कोपरगावचा पेशवेवाडा ऊर्फ विटाळशीचा वाडा


_Vitalashicha_Peshvewada_1.jpgकोपरगाव येथील बेट या भागाला कोपरगावपेक्षा अधिक महत्त्व पौराणिक काळापासून आहे ते, शुक्राचार्य-देवयानी-कच-शर्मिष्ठा-ययाती-वृषपर्वा यांच्यामुळे. तो भाग दंडकारण्य म्हणूनही ओळखला जात होता. रामायण-महाभारत या महाकाव्यातील काही संदर्भ त्या प्रदेशात पोचतात. उदाहरणार्थ, त्या भागातील श्रृंग्य ऋषीचा आश्रम, अगस्ती ऋषींचा आश्रम, पंचवटी परिसर. महानुभाव पंथीय चक्रधर स्वामींचा वावर त्या भागालगतच्या प्रदेशात डोमेगाव-संवत्सर येथील ज्ञानेश्वरांचा निवास नेवासे येथील. तर त्यांनी तेथून चालवलेली भिंत, पुणतांब्याच्या योगी चांगदेवांनी वाघावर आरूढ होऊन केलेला प्रवास... पौराणिक व ऐतिहासिक दंतकथांची/घटनांची पार्श्वभूमी त्या परिसराला लाभलेली आहे.

कोपरगाव शहराचा इतिहास आणि वर्तमान यांचा धांडोळा घेतला तर प्रथम नजरेत भरतो तो कोपरगावातील पेशव्यांचा वाडा! तो वाडा रघुनाथराव पेशवे यांनी सतराव्या शतकाच्या मध्यास बांधला असावा. कारण पेशवा बाळाजी बाजीराव यांच्यासमोर अग्निदिव्य इसवी सन 1744 मध्ये कोपरगाव येथे करण्यात आले होते अशी नोंद अनिल कठारे लिखित ‘शिवकाळ व पेशवाईतील महारांचा इतिहास’ या पुस्तकात पान क्रमांक दोनशेपंधरावर आलेली आहे.

कोपरगावचा पेशवेवाडा गोदावरीच्या उत्तर दिशेला आहे. त्या ठिकाणी गोदावरी नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. त्या कारणामुळे त्या ठिकाणाला धार्मिक महत्त्व आले आहे. तसाच प्रकार पुणतांबे येथेदेखील असल्याने पुणतांब्यासदेखील विशेष धार्मिक महत्त्व लाभलेले आहे.

इंग्रजांनी कोपरगाव येथील वाडा पेशवाईच्या पतनानंतर म्हणजे 1818 नंतर ताब्यात घेतला. त्यांनी त्या वाड्यातील संपत्ती हस्तगत करून, वाड्याच्या तळघरात जाणारे सर्व दरवाजे बंद केले आणि तेथे भिंती बांधल्या आहेत. इंग्रजांनी त्यांची सत्ता असेपर्यंत त्या वाड्याचा वापर सब डिव्हिजन ऑफिस म्हणून केला. त्यासाठी वाड्याच्या रचनेत आवश्यक त्या दुरुस्ती व फेरफार केले गेले. त्यामुळे वाड्याच्या कोणत्या भागाचा वापर मूळात कशासाठी होत होता त्याचे अनुमान करता येत नाही. स्वातंत्र्यानंतर वाड्याचा वापर मामलेदार कचेरी म्हणून केला जाई. त्यामुळे त्या वाड्याला ‘जुनी मामलेदार कचेरी’ असे संबोधले जाते. त्या वाड्याचा काही भाग कोसळल्याने व नवीन तहसिल कार्यालय बांधले गेल्याने तो वाडा मोकळा करून पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात देण्यात आला. शासनाने त्या वाड्याचा काही भाग एक रुपये नाममात्र भाड्याने ‘बहुजन शिक्षण संघा’च्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहा’करता 1969 साली दिला होता. ती संपूर्ण वास्तू 1999-2000 पासून पुरातत्त्व खात्याच्या ताब्यात आहे. मात्र तरीही वाड्याची बरीच पडझड झालेली आहे. त्यामुळे वाड्यातील बहुतांश प्रेक्षणीय बाबी नष्ट झाल्या आहेत.

_Vitalashicha_Peshvewada_3.jpgवाड्याच्या पूर्वेच्या बाजूला घोड्यांची पागा असावी. विटाळशीचा वाडा जमिनीपासून पंचवीस ते तीस फूट उंचीवर आहे. वाड्याच्या पूर्व आणि दक्षिण दिशांना भिंतीपासून चार-पाच फूट अंतरावर ठिकठिकाणी दगडी बांधकामाचे आधार दिलेले आहेत. वाड्याच्या पूर्वेस दक्षिणेकडून उत्तरेकडे चढणार्‍या पंचवीस दगडी पायर्‍या आहेत. वर सज्जा आहे. तेथून पूर्व बाजूने वाड्यात प्रवेश केल्यानंतर मध्यभागी 10×10 फूटांची मोकळी जागा नजरेस पडते. त्या मोकळ्या जागेच्या दक्षिणेला दरवाजा असून तो 15×30 फूट लांबी-रुंदीच्या दक्षिणोत्तर दिवाणखान्यात उघडतो. त्याच्या छतास लाकडी पानाफुलांची व वेलबुट्ट्यांची सुंदर अशी नक्षी होती. नक्षी लाल-हिरव्या नैसर्गिक रंगांनी रंगवलेली होती. सध्या तेथे नक्षी दिसत नाही. हॉलच्या पश्चिम बाजूस चार ते पाच फूट रुंदीची भिंत आहे. त्या भिंतीतून छतावर व खाली तळघरात जाण्यासाठी पायर्‍यांची व्यवस्था होती. ती बुजवण्यात आली आहे. दिवाणखान्याच्या उत्तर बाजूस 10×10 फूट आकाराची मोकळी जागा आहे. त्या जागेच्या उत्तरेस 10×15 फूट आकाराची खोली आहे. तेथून 10×10 फूट मोकळ्या जागेच्या पश्चिमेस जाण्यासाठी दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून एका खोलीमधून जाऊन नंतर पहिल्या मोकळ्या चौकोनात प्रवेश करता येतो. पूर्वेच्या 15×30 फूटांच्या दिवाणखान्यामधूनदेखील त्या हॉलच्या पश्चिमेस उघडणारा दरवाजा आहे. दरवाज्यासमोर प्रशस्त 30×60 फूट आकाराचा दरबार हॉल आहे. त्याच्या दक्षिणेला आणि उत्तरेला पाच ते सहा खिडक्या आहेत. खिडक्यांचे दरवाजे सुंदर महिरपीने व नक्षीकामाने सजवलेले होते. हॉलच्या ईशान्य कोपर्‍यात 10×10 फूट आकाराची खोली आहे. हॉलमध्ये भिंतीपासून पाच-सहा फूटांवर दोन बाजूंनी मोठे खांब असून त्या खांबांवर लाकडी नक्षीच्या महिरपी आहेत. तसेच, पश्चिमेकडील दोन्ही खांबांना जोडणारी लाकडी मोठी महिरप आहे. हॉलच्या छताला वरच्या बाजूस उजेड आत यावा यासाठी जाळ्या लावून काचेच्या कौलाच्या छताच्या रूम बांधलेल्या होत्या. हॉलच्या उत्तरेस चारही बाजूंनी ओटा असलेला प्रशस्त चौक आहे. चौकात उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायर्‍या आहेत. चौकात पडणारे पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी नालीची व्यवस्था केलेली आहे.

चौकाच्या ईशान्य बाजूस वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. दरवाजा प्रचंड असून, तो जुन्या सागवानी लाकडाचा आहे. त्यास बंद करण्यासाठी भिंतीतील अडसराची योजना केलेली आहे. त्या दरवाज्यापर्यंत ओटा उतरून जाण्यासाठी पाच-सहा पायर्‍या आहेत. तसेच, दरवाज्यासमोर उत्तर बाजूने खाली उतरण्यासाठीदेखील पंधरा ते वीस पायर्‍या आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस, पूर्व दिशेला10×10 फूट आकाराची खोली आहे. दरवाज्याच्या आतील बाजूने पूर्व व पश्चिमेकडील ओट्यालगत पूर्वी मोकळी जागा होती. मात्र इंग्रजांच्या काळात त्या ठिकाणी लोखंडी गज लावून कारागृहाची व्यवस्था केली गेली. इंग्रजांनी चौकाच्या ओट्याच्या पूर्व बाजूस असलेल्या खोलीचा वापर शस्त्रागार म्हणून केला होता. अव्वल कारकूनाचे टेबल व इतर कारकूनांच्या बसण्याच्या व्यवस्था दरबार हॉलमध्ये केलेल्या होत्या. पूर्वेच्या मोठ्या हॉलमध्ये मामलेदार साहेबांच्या बसण्याची व अँटिचेंबरची व्यवस्था करण्यात आली होती; तसेच, साक्ष नोंदवण्यासाठी कठड्याची व्यवस्था करण्यात आली होती.

बैठकीच्या हॉलला लागूनच पश्चिमेस 30×10 फूट आकाराची आणखी एक खोली आहे. तिच्या पश्चिमेस 10×10 ची आणखी एक खोली आहे. त्या दोन्ही खोल्यांपैकी दक्षिणेकडील खोलीच्या छतास पूर्वेच्या हॉलच्या छताप्रमाणे फुलांचे व वेलबुट्टीचे लाकडी नक्षीकाम केलेले होते. त्यांना नैसर्गिक रंग दिलेला होता. त्याही ठिकाणचे नक्षीकाम नाहीसे झालेले आहे. पेशव्यांनी खोलीमध्ये स्नानगृहाची व्यवस्था केलेली होती. तसेच, स्नानगृहाच्या उत्तरेस असलेल्या खोलीचा वापर शौचालय म्हणून केलेला होता. पश्चिम बाजूस सांडपाणी व मलमूत्र विसर्जन यांची व्यवस्था केलेली दिसते. शौचालय व स्नानगृह यांच्या समोरच्या खोलीवजा जागेचा वापर वस्त्रे बदलण्यासाठी केला जात असावा. त्या खोलीचा एक दरवाजा उत्तरेकडे असून तो पहिल्या चौकाच्या बाजूच्या ओट्यालगत उघडतो. ओट्याच्या पश्चिम बाजूला साधारणपणे 20×20 फूटांची जागा आहे. त्याच्या वापराविषयी काही अंदाज बांधता येत नाही. त्या जागेच्या पश्चिम बाजूस पाच फूट रुंदीची भिंत असून त्या भिंतीतून दुसऱ्या चौकात जाण्यासाठी दरवाजा आहे. त्या भिंतीतून छतावर जाण्यासाठी आणि तळघरात उतरण्यासाठीदेखील पायऱ्यांची व्यवस्था आहे. मात्र तळघराच्या पायऱ्या बुजवून टाकण्यात आलेल्या आहेत. त्या दरवाज्यालगत कधी काळी दुसरा दरवाजा असावा. तो भिंत बांधून बुजवलेला आहे. पण त्या दरवाज्यावर असलेली नक्षीची माथापट्टी, त्यावरील मंगल कलश, फुलांची कोरलेली नक्षी आणि इतर धार्मिक चिन्हे पाहता येतात.

दुसर्‍या चौकातील छत पूर्णपणे काढून टाकून त्यावर पत्रे टाकलेले आहेत. त्यामुळे चौकाभोवतालच्या चारही बाजूंच्या जागेचा वापर काय होत असावा त्याचे केवळ अनुमान करावे लागते. त्या चौकालादेखील चारही बाजूंनी तीन-चार पायऱ्या असून मध्यभागी तुळशीवृंदावनाची व्यवस्था आहे. चौकाच्या चारही बाजूस माजघर, झोपण्याच्या खोल्या किंवा स्त्रियांसाठी वापरात येणाऱ्या जागा असाव्यात. चौकाची दक्षिणेकडील भिंत सुमारे सहा फूट रूंदीची आहे. वाडा नदीकिनारी असल्याने पुरापासून संरक्षण व्हावे या हेतूने किंवा महिलांच्या वापराचा भाग असल्याने जास्त संरक्षणाची तरतूद म्हणून त्या भिंतीची वरची रुंदी सहा फूट ठेवलेली असावी. भिंतीची वरची बाजू सहा फूटाची याचा अर्थ त्या भिंतीचा पाया किती रूंद असेल त्याची कल्पनाच केलेली बरी! दुसऱ्या चौकाच्या उत्तरेस पाच फूट रूंदीची आणखी एक भिंत असून त्या भिंतीतूनदेखील छतावर जाण्यासाठी आणि तळघरात उतरण्यासाठी पायऱ्यांची व्यवस्था केलेली आहे. वाड्यातील इतर ठिकाणांप्रमाणे तेथेही तळघरात जाणाऱ्या पायऱ्या बुजवण्यात आलेल्या आहेत. त्या भिंतीस दोन-चार ठिकाणी चोरदरवाजे किंवा खोटे दरवाजे आहेत. ती संरक्षणात्मक तरतूद असावी.

_Vitalashicha_Peshvewada_2.jpgत्या भिंतीच्या उत्तरेस तीस फूट रूंद आकाराच्या सभागृहसदृश जागेचे बांधकाम आहे. परंतु त्या जागेचे नेमके प्रयोजन इंग्रजांनी केलेल्या दुरुस्तीमुळे सांगता येत नाही. वाड्यातील ती नोकरवर्गाच्या किंवा संरक्षण तुकडीच्या निवासाची जागा असू शकेल. त्यानंतर वाड्याची पश्चिमेकडील भिंत दिसते. त्यात असलेल्या दरवाज्याची बाजू शहराच्या सपाटीकडे उघडते.

वाड्याच्या चारही बाजूंनी भिंतींची तटबंदी उभारलेली आहे. त्यात शत्रूवर मारा करण्यासाठी सलग अशा छोट्या-छोट्या खिडक्यांची योजना आहे. तसेच, छतावर चार फूट उंचीची ज्याला आज पॅरापीट वॉल म्हणता येईल अशा भिंती असून, त्यातदेखील तसा मारा करण्यायोग्य खिडक्यांची योजना आहे. वाड्याच्या तळघराच्या भिंतींचे बांधकाम मोठ्या दगडांनी केलेले आहे. त्यात चुन्याच्या दर्जा भरलेल्या दिसतात.

वास्तूचे तळघर हे सामान्यत: जमिनीच्या पृष्ठभागाखाली बांधलेले असते. विटाळशीच्या वाड्याचे वैशिष्ट्य असे, की तेथील तळघर जमिनीच्या पृष्ठभागापासून उंचीवर आहे. तळमजला चारही बाजूंनी बंद केलेला असून त्याच्यावर बांधकाम केलेले आहे. वाडा पश्चिम बाजूने पाहिल्यास तळघर जमीनसपाटीच्या खाली आहे असे दिसते. मात्र पूर्वेकडून पाहिल्यास वाड्याचे बांधकाम दुमजली दिसते. वाड्याच्या बाह्य भिंती दगडमातीने अथवा चुन्याने बांधलेल्या आहेत. मात्र आतील सर्व भिंती पांढऱ्या मातीत चुनखडी-भुसा-कांड-गवत व इतर गोष्टींचे मिश्रण करून त्याच्या लगद्यापासून बनवलेल्या रद्याच्या आहेत. त्या मातीच्या बांधकामातच नक्षीकाम केलेले असून, ते हिरव्या-लाल नैसर्गिक रंगांनी रंगवलेले आहे. मात्र नंतरच्या काळात त्यावरून चुना किंवा पिवळी माती यांचे थर दिलेले दिसतात.

कोपरगाव भागात 1969 व 1971 साली आलेल्या महापूराच्या वेळी पुराचे पाणी वाड्याच्या सभोवताली पंचवीस फूटांपर्यंत चढले होते. त्यावेळी दक्षिणेकडील खिडक्यांमधून हात बाहेर काढला असता पुराच्या पाण्याला स्पर्श करता येत असे. त्यावरून वाड्याचे पुरापासून संरक्षण होण्यासाठीच भोवताली तटबंदीचे बांधकाम केले गेले असावे या म्हणण्याला दुजोरा मिळतो.

- शैलेंद्र बनसोडे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.