जूचंद्र गावात होते कोंबर हावली (कोंबडी होळी)


_JuchandraGavalaHote_KombarHavli_2.jpgजूचंद्र हे ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील हिंदू -आगरी लोकवस्ती असलेले गाव. ते रांगोळी कलेसाठी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. तसेच, ते तेथे उत्साहात साजऱ्या केल्या जाणाऱ्या पारंपरिक सणांमुळेही ओळखले जाते. त्या परंपरेतील मोठा सण म्हणजे होळी - तेथील स्थानिक आगरी बोलीभाषेत 'हावली'. तिला हावलाय माता किंवा हावलुबाय (बाय म्हणजे मोठी बहीण) असेही संबोधले जाते. जूचंद्र गाव मुंबईजवळ पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्टेशनच्या पूर्वेस आहे. गावाशेजारी बाहेरून येणाऱ्या स्थलांतरितांची वस्ती वाढत असली तरी गाव त्याची संस्कृती-परंपरा टिकवून आहे.

लहान मुलांच्या होळी गावभर गल्लीगल्लीत हुताशनी पौर्णिमेच्या दहा दिवस अगोदर लावल्या जातात. मुख्य होळ्या दोन दिवस लावल्या जातात. पहिल्या दिवशीच्या होळीला कोंबड्या बांधण्याची पद्धत नवसाचा भाग म्हणून आहे. म्हणून तिला कोंबडी होळी (कोंबर हावली) असे म्हणतात. तर दुसऱ्या दिवशीच्या होळीला ‘मोठी हावली’ असे म्हणतात. होळी पहाटे कोंबडा आरवल्यावर पाडली जाते.   

जूचंद्रच्या होळी सणाला शतकाची परंपरा आहे अशी ग्रामस्थांची धारणा आहे. पूर्वी तेथे फाल्गुन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत रोज म्हणजे पंधरा दिवस होळी पेटवली जात असे. तेथील होळी हनुमान मंदिराच्या जवळील भातशेतीमध्ये पेटवली जात असे. रात्री होळीसमोर करमणुकीचे कार्यक्रम म्हणून गावातील कलाकारांचे कार्यक्रम होत असत. आगरी शिलीतील सोंगे आणि बतावणी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असत. रोज रात्री साऱ्या गावातील आबालवृद्ध हे कार्यक्रम पाहण्यास जमत.

_JuchandraGavalaHote_KombarHavli_1.jpgएक गाव एक होळी ही पद्धत गावात जोपासली जाते. होळीसाठी लागणारे झाड खास मानपान देऊन जंगलातून आणले जाते. त्याला गावच्या वेशीवर आल्यावर सजवून, गाडीत बसवून, वाजतगाजत तालावर नाचत गावभर फिरवले जाते. गावातील स्त्री-पुरुष आबालवृद्ध मिरवणुकीत सहभागी होतात. पूर्वी ग्रामीण भाग असल्याने होळीसाठी प्रत्येक घरातून लाकूड आणि हार नेण्याची पद्धत होती. मधील काळात त्यातील काही गोष्टी बदलल्या, मात्र लोकांचा उत्साह तोच असतो. महिला पारंपरिक गाणी गातात, नाचगाणी- मनोरंजनाचे कार्यक्रम यांतून सण उत्तरोत्तर इतका रंगत जातो, की रंगपंचमीचा दिवस कधी उजाडतो ते कळतदेखील नाही.

‘हावलुबाय’च्या पूजेचा मान परंपरेने म्हात्रे कुटुंबीयांकडे चालत आलेला आहे. त्यात गावात नव्याने लग्न झालेल्या जोडप्यालाही सहभागी केले जाते. लग्न झालेल्या इतर नव्या जोडप्यांनी हावलुबायला प्रदक्षिणा घालण्याची पद्धत आहे. होळी हा मुख्यत: खाण्यापिण्याचा सण समजला गेला असला, तरी जूचंद्र गावात मात्र होळीचा खास उपवास पाळला जातो! प्रत्येक घरात पुरणपोळ्या केल्या जातात. रात्री होळीच्या होमात पोळी, नारळ, ऊस अर्पून उपवास सोडला जातो.

- शैलेश पाटील

लेखी अभिप्राय

छान महिती दिली आहे. शुभेच्छा.

Devendra Parab14/03/2018

Juchandra kar

Rohan Kanojiya 19/03/2019

जूचंद्रची आगरी परंपरा व हावली वा सुंदर वर्णन

Hrudaynathpatil19/03/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.