विनय सहस्रबुद्धे - कुमार केतकर


दोन राज्यसभा सदस्य!

_KumarKetkar_VinaySahastrabudhedde_3_0.jpgकुमार केतकर यांची राज्यसभेवर काँग्रेस पक्षातर्फे महाराष्ट्रातून निवड हा विषय बऱ्याच कुतूहलाचा झाला आहे. त्याचे प्रमुख कारण केतकर यांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेबद्दल महाराष्ट्रात सर्वत्र आदर-आस्था-प्रेम आहे. त्यांच्या मतांबद्दल, आग्रही प्रतिपादनाबद्दल भिन्न मते आहेत, परंतु त्यांचे वाचन व संदर्भबहुलता या गोष्टी सर्वांनाच प्रिय आहेत. त्यांना असा माणूस महाराष्ट्रात नाही याची मनोमन जाणीव आहे. त्यांची निवड कॉंग्रेस पक्षातर्फे सुचवण्यात आली. त्यामुळे त्यावर आरंभीच्या उत्साहात उलटसुलट चर्चा होऊन गेली. केतकर नेहरू-गांधी घराण्याचा सतत पुरस्कार करत आले आहेत. त्यांनी त्यांच्या त्या ‘लोभा’साठी वैचारिक समर्थनदेखील दिले आहे. त्याबद्दलचा ‘लाभ’ त्यांना मिळाला अशी थिल्लर प्रतिक्रियाही त्या चर्चेत उमटून गेली, पण ती फार काळ टिकली नाही; कारण केतकर यांनी विविध पदे भूषवली, ते महाराष्ट्रातील ‘सकाळ’ वगळता तिन्ही मोठ्या वृत्तपत्रांचे संपादक (‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’ व ‘लोकमत’) होते. तसेच, त्यांनी ‘दिव्य मराठी’ला आकारच दिला. त्यांना 2000 साली पद्मश्री किताबाने गौरवण्यात आले. त्यांची भाषणे म्हणजे ‘मेजवानी’ असते – त्यात संदर्भ ठासून भरलेले असतात, वाक्चातुर्यही असते आणि मुख्य म्हणजे ठोस प्रतिपादन असते. ते निवडणुकांचे विश्लेषण (केवळ भारतीय नव्हे) आकेडवारीसह, उदाहरणांचे मासले देऊन, अभ्यासयुक्त, आम जनांना पटेल असे करतात. सहसा त्यांचे अंदाज बरोबर येतात, विश्लेषण तर्कशुद्ध असते. स्वाभाविकच, त्यांचा राजकारण हा आवडता विषय असावा असे जाणवते, परंतु ते कृष्णमूर्ती तत्त्वज्ञानासारख्या गहन विषयावरही श्रोत्यांना खिळवून ठेवतात.

केतकर यांच्याप्रमाणेच विनय सहस्रबुद्धे यांची राज्यसभेवर नियुक्ती ‘भारतीय जनता पक्षा’तर्फे काही महिन्यांपूर्वी झाली. तेही मुद्देसूद बोलणारे, प्रश्नाच्या अभ्यासात खोलवर जाणारे, पण नेमस्त. काय योगायोग पाहा! महाराष्ट्रातील दोन विद्वान गृहस्थ एकाच काळात राज्यसभेवर जात आहेत व त्यामुळे राज्यसभा म्हणजे ‘वरिष्ठांचे सभागृह’ ही जी अपेक्षा असते ती अल्पांशाने सार्थ होत आहे. यामधून चांगला पायंडा पडेल आणि विधान परिषद व राज्यसभा यांना बौद्धिक लकाकी लाभेल अशी अपेक्षा ठेवुया.

भारतातील राजकारण आणि लोकशाही व्यवस्था, दोन्ही एका कसोटीच्या टप्प्यावर उभ्या आहेत. भाजप 2014 मध्ये निर्विवाद मताधिक्याने निवडून सत्तेवर आला तेव्हा पक्षाच्या वतीने दिली गेलेली आश्वासने मोठी होती. पक्ष निवडून येण्याचे प्रमुख कारण नरेंद्र मोदी यांनी लोकांच्या वाढत्या आकांक्षा विकासाच्या राजकारणाने पूर्ण होतील असे आश्वासक चित्र त्यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेतून जनतेसमोर तयार केले. त्यांनी सत्तेवर आल्यानंतरही काही धाडसी निर्णय घेतले आणि जनसंपर्क ठेवला. परिणामत: भाजप नंतरच्या वेगवेगळ्या निवडणुकांत आघाडी घेत गेला, परंतु त्यांच्या त्या विजयमोहिमेला आता जनतेतून शह जाणवू लागला आहे. मोदी-शहा जोडी एका बाजूला सर्वसत्ताधीश वाटत असताना, त्यांचे भाजपशी संलग्न अनेक (अतिरेकी वाटाव्या अशा) ‘हिंदू’ घडामोडींवर लक्ष नाही, की त्यांचा त्या घडामोडींना पाठिंबा आहे? हे कळण्यास मार्ग नाही. गोवंश हत्या बंदी, उत्तर प्रदेशमध्ये आंबेडकरांचे ‘रामजी’सकट संपूर्ण नाव वापरण्याचा निर्णय... अशा निर्णयांना कसलेही तार्किक समर्थन असू शकत नाही. भाजपच्या मध्यवर्ती समितीने ते निर्णय रद्द केले पाहिजेत, तशा घडामोडींना पायबंद बसेल असे पाहिले पाहिजे. भाजपचे ‘सबका साथ सबका विकास’ हे धोरण जनव्यवहारात प्रत्ययाला येत नाही; उलट पक्षपातीपणाने व्यक्त होत आहे असे जाणवते. त्याचे निराकरण होत नाही. तसेच, भाजप सरकारचे नोकरशाहीवर नियंत्रण आहे असेही जाणवत नाही.

दुसऱ्या बाजूस काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी आले आहेत. त्यांची प्रतिमा गेल्या काही वर्षांत फार मलीन करण्यात आली होती – ती खरे तर कुचेष्टाच होती. परंतु त्यांनी त्यांच्या अंगचे सामर्थ्य व त्यांची चिकाटी गुजरातमधील निवडणुकांत दाखवून दिली. काँग्रेस भाजपला पर्याय देऊ शकेल अशा स्थितीत नक्की नाही, पण काँग्रेस वर्षभरात पलटी मारू शकेल अशा अवस्थेत आहे असेही जाणवते.

अशा वेळी, कुमार केतकर दिल्लीला जात आहेत. ते राज्यसभेच्या नियमांच्या चौकटीत काय प्रकारची व किती प्रभावी कामगिरी बजावतील हे सांगता येणार नाही, पण काँग्रेस नेतृत्वाने राज्यसभेच्या महाराष्ट्रातील एकमेव जागेसाठी राज्यातील पक्षवर्तुळ बाजूला सारून ‘पक्षाबाहेर’च्या त्या माणसाची प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. त्यातून बऱ्याच गोष्टी सूचित होतात. कुमार केतकर हे जसे बिनतोड युक्तिवाद करू शकतात, जसा झंझावाती प्रचार करू शकतात; तसे, त्यांच्या अंगी संघटनकौशल्य फार मोठे आहे. त्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर, पक्ष व विचारसरणी निरपेक्ष अक्षरश: हजारो माणसे जोडली गेली आहेत. त्यामुळे त्यांची कृती, त्यांचे विचार हे नेहमीच कुतूहलाचे राहिले आहेत. त्यास काँग्रेस पक्षाचे पीठ कसे लाभते त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. केतकर यांच्या त्या ताकदीकडे विरोधकांनी जरा दचकूनच पाहण्यास हवे.

विनय सहस्रबुद्धे हेदेखील भाजपमधील ‘थिंक टँक’ म्हणावे अशा पात्रतेचे आहेत. एरवी संघ परिवाराची व पक्षाची ख्याती बौद्धिक कामासाठी नाही. पक्ष परिवाराचे वेगवेगळ्या आघाड्यांवरील विधायक कार्य कौतुक वाटावे असे आहे. त्यातील त्यांची निष्ठा विशेष महत्त्वाची. जनता राजवटीचा प्रयोग फसल्यानंतर बरेच समाजवादी जसे विधायक कार्यास लागले, तसे बरेच ‘जनसंघी’देखील वेगवेगळ्या तऱ्हेची सामाजिक कामे करू लागले. त्यात जिल्हा बँकांपासून तळच्या समाजाच्या उद्धारापर्यंतच्या विविध कामांचा समावेश होतो. ते भाजपकडून विफल झाले होते. मोदी यांनी गेल्या निवडणुकीआधी त्यांच्यात राजकारणाबद्दल उमेद व आशा निर्माण केली. मोदी व भाजप यांना विजय खरा लाभला तो मनमोहन सिंग यांच्या काळातील नोकरशाहीच्या नाकर्तेपणामुळे आणि राजकारणाशी पुन्हा संलग्न झालेल्या संघ परिवारातील कार्यकर्त्यांमुळे. त्यांचा भारतीय (हिंदू) जीवनपद्धतीवर विश्वास आहे, तरीदेखील त्यांना कोणताही ‘हिंदू’ वेडेपणा आधुनिक काळात सहन होईल असे नव्हे. त्यांना मोक्ष, पुनर्जन्म, चौ-यांऐशी लक्ष योनीतील फेरे, आत्मा-परमात्मा यांपलीकडील, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळातील ‘न्यू हिंदू थॉट’ हवा असणार! त्यांना सत्तेच्या राजकारणाचे महत्त्व कळते, परंतु त्यांनाही सत्तेचा दुरुपयोग त्रस्त करणाराच वाटेल. म्हणून भाजप पक्षवर्तुळातील बऱ्याच लोकांना मोदी-शहा यांचा ‘एकतंत्री कारभार’ पसंत नाही अशा बातम्या प्रसृत होत असतात.

विनय सहस्रबुद्धे उच्चशिक्षित आहेत. त्यांनी लोकशाही राजकारणाशी संबंधित विषयावर पीएचडी मिळवली आहे. त्यांची तशी काही पुस्तके आहेत. त्यांनी ‘रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी’ ही सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक प्रशिक्षणासाठी ख्यातनाम संस्था उभी केली आहे. प्रबोधिनीला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे. ती कामगिरी विनय सहस्रबुद्धे यांची. सहस्रबुद्धे यांना वेगवेगळ्या विचारसरणींच्या परिषदांमध्ये आणि गटचर्चांमध्ये मुद्दाम बोलावले जाते ते त्यांच्या ‘फोकस्ड’ मांडणीमुळे. तशा वेळी सहस्रबुद्धे ‘म्हाळगी प्रबोधिनी’चे प्रमुख म्हणून पक्षाच्या सीमा ओलांडून बोललेले काही वेळा पाहण्यात आले आहे. सहस्रबुद्धे यांनी मुंबई विद्यापीठात काही चांगल्या प्रथा पाडल्या; तसे आग्रह धरले. त्यांची खासदार होण्याआधी भाजपचे उपाध्यक्ष म्हणून नेमणूक झाली, ते त्या पदावर गेली तीन वर्षें आहेतच. शिवाय, त्यांच्यावर ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’ या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सहस्रबुद्धे यांच्या बुद्धिमत्तेची व संघटनकौशल्याची छाप दिल्लीत अजून जाणवायची आहे. ते खासदार झाल्यामुळे त्यांना बळ अधिक लाभते का ते पाहायचे.

केतकर-सहस्रबुद्धे या दोघांचीही महाराष्ट्र व मराठी संस्कृती या विषयात आस्था आहे. त्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्रीय पातळीवरील कार्याची अपेक्षा जशी आहे तशी ते राष्ट्रीय पातळीवरून मराठीकारण कसे पुढे नेतात याबद्दल उत्सुकता आहे. महाराष्ट्र, राष्ट्र नव्हे; तर अवघे जगच सध्या कसोटीच्या काळातून जात आहे. अशा वेळी महाराष्ट्राचे हे दोन बुद्धिवान ‘हिरे’ दिल्लीत कसे चमचमतात व जगात प्रकाश पाडतात बरे! ते पाहूया.

- दिनकर गांगल

लेखी अभिप्राय

योगायोगच म्हणावा लागेल की ही दोन्ही व्यक्तिमत्व दोन वेगवेगळ्या विचारसरणी ची पार्श्वभूमी असलेली आहेत तरीही देश हिता साठी एकत्र येऊन काम करावं अशी अपेक्षा करणं योग्य ठरेल

Milind Dharwadkar10/04/2018

अप्रतिम

Vasant Vasant Limaye17/04/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.