अण्णांचे स्पिरिट


_RaleganSiddhi_AannaHazare_1.jpgअण्णा हजारे यांचे दिल्लीतील उपोषण गाजले नाही. त्याची फलनिष्पत्तीदेखील अण्णांचे कार्यकर्ते व सरकार यांच्याकडून खूप उत्साहाने व्यक्त झाली नाही, त्याचे एक कारण म्हणजे अण्णांनी सरकारने आश्वासने न पाळल्यास उपोषणास पुन्हा बसण्याचा इशारा दिला आहे. सरकारला एवढ्या अल्पावधीत कोणत्याही आश्वासनांची पूर्तता करता येणार नाही. त्या परिस्थितीत अण्णांची तब्येत कशी आहे? त्यांचा निर्धार किती पक्का आहे? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील.

मुद्दा अण्णांचे उपोषण फसले की फसले नाही हा नसून, त्या निमित्ताने सामाजिक विकृती स्पष्ट झाली हा आहे व त्याकडे हेरंब कुलकर्णी यांनी योग्य प्रकारे लक्ष वेधले आहे. हेरंब हे शिक्षक होते. त्यांनी नोकरी सोडून शिक्षणविषयक प्रश्नांकडे लक्ष वेधणे सुरू केले. त्यासाठी ते खूप भटकले, त्यांनी वेगवेगळ्या पाहण्या केल्या, लेखन केले - ते मिळेल त्या माध्यमातून लोकांसमोर मांडले. त्यांचे ते 'वन मॅन मिशन' होऊन गेले. त्यात त्यांना साने गुरुजी 'गवसले'. त्यांनी ती मांडणी लोकांसमोर केली. हेरंब यांच्या लेखनात विचारांपेक्षा भावना ओसंडून वाहते. स्वाभाविकच हेरंब हे साने गुरुजीप्रेमी वर्तुळात प्रिय झाले. पण गुरुजींनी विचारसाहित्य लिहिले आहे आणि त्यांनी त्यांचे विचार कृतीतदेखील उतरवले आहेत, याकडे मात्र गुरुजीप्रेमींचे दुर्लक्ष होते.

हेरंब जसजसे शैक्षणिक प्रश्नात अधिक घुसले तसतशी त्यांची मानसिक वाढ झाली, त्यांना त्या प्रश्नाचे कंगोरे कळले. त्यातून त्यांना 'गरिबीचे दर्शन' झाले. हेरंब सध्या त्यांचे ते नवे ‘दर्शन’ मांडत असतात व त्या ओघात सामाजिक प्रश्नांवर भाष्य करत जातात. त्यामध्ये भावनाक्षोभ जास्त असतो. पण सध्याच्या तंत्रविज्ञानप्रभावी जगात भावना-संवेदना किमान पातळीवर भासतात व हेरंब यांचा तो ‘वेडेपणा’च ठरतो! म्हणून बहुधा ते अण्णा हजारे नावाच्या दुसऱ्या 'वेड्या'च्या समर्थनार्थ धावले. आम्हाला आम्ही 'थिंक महाराष्ट्र'मध्ये 'चांगुलपणा जपला जावा' या मताचे असल्याने अण्णा व हेरंब या दोघांच्याबद्दल सहानुभूती वाटते. अण्णांचा उपोषणामागील हेतू उदात्त होता. त्यांच्या मागण्या भावनोद्रेकातून उद्भवल्या असल्याने त्या आरंभापासून अव्यवहार्य आहेत. त्या मान्य होण्याची शक्यता सतत दूरच गृहीत धरली पाहिजे. तरीसुद्धा अण्णांसारख्यांच्या अशा कृतीने समाजाची संवेदना व जाणीव व्यक्त होते व जागृत राहते. ते अण्णांकडून घडत असलेले मोठे कार्य होय. अण्णांना बदनाम केले ते मीडियाने. सध्याच्या समाजजीवनात सर्वात विकृत गोष्ट कोणती असेल तर ती मीडिया ही आहे. 'माणूस कुत्र्याला चावला' तर ती बातमी होते हे मीडियाचे मूळ सूत्र आहे. ते सूत्र सध्याचा मीडिया टोकाला नेऊन माणूस जर कुत्र्याला चावत नसेल तर त्याला चावण्यास भाग पाडत आहे!

अण्णांची ताकद दोन पातळ्यांवर व्यक्त झाली- प्रथम राज्य पातळीवर व नंतर राष्ट्रीय पातळीवर. त्यांनी आरंभी राळेगण सिद्धी गावी चमत्कार घडवून दाखवला. त्यांनी त्या गावात पाणी उपलब्ध करून देऊन नुसती समृद्धी आणली नाही तर लोकांच्या जीवनाला वळण लावण्याचे प्रयत्न जारी ठेवले. त्यांचे ते प्रयत्न अनुकरणीय ठरले. माणूस विधायक कार्यात गुंतला, यशस्वी झाला की त्याची दृष्टी विशाल बनते, ती अधिक मोठे जग पाहू लागते. त्यातून त्या माणसाच्या 'समाजोद्धार' कार्याबाबतच्या आकांक्षा वाढू लागतात. तो त्याच्या कुवतीत नसलेल्या मोठ्यामोठ्या उड्या घेऊ लागतो. बाबा आमटे, बाबा आढाव, मेधा पाटकर यांच्या बाबतीत तसे घडले आहे. परंतु त्यांना तशा मोठ्या उड्या मारताना यश लाभले नाही व ते त्यांच्या मूळ कार्याप्रती मर्यादित राहिले. तेथे एकनिष्ठ राहिले. त्यामुळे त्यांचे थोरपण अभंग राहिले.

अण्णा हजारे हे मुळात 'हाय प्रोफाईल' व्यक्ती नव्हे, ना त्यांच्याकडे कोणत्या विचारसरणीचे बळ आहे. त्यामुळे ते 'राळेगण सिद्धी'चे यश घेऊन जोवर महाराष्ट्र पातळीवर राहिले तोवर लोकांनी त्यांच्या उद्दिष्टांची विशालता समजावून घेतली, पण ते दिल्लीला रामलीला मैदानावर उपोषणासाठी गेले, त्यांनी केंद्र सरकारलाच आव्हान दिले, तेव्हा ते एका मोठ्या ‘रॅकेट’मध्ये अडकले. ते ‘रॅकेट’ बनावट व बदमाश होते व आहे का ते अजून ठरायचे आहे. या ‘रॅकेट’चे राज्य दिल्लीत चालू आहे. मुदलात, अण्णांनी त्यावेळी राजकारणाशी संबंध नको ही भूमिका घेतली, ती त्यांच्या व्रतस्थ जीवनाला धरून होती. पण त्यांनी त्याचे तत्त्वज्ञान मांडले नाही. केजरीवाल यांना सत्तेचे राजकारण महत्त्वाचे वाटले व त्यांनी तसे मांडले, त्यांना जयही मिळाला. अण्णांची भूमिका अवघड होती. त्यांच्याकडून ती यथार्थ व्यक्त न झाल्याने ते एकटे पडले, नगर जिल्ह्यात परत आले.

अण्णांना व त्यांच्या साथीदारांना मागील वेळी देशभर पाठिंबा मिळाला. त्याला कारण त्यावेळी लोकक्षोभ प्रचंड होता. भ्रष्टाचारविरोध हे निमित्त होते. परंतु मुळात देशात काही घडत नाही, समाजाच्या इच्छा-अपेक्षा-आकांक्षा व्यक्त करण्यास देशात पीठ नाही अशी अवस्था सर्व क्षेत्रांत झाली होती. त्यात जीवन विलक्षण असुरक्षित व अनिश्चित होऊन गेले होते. समाज नेतृत्वहीन असा होता. अण्णा व त्यांचे साथी समाजाच्या त्या अस्थिर, अस्वस्थ भावनांचे प्रतीक बनले. देशाचा एक कोपरा असा राहिला नाही, की जेथून अण्णांना पाठिंबा मिळाला नाही. अण्णांचे स्पिरिट म्हणजे लोकांचा तो ‘मूड’ होता. अण्णा जनतेच्या अस्वस्थतेचे काही काळ प्रतीक बनून गेले होते. मात्र अण्णांकडे त्यासाठी ना विचारसरणी होती, ना तत्त्वज्ञान. नरेंद्र मोदी यांनी तो ‘मूड’ हेरला. त्यांची निवडणूक मोहीम झंझावाती झाली. त्यांनी देशाला दिलासा दिला व नंतर विकासाची स्वप्ने दाखवली. ती सफल होत आहेत की विफल ठरणार आहेत हे अजून स्पष्ट व्हायचे आहे. ‘मराठा मोर्चा’सारख्या घटना व शेतकऱ्यांचे आंदोलन यांसारखी क्षुब्धता हे नित्याचे पक्षीय राजकारण आहे. पूर्वी काँग्रेस सत्तेविरूद्ध भाजप व समाजवादी तशी आंदोलने करत. त्यांना काडीचे महत्त्व मिळत नसे. आता काँग्रेस व अन्य राजकारणप्रेरित गट लोकक्षोभ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ते निवडणुकांचे राजकारण आहे. त्याचे यशापयश निवडणुकांची गणिते ठरवतील.

अण्णांच्या आंदोलनातून व्यक्त होऊ पाहत आहे ती सत्तेच्या राजकारणापलीकडील जनतेची ताकद – प्रत्येक व्यक्तीची ताकद. ‘आप’ हे भले अरविंद केजरीवाल यांनी पक्षासाठी (ब्रँड) नाव घेतले असेल, परंतु ‘आप’मधून व्यक्त झाली ती व्यक्तिस्वातंत्र्याची व व्यक्तिविकासाची इच्छा व आकांक्षा. ते उद्याच्या राजकारणाचे सूत्र असणार आहे. ‘आप’ हे उद्याचे ‘स्पिरिट’ आहे आणि ते अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून निर्माण झाले. अण्णा ते मांडत असोत वा नसोत, विचारी लोकांना त्यांची चेष्टा करून चालणार नाही; त्यांना अण्णांचा ‘फिनॉमिनॉन’ समजून घ्यावा लागेल.

- दिनकर गांगल

लेखी अभिप्राय

Excellent article,yes I agree that everyone should understand the phenomenon of respected Anna..

Dr Nagesh Tekale09/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.