चंद्रकांत पवार - पोस्टमन ते कीर्तनकार


_Chandrakant_Pawar_1.jpgचंद्रकांत पवार हे सद्गृहस्थ आटगाव (कल्याण-कसारा मार्गावर) या छोट्याशा गावात राहतात. त्यांचे वर्णन 'पोस्टमन ते कीर्तनकार' असे एका वृत्तपत्राने केले आहे. त्यांचा परिवार आठ बहिणी व एक भाऊ असा होता. ते पत्नी, दोन मुले व सुना यांच्यासह आटगाव येथे वास्तव्य करून आहेत. त्यांनी तेथेच मुलांसाठी दोन दुकाने काढली आहेत. चंद्रकांत अकरावी झाले असून (पूर्वीची एस.एस.सी.) ते पोस्ट खात्यात पोस्टमन म्हणून गेली एकतीस वर्षें डोंबिवलीत कार्यरत होते. ते नंतर बढती होऊन, ठाणे सब डिव्हीजनमध्ये सुपरवायझर या पदावर गेली पाच वर्षें कार्यरत आहेत.

त्यांना गुरु मधुकर महाराज यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यांतून त्यांना समाजकार्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत असे आध्यात्मिक वाचन केले आहे. चंद्रकांत गेल्या पस्तीस वर्षांपासून वाडा, विक्रमगड, जव्हार, भिवंडी, शहापूर या तालुक्यांत भजन-कीर्तन-प्रवचन या माध्यमांतून समाजप्रबोधन करत असतात. स्वच्छता, अंधश्रद्धा व व्यसने यांचा विरोध, पुढील पिढीवर संस्कार या दृष्टीने त्यांचा प्रयत्न असतो. माणसाकडे ज्ञान असते, पण आत्मज्ञान होणे आवश्यक आहे असे त्यांचे मत आहे. 

ते 'गुंडोपंत महाराज भक्त मंडळ' या संस्थेचे मार्गदर्शक आहेत. ते मंडळ मनोर येथे केन गावात आहे. संस्थेमध्ये सप्ताह साजरे केले जातात, दिंडीही काढली जाते. चंद्रकांत सहका-यांच्या मदतीने प्रबोधन कार्याबरोबर मेंढी, मौळीपाडा, कुंजपाडा, कुंज केगवा, सावरखिंड, बॅटरीपाडा, झडपोली अशा आठ गावांमध्ये मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात. मुलांना शाळेतून पोषण आहार मिळतो. त्यासाठी ताटे, ग्लास, दप्तरे, वह्या, पेन, युनिफॉर्म, रोटरीकडून पाण्याच्या टाक्या असे साहित्य वाटप केले जाते. त्यासाठी त्यांना सत्तर ते ऐंशी टक्के मदत डोंबिवलीतूनच मिळते. महिंद्रशेठ विरा (टिळक टॉकिज), कन्हैयालाल राठोड (प्रभात पेपर मार्ट), डोंबिवली नागरी बँक, विवेक नवरे, इंद्रपाल शांताराम पाटील (केवणी दिवा) अशा काही व्यक्ती व संस्था त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवतात. वस्तू वाटपामुळे शाळेतील मुलांची संख्या वाढू लागली आहे. त्यांना पोस्टातून व काही स्थानिक संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे पुढे काही संकल्प आहेत. पैकी दोन म्हणजे आश्रमशाळा काढणे व वारकरी शिक्षण संस्था चालू करणे - तेथे वाचन, गायन, वाद्य शिकवणे.
- चंद्रकांत पवार 9224430431
शब्दांकन- वैशाली प्रमोद जोशी 9920646712
(आरोग्य संस्कार जुलै 2013)
 

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.