ज्ञानभाषा मराठीकडे


_MazyaMarathi_Maticha_1.jpgसंत ज्ञानदेवांनी मराठी भाषेच्या संक्रमणाला प्रारंभ केला. संस्कृत ही भारताची ज्ञानभाषा म्हणून ओळखली जायची. त्यामुळे सर्व ज्ञान, तत्त्वज्ञान त्या भाषेत ग्रंथबद्ध होते. ती कोंडी फोडण्यासाठी ज्ञानदेवांनी ते ज्ञान लोकभाषेत प्रवाहित केले आणि ‘मराठीचिये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू’ केला. परंतु त्यानंतर ललित साहित्य वगळता इतर भाषांतील ज्ञान मराठी भाषेत आणून त्या भाषेला ज्ञानभाषा म्हणून प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झालेला नाही. तो मान इंग्रजी भाषेने मिळवला. सर्व ज्ञानशाखांतील अद्ययावत ज्ञान त्या भाषेत बंदिस्त आहे. त्यामुळे ती भाषा अवगत करणे अपरिहार्य ठरते. ते ज्ञान मराठी भाषेत खुले केल्याशिवाय मराठी लोकांची भाषिक गुलामी संपुष्टात येणार नाही. ज्ञानदेवांनी तेराव्या शतकात जसे कार्य केले तसे भाषिक कार्य सद्यकाळात करावे लागणार आहे. सर्वसामान्य माणसे त्यांच्या दैनंदिन लोकभाषेतूनच व्यक्त होत असतात. वारकरी पंथाने तसा अवसर त्यांना दिला. तसा प्रयोग सर्व ज्ञानशाखांत ‘ऐसी अक्षरे रसिके मेळवीन’ होताना दिसतो का? पारमार्थिक क्षेत्रात ते कार्य संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकोबांनी केले.

म्हणूनच समाजजीवनाच्या अन्य क्षेत्रांत मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून रुजवण्याचे कार्य करावे लागणार आहे. मातृभाषेतून सर्व ज्ञान-विज्ञान, तंत्रज्ञान अनुवादित केल्यामुळे त्यांच्या भाषेत ज्ञानार्जन करण्याची संधी जर मराठी भाषक समाजाला लाभली तर इंग्रजी भाषेचे, शाळांचे अवास्तव स्तोम माजले आहे ते संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी गरज आहे मराठी माणसांनी दृष्टिकोन बदलण्याची. याचा अर्थ इंग्रजी भाषेचे ज्ञान संपादन करू नये असा नाही. उलट, अनेक भाषेचे ज्ञान असणे, इतर भाषा अवगत असणेही  व्यक्तिमत्वाच्या समृद्धीसाठी आवश्यक आहे. परंतु आपल्या मातृभाषेचा अव्हेर करून, तिच्याबद्दल न्यूनगंड बाळगून दुसऱ्या भाषेला शरण जाणे बरोबर नाही एवढेच! ते कार्य प्रत्यक्ष कृती आणि मातृभाषक चळवळ उभारल्याशिवाय होणार नाही. नुसता मराठीच्या नावाने टाहो फोडून अथवा परिपत्रकांचे फतवे काढून काहीही साध्य होणार नाही. त्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. मराठी माणसाची मानसिकता तशी बदलावी लागेल आणि भाषिक न्यूनगंड मिटवल्याशिवाय ते शक्य होणार नाही. तेराव्या शतकात जो प्रश्न वारकरी संताना पडला, त्यासाठी त्यांना लोकभाषेचा आग्रह धरावा लागला. तेव्हा संस्कृत भाषा आणि त्या भाषेला बंदिस्त करणारे तत्कालीन समाजधुरीण त्यांच्यासमोर होते. आज संस्कृत भाषेच्या जागी दुसरी भाषा आहे; पण मूळ प्रश्न आहे तोच आहे. महाराष्ट्र राज्याच्या भाषिक धोरणातून तेच दाखले, तेच संदर्भ द्यावे लागतात, याचा अर्थ काय? म्हणून हा केवळ भाषिक अस्मितेचा प्रश्न नाही; तर तो मराठी माणसाचा सांस्कृतिक प्रश्न आहे. त्या परिप्रेक्ष्यातून या प्रश्नाकडे पाहिले पाहिजे.

संत ज्ञानदेव यांचा मराठी भाषाभिमान, चक्रधरांचे-महानुभावांचे मराठी प्रेम, नामदेवांची मराठी भाषाभिव्यक्तीची प्रेरणा, संत एकनाथांचा मराठी भाषेबाबतचा रोकडा सवाल, संत तुकोबांनी गाठलेले लोकभाषेच्या गौरवाचे, लोकाभिमुख काव्याभिव्यक्तीचे शिखर आणि शिवाजी महाराजांनी सिद्ध केलेला ‘राज्यव्यवहार कोश’, संत रामदासांची ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ ही उक्ती… अशा प्रकारे, महाराष्ट्राच्या मानबिंदूंनी, त्यांच्या अस्मिताकेंद्रांनी महाराष्ट्र धर्माच्या जोपासनेसाठी केलेला प्रयत्न महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात महत्त्वपूर्ण आहे. भाषा टिकली, जगली तर राष्ट्र जगते या जाणिवेतून महाराष्ट्र धर्माच्या विकासासाठी मराठी भाषेचे संवर्धन आणि विकास करणे हा कळीचा प्रश्न आहे.

महाराष्ट्राची राजभाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता 11 जानेवारी 1965 रोजी लाभली. तसेच, मराठी भाषेचे स्थान भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये राष्ट्रीय भाषा म्हणून तेराव्या क्रमांकावर आहे आणि जागतिक भाषांमध्ये मराठी भाषा दहाव्या क्रमांकाची भाषा म्हणून गणली जाते. भाषावार प्रांतरचना या तत्त्वानुसार इतर राज्यांची निर्मिती झाली; पण मराठी भाषकांना महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यासाठी काही जणांना प्राणांची आहुती द्यावी लागली, तेव्हा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी मराठी भाषेच्या विकासासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केले. परंतु माधव ज्यूलियन यांनी जे म्हटले होते ‘हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू | हिला बैसवू वैभवाच्या शिरी |’ ही परिस्थिती मात्र आली नाही. केवळ कागदावर मराठीला राजभाषेचा दर्जा लाभला, परंतु ती वास्तवात, प्रशासकीय व अन्य व्यवहारात मात्र अंग चोरून वावरत आहे. त्याला राजवैभव कसे म्हणायचे? अजूनही मराठी माणसाने तिला वैभवाच्या शिरी बसवले नाही हे कटू सत्य आहे. असे का झाले? त्याचे उत्तर मराठी माणसाच्या मानसिकतेत आहे. तात्त्विक पातळीवर अनेक निर्णय होतात, पण त्याच्या अमलबजावणीमध्ये कृतिशीलता आढळत नाही. अलिकडेच २०१४ मध्ये डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली गठित झालेल्या ‘मराठी भाषाविषयक धोरण समिती’ने जो अहवाल शासनाकडे सादर केला आहे, त्यात प्रारंभीच नमूद केले आहे, ‘11 जानेवारी 1965 रोजी राजभाषा म्हणून मराठी भाषेला मान्यता देण्यात आली, या घटनेस पन्नास वर्षें होत आली तरी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांत मराठी भाषेचा वापर ज्या प्रमाणात व्हावयास पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाही.’ हा अभिप्राय अत्यंत परखड व वास्तवदर्शी आहे. या समितीने शासनाकडे पुढील पंचवीस वर्षांच्या मराठी भाषेच्या वाटचालीचा जो अहवाल सोपवला आहे त्यात अनेक शिफारशी करण्यात आल्या आहेत. त्या स्वीकारून, त्यावर चर्चा करून मराठी भाषेच्या विकसनाचे उत्तरदायीत्व शासनाने निभावले पाहिजे.

कोणत्याही शिक्षणपद्धतीमध्ये मातृभाषेतून शिक्षण द्यावे हे सर्वमान्य तत्त्व आहे. ज्ञानार्जन व ज्ञाननिर्मिती ही मातृभाषेतूनच अधिक सुलभपणे होत असते. आज जी अनेक  प्रगत राष्ट्रे आघाडीवर दिसतात त्यांच्या शिक्षणामध्ये सर्व पातळींवर त्यांच्या मातृभाषा आघाडीवर आहेत. सर्व ज्ञानशाखांतील शिक्षण त्यांच्या मातृभाषेत दिले जाते, मग आपण ही परवशता कधी नाकारणार? मराठी समाज त्या मूलभूत प्रश्नापासून खूप दुरावत आहे. शिक्षणात कोणत्या भाषेला अग्रक्रम दिला जातो त्यावर त्या भाषेची समृद्धी आधारित असते. सर्व अभ्यासक्रम त्यांना मातृभाषेत उपलब्ध करून दिले तर मराठी विद्यार्थ्याला इंग्रजी शाळेत जाण्याची गरज उरणार नाही. उलट, आपल्याकडे शेतकऱ्यासाठी आवश्यक असलेला ‘कृषी’ हा अभ्यासक्रमही इंग्रजीमध्ये शिकवला जातो! अशाने कोणता फायदा कृषिनिष्ठ वर्गाला होईल? म्हणूनच भाषा समितीने जी पंचवीस उद्दिष्टे ठरवून अहवाल दिला आहे, त्यांची पूर्तता करणे निकडीचे आहे. तसेच, मराठी भाषेच्या संवर्धनाबाबत मागे पडलेल्या अनेक मुद्यांच्या परिपूर्तीचीही गरज आहे. त्यासाठी जनआंदोलन उभारावे लागले तरी चालेल! यासाठी मराठी अभ्यासक्रम राबवणारी विद्यापीठीय मंडळे, विविध भाषिक- साहित्यिक मंडळे, साहित्यसंस्था यांनी त्यांच्या निष्ठा एकवार तपासून पाहण्याची गरज आहे. मराठी भाषकाला, समाजनिष्ठेला, केंद्रस्थानी ठेवून ध्येयधोरणे कृतिशीलपणे राबवली तरच ज्ञानदेवांची, ‘अमृतातेही पैजा जिंके’ ही उक्ती सार्थ होऊ शकेल आणि कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिन ‘मराठी भाषा दिन’ म्हणून अधिक सामर्थ्यशाली ठरेल, उत्सवी होईल.

- अशोक लिंबेकर

ashlimbekar99@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.