हेमंत कर्णिक यांचे हटके विचारविश्व


_HemantKarnik_YnacheHatkeVicharvishw_1.jpgहेमंत कर्णिक यांचे ‘अध्यात आणि मध्यात’ हे पुस्तक म्हणजे 1980-90 च्या काळात ‘आपलं महानगर’ या दैनिकात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन आहे. लेखकाने त्या काळातील विविध प्रश्न, राजकीय वातावरण, समाजापुढे असलेल्या समस्या यावर पोटतिडिकीने लिहिले आहे. आजच्या काळाशी त्या काळाची तुलना होऊ शकत नाही, कारण सर्वच गोष्टींमध्ये प्रचंड उलथापालथ झाली आहे. तरीदेखील लेखकाने निर्धास्तपणे मांडलेले विचार हे कालबाह्य ठरत नाहीत. त्या काळात असे विचार मांडणे हे साहसच होते! लेखनात आढळून येते ती लेखकाची चिकित्सक विचारसरणी. लेखक प्रत्येक गोष्ट आहे तशीच न स्वीकारता, तो ती तिला तर्काचा मापदंड लावून स्वीकारतो. लेखकाने त्याच्या मनाला जे पटेल व जे रुचेल तेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

उदाहरणार्थ, लेखक ‘शिवाजीचा कंटाळा येऊ नये’ या लेखात म्हणतो - मराठी समाज जेव्हा सदोदित ‘शिवाजी शिवाजी’ करत बसतो तेव्हा तो हेच सांगत असतो, नाही का? की तीनशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या महापुरुषाची इतकी भजने गाणे, म्हणजे त्या नंतरचा तीनशे वर्षांचा इतिहास काही सांगण्यासारखा नाही! पण तसे तर अजिबातच नाही. महाराष्ट्राने कला, सामाजिक चळवळी, राजकीय नेतृत्व... अनेक क्षेत्रांत कर्तृत्ववान व्यक्ती निर्माण केल्या आहेत. मग एका शिवाजीलाच हे लोक इतके घट्ट धरून का बसले आहेत? शिवसेनेच्या वातावरणामुळे जो शिवाजी आजच्या काळात प्रतीत होत आहे, तो एकत्र येऊन जमावाच्या रूपाने हिंसा करणाऱ्यांना, सर्वसामान्य नागरिकांना दहशत दाखवण्यासाठी प्रेरणा ठरणारा मराठी राजा आहे. माझ्या शिवाजीची तर ही केवळ विटंबना आहे.

आणखी एक उदाहरण पाहा –

‘... बुडणाऱ्या जगाच्या पाठीवर शेवटच्या काड्या’ या लेखात, अॅटम बॉम्ब बनवता आला, कारण अॅटमचे आणि वस्तुमान-ऊर्जा यांच्या संबंधांचे गणित बऱ्यापैकी सोडवता आले होते. म्हणजे अॅटमचा बॉम्ब करताना गणित अचूक असण्याचा आधार घ्यायचा आणि जगबूड करताना मात्र गणिताचे काही खरे नाही असे म्हणायचे! हे म्हणजे अॅटम बॉम्ब फोडले म्हणून बाजपेयी यांचा अभिमान बाळगायचा आणि त्याचमुळे जगबूड होणार, तर बाजपेयी यांना नावे ठेवायची? हे काही खरे नाही. पण मला वाटते, की माझेच काही खरे नाही. हा आपला भारत देश थोर आहे, पाहा. उत्तर प्रदेश-ओरिसा-राजस्थान मधील मागास, अडाणी जनता राहू दे. खग्रास सूर्यग्रहणासारखी दुर्मीळ पर्वणी उपलब्ध झाली तर या देशाच्या औद्योगिक, आर्थिक, व्यावहारिक आणि प्रागतिक राजधानीत, मुंबईत रस्ते ओस पडले! आयुष्यात एखाद दुसऱ्या वेळी मिळावी अशी संधी समोर आली आणि मुंबईकर दारेखिडक्या लावून घरात बसले आणि गणपती दूध प्यायला, तोदेखील येथेच!

 ही काहीतरी भारतीय जनमानसाची गडबड आहे. त्यांना त्यांच्या प्रयत्नांनी काहीही साधत नाही असा मुळी ठाम विश्वासच आहे! मग एका बाजूने, ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ म्हणत सुस्त बसून राहायचे आणि दुसऱ्या बाजूने ‘कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचनं’ म्हणत फळाची अपेक्षा न धरता निरिच्छ कर्म करायचे. एकूण, स्वत:च्या प्रयत्नाने स्थिती बदलण्याची उमेद बाळगायचीच नाही. म्हणून लोकांना बरे होण्यासाठी कोणा बुवा-बाबाचा आशीर्वाद हा आधार वाटतो आणि सर्व काही नष्ट करणाऱ्या जगबुडीमध्ये तथ्यांश वाटतो.

_HemantKarnik_YnacheHatkeVicharvishw_2.jpgत्यांनी ‘ग्रहण: अंधश्रद्धेचे आणि अविचारी’ या लेखात समाजातील प्रतिष्ठित माणसे आधुनिकतेशी संबंध असताना तर्क झुगारून कसे वागतात त्याचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. 11 ऑगस्टच्या, म्हणजे सूर्यग्रहण झाले त्या दिवशीच्या ‘बॉम्बे टाइम्स’मध्ये ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांची छोटेखानी मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. साळगावकर यांचे वर्णन त्यात आघाडीचे ज्योतिषी, राज्यातील गणेश महामंडळाचे अध्यक्ष, कालनिर्णय कॅलेंडरांमागील प्रेरणा असे आहे. मुलाखतीत साळगावकर यांनी बरेच काही म्हटले आहे - ग्रहणात मी माझ्या घरातील देवालयात बसून मंत्रपठण करणार, कारण तसे केले नाही, तर ते मंत्र नंतर प्रभावहीन बनतील. ग्रहणाच्या काळात अन्न शिजवू नये, खाऊ नये. दुसऱ्या बाजीरावाने ग्रहणात युद्ध केले आणि तो ते हरला. ग्रहणकाळात वातावरणात बदल होतात, जंगली डुकरे आणि पक्षी विचित्र वागतात.

... मंत्र तेच राहतात, मंत्र म्हणणारे तोंडही तेच राहते; मग त्यांचा प्रभाव कमी का व्हावा? ग्रहणकाळात अन्न शिजवल्यामुळे व ते खाल्ल्यामुळे अपाय झाल्याची उदाहरणे किती आहेत? एक सोपा मार्ग म्हणजे हंगेरी, तुर्कस्तान वगैरे देशांमध्ये खग्रास ग्रहण झाले आणि सर्वांनी अन्न शिजवून खाल्ले तर त्या देशांमध्ये लोकांच्या तब्येती घाऊकपणे बिघडल्याची, इस्पितळे रुग्णांनी भरून गेल्याची बातमी साळगावकर यांना कळली आहे का? ग्रहण बाजीरावासाठी अपशकुनी आणि इंग्रजांना धार्जिणे, असे का? अचानक, अवेळी काळोख होण्याने प्राणी-पक्षी गोंधळतात; माणसाला काळोख होण्याची अपेक्षा असतानाही त्याने बिनबुद्धीच्या प्राण्या-पक्ष्यांना अनुकरणीय मानायचे का? असे तार्किक प्रश्न साळगावकर यांना विचारता येतील; पण त्यात अर्थ नाही, कारण शेवटी मुद्दा दृष्टिकोनाचा आहे. मी जर अविचाराने अंधश्रद्धा घट्ट धरून बसायचे म्हटले तर सगळे तर्क झुगारून माझ्यावर खरोखर परिणाम होताना दिसून येईलही. सगळ्या विज्ञानाकडे पाठ फिरवून झुडपात तोंड लपवणाऱ्या डुकराप्रमाणे जर साळगावकर त्यांच्या पूर्वजांनी सांगून ठेवलेले प्रमाण मानणार असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे; पण मग त्यांनी आधुनिकतेशी संबंध सांगू नये. अमेरिकेबिमेरिकेशी नाती जोडण्यास जाऊ नयेत.

पुस्तकामध्ये एकूण त्रेचाळीस लेख आहेत आणि सर्व लेख आटोपशीर आहेत. लेखकाने व्यक्त केलेले विचार हे पटण्यासारखे आहेत. पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे लेखकाला कोठलाही विषय वर्ज्य नाही. अगदी व्हॅलेनटाइन सण, शिवसेना, सिनेमा, अंधश्रद्धा, विज्ञान, भविष्यविज्ञान, राष्ट्रभक्ती, साहित्य संमेलन, शिक्षण, येथपासून ते पु.ल., लता, तलत महम्मूद, मारिआ पुझो येथपर्यंत.
लेखक या सर्व विषयांवर लिहिताना अनेक ठिकाणी मूलभूत सत्य सांगून जातो. उदाहरणेच द्यायची झाल्यास -

1. भूतकाळ म्हणजे इतिहास नव्हे; इतिहास म्हणजे वर्तमानात वावरणारा भूतकाळ
2. बलात्कार करणारा तुर्की वा देशी मुसलमान वा परदेशी इंग्रज असण्याऐवजी येथील हिंदू मराठा असला तरी बलात्कार सुखकारक होत नाही.
3. जे विसरून जायचे ते शिक्षण कसे असेल?
4. गुणवत्ता ती गुणवत्ता. पाकिस्तानचा संघ जर असेलच भारतापेक्षा श्रेष्ठ, तर पाकिस्तानच जिंकला पाहिजे.

हे झाले मूलभूत विचारांविषयी, पण लेखकाला दाद द्यावी लागते ती त्याने तिरकस परंतु तर्कनिष्ठ व चिकित्सक पद्धतीने केलेल्या विवेचनासाठी. उदाहरण येथे देण्याचा मोह आवरत नाही: 1. जगताना घेतलेल्या अनुभवावरून जरी लिखाण केले तरी अनुभव घ्यायला मन लागते आणि मन म्हणजे नुसती चाळणी नसते तर ते अनुभवांची निवड करणारे असे भट्टीसारखे साधन असते; अनुभवांना शिजवून त्यांना नवीन चव मिळवून देणारे. प्रत्येक भट्टी वेगळी. 2. कायदा म्हणजे आपल्या बाजूच्या लोकांच्या संरक्षणासाठी आणि आपल्याविरूद्ध पार्टीतील लोकांना धडा शिकवण्यासाठी वापरण्याचे हत्यार नव्हे; कायदा हा डोक्यावर बसणारा राजा आहे असे इंग्लंडमध्ये समाजमूल्य आहे.

पु.लं.च्या लोकप्रियतेच्या कारणांची कर्णिक यांच्या एवढी सहज, सोपी मांडणी क्वचितच कोणी केली असेल. ते लिहितात, पु.लं.नी पारंपरिक श्रद्धा आणि रुढी यांचा पुरस्कार कधीही केलेला नाही. त्यांचा देवावर विश्वास नाही, हे त्यांनी लपवून ठेवलेच नाही. त्यांनी एवढी व्यक्तिचित्रे लिहिली, सर्व प्रकारच्या माणसांची लिहिली, पण धार्मिकता, देवपूजा यांना कधीही नीतिमूल्याचे स्थान दिले नाही. त्यांनी धर्मश्रद्धा आणि धार्मिक कार्य यांच्यापेक्षा पददलितांची सेवा, समाजाच्या भल्यासाठी त्याग यांना सतत जास्त किंमत दिली आहे.

... कट्टर हिंदुत्व सोड्यासारखे फसफसत असतानाच्या आजच्या काळात पु.लं.चा कल हिंदुत्वाच्या विरोधी होता हे सर्वजण जाणतात, तरीही त्यांच्या लोकप्रियतेला, त्यांच्या आदरस्थानाला, त्यांच्या देवत्वाला बाधा आली नाही. त्यांनी माणसातील विसंगती संवेदनशील मनाने टिपली आणि तिचा विनोद केला. पु.ल. सतत दिलासा देतात, सामान्य असले तरी बिघडत नाही, चैन, सत्ता, कीर्ती नाही हाती आली तरी चालेल, माणसाच्या साध्या जगण्यातही गंमत आहे, त्याला मोल आहे.

गांधी यांच्यासारखी व्यक्ती वाढत वाढत नीतिमूल्यांच्या ध्रुवपदी पोचली. म्हणून  गांधी महात्मा. सगळ्यांच्यात तेवढी ताकद कशी असेल? त्या ध्रुवाला समोर ठेवून जमिनीवरील रस्ता चालण्यासाठी कोणीतरी निकट, आकलनाच्या आणि आचरणाच्या आवाक्यातील लागतो, ती भूमिका पु.ल.देशपांडे यांनी पार पाडली. मराठी माणूस त्यासाठी त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ राहील. विठ्ठल जसा त्याच्या भक्तांचा सगासोयरा असलेला देव होतो, तसेच पुलं मराठी माणसाच्या मनात देव होऊन राहतील.

लेखकाची लेखनशैलीच अशी आहे, की कोणताही लेख कोठेही रेंगाळला आहे असे वाटत नाही. कोठल्याही गोष्टीचा स्वीकार आंधळेपणाने न करता मनाला पटेल व रुचेल तेच लिहायचे हा बाणा असल्याने सर्व लेख वाचनीय झाले आहेत. राहून राहून आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटते, की हेमंत कर्णिक यांनी त्यांच्या लेखनास पुस्तकरूप देण्यास एवढा वेळ का घेतला?

काहीतरी हटके विचारांचे पण तेवढेच सकस साहित्यिक मूल्य असलेले लेखन वाचल्याचा आनंद देणारे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव - अध्यात आणि मध्यात
लेखक - हेमंत कर्णिक
प्रकाशन - सदामंगल पब्लिकेशन         
पृष्ठ संख्या - 192
किंमत - 225.00 रुपये

- माधव ठाकूर
Sahitya.mandir@yahoo.in

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.