पत्रावळ


_Patraval_1_0.jpgपत्रावळ म्हणजे पळसाच्या पानांची गोलाकार थाळी किंवा ताट होय. ती मुख्यत: भोजनासाठी उपयोगात आणली जाते. पत्रावळी लग्नसमारंभात किंवा अन्य कार्यक्रमात जेवणावळींसाठी वापरल्या जातात. त्या आधीच्या काळात घरोघरी बनवल्या जात. त्या नारळाच्या किंवा लिंबाच्या झाडापासून काढलेल्या काड्यांनी जोडल्या जात. तसे जोडून साधी पसरट पत्रावळ तयार केली जात. कालांतराने जेवणाचे इतर पदार्थ पत्रावळीमध्ये व्यवस्थित वाढता यावे, म्हणून त्यात वाट्या तयार करण्यात येऊ लागल्या. तसेच पानांचे छोटे द्रोणही तयार केले जातात. त्या पत्रावळी मशीनचा वापर करून तयार करण्यात येतात. पत्रावळी तयार करणे हा लघुउद्योग अनेक ठिकाणी केला जातो.

पुरातन काळात पत्रावळीवर जेवण करणे हे प्रशस्त मानले गेले आहे. पत्रावळीसाठी सहसा पळसाची पाने वापरली जातात. तसेच टेंटू, आघाडा, फणस, जांभूळ, आंबा, चाफा व केळ या वृक्षांची पानेसुद्धा वापरली जातात. ती पाने तुटलेली, फाटलेली, किडीने खाल्लेली व मलिन असू नयेत असा अलिखित संकेत पाळला जातो. पत्रावळीच्या अधोभागी एक पान जोडावे. ते न जोडल्यास तशी पत्रावळ भोजनाला निषिद्ध मानली गेली आहे. पत्रावळ एकपानी किंवा दोनपानी असेल किंवा पळसाच्या पानांच्या पत्रावळीतील मधले पान केळीचे किंवा कमलपत्र असेल तर त्याला मात्र खाली पान जोडण्याची आवश्यकता नाही. पत्रावळी करताना डेखाला डेख किंवा टोकाला टोक जोडू नये, पानाचे अग्र मध्यभागी येऊ नये, पानांची पाठीला पाठ लागू नये, डेख पानाच्या टोकाला जोडावे, असे पुराणात सांगितले आहे. भोजनासाठी निमंत्रित ब्राह्मणांकडून पत्रावळी लावून घेऊ नयेत, असाही नियम आहे. चातुर्मासात किंवा काही व्रते आचारताना ठराविक पानांच्या पत्रावळीवर भोजन करण्याचा प्रघात आहे. पळसाच्या पानांमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्त्व आहे.

पानांनी बनवलेल्या पत्रावळींचा वापर गावाकडे जनावरांना खायला देण्यात होतो. त्यामुळे कचरा तयार होणे आणि त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र, पानांचा वापर करून तयार केलेल्या पत्रावळी तुटतात, फाटतात किंवा त्यांना वाळवी लागते म्हणून हल्ली थर्माकोलने तयार केलेल्या पत्रावळी बाजारात आल्या आहेत. पत्रावळी बनवून विकण्याचा व्यवसाय अनेक कुटुंबे करत असत. त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर उदरनिर्वाह करत असत. पत्रावळी बनवून थेट शहरातील बाजारात विकल्या जात. त्यामुळे अनेक कुटुंबांना रोजगार मिळत असे. आता यंत्राद्वारे प्लॅस्टिकच्या पत्रावळी व द्रोण अत्यंत कमी वेळात, कमी किमतीत, तसेच विविध रंगांत उपलब्ध होतात. पण त्या पर्यावरणास हानिकारक असतात. त्याला पर्याय म्हणून कागदाच्या पत्रावळी बाजारात आल्या आहेत. त्या पत्रावळींना अॅल्युमिनिअम फोइल लावली जाते. त्यामुळे त्यात जेवणाचे पदार्थ वाढता येतात. पण या पत्रावळी कार्यक्रम संपल्यानंतर कचऱ्यात टाकून दिल्या जातात. शहरात जनावरांचे प्रमाण कमी असल्याने पानाच्या पत्रावळींपेक्षा कागदाच्या पत्रावळींचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. शहरात कार्यक्रमात जेवणावळींसाठी बुफे व केटरींग पद्धत वाढली आहे. त्यामुळे भोजनासाठी पत्रावळींच्या पंक्ती लोप पावत जात आहेत.

जर्मनीतील 'लीफ रिपब्लिक' या कंपनीने झाडाच्या पानांपासून पत्रावळी बनवायला सुरूवात केली आहे. त्यांनी पत्रावळी बनवताना एकावर एक अशा पानांच्या दोन थर दिले आहेत आणि मध्ये पानांपासूनच बनवलेला कागद घातला आहे. त्यामुळे त्या तीन थरांनी पत्रावळींना मजबूती आली आहे. त्यांनी त्या पत्रावळी शिवल्या आहेत. त्या शिवताना त्यांनी जो धागा वापरला आहे तो धागा दोराही त्यांनी पाम झाडाच्या तंतूंपासून बनवला आहे. त्या कंपनीची माहिती देणारा व्हिडीओ या लिंकवरून पाहता येईल.

- विकास ठाकरे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.