अपेक्षा पुण्यात परतल्यावर चांगला जॉब मिळेल अशी होती. मात्र, त्यांना जॉब काही मिळाला नाही. त्यांनी अनेक उद्योग-नोकऱ्या यांचा शोध केला, पण जीवनात अपयशच येत गेले. मात्र, त्यांनी थांबायचे नाही, खचायचे नाही, तर लढायचे आणि फक्त लढायचे एवढाच विचार डोक्यात ठेवला. एके दिवशी, त्यांना जुना इंजिनीयर मित्र भेटला. त्याने धनकवडीमध्ये ट्रान्सफॉर्मर बसवण्याची विचारणा केली. शरद यांनी पूर्वज्ञान नसताना ते काम यशस्वी करून दाखवले. त्या कामाचे त्यांना चार हजार रुपये मिळाले. त्यानंतर त्यांना अंडरग्राउंड केबल टाकण्यापासून पाइपलाइनची कामे, एकामागोमाग एक मिळत गेली. त्यांचा त्यांच्या सर्वांशी मिळून-मिसळून राहण्याच्या स्वभावामुळे जनसंपर्क वाढत गेला. त्यांनी मोठ्या संघर्षातून पुणे महापालिकेची कामे करण्याचे लायसन्स मिळवले. मग त्यांनी स्वतः लहान लहान टेंडरे भरणे सुरू केले. शरद उद्योगातील विविध अडचणींचे टक्केटोणपे पार करत उद्योजक बनले होते! मग मात्र ते कोठे अडखळले नाहीत. त्यांनी तीन वर्षांत एकशेपंच्याहत्तर कुटुंबांना रोजगार मिळवून दिला. त्यांचे काम अधिकृत काँट्रॅक्टर म्हणून पीडब्ल्यूडी, झेडपी, एमएसईबी, एमईएस या ठिकाणी सुरू आहे. शरद यांनी त्यांच्या कामाचा पहिला मोठा चेक हातात पडल्या पडल्या गावाकडे वडिलांना चारचाकी गाडी भेट म्हणून पाठवून दिली. वडिलांचे निधन 2011 साली झाले.

शरद यांची दखल राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. त्यांना लंडनचा पुरस्कार त्यानंतर मिळाला. त्यांना प्रिन्स चार्ल्स यांच्या हस्ते ‘वायबीआय यंग आंत्रप्रेन्यूअर ऑफ दि इयर, 2013’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तो समारंभ त्यांच्या लक्षात आयुष्यभर राहणार आहे. ते दृश्यच तसे होते. ते चमचमत्या सोन्याचा मुलामा असलेले भव्यदिव्य छत, जगावर राज्य केल्याची साक्ष सांगणाऱ्या ऐटदार भिंती, उमरावी बाज असणारा पायाखालील लाल गालिचा अशा लंडनच्या सभागृहात समारंभ झाल्याचे ओढीने सांगतात. शरद यांना महत्त्वाच्या संस्थांमध्ये मार्गदर्शनासाठी भारतभर बोलावण्यात येते. त्यांनी तीसहून अधिक जणांना उद्योजक बनवले आहे. ते त्यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या कामगारांना आणि संघर्षात मदत केलेल्या सर्वांना देतात. ते उद्योजकता विकसित करण्याचे कार्य अव्याहतपणे पुढे सुरू राहणार याची ग्वाही देतात.

शरद यांनी ‘इंडियाना’ नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली अाणि तरुण उद्योजकांसाठी संपूर्ण भारतात गव्हर्मेंट डिपार्टमेंटचे टेंडर दाखवणारे ‘ई-टेंडरवर्ल्ड’ नावाचे टेंडरिंग सोल्यूशनचे अॅण्ड्रॉईड अॅप्लिकेशन बनवले. त्यांनी ‘How to become a contractor’ नावाचा कंत्राटदार बनण्यासाठी उपयुक्त असणारा ट्रेनिंग कोर्सदेखील सुरू केला आहे. त्यांना तशा विविध गोष्टी घडवायच्या असतात. शरद यांच्या ‘इनोव्हेशन इंजिनीयर्स अँड काँट्रॅक्टर्स’ उद्योगाची वार्षिक उलाढाल चार कोटी रुपयांची असून येत्या तीन आर्थिक वर्षांत ती सहा कोटींच्या घरात जाईल अशी अपेक्षा त्यांना आहे. शरद यांनी मोठ्या कंपन्यांच्या धर्तीवर स्वत:ची काही मूल्ये निर्माण केली आणि ती जपली आहेत. त्यांचा कटाक्ष ग्रामीण तरुणांना रोजगार देण्यावर असतो. ते त्यांना त्यांच्यातील हुन्नर पाहून मग प्रशिक्षित करतात.

_RR_5.jpgशरद तांदळे यांचे व्यक्तिमत्त्व पुराणकथेत शोभतील अशा चमत्कारांनी भरलेले आहे. ह्या इंजिनीयर माणसाने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी, लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना कादंबरी लिहिली; तीदेखील खूप सारे संशोधन करून, संदर्भ तपासून घेऊन. त्यांना कादंबरीचा विषय सुचला तो, ते लंडनला जाण्यासाठी विमानात प्रथमच बसले तेव्हा. त्यांना एकदम रावणाचे पुष्पक विमान आठवले, त्या पाठोपाठ गरुडपुराण.

शरद यांनी गरुडपुराणाचे पारायण वडीलांचे निधन झाल्यानंतर ऐकले होते. त्यात आत्मा मृत्यूनंतर कोठे जातो? यमपुरी कशी आहे? नचिकेत तेथून परत का व कसा येऊ शकला? अशी वर्णने आहेत. शरद यांचे औत्सुक्य जागे झाले व त्यांनी पुण्याला ‘नेर्लेकर ब्रदर्स’कडून पुराणवाङ्मयाचे सर्व खंड विकत घेऊन ते वाचून काढले. त्याच सुमारास त्यांची लंडन सफर घडून आली. त्यांना त्यानंतर रावणाने इतके पछाडले, की त्यांच्या व्यवसायाकडे 2013 मध्ये वर्षभर दुर्लक्ष झाले. धंदा कमी झाला, नफा घटला. ते म्हणाले, की माझे वेड माझी बायको पाहत होती. ती म्हणाली, ‘रावण लिहून काढा.’ अशी कादंबरी लिहिली गेली! धाकट्या भावाने ती अर्धी लिहून झाली तेव्हा तो म्हणाला, ‘लिहून काढ.’ त्यानेच मला आरंभी कादंबरी लेखन करणे किती अवघड आहे ते सांगितले होते. पण तोच माझा संपादकीय सल्लागार झाला.

शरद तांदळे यांनी स्वत:च कादंबरी प्रकाशित केली आहे. कादंबरीच्या साडेचार हजार प्रती विकल्या गेल्या आहेत. शरद म्हणाले, की आता तर अॅडव्हान्स देऊन विक्रेते पुस्तके मागवतात!

शरद तांदळे सदतीस वर्षांचे आहेत. त्यांची आई बीडला राहते. त्या शिक्षिका आहेत. शरद त्यांच्या पत्नी व भाऊ पुण्यात राहतात. शरद आता ‘मंदोदरी’ या व्यक्तीरेखेवर कादंबरी लिहिण्याचा विचार करत आहेत. ते म्हणाले, की तत्कालीन स्त्रीची मानसिकता आणि एकत्र कुटुंबव्यवस्था याबाबत माझा बराच विचार झाला आहे.

शरद तांदळे - 9689934481, tandale.sharad@gmail.com

- चैतन्य मचाले, achaitanya05@gmail.com
(महाराष्ट्र टाइम्स 10 जानेवारी 2015 वरून उद्धृत, संपादीत-संस्कारीत.)

Last Updated On 20th Sep 2018

शरद तांदळे यांनी लिहिलेल्या 'रावण - राजा राक्षसांचा' या कादंबरीचा परिचय वाचा.

लेखी अभिप्राय

Please guide me for becoming Electrical Contractor my cell 9665 4591 71

Vijay R Lahane29/09/2018

MI PAN ASACH AHE.

rupesh ramesh …06/08/2019

तुमची story ऐकून प्रोत्साहन दिले आणि ते चघळत न बसता स्वतःहा स्टोरी बनवायला लागलोय.

Valmik Garje 10/09/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.