मराठी भाषा आणि बदलत गेलेली मराठी संस्कृती


बदलत्या जगात मराठीचा, किंबहुना कोणत्याही स्थानिक भाषेचा विचार अगदी वेगळ्या पद्धतीने करावा लागणार आहे. भाषा हे संस्कृतीचे मुख्य वाहन असते असा समज पूर्वापार आहे. परंतु तशी, संस्कृतिरक्षणाची व संवर्धनाची अनेक प्रभावी साधने - मल्टिमीडिया – उपलब्ध झाली आहेत. त्या ओघात भाषा हे साधन लोकप्रियतेच्या कसोटीवर निष्प्रभ होतानाही दिसत आहे. म्हणूनच महाविद्यालयांमध्ये अकरावी-बारावीच्या वर्गांत भाषेच्या पेपरला ‘कम्युनिकेशन स्किल’ असे नाव दिले गेले आहे. जुन्या इंग्रजीचा वा जुन्या मराठीचा भाषिक डौल लेखनात व संभाषणात राहिलेला नाही ही गोष्ट तर सर्वच सुशिक्षित व सुसंस्कृत लोकांच्या प्रत्ययाला येत आहे. म्हणजे काय? तर जे भावनाविचार सूक्ष्म रीत्या निव्वळ भाषेतून जुन्या काळात व्यक्त करता येत होते, ते तसे करणे आता जमत नाही. शक्यता अशी आहे, की मानवी ज्ञानानुभव बराच विस्तारला हे त्याचे कारण असावे. मल्टिमीडियापैकी भाषा हे साधन सखोल परिणाम करणारे आहे, कारण भाषा कष्टसाध्य असते. ते तिचे वैशिष्ट्यसुद्धा ती लिखित/मुद्रित स्वरूपात समोर येते तेव्हा प्रकर्षाने प्रत्ययाला येते. ती जेव्हा बोली स्वरूपात पुढे येते तेव्हाही ती हावभावासारख्या अन्य माध्यमाच्या साहाय्याने आलेली असते (फोनवर वा रेडिओवरसुद्धा आवाजातील चढउतारांच्या व नकलांच्या साहाय्याने) व त्या भाषेचा परिणाम वेगळा असतो. व्हिज्युअल भाषा ही नव्या काळाची गरज असू शकते; नव्हे, ती असल्याचे जाणवते. भाषेचा प्रत्यय पाच इंद्रियांच्या साहाय्याने येत असतो. व्हिज्युअल भाषेमध्ये मोबाइलसारख्या आणखी एका ‘नव्या इंद्रिया’ची आवश्यकता भासेल. त्यामुळे व्हिज्युअल भाषेचा विचार अगदी वेगळा असणार आहे. तो समाजात टोकाला कोठेतरी चालू असेलही, पण मुख्य समाज रूढीने चाललेला असतो. तेथे मातृभाषा-तीमधून शिक्षण-तिचे फायदेतोटे अशा व्यावहारिक महत्त्वाच्या आणि काही भावनिक आग्रहाच्या-अस्मितेच्या गोष्टी चर्चेमध्ये असतात.

या सर्व क्रांतिकारी स्थित्यंतरामध्ये स्थानिक संस्कृतीचा विचार परम महत्त्वाचा ठरतो. संस्कृती हा कोणत्याही स्थानिक समाजाचा जगण्याचा गाभा असतो. मराठी संस्कृतीचा जाणता वेध घेण्याचा पहिला संघटित प्रयत्न 1989 मध्ये पहिल्या ‘जागतिक मराठी परिषदे’त (जामप) झाला. तिच्या पाठीमागे शरद पवार व मनोहर जोशी हे खंदे मराठी नेते होते. माधव गडकरी हे प्रमुख संघटक होते. प्रभुराम जोशी, रवी बापट, शरदिनी डहाणुकर, विनय नेवाळकर असे प्रमुख कार्यकर्ते होते. तेथे मराठी भाषा-संस्कृतीचे अनेक विभ्रम व्यक्त झाले. तो सोहळा मनोरम होता; त्यात समाजसंस्कृतीचा वेध वेगवेगळ्या तऱ्हांनी घेण्यात आला. नंतर मात्र ‘जागतिक मराठी परिषदे’ला वार्षिक कर्मकांडाचे स्वरूप आले आहे. एकटे रामदास फुटाणे तो समारंभ दरवर्षी जानेवारी महिन्यात पार पाडत असतात. आधीचे पवार-जोशी आणि नंतरचे फुटाणे, दोन्ही मराठी समाजाचे सच्चे प्रतिनिधी आहेत. पवार-जोशी हे राजकारणी. त्या दोघांनी मराठी समाजसंस्कृतीचा विचार कसा आणि किती व्यापकपणे केला हे कधीच मांडलेले नाही. फुटाणे हे मराठी वाङ्मयीन कार्यकर्त्याचे अस्सल रूप आहे. त्यांना प्रतिभाही लाभली आहे. त्यांनी वात्रटिका हे कवितेचे नवे रूप महाराष्ट्रात रुजवले. त्यांची त्या वात्रटिकांमागील मार्मिक दृष्टी फार थोड्यांना लाभली. फुटाणे ‘जागतिक मराठी परिषदे’च्या बाबतीत मात्र केवळ उत्साहात असतात. त्यांची ती परिषद दरवर्षी योजण्यामागे फार मोठी भूमिका नसते. त्यामुळे ‘जागतिक मराठी परिषद’ उत्सवापुरती उरली आहे!

आणि वर्तमान मराठी संस्कृतीचे एकूण रूप उत्सवीच तर आहे - शिवजयंतीचा उत्सव, आंबेडकर जयंती उत्सव, गणपती उत्सव... गजानन महाराजांच्या प्रकटदिनाचाही उत्सव! परवाच्या ‘व्हॅलेंटाइन डे’ला मधुबालाचा प्रकटदिन साजरा झाला म्हणे! समाज उत्सवप्रिय बनण्याचे कारण आहे की वर्तमानकाळाचे ताण समाजाला सहन होत नाहीत. ताण वरकरणी जीवनाच्या गतीमधून व राजकारणातून निर्माण होत आहेत असे जाणवले तरी ते रुतले आहेत संस्कृतिकारणात – त्यांचा एक पदर जसा ग्लोबल व लोकल अशा स्वरूपाचा आहे, तसा दुसरा पदर संमिश्रतेचा आहे. कधी कधी वाटते, की ‘बॉइलिंग पॉट’ हे वर्णन फक्त अमेरिकेचे का करावे? ते महाराष्ट्रालाही लागू आहे. महाराष्ट्र विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व कोकण अशा पाच संस्कृती एकत्र येऊन घडला आहे. महाराष्ट्र व मराठी भाषा यांचा इतिहास भले दोन हजार वर्षांपूर्वीपर्यंत सांगितला जाऊ दे, आजचा महाराष्ट्र घडला आहे तो गेल्या चार-पाचशे वर्षांत - अनेकानेक समाजगट एकत्र येऊन. भारतातील वेगवेगळे समाज येथे त्या काळात आले – अगदी मराठेसुद्धा. कोकणातील नाटळ गावच्या सावंतांनी त्यांचा साडेचारशे वर्षांचा वंशवृक्ष प्रसिद्ध केला आहे, त्यात ते मध्यप्रदेशातून कोल्हापूरमार्गे सावंतवाडीला आल्याचे नमूद आहे. रायगडाच्या तळाजवळच्या पोलादपूरची शहामंडळी शिवाजीराजांबरोबर सुरतेहून तेथे आली असे सांगतात. वेगवेगळ्या जिल्हा ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींत सिंधी उद्योजकांचे प्राबल्य दिसते. ते सत्तर वर्षांपूर्वी महाराष्ट्रात आले. ज्ञानेश्वर-शिवाजी यांच्या काळची मराठी संस्कृती व सध्याची मराठी संस्कृती यांमध्ये महदंतर आहे.

आज मराठी कोणाला म्हणायचे येथपासून प्रश्न सुरू होतो. दिग्दर्शक यश चोप्रा यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार देण्याचा समारंभ कोल्हापूरला झाला. त्यांचे उत्तरादाखल भाषण इंग्रजीत झाले. त्यांचा जन्म पंजाबातील, पण सारे कार्यकर्तृत्व मुंबईतील. त्यांनी त्यांना मुंबई-महाराष्ट्राने घडवले म्हणून जी कृतज्ञता व्यक्त केली ती अस्सल मराठी वळणाची होती. अमेरिकेतील अनिवासी मराठी कुटुंबांत तेथेच जन्मलेल्या मुलांना अनेक गोष्टी मराठी - वरणभात-तूप, भातुकलीची भांडी - आवडतात. त्या मराठी गोष्टी त्यांच्या माध्यमातून अमेरिकन समाजातही पोचतात. तो मराठी संस्कृतीचा प्रसार असतो. त्याहून ठळक चिन्ह दिसते, ते देशोदेशीच्या गणेशोत्सवात. अमेरिकेतील फिलाडेल्फिया व रॅले येथील गणेशोत्सव दहा दिवसांचे, मिरवणुकांसह परिपूर्ण असतात. त्यामध्ये तेथील भारतीयांची एकात्मता दिसतेच, परंतु अमेरिकन समाजही गेल्या काही वर्षांत त्यात सहभागी होऊ लागला आहे. ‘मराठी गणेश’ ही कदाचित उद्याच्या अखिल जगताला जोडणारी देवता होऊन गेली तर आश्चर्य वाटायला नको. संमिश्र संस्कृतीच्या या ज्या प्रतीकात्मक खुणा सांगितल्या त्या सर्व ठिकाणी भाषा बिनमहत्त्वाची होती, तरी ठसा मराठी होता. तीच तर संस्कृती!

ज्या पहिल्या ‘जागतिक मराठी परिषदे’चा लेखारंभी उल्लेख केला तिचे अध्यक्ष कसुमाग्रज होते व प्रमुख पाहुणे पु.ल. देशपांडे होते. वसंत बापट समारंभाचे सूत्रसंचालक होते. देशोदेशीच्या व वेगवेगळ्या क्षेत्रांतील प्रमुख मराठी व्यक्ती, सुनील गावसकरसह आल्या होत्या. तो काळ भाषेच्या व छापील शब्दाच्या प्रभावाचा होता. तेथे कुसुमाग्रजांनी त्यांचे ऐतिहासिक महत्त्वाचे ठरलेले मराठी भाषाविषयक वाक्य उच्चारले, की मराठी भाषेने राजमुकूट घातला आहे खरा, पण तिने अंगावर दारिद्र्याची लक्तरे ल्याली आहेत. त्या आधीची पंधरा-वीस वर्षें मराठी भाषेच्या भवितव्याबाबत बरीच चिंता व्यक्त केली जाई, त्यासाठी काही महत्त्वाच्या परिषदा-बैठका झाल्या. तशी मराठी भाषेबाबतची काळजी अजूनही व्यक्त होते. मात्र तिचे स्वरूप प्रतिकात्मक असते. परंतु 1989 नंतरच तंत्रविज्ञानाने समाज एका वेगळ्या पातळीवर एकत्र जोडला जाण्याची प्रक्रिया घडत गेली आहे. तीमध्ये माणसांच्या जीवनात ‘कम्युनिकेशन’ महत्त्वाचे ठरले, भाषा दुय्यम स्थानावर गेली. माणसांना व्यक्त व्हायचे असते, त्यासाठी त्यांना साधन लागते. भाषा हे एक प्रमुख साधन आहेच. परंतु भाषेचा विचार बदललेल्या परिस्थितीत, बहुमाध्यमांच्या संदर्भात व्हायला हवा.

- दिनकर गांगल

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.