सज्जनांना तपासणारी अनुदार मानसिकता


_SajjanannaTapasnari_AnudarMansikta_1.jpgअण्णा हजारे यांच्यावर होणाऱ्या विकृत टीकेमधून एक वेगळाच मुद्दा लक्षात आला. आम्ही सामाजिक व्यक्तींना कठोरपणे तपासतो व त्याउलट राजकारण्यांत सद्गुण शोधतो! महिन्यापूर्वी झालेल्या राज ठाकरे-पवार मुलाखतीनंतर दोघे किती उमदे, किती रसिक यांबद्दलच्या पोस्ट वाहत होत्या. पण त्यांनी त्यांच्याजवळ दिसते तितकी संपत्ती कशी जमवली असेल हा प्रश्नही पडला नाही आम्हाला... गल्लीतील नगरसेवक कोटी रुपये कमावतो, पण आम्ही त्याच्या वाढदिवसाला पहिल्यांदा जातो. अण्णा मात्र विमानाने दिल्लीला गेले तर त्या सीटचा फोटोही टाकला जातो! ही काय विकृती आहे? निम्मे राजकारणी उन्हाळ्यात परदेशात असतात. तेथे आम्ही गप्प! मात्र मेधा पाटकर खरेच पाण्यात उभ्या होत्या का? हा सार्वजनिक चर्चेचा विषय असतो. गो.रा. खैरनार यांच्या पत्नीने खूप वर्षांपूर्वी छापखाना काढला. त्याबाबत कर्ज फेडण्यासंबंधीची चौकशी सगळ्या महाराष्ट्राने केली. बिचारे शरद जोशी आरंभीच्या काळात ‘मते मागायला आलो, तर जोड्याने मारा’ असे एकदाच म्हणाले होते. तर ते राजकारणात आले तेव्हा लोक त्यासाठी जोडे घेऊन उभे होते! आणि पवार सोनियावर टीका करून वेगळे होतात; नंतर त्यांच्याबरोबर सरकार बनवतात; त्याला मात्र आम्ही मुत्सद्दीपणा म्हणतो. अण्णा केवळ संशयावरून संघाचे असतात, पण पवार जनसंघासोबत सरकार चालवतात, फडणवीस सरकारला मतमोजणी पूर्ण होण्यापूर्वी पाठिंबा देतात, ते पुरोगामी! आणि भाजप सरकारचे दोन मंत्री घरी पाठवणारे, त्या सरकारविरुद्ध उपोषण करणारे अण्णा मात्र संघाचे? हा काय प्रकार आहे? आम्ही सज्जनांना तपासताना इतके अनुदार का असतो? खरेच, या सार्वजनिक मानसिकतेवर विचार करायला हवा.

अण्णांचे एकूण उपोषण एकशेपंचेचाळीस दिवस झाले. त्यात अठ्ठावन्न दिवस उपोषण हे भाजप सरकारच्या काळात त्या सरकारविरुद्ध केलेले आहे. अण्णा संघाचे! एकशेपंचेचाळीस दिवस म्हणजे जवळपास पाच महिने. आम्ही कोणत्याही कारणासाठी किती दिवस 'उपवाशी' राहू शकलो हे तपासून मग अण्णांचे मूल्यमापन करावे.

मी अण्णांचे आंदोलन गेली वीस वर्षें जवळून पाहत आहे. त्यांचे सामर्थ्य आत्मक्लेशांतून नैतिक शक्ती निर्माण करणे व तिच्या आधारे सरकारला झुकवणे हे आहे. ते अल्पशिक्षित आहेत. त्यांच्याकडे संघटना नाही. त्यांनी त्यांच्या आंदोलनातून भ्रष्टाचार व निवडणूक सुधारणा हे मुद्दे राष्ट्रीय चर्चेचे बनवले, ते मान्य करून मग त्यांच्या दोषांवर बोलावे. ते भाबडे आहेत, पण बनेल नाहीत, त्यांना वैचारिक मर्यादा आहेत पण ते अप्रामाणिक नाहीत. लक्षात ठेवा, अशा आत्मक्लेश करून सरकारला झुकवणाऱ्या व्यक्ती खूप कमी राहिल्या आहेत. म्हणून अशी माणसे त्यांच्या दोष-मर्यादांसह जपली गेली पाहिजेत. त्यामुळे कोणी त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेतली की माझा संताप होतो. त्या माणसाने समाजासाठी स्वतः ला पणाला लावले; फक्त गावाचा, लोकांचा विचार केला; तो फकिरासारखा जगला, एवढे तरी भान ठेवावे की नाही?

यात आणखी एक मुद्दा आहे. अण्णा  हजारे, मेधा पाटकर यांच्यावर काहीही बोलले किंवा लिहिले तर अंगावर कोणी येत नाही. त्यामुळे त्यांच्यावर कशीही टीका केली तरी चालते. त्यातून ती टीका अधिक बेफाम होते. त्याउलट गल्लीतील नगरसेवकावर किंवा राज, उद्धव किंवा अजित पवार यांच्यावर टीका जपून केली जाते किंवा केलीच जात नाही, कारण त्यांचे संघटित कार्यकर्ते थेट टीकाकाराच्या घरावर चालून येऊ शकतात. त्यामुळे त्या भीतीतून नुसती टीका टाळली जाते असे नव्हे तर त्या भीतीची जागा स्तुती घेते; भीती लपवली जाते. मग राज यांची व्यंगचित्रे, उद्धव यांची फोटोग्राफी, अजित पवार यांचा करारीपणा यांवर बोलले जाते. कार्यकर्ते मात्र सॉफ्ट टार्गेट असतात.

महात्मा गांधींवर अजूनही टीका होते, कारण गांधीवादी करून करून काय करतील? पण एखाद्या जातीच्या संतावर, भूतकाळातील नेत्यावर टीका करण्याची हिंमत नाही, कारण त्यांचे भक्त चालून येतील. तेव्हा टीकाकार असे भेकड असतात. ते सोशल मीडियात टार्गेट निवडताना 'सॉफ्ट टार्गेट' निवडतात.

- हेरंब कुलकर्णी

लेखी अभिप्राय

सर,
अतिशय योग्य शब्दात मांडता सर,वास्तव परिस्थिती आहे.
नमस्कार

BAJIRAO Raghun…05/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.