सॅम पित्रोडा यांचे विचारमंथन


_Sam_Pitroda_1_0.pngसॅम पित्रोडा यांना प्रत्यक्ष ऐकण्याचा योग या वर्षी दोन वेळा आला. प्रथम सहा महिन्यांपूर्वी पुण्यात व अलिकडे दोन आठवड्यांपूर्वी मुंबईत. त्यांनी त्यांचे विचार दोन्ही वेळेस साधारणत: एकेक तास मांडले. एकूण उपस्थितांनी त्यांच्याशी ज्या गप्पा केल्या व त्यांनी ज्या वेगवेगळ्या प्रश्नांना स्पर्श केला, त्यांपैकी दोन मुद्दे मला स्वतःला विचार करावा असे महत्त्वाचे वाटले. वाचणार्‍याला कदाचित त्यातून अजून दुसरे काही सुचू शकेल. त्यामुळे मला त्यांच्या बोलण्यातून काय वाटत आहे ते न मांडता पित्रोडा काय बोलले तेवढेच नमूद करतो.

सध्याचे जग हे पूर्णपणे अनियंत्रित बाजारपेठेचे झाले आहे. व्यापार हा धर्म झाला आहे - मग तो खाण्याच्या गोष्टींचा असो वा कपडेलत्ते-दागदागिने-मनोरंजनाच्या वस्तूंचा असो. त्या साऱ्यांचे उत्पादन आपली जरुरी किती आणि आपण करत असलेली निर्मिती किती यांचे एकमेकांशी देणे घेणे जणू काही असतच नाही या पद्धतीने होत आहे. त्याला काही गणितच राहिलेले नाही.

वस्तू बाजारात आणायची आणि प्रचंड जाहिरातबाजी करून ती ग्राहकाच्या गळी उतरवायची; इतकी की त्याला त्याची सवयच व्हायला पाहिजे! ती माणसे त्यांनी अमूक गोष्ट घेतली नाही तर जणू आकाश कोसळणार आहे या भ्रमात फिरू लागेपर्यंत जाहिरातींचा मारा चालू ठेवायचा आणि माणूस तशा चक्रात एकदा गुंतून गेला, की बाजार व्यवस्थित पुढे पुढे वाढवत ठेवायचा. अजून महत्त्वाचे म्हणजे ते सारे अमूक देशात-भागात अमूक काळात घडत आहे असे नव्हे; तर ते जीवनचक्रच माणसांच्या जगण्याचे, त्यांच्या जगाचे अविभाज्य अंग झाले आहे. 

मग जेव्हा आपण पर्यावरणाच्या जगातील भयानक विषमतेच्या, भूकबळींच्या बातम्या पाहतो-वाचतो तेव्हा ते सारे किती विपरीत आहे असे आपणास वाटत नाही का? आणि जर तसे आपणास वाटत असेल तर त्याला उत्तर म्हणून आपण आपली कृती काही करतो का?

पित्रोडा यांनी त्याकरता एक उदाहरण दिले. आज जगात दहा लाख मोटार गाड्यांचे दरवर्षी उत्पादन होते असे आपण अंदाजाने म्हटले, तर त्या साऱ्या गाड्या रोज रस्त्यावरून फिरतात का? तेवढी माणसे त्यांच्या गाडीतून बाहेर प्रवास करत असतात का? तर त्याचे उत्तर नाही असे आहे. केवळ पाच टक्के मोटारी या बाहेर असतात आणि पंच्याण्णव टक्के घरात, गैरेजेस वा अन्य ठिकाणी पडून असतात. माणसांचे जाणेयेणे हे टॅक्सी, मित्राच्या गाड्या यांतूनही होत असते आणि म्हणून काही वर्षांनी जो प्रश्न उद्भवणार आहे तो हा, की हे असे फार काळ चालू शकेल का? एवढ्या पडून राहणाऱ्या गाड्या आणि रोजच्या बदलांनी होत जाणारी त्याच गाड्या उत्पादन करण्यासाठी कमी मनुष्यबळाची जरुरी यांमुळे वाढत जाणारी बेकारी आणि साठत जाणारा कचरा... सारे प्रश्न केव्हातरी अक्राळविक्राळ रूप धारण करून जगापुढे उभे ठाकतील, संगणकामुळे माणसे घरातून, बसस्टॉप, ‘कॉफी डे’ अशा कोठूनही कचेरीचे काम करत असतात. त्यामुळे जागा कचेरीकरता पाहिजेच असे जरुरीचे राहिलेले नाही. टेलिव्हिजन नसला तरी मोबाईलवरून सारे पाहता येते, पुस्तकांची जागाही इंटरनेटने घेतली आहे. सारे बदलते जग जे उभे राहत आहे, त्यात अनेक गोष्टी बाद होत आहेत, नवीनाची भर पडत  आहे, त्याचा सामना कसा करायचा याचाच विचार या पुढे महत्त्वाचा राहणार आहे. आज ज्या वेगाने जग बदलत आहे त्याचा अंदाज भल्या भल्यांनाही घेता येत नाही, मग सर्वसामान्य माणसाची काय कथा! या साऱ्यातून जग, म्हणजे पर्यायाने आपण बाहेर येणे ही सर्वात जास्त निकडीची बाब आहे... पित्रोडा यांचा भर या मुद्यावर दोन्ही वेळेस होता.

राहुल गांधी अमेरिकेत काही काळापूर्वी गेले होते. त्यांनी तेथे सभांमधून भाषणे केली, काही ठिकाणी पत्रकार परिषदा घेतल्या, राजनैतिक विषयांशी संबंधित लोकांबरोबर चर्चा केली. त्या साऱ्याचे वार्तांकन भारतात भरपूर प्रमाणात उलटसुलट येत होते. पित्रोडा यांनी त्या सर्व साऱ्या बैठका आयोजित केल्या होत्या हे कळल्यामुळे साहजिकच राहुल गांधी हा विषय येणे अनिवार्य होते. पत्रकारांनी त्यांना त्या संदर्भात प्रश्न विचारले आणि त्यामुळे माहीत नसलेले राहुल गांधी प्रथमच ऐकावयास मिळाले!

पित्रोडा यांनी सुरुवातीसच एक गोष्ट स्पष्ट केली आणि त्यामुळे कदाचित अनेकांना राहुल गांधी यांच्याबद्दल नवीनच माहिती मिळाल्याची जाणीव झाली, कारण... एकच होते, की पित्रोडा यांनी म्हटल्याप्रमाणे राहुल गांधींची प्रतिमा ही जनमानसात होता होईल तेवढी मलीन करण्याचे उद्योग सतत चालू आहेत. त्यांना पप्पू म्हणणे, अडाणी म्हणणे, वा अजून काही काही म्हणत राहणे यात जराही खंड पडत नाही. त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडे पाहण्याची लोकांची दृष्टी ती आणि तीच आहे; किंबहुना अधिक कलुषित होत गेली आहे.

पण पित्रोडा यांनी म्हटले, की राहुल गांधी हे अत्यंत हुशार, उच्च विद्याविभूषित आहेत, त्यांचे वाचन हे चौफेर आहे. त्यांना अनेक विषयांत गती आहे आणि त्यांचा ओढा नवीन नवीन गोष्टी आत्मसात करण्याकडे आहे. त्यांनी उदाहरण म्हणून एक गोष्ट सांगितली. पित्रोडा यांनी राहुल यांना ते अमेरिकेत असताना पुस्तकांचा मोठ्ठा गठ्ठा भेट म्हणून दिला होता. तो त्यांनी वाचून थोड्याच काळात संपवलाही होता. त्यांनी अमेरिकन व इतर अनेक परदेशी लोकांबरोबर जो संवाद साधला होता त्याकडे लक्ष दिले तर लक्षात येते आणि वाईटही वाटते, की भारतीय लोकांना राहुल गांधी हे पाहिजे तसे समजलेले नाहीत आणि ते समजावेत हीच इच्छा...

या दोन्ही गोष्टींवर मलाही वाटले, थोडा जास्त विचार करावा आणि पाहवे, आपले विचार आपणास काय सांगताहेत.

- कुमार नवाथे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.