कुसुमाग्रजांच्या गावी


_Kusumagrajanchya_Gavi_1.jpgसुनील, नुमान आणि सारथी गजू यांच्या बरोबर कुसुमाग्रजांच्या जन्मगावी निघालो होतो! बोरठाणची शीव ओलांडली, की शिरवाडे समोरून खुणावू लागते.

पौष-माघ महिना म्हटले, म्हणजे आनंदाच्या अक्षय्य ठेव्याची लयलूट करणारे वातावरण असते. गावाकडे जत्रांचा आरंभ त्याच काळात होतो. त्या त्या गावच्या ग्रामदेवतेच्या नावाने भरलेल्या आणि भारलेल्या जत्रेत एकदा तरी सामील व्हायला हवे असे मनात असते. वर्षभराच्या नोकरीधंद्यातील ताणतणाव, नात्यातील रूसवे-फुगवे क्षणार्धात तेथे गळून पडतात. भक्तिभावाच्या पुरात सारे वाहून जाते. ग्रामदेवतेच्या चरणी लीन होताना मूर्तीच्या चेह-यावरील प्रसन्न हास्य मग स्वत:च्याही मनभर पसरत जाते. दिमडी, तुणतुणे, संबळ यांची लय शरीर-मनाला लपेटून घेते, नकळत ओठांतून शब्द बाहेर येतात..... ‘मातोबाच्या नावानं चांगभलं’….. ‘शनीमहाराजांच्या नावानं चांगभलं’……

आमच्या गाडीने रानवड गावी उजवी घेतली, तेव्हा मनात असेच काहीबाही चाललेले होते. कितीतरी दिवसांपासून भिजत पडलेले घोंगडे वाळत घालायचेच या निश्चयाने निघालो होतो.

बाहेर उन्हाचा चटका वाढू लागला. एका अनामिक ओढीने कुसुमाग्रज नावाच्या महान सारस्वताच्या भूमीत पाऊल ठेवताना, अंगावर शहारा आला. गावात शिरतानाच, पाण्याने तळ गाठलेल्या विहिरीवर माताभगिनींची पाण्यासाठी चाललेली धडपड काळजावर ओरखडा उमटवून गेली.

आधी फोनवरून बोलणे झालेले होते. त्यामुळे त्यावेळचे ग्रामपंचायत सदस्य शरद काळे आणि कार्यकर्ता विजय गांगुर्डे स्वागताला हजर होते. शरद काळे यांनी परिसराची ओळख उत्साहाने करून दिली. सर्वप्रथम कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या संस्था पाहिल्या. जुने विद्यालय बरेचसे थकल्याने, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय नव्या इमारतीत आणले गेले आहे. त्यासाठी आणि कुसुमाग्रजांचे स्मारक म्हणजे ग्रंथालय, एकशेएकोणतीस आदिवासी घरकुले; तसेच, भव्य हॉल यासाठी शासनाकडे पाठपुरावा करून, जवळपास सत्तर लाखांचा निधी उभा झाला आहे. बाळासाहेब आपटे यांनी त्याकामी प्रयत्न केले हे काळे यांनी कृतज्ञतापूर्वक नमूद केले. संस्थेने व्याखानमालेचे आयोजन 27 फेब्रुवारी ते 10 मार्च अशा कालावधीत काही वर्षे केले; तथापी व्याखानमाला आता बंद आहे.

कुसुमाग्रज यांची पावले ज्या मातीत थिरकली, तो वाडा धाप लागलेल्या वृद्धाचे उसासे ऐकवतो. केव्हाही रडू कोसळेल अशी अवस्था झाली म्हणून, वळलो तर ‘लक्ष्मीनारायण’च्या प्रांगणात पाऊल पडले. डॉ गोरे यांनी सांगितल्याप्रमाणे लक्ष्मीनारायण मंदिर गेल्या तीनशे वर्षांपासून ऊनपावसात सुखदुःखाचे सोहळे पाहत उभे आहे. मंदिराचा जिर्णोद्धार तात्यांनी केला असे डॉक्टरांनी सांगितले. जिर्णोद्धाराचे वैशिष्ट्य म्हणजे मूळ मंदिराचे छत तसेच ठेवून, बाकी दुरूस्ती करवून घेतली. मंदिरात उभे असताना, गर्भगृह मात्र कुलुपबंद होते. आतमध्ये लक्ष्मीनारायण केविलवाण्या अवस्थेत एकमेकांना अधू आधार देत असल्याचे जाणवून गेले. मंदिराची मालकी तात्यासाहेबांच्या नातेवाईकांकडे आहे. ते गोकुळअष्टमी, दिवाळीला गाभारा उघडतात. लांबून मंदिराच्या कळसाचेही दर्शन घेतले.

ग्रामपंचायतीची जुनी इमारत आणि नवी इमारत काळाचा महिमा कानात सांगून गेली. गावात ‘कुसुमाग्रज ज्येष्ठ नागरिक संघ’ आणि त्यांच्याच नावाने ‘बिगरशेती ग्रामीण सहकारी पतसंस्थे’चे कामही चालते असे कळले. पाच हजार लोकसंख्या असलेले शिरवाडे गाव त्याच्या परीने तात्यांच्या अनेक स्मृतींना उजाळा देत उभे आहे. तात्यांनी तत्कालीन जिल्हा अधिकारी अशोक खोत यांना पत्र पाठवून गावाला ओझरखेड कॅनॉलद्वारे पाणीपुरवठा करावा अशी विनंती केली होती. ते पत्र जिल्हाधिका-यांनी त्यांच्या दालनात फ्रेम करून लावले होते. अचानक ओळी ओठावर आल्या.....

    वा-यावर येथील रातराणी ही धुंद
    टाकता उसासे, चरणचाल हो मंद
    परि स्मरतो आणिक करतो व्याकुळ केव्हा
    त्या परसामधला एकच तो निशिगंध            

गावात फिरताना असे काही आठवत होते.

गावात पौष अमावास्येपासून शनी महाराजांची यात्रा भरते. आम्ही तेथे होतो तो यात्रेचा दुसरा दिवस होता. मंदिरपरिसरात छोटेमोठे विक्रेते, खाऊ-खेळण्यांची दुकाने थाटून भर उन्हात ‘रविपुत्र यमाग्रज’ची त्यांच्या परीने आराधना करताना दिसले. त्यांच्या कष्टाला संबळ-दिमडीची लय साथ-संगत करत होती. शनी महाराजांचे मंदिर भव्य, मोकळे आहे. जागोजाग लोकांचे थवे गुलालाने माखून मंदिर ओट्यापाय-यांवर, झाडाच्या सावलीत विसावले होते. आम्ही दर्शन करून एके ठिकाणी चहा घेतला. आणखी काही गावकरी येऊन वेगवेगळ्या विषयांवर बोलले. पण सार्‍यांत समान धागा होता, तो म्हणजे कुसुमाग्रज तथा ‘तात्या’. तात्यांची अधुनमधून गावाला झालेली भेट, निफाड्यांच्या मळ्यात द्राक्षे खायला जाणे. गावक-यांबरोबर वेचलेले क्षण, केलेल्या चर्चा यांच्या अनंत स्मृतींचा भंडारा उधळला जात होता. शरद काळे, विजय गांगुर्डे आणि गावकरी यांचा निरोप घेऊन गाडीकडे वळताना पुन्हा शब्द उमटले -

नवलाख तळपती दीप विजेचे येथ
उतरली तारकादळे जणू नगरात
परी स्मरते आणिक करते व्याकुल केव्हा
त्या माज घरातील मंद दिव्याची वात!

- शिरीष गंधे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.