अध्यात्म


महात्मा गांधी यांच्या तोंडचे एक वाक्य मला फार मोह घालते. म्हणे, ते ब्रिटिशांना उद्देशून असे म्हणाले होते, की ‘तुम्ही कोण मला स्वातंत्र्य देणारे? मी माझा स्वतंत्र आहे.’ मला कायम वाटत आले आहे, की स्वातंत्र्य ही मानवी मनाची सर्वोच्च अवस्था. पूर्ण स्वतंत्र. कसलेही बंधन नाही – कसलाही गंड नाही. दडपणमुक्त अशी स्थिती ती! माणूस जेव्हा लाख वर्षांपूर्वी  आफ्रिकेत जन्माला आला तेव्हा उन्मुक्तच होता तो. तेथून तो सा-या पृथ्वीतलावर पसरला, पार ऑस्ट्रेलियापर्यंत जाऊन पोचला, तो स्वत:च्या इच्छेने. शरीरपोषणासाठी अन्नाची गरज हे प्रमुख कारण होते. पण त्याला उत्क्रांतीच्या कोणत्यातरी टप्प्यावर मेंदूची जाणीव झाली. त्याला शरीरधारणेइतकीच बुद्धीची, मनाची मशागत गरजेची आहे हे कळले. तो म्हणजे बैल नव्हे, की खाल्ला कडबा आणि बसला रवंथ करत. की तो म्हणजे गाढव नव्हे की घे पाठीवर ओझे आणि बस पाट्या टाकत. ते त्याला बुद्धी चालवल्यामुळे आकळत गेले. सर्व प्राणी जगतात माणसाचे ते वैशिष्ट्य ठरले- बुद्धिमान प्राणी! प्राण्यांप्रमाणे माणसांचेही कळप तयार होत गेले. त्यांना म्हणत, जमाव, समुदाय. त्यांच्या व्यवस्थापनाची गरज वाटू लागली तेव्हा एका बाजूला टोळ्या, देश अशा रचना होत गेल्या तर दुस-या बाजूला धर्म-पंथ. त्यातच माणसाने केव्हातरी मन:शांतीसाठी देवाचा शोध लावला. मनुष्य सृष्टीच्या पसा-यात निर्माण झाला – प्रगतीच्या, विकासाच्या एका टप्प्यावर येऊन पोचला. सृष्टीचे कोडे उलगडू लागला, तरी त्याला त्याच्या जीवनाचा अर्थ कळेना. को ऽहम्! मी आहे तरी कोण? मी कशासाठी या भूतलावर आलो? माणसाच्या बुद्धीला पडलेल्या या अशा प्रश्नांची उत्तरे धर्म-तत्त्वज्ञानांनी दिली. त्यांनी जीवन जगण्याची रीत तर सांगितलीच, त्याचबरोबर एक जीवन संपल्यावर उर्वरित जनांच्या जीवनात जी पोकळी तयार होते. त्याचीही व्यवस्था लावून दिली. त्यामधून पुनर्जन्म, मोक्ष अशा संकल्पना तयार झाल्या. मनुष्य समुदायाला त्या संकल्पनांनी काही हजार वर्षें रिझवलेदेखील. मनुष्य समुदाय त्यात गुंगून गेला. माणसांना तीच त्यांच्या जीवनाची इतिकर्तव्यता वाटू लागली.

पण गेल्या चार-पाचशे वर्षांपासून वैज्ञानिक शोध लागणे सुरू झाले. पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते इतक्या प्राथमिक संशोधनापासून सुरुवात झाली आणि आज, माणूस प्रतिसृष्टी निर्माण करण्याच्या गोष्टी बोलू शकतो. अशा त-हेने मानवी जीवनाचे गूढ जवळ जवळ उलगडून दाखवले. त्यामुळे धर्मांनी केलेली मनुष्यजीवनाची व्यवस्था फोल ठरली. ती व्यवस्था म्हणजे केवळ कर्मकांड उरले.

धर्माशी जोडला गेलेला एक पदर मात्र विलोभनीय आहे. तो आहे अध्यात्माचा. त्याचा धर्माशी साक्षात संबंध काही नाही. तो साधा व्यक्तिविकासाचा मार्ग आहे. पण त्याची मांडणी अशी केली जाते, की ती गोष्ट गूढ आहे. अशी गूढ, की ती सहजगत्या उमगणार नाही. अध्यात्मवादी पंथांचे सध्याचे खूळ येण्याआधी, पंधरा-वीस वर्षांपूर्वी काही साधू पुरुष समाजात होऊन गेले. त्यांनी चांगली कामे उभी केली. नियमित बैठका वगैरे घेऊन सत्संगाचा मार्ग चोखाळला. त्यांच्यापैकी वामनराव पै हे खूपच बुद्धिनिष्ठ आणि व्यवहारवादी. त्यांचे एक विचारसूत्र आपला भारत देश हा अमेरिकेच्या तोडीस तोड निर्माण करायचा आहे असे होते. पण त्यांच्याकडेही अन्य अनेक साधू-पुरुषांप्रमाणे नामजपाचे महात्म्य सांगितले जाई आणि त्यांचे अनुयायी ‘तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ ही त्यांची शिकवण बाजूला सारून नामाचा जप करून अध्यात्ममार्ग अनुसरत!

अध्यात्म ही गोष्ट मुळात वैयक्तिक आहे. ती धर्मपंथाप्रमाणे समुदायाने अनुसरायची गोष्ट नाही. अध्यात्माचा साधासोपा अर्थ आहे – माणसाचे बाह्य जीवन आणि अंतर्जीवन यांची एकरूपता. म्हणजे मग माणूस अखंड, निरामय जीवन जगू शकतो. तसे जीवन आज सर्रास सर्व माणसांमध्ये दिसत नाही. माणसाच्या मनाचा जो ध्यास तोच जर त्याच्या बाह्य जीवनाचे उद्दिष्ट बनले तर त्याच्या इतका श्रेष्ठ आध्यात्मिक दुसरा पुरुष नाही! हठयोगी निकम गुरुजींचा किस्सा आहे. त्यांच्याकडे साधक सांगू लागला, मला योगासने शिकायची आहेत, परंतु मी सिगारेट ओढतो. मला ती आवडते. पण ती बाधा माझ्या मनाला छळते. निकमगुरुजी म्हणाले, वेडा आहेस तू. तू योगासने शिकून घे, करू लाग. सिगारेट ओढायला आमची हरकत नाही – साधकाने त्यांचा सल्ला मानला. त्याची सिगारेट त्यानंतर कित्येक वर्षांनी आपोआप सुटली. त्याची योगासने आणि त्याची सिगारेट कित्येक वर्षें निरंतर चालू होती.

अध्यात्म ही वृत्ती आहे. ती अंतर्मनातील ध्यासाने साध्य होते. तो ध्यास जर परमेश्वरकृपेचा बाळगला तर फसव्या जीवनाचा लाभ होतो. या जीवनात शांतता लाभत नाही ती नाहीच!

- दिनकर गांगल

लेखी अभिप्राय

"अत्त दीप भव" हि शिकवण गौतम बुद्ध यांनी आधीच सांगितलं आहे .. ती सरळ सरळ पै यानी उचलली आहे.

shrikant Petkar05/01/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.