जागृतिकार भगवंतराव पाळेकर यांच्या मागावर!


_Jagrutikar_BhagvantPalekar_1.jpgमाणसाचे आयुष्य अनिश्चिततेने भरलेले असते. मी संशोधनाच्या क्षेत्रात काही करू शकेन असे माझ्या दोन-तीन कुंडल्या बनवणाऱ्यांनाही सांगता आले नसते. मी शिपाई म्हणून ‘साने गुरुजी शिक्षण मंडळा’च्या बारागाव पिंप्री (तालुका सिन्नर) येथील माध्यमिक शाळेत नोकरीला 1984 मध्ये लागलो, तेव्हा मी बार बार बारावी नापास झालेला होतो! मी पुढे शिक्षणाची आणि सेवेची एकेक पायरी चढत गेलो. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रकिया आहे यावर माझा विश्वास ना! ‘साधने’चे संपादक यदुनाथ थत्ते यांनी ‘नवनिर्माणकारी बेचैनी’ असा एक सिद्धांत मांडला आहे. माझे शिक्षण-वाचन-लेखन बेचैनीतूनच होत गेले आणि मी झाडू ते खडू असा प्रवास सुरू केला, तो पुढे संशोधनापर्यंत पोचला!

पीएच.डी.ची पदवी मिळवली म्हणजे संशोधन झाले असे होत नाही. संशोधनासाठी रूची असणाऱ्या विषयाची निवड केली, तर संशोधनकार्य पूर्ण होताना समाधानही मिळते.

मी मराठी विषयात एमए होऊन ‘गोखले एज्युकेशन सोसायटी’च्या ‘बिटको महाविद्यालया’त कादंबरीकार वि.वा. हडप पारितोषिकाचा मानकरी ठरलो होतो. मी शिक्षणाचा एकेक गड सर करत माध्यमिक शिक्षक म्हणून स्थिरावलो होतो. मी शिक्षकांच्या पतसंस्थेत संचालक म्हणून काम करत असतानाच ‘रयत शिक्षण संस्थे’च्या दहिवडी कॉलेज येथे अधिव्याख्याता म्हणून माझी निवड झाली. एनडीएसटी (Nashik District Secondary Teachers Society) सोसायटीच्या गुणवंत शिक्षक निवडीच्या कमिटीवर दिलीप धोंडगे हे सदस्य होते. धोंडगेसर हे माझे मित्र. माझा ‘मरणगाथा’ कवितासंग्रह 1985 मध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा एकनाथ पगार, धोंडगे हे दोघे पाठीवर थाप देण्यासाठी सिन्नरला आले होते. त्यांच्या बरोबरच्या भेटीत गप्पा होत. काय वाचले? काय लिहिले? हे गप्पांचे सूत्र असे.

एकदा, धोंडगे व मी, आम्ही दोघे वर्टी कॉलनीतील एका झाडाखाली उभे होतो. त्यावेळी गप्पांत पीएचडीचा विषय निघाला. ते म्हणाले, काम कशावर करणार? माझ्या डोक्यात मराठी तमाशातील सोंगाडया हा विषय होता. कारण आमच्या घरातच तमाशा आणि सोंगाडया होता. ‘तमासगिराचे प्वॉर’ ही माझी पहिली ओळख. दुसरा विषय पत्रकारिता हे सूत्र घेऊन काही करावे असा होता. सेवा दलात जात असल्याने सामाजिक चळवळी माहीत होत्या आणि बडोद्यात राहून मराठी वृत्तपत्र चालवणारे ‘जागृति’कार भगवंतराव पाळेकर यांच्याविषयी ऐकून होतो. भगवंतरावांचे नातू सुभाष पाळेकर यांच्याशी परिचयदेखील झालेला होता. पाळेकरांचा परिचय संदर्भ-साधने मिळण्यासाठी उपयोगी ठरणार होता.

दिलीप धोंडगे यांनी तेव्हा ब्राह्मणेतर चळवळीच्या पत्रकारितेवर पुण्याच्या ‘रानडे इन्स्टिटयूट’मध्ये शोधनिबंध सादर केला होता. त्यांना ‘जागृति’कार पाळेकरांवर काम होऊ शकेल असे वाटले. त्यांनीच सदानंद मोरे यांनी संपादित केलेल्या पाळेकरांच्या पुस्तकाचा संदर्भही दिला. ‘जागृति’कार भगवंतराव पाळेकर हे मूळ कळवण तालुक्यातील पाळ्याचे. पाळेकरांच्या वृक्षाची एक फांदी बडोद्याला गेली, तर दुसरी भालूरला स्थलांतरित झाली.

विषय तर नक्की झाला. धोंडगे नुकतेच पीएचडीचे गाईड झाले असल्याने मार्गदर्शकाचा शोधही संपला आणि मी प्रवेशप्रकियेतून पुढे गेलो. ललित लेखन, वृत्तलेखन, स्तंभलेखन आणि संशोधन हे वेगवेगळे असते याची जाणीव त्या काळात झाली. पुण्यात जाऊन मराठी वृत्तपत्रांचा इतिहास (रा.के.लेले), ‘‘जागृति’कार पाळेकर" (संपादक सदानंद मोरे ), ‘दिनकरराव जवळकर समग्र वाड़मय’ ( य. दि. फडके ) अशी पुस्तके जमवण्यास सुरुवात केली. धोंडगे प्रत्येक भेटीत नवनवीन संदर्भसाधनांविषयी बोलत आणि मी त्यामागे लागत असे. एकदा कवी विलास शेळके, अमोल बागूल व मी, असे आम्ही तिघे निळू फुले यांना भेटण्यासाठी गेलो. निळू फुले यांचा चळवळींचा अभ्यास असल्याने ते सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळींविषयी भरभरून बोलले आणि पुढील पंधरा दिवसांत निळूभाऊंकडून ‘जागृति’कार पाळेकर आणि केशवराव विचारे यांची पुस्तके कुरियरने हजर झाली! आश्चर्य म्हणजे त्यात पुस्तके पाठवण्यास उशीर झाल्याबद्दल दिलगिरीचे पत्र होते. मला निळू फुले यांच्यामुळे पाळेकर बडोद्याला जाऊन पाळेकर झाले, पण ते मूळ पाळ्याचे आहेत हा शोध लागला.

संशोधन ग्रंथालयात, महाविद्यालयात बसून करायचे काम नाही. त्यासाठी संदर्भ साधनांचा शोध आणि अभ्यासविषयाशी संबंधित माणसांशी संवाद महत्त्वाचा असतो.

मी अहमदनगरच्या ‘राधाबाई काळे महिला महाविद्यालया’तून फेलोशिप घेऊन तेव्हाच्या पुणे विद्यापीठात दाखल झालो. सहा नंबर होस्टेलमधील रूम नं 11 हे माझे दोन वर्षें अभ्यासाचे स्थान. मराठी विभागात राजन गवस होते. होस्टेलमध्ये नारायण भोसले यांच्यासारखे अभ्यासक होते. राजन गवस यांनी गंभीरपणे विषयाची व प्रबंधलेखनाची अंगोपांगे सांगितली. मी ‘लोकमान्य ते महात्मा’ हे स्तंभलेखन अधूनमधून वाचले होते. सदानंद मोरे यांचे ते लेखन पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले. त्याची प्रसिद्धीपूर्व नोंदणी करून ते मिळवले. मोरे यांच्याशी चर्चा संशोधनाला दिशा देणारी ठरली. सत्यशोधक आणि ब्राह्मणेतर या चळवळींचे मूळ दस्तऐवज हे बाबा आढाव यांच्या ‘महात्मा फुले समता प्रतिष्ठान’ने जतन केले आहेत. बाबांनी पाळेकरांचे समग्र वाङ्मय जतन, संवर्धन, संपादनाचे कामही केले आहे. तेथे अनेक दुर्मीळ कागदपत्रे पाहण्यास मिळाली. संदर्भ साधनांची माहिती ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’च्या ग्रंथालयात बसून घेतली. संशोधकाला संदर्भाविषयी खूप काळजी घ्यावी लागते. तेथे एका संशोधकाने पाळेकर यांना एका ग्रंथाच्या लेखनाचे श्रेय दिल्याचे पाहिले, पण तो ग्रंथ पाळेकर यांचा नसल्याचे छाननीत लक्षात आले.

धोंडगे म्हणाले, की बडोद्याला चक्कर मारून या. बडोदा गाठले. सुभाष पाळेकर यांनी साधने उपलब्ध करून दिली. सयाजीराव विद्यापीठात पाळेकर यांच्याविषयी अनास्था दिसून आली. पाळेकर यांच्या संदर्भात य.दि. फडके यांच्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ या खंडात्मक लेखनात विपुल संदर्भांची नोंद आढळली. पुण्यात संदर्भ साधनांची दोन वर्षांत विपुल सामग्री जमा झाली, वाचनही झाले, पण प्रबंधलेखन काही झाले नाही. पुन्हा नगरला कॉलेजमध्ये नोकरीवर जॉईन झालो. तेथे मराठीतील ज्येष्ठ संशोधक र.बा. मंचरकर होते. त्यांनी प्रबंधलेखनासाठी काही तंत्र आणि मंत्र सांगितले. महाविद्यालयात स्थिरस्थावर होता होता वर्ष सरले. मला मे महिन्याची सुटी प्रबंधलेखनासाठी उपयुक्त ठरली. रात्रीचा दिवस करणे ही लोकोक्ती खरी ठरली. बोऱ्हाडे रात्री लिहिण्यास बसत- कधी कधी पहाटेपर्यंत लेखन सुरू असे. दिवसा झोप. दीड महिन्यांत प्रबंधलेखनाचा आनंद अनुभवला आणि सुटी संपल्यानंतर कॉलेज पुन्हा जॉईन केले. बदलीची ऑर्डर हातात पहिल्याच दिवशी मिळाली. श्रीगोंदा-नगर परतीचा प्रवास. दीड महिन्यांत पनवेल कॉलेजला पुन्हा बदली. ‘रयत शिक्षण संस्थे’त महाराष्ट्र दर्शनाची संधी मिळाली, पण प्रबंधलेखनात अडथळा आला.

दरम्यान, महाविद्यालयीन प्राध्यापकांचा संप सुरू झाला. मी थेट नाशिक गाठले आणि रात्रीचा दिवस पुन्हा सुरू केला. संप ही मला पर्वणी ठरली. प्रबंधाचा खर्डा पूर्ण झाला. संपाचाही कंटाळा आला. आठ दिवस नाशकात काही उलाढाली करत फिरलो आणि संप यशस्वी झाल्याचे संकेत मिळताच कॉलेज जॉईन केले. प्रबंधलेखन हा तांत्रिक भाग असतो. संदर्भसूची, विषयसूची, व्यक्तिनामसूची, मुद्रितशोधन हे तांत्रिक काम. त्याला मदत नसेल तर ते कंटाळवाणे ठरते. त्यावेळी रवींद्र मालुंजकर मदतीला धावून आला. मी पनवेल ते नाशिक असा परतीचा प्रवास दोन महिने रोज केला. तांत्रिक भाग संपवून धोंडगे यांना प्रंबध वाचण्यास दिला. धोंडगे यांच्यासारख्या समीक्षकापासून काही मंडळी दूर राहते. त्यांचा लौकिक झटपट पीएच डी असा नाही. त्यांनी ते बहुप्रसवा मार्गदर्शकांच्या पंगतीतील नसल्याने निवडक विद्यार्थी घेतले. मी धोंडगे यांच्याकडे संशोधन करतो असे म्हटल्यावर ‘अरेरे अरेरे’चे सुरही कानावर येत. पण तो काळ माझ्यासाठी संपन्नतेचा होता. सरांनी वाचन-लेखनाची शिस्त लावली. अभ्यासाची दिशा दाखवली आणि उत्तम काम व्हावे याची काळजी घेतली. नाशिक ते सटाणा हा परतीचा प्रवास म्हणजे नवे काही शिकल्याचा असायचा. सरांनी प्रबंध वाचला आणि एक अक्षरही न बदलता विद्यापीठाला सादर करण्यास सांगितले!

मला सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ, चळवळीची साधने, पत्रकारिता, वृत्तपत्रांचा इतिहास- त्यातील पाळेकर यांनी बडोद्यात राहून 1917ते 1948 या काळात चालवलेले ‘जागृति’ नावाचे मराठी पत्र, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादात असलेली पाळेकर यांची भूमिका, परिवर्तनवादी चळवळीतील ताणेबाणे, ब्राह्मणेतर पत्रकारांची दृष्टी आणि सृष्टी या गोष्टी समजावून घेता आल्या आणि वाङ्मय इतिहासातील उणिवाही लक्षात आल्या. मला आपल्याकडील इतिहास लेखनाने गौरवीकरणाला महत्त्व दिले, पण वंचितांचा इतिहास लिहिला नाही हे तथ्य समजले. सकाळचे वृत्तपत्र सायंकाळी शिळे होते का? पाळेकर म्हणतात, “वृत्तपत्रातील बरेचसे लेखन तात्पुरत्या स्वरूपाचे असते, यात संशय नाही. तसे असणे अपरिहार्य आहे. तथापि विचार जागृत करण्यात आणि भाषेला वळण लावण्यात वृत्तपत्रे महत्त्वाची कामगिरी बजावतात. नियतकालिकांतील निवडक लेख गोळा करून प्रसिद्ध केले तर वाङ्मयात खरोखर भर पडेल. असे लेखसंग्रह अनेक गचाळ पुस्तकांपेक्षा नि:संशय संग्राह्य होतील.” (6 जानेवारी 1945) मी वृत्तपत्रीय लेखनाकडे पाळेकर यांच्यामुळेच नीरक्षीर विवेकाने पाहू शकतो. विद्यापीठीय विद्वानांच्या शोधनिबंधांपेक्षा मला वृत्तपत्रातील लेखन अधिक जवळचे वाटते आणि मी लिहितो.

- शंकर बोऱ्हाडे

shankarborhade@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.