अरविंद टिकेकरांचे विचारधन: जरा हटके पुस्तक


_ArvindTikekar_Vichardhan_JraHatkePustak_1.jpgप्रा. अरविंद चिं. टिकेकर (5 जानेवारी 1935 ते 26 ऑक्टोबर 2010) हे विचारवंत ग्रंथपाल होते. त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य ग्रंथालय व्यवस्थापन आणि ग्रंथालय व माहितीशास्त्र यांचे अध्ययन व अध्यापन यांसाठी वाहिले. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालयाची पी. एम. जोशी, डी. एन. मार्शल आणि बी. अँडरसन यांनी प्रस्थापित केलेली वैभवशाली परंपरा पुढे नेली. त्यांनी तेथील बावीस वर्षांच्या सेवाकाळात (1973 ते 1995) अनेक नवीन कार्यपद्धती अवलंबल्या आणि मुख्य म्हणजे संगणकाचा वापर सुरू केला. त्यांनी शेकडो ग्रंथपालांना घडवले, ते जगभर पसरलेले आहेत. त्यांचा कटाक्ष विविध क्षेत्रांतील व्यक्तींना ग्रंथालय क्षेत्राशी जोडून त्यांचे योगदान प्राप्त करण्यावर होता. मी त्यापैकी एक भाग्यवान! माझे सर्व शिक्षण आणि माझी कारकीर्द गणित विषयात झाले. मला टिकेकरांनी विशेष प्रोत्साहन दिले. माझा मुंबई विद्यापीठाशी संबंध नव्हता. मी त्यांना विद्यानगरीमधील ‘जवाहरलाल नेहरू ग्रंथालया’त 1978 च्या जुलै महिन्यात भेटून ग्रंथालय वापरण्याची परवानगी मागितली. त्यांनी मला लगेच साधारण वाचक म्हणून एक वर्षासाठी सदस्य केले आणि दोन पुस्तके घरी नेण्याची मुभाही दिली. त्यानंतर आमच्या भेटी नियमितपणे होऊ लागल्या, मला त्यांचा प्रगत दृष्टिकोन आणि सचोटीने काम करण्याची जिद्द भावली. आमची ती जुळलेली नाळ त्यांच्या मृत्यूनेच तुटली.

त्यांनी मला माझी ग्रंथालय क्षेत्रातील आवड व संशोधनवृत्ती बघून 1985 पासून त्यांच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागात अध्यापन करण्यास अभ्यागत प्राध्यापक म्हणून आमंत्रित केले. ते आजतागायत चालू आहे. त्यांनी विद्यापीठाच्या ग्रंथालयात पहिला संगणक आणण्यासाठी 1988-89 मध्ये केलेले अथक प्रयत्न कौतुकास्पद होते. त्यांनी मला संगणकाच्या वापरासाठी समुचित आज्ञावली लिहिणे आणि कर्मचारीवृंदाला प्रशिक्षण देणे यासाठी दिलेली संधी माझा ग्रंथालयाचा अभ्यास वाढवण्यास महत्त्वाची ठरली. विशेष म्हणजे, त्यांनी 1995 मध्ये निवृत्त झाल्यावर वयाच्या साठाव्या वर्षी संगणक वापराचे शिक्षण घेतले. त्यांनी इंटरनेटचा वापर ज्या प्रकारे केला, तो सेवेत असलेल्या ग्रंथपालांना लाजवणारा होता. त्याला मुख्य कारण म्हणजे त्यांची ग्रंथालयशास्त्रावरील पकड उच्च दर्जाची होती आणि त्यामुळे त्यांना काय शोधायचे हे माहीत होते. मी 2006 साली स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर आम्ही दोघांनी जवळपास संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर ग्रंथालयांना भेटी देऊन ती आधुनिक कशी करता येतील यांबाबत अनेक कार्यशाळा व कार्यक्रम घेतले. ते स्वत: विद्यापीठाचे ग्रंथपाल असूनही त्यांनी शालेय, महाविद्यालयीन, सार्वजनिक अशा सर्व प्रकारच्या ग्रंथालयांचा विकास करण्यात रस घेतला.

त्यांचे अनेक विद्यार्थी, सहकारी आणि हितचिंतक यांनी त्यांचा अमृतमहोत्सव 2010च्या जानेवारीत मोठ्या दिमाखात साजरा केला होता. मात्र त्यांची इच्छा त्याप्रसंगी त्यांचा गौरवग्रंथ काढला जाऊ नये अशी होती. त्याऐवजी त्यांनी वेळोवेळी प्रसिद्ध केलेले लेख व इतर साहित्य एकत्रित करून पुस्तक तयार करावे, ते व्यावसायिक चरित्र या प्रकारचे असावे असे त्यांच्या मनात होते. टिकेकरांनी त्या दृष्टीने जुळवाजुळव सुरू केल्याचे मला सांगितले आणि त्याबाबत चर्चा करण्यासाठी मला त्यांच्या घरी 28 ऑक्टोबर 2010 ला बोलावले. मात्र तसे घडायचे नव्हते, कारण त्यांची प्राणज्योत 26 ऑक्टोबर 2010 रोजी रात्री 11:30 ला आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मालवली. त्यांना मृत्यू आजारी, लोळागोळा किंवा अगतिक होऊन नको होता. त्यांच्या मनाप्रमाणेच ते घडले, पण आम्हाला धक्का बसला. 

अशा व्यासंगी टिकेकर यांचा पहिला स्मृतिदिन त्यांच्या मनात असलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाने साजरा व्हावा आणि ते पुस्तक मी संपादित करावे असा प्रस्ताव त्यांची पत्नी आशा, मुलगी (डॉ. रोहिणी केळकर) आणि मुलगा (हेमंत) यांनी माझ्यापाशी जून 2011मध्ये मांडला. मी माझा त्यांच्याशी असलेला दीर्घ व्यावसायिक आणि वैयक्तिक संबंध लक्षात घेऊन; तसेच, त्यांच्या ऋणातून थोडेफार मुक्त होण्याची संधी लक्षात घेऊन त्यास होकार दिला.

मी टिकेकरांचे सर्व लिखित साहित्य एकत्र करून त्याचा अभ्यास काही आठवडे केला. त्यांचे लेखन विपुल आणि विविधांगी होते. मुख्य म्हणजे प्रसंगानुसार ते मराठी व इंग्रजी भाषांत होते. मी त्यातून विषयांची विविधता, मांडणीमधील नाविन्य आणि वर्तमान व भविष्य या दोन्ही काळांतील उपयुक्तता असे निकष लावून टिकेकरांचे महत्त्वपूर्ण असे प्रत्येकी वीस मराठी आणि इंग्रजी लेख निवडले आणि पुस्तक द्विभाषिक असावे असा निर्णय घेतला. तो थोडा धाडसी आहे. ज्यांना त्यापैकी एकच भाषा येत असेल त्यांच्या सोयीसाठी मी प्रत्येक इंग्रजीमधील लेखाचा सारांश मराठीत आणि प्रत्येक मराठी लेखाचा सारांश इंग्रजीत तयार केला. तसे करताना फार काळजी घ्यावी लागली, कारण त्रयस्थाने थोडक्यात पण अचूकपणे लेखाचे सार देणे हे काम कठीण असते. त्या दोन विभागांशिवाय त्यांना मिळालेले सन्मानपत्र आणि त्यांच्याविषयीची इतर रंजक माहिती चार परिशिष्टांत सामिल केली. तसेच, शेवटी शोध घेण्यास उपयुक्त अशी शब्दसूची तयार केली. हे जवळपास तीनशे पानी पुस्तक तयार करण्यास चार महिने लागले. ग्रंथपाल म्हणून टिकेकरांच्या विचारांचे प्रतिबिंब त्या पुस्तकात पडले आहे. म्हणून मी त्यास “Reflections of a Librarian – Selected Writings of Professor A. C.Tikekar” असे शीर्षक दिले. श्रीमती टिकेकरांनी ‘परिपूर्ण ग्रंथपाल’ या मथळ्याखाली मांडलेले मनोगत पुस्तकाला पूर्णत्वास नेण्यास कळीचे ठरले असे मी मानतो.

टिकेकरांच्या कुटुंबीयांनी सर्व निर्णय घेण्याची स्वतंत्रता मला देऊन या कार्यात सर्वतोपरी मदत केली. योगेश पालकर या त्यांच्या स्नेह्याने पुस्तक किमान वेळेत आणि सुबक व आकर्षक स्वरूपात छापून दिले. टिकेकरांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’त झालेल्या समारंभात पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी पुस्तक स्वखर्चाने छापून; तसेच, इच्छुक वाचकांना विनामूल्य देऊन टिकेकरांना वाहिलेली आदरांजली सदैव स्मरणात राहील. पुस्तकाच्या प्रती देशातील सर्व प्रमुख ग्रंथालयांत पाठवल्या गेल्या आहेत. पुस्तक निराळेच आहे, ग्रंथालय क्षेत्राशी निगडित प्रत्येकाला काहीना काही वेगळा संदेश देत आहे असे प्राप्त झालेल्या प्रतिक्रियांवरून समजले. एकाद्या व्यक्तीच्या कार्याची नेमकी व बिनचूक नोंद म्हणून या पुस्तकाची भलावण करतात तेव्हा अतिशय समाधान वाटते!

- डॉ. विवेक पाटकर

लेखी अभिप्राय

लेख माहितीपूर्ण आणि चांंगला आहे. पस्तक मिळवून वाचावेसे वाटू लागले!!

आनंंद द. गाडगीळ10/01/2018

टिकेकर सरांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. डॉ. पाटकरांनी घेतलेली मुलाखत अजून स्मरते. ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला [मुंबई बाहेर असल्यामुळे] उपस्थित राहू न शकल्याची खंत वाटते.

सचिन वैद्य15/01/2018

टिकेकर सरांच्या सत्कार समारंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभले. डॉ. पाटकरांनी घेतलेली मुलाखत अजून स्मरते. ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला [मुंबई बाहेर असल्यामुळे] उपस्थित राहू न शकल्याची खंत वाटते.

सचिन वैद्य15/01/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.