कोपरगाव येथील पेशवेकालीन वाडे


_Koprgaon_Yethil_PeshvekalinVade_1.jpgरघुनाथरावांना (राघोबादादा) पेशवाईची वस्त्रे नारायणराव पेशव्यांच्या हत्येनंतर 10 ऑक्टोबर 1773 रोजी मिळाली. नारायणराव पेशव्यांच्या मृत्यूनंतर सखारामबापू, त्रिंबकराव मामा, नाना फडणवीस, मोरोबा फडणवीस, बजाबा पुरंदरे आदी प्रमुख बारा मंडळींनी एकत्र येऊन बारभाई मंडळ स्थापन केले आणि त्यांनी राघोबादादांना पदच्युत करून कारभार स्वतःच्या हाती घेतला. राघोबादादांनी पेशवाई परत मिळवण्यासाठी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले. राघोबादादा इंग्रजांच्या आश्रयास 23 फेब्रुवारी 1775 रोजी आले. दादा इंग्रजांबरोबर सतत सात - आठ वर्षें राहिले.

इंग्रज व मराठे यांच्यात तह महादजी शिंदे यांच्यामार्फत ग्वाल्हेरपासून वीस मैलांवर सालबाई येथे 17 मे 1782 रोजी झाला. तहातील एका अटीनुसार इंग्रजांनी राघोबास पेशव्यांच्या स्वाधीन केले. राघोबादादांनी महादजी शिंदे यांच्या सल्ल्यावरून कोपरगावला कायम वास्तव्य करण्याचे ऑगस्ट 1783 मध्ये ठरवले. ते कोपरगावला आले. नाना फडणवीसांनी राघोबादादांना दरमहा पंचवीस हजार रुपयांचे पेन्शन मंजूर केले.

पेशव्यांचे दोन भव्य वाडे कोपरगाव येथे होते. एक वाडा खुद्द कोपरगाव येथे बघण्यास मिळतो. तो वाडा पूर्वाभिमुख - धाबा पद्धतीचा असून, वाड्यात प्रवेश करण्यासाठी पूर्व - पश्चिम व उत्तर बाजूने लाकडी दरवाजे आहेत. त्यावर नक्षीकाम केलेले आहे. पूर्वेला किल्ल्याप्रमाणे दगडी तटवजा भिंत असून, शिरण्यास मुख्य रस्ता गोदावरीच्या बाजूने आहे. वाड्याचे छत पुणे येथील मोरोबादादांच्या वाड्यात आहे तसे आहे. वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार व उत्तर प्रवेशद्वार यांच्यासमोर अंदाजे 25 x 15 फूट आकारमानाचा चौक आहे. चौकाच्या चारही बाजूंनी ओसरी व बैठकीच्या सदरची रचना आहे. वाड्याच्या मध्यावरील दक्षिणोत्तर सामायिक भिंतीमध्ये भुयार असून त्या लगत वाड्यातील आतील बैठकीची खोली आहे. ब्रिटिशांनी त्या वाड्याचा तहसील कार्यालयासाठी वापर केलेला होता. राघोबादादांच्या पत्नी आनंदीबाई यांचे त्या वाड्यात 1767 ते 1783 या कालावधीत अधून-मधून व 1783 ते 1792 पर्यंत सलग वास्तव्य होते. आनंदीबाई अस्पर्श्य असताना अंतर्वाड्यातील मागील खोलीत बसत असत व गोदावरी नदीला स्पर्श होऊ नये म्हणून त्या वाड्यातून बाहेर पडत नसत. त्यामुळे लोक त्या वाड्याला ‘विटाळशीचा वाडा’ असे म्हणत असावे.

कोपरगाव कचेश्वर बेट येथील वाडा... बेटातील शुक्रेश्वराच्या मंदिरास लागून दक्षिणेस पेशव्यांचा भव्य वाडा होता. पेशवे दप्तरात (पेशवे दप्तर 19/53) त्या वाड्यासंबंधीचा उल्लेख पुढीलप्रमाणे आहे. “मौजे कोपरगाव परगणा कुंभारी येथे गंगेच्या बेटात श्री शुक्रेश्वर देवालयासन्निध सन इसने सबैनात (1771-72) सरकारचा वाडा व बाग नवा केला”. त्याचा अर्थ 1771-72 पूर्वी तेथील सरकारवाड्याचे बांधकाम पूर्ण झालेले होते.

राघोबादादा सालबार्इच्या तहानंतर ऑगस्ट 1783 मध्ये कोपरगावला आले. त्यांचे वास्तव्य नंतर त्या बेटातील वाड्यातच होते. वाड्याचे बांधकाम काळ्या व घोटीव दगडात केलेले होते. वाड्याचा पाया चुना व दगड यांत भरलेला होता व तो पंधरा फूट रुंद होता. राघोबादादांच्या हातची चुना-विटांची अष्टपैलू विहीर वाड्याच्या मागील बाजूस आहे. ती लक्ष्मण गणू शिंदे लढालाईत यांच्या मालकीच्या शेतात आहे. ती जमीन रामचंद लालचंद काले यांजकडे होती. तो वाडा अस्तित्वात नाही. तो सुमारे शंभर वर्षांपूर्वी पाडून जमिनीचा लिलाव करण्यात आला. घोटीव दगडही विकण्यात आले. त्यांपैकी काही दगड येवल्याचे नगरशेठ गंगाराम छबिलदास यांनी विकत घेतले होते व ते त्यांनी येवल्यात बांधलेल्या मुरलीधराच्या मंदिरास लावले. राघोबादादा त्याच वाड्यात 11 डिसेंबर 1783 रोजी, वार गुरुवार (शोभननाम संवत्सर मार्गशीर्ष वद्य 3 शके 1705) सहा घटिका रात्री वारले अशी नोंद पेशवे दप्तरात आढळते. दादांच्या निधनानंतर आनंदीबाईंचे वास्तव्य 1792 पर्यंत कोपरगावातील वाड्यात होते. कोपरगाव येथील शिवराम विष्णू रानडे यांचे वडील विष्णू विश्वनाथ व आजा विसाजी अनंत यांस पेशवे सरकारांनी नोकरीस ठेवले होते. साठे, सहस्त्रबुद्धे, केळकर, गोखले ही घराणी त्यांच्याबरोबर कोपरगावी आली होती. तशा नोंदी आढळतात.

राघोबादादा पेशवे यांचा कोपरगाव ही महाराष्ट्राची राजधानी करण्याचा विचार एके काळी होता. राघोबांनी ते राजकारणातून निवृत्त होऊन कायमचे वास्तव्य करण्यासाठी कोपरगावला आले तेव्हा कोपरगावच्या पश्चिमेला तीन मैलांवर असलेल्या हिंगणी गावाजवळ भव्य वाडा बांधण्याचे ठरवले. गोदावरी नदी हिंगणी गावापाशी दक्षिणवाहिनी होते, त्या ठिकाणी नदीच्या पश्चिम तीरावरील जागेची निवड करून बांधकामाला सुरुवात झाली. वाड्याच्या तीन भिंतींचे बांधकाम झाल्यानंतर पूर्वेकडील चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू असताना राघोबादादांचे 11 डिसेंबर 1783 रोजी कोपरगाव बेटात निधन झाले. राघोबांनी ते आजारी असताना, त्यांचा अंत्यविधी त्या वाड्यात व्हावा व तेथेच त्यांची राख पडावी अशी इच्छा व्यक्त केली होती. त्याप्रमाणे राघोबांचे दहन त्या तीन भिंतींच्या वाड्यात केले गेले व त्या ठिकाणी सांबाची स्थापना करण्यात आली. वाडा बांधताना चुना तयार करण्यासाठी वापरलेले मोठे दगडी चाक तेथे बघण्यास मिळते.

भिंतींच्या वाड्याचे बांधकाम मजबूत, भक्कम व उत्कृष्ट दर्जाचे आहे. भिंतीची लांबी दोन हजार फूट, रुंदी एक हजार फूट आणि उंची पंचेचाळीस फूट असून भिंतीची माथ्यावरील जाडी सात फूटांची आहे. सर्व बांधकामाला आतबाहेर कातीव स्वरूपाचा काळा दगड व चुना वापरला गेलेला आहे. वाड्याच्या उत्तर व दक्षिण भिंतीला एकेक उंच बुरूज बांधलेला आहे. उत्तरेकडील भिंतीमध्ये प्रशस्त प्रवेशद्वार ठेवलेले आहे. राघोबांच्या इच्छेनुसार बांधला जाणारा तो वाडा पूर्ण झाला असता तर प्रशस्त, भक्कम आणि रेखीव नक्षीकामाचा वाडा पाहण्यास मिळाला असता!

संदर्भ ग्रंथ –
1. पेशवे घराण्याचा इतिहास – लेखक प्रमोद ओक
2. पुण्याचे पेशवे – लेखक अ.रा. कुलकर्णी
3. राघोबादादा उर्फ राघोभरारी – लेखक स.रं. सुठणकर (आवृत्ती – 1946)
4. आनंदीबाई पेशवे – लेखक चिं.ग. कर्वे

- नारायण क्षीरसागर

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.