श्रीगणेश मंदिर संस्‍थान - जुन्या-नव्या डोंबिवलीचे प्रतीक!


_Dombivali_Ganesh-Mandir_.jpgडोंबिवली शहर गावठाण होते. ना नदी, ना डोंगर, ना झाडांनी वेढलेले. वा त्यांचे सान्निध्यदेखील न लाभलेले गाव. तरी निसर्गरम्य! भातशेतीची काळीशार जमीन, त्यावर सळसळणारी भाताची रोपे, त्यात उदंड श्रम करून पीक काढणारा शेतकरी-आगरी समाज, काही मोजकी सुशिक्षित कुटुंबे, संगीतावाडीच्या मागील बाजूला असणारे सावरीच्या कापसाचे दाट जंगल, तर गोग्रासवाडीच्या छोट्याशा टेकडीवरील उदंड गोधन असणारे गोपालकृष्णाचे मंदिर असे काहीसे चित्र डोंबिवलीचे होते. निसर्गरम्य डोंबिवलीत मोठे मंदिर १९२४ पर्यंत नव्हते. डोंबिवलीकरांना जवळच्या मोठ्या गावी जाऊन तेथील यात्रेत-जत्रेत सहभागी व्हावे लागत असे.

काही डोंबिवलीकर मंडळी पायवाटांच्या छोटेखानी गावात गावकर्‍यांना एकत्र येण्यासाठी जागा हवी या हेतूने एकत्र आली आणि त्यातून श्रीगणेशाची स्थापना करावी असा सत्यसंकल्प झाला. त्यानुसार श्रीगणेशाची स्थापना छोटेखानी समारंभाने २४ मे १९२४ रोजी (शके १८४६ वैशाख वद्य ४) ‘ग्रामदैवत’ झाली! त्याच दिवशी श्रीशंकर, श्रीमारूती, महालक्ष्मी यांचीही स्थापना तेथे केली गेली. कालांतराने, १९३३ मध्ये ब्रह्मीभूत स्वामी आनंदाश्रम यांच्या समाधिस्थळावर श्री गुरूदत्तात्रेय यांच्या प्रतिमेची स्थापना झाली. हळूहळू आसपास असणाऱ्या देवता ‘श्रीगणेश मंदिरा’च्या वास्तूत येऊन स्थिरावल्या - १९५० ला शंकर मंदिर, १९५८ ला मारूती मंदिर यांचा जीर्णोद्धार झाला.

मंदिर डोंबिवली आणि ठाकुर्ली स्टेशनांच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. मंदिराचे पहिले विश्वस्त मंडळ १९२६-२७ ला तयार झाले. मंदिराची पहिली घटना १९३६ ला लिहिली गेली. त्या घटनेचे वैशिष्ट्य म्हणजे त्या काळी जातीयतेची सर्व बंधने झुगारून मंदिर सर्वांसाठी खुले ठेवण्यात आले होते. सर्व सामाजिक उपक्रमांचा समावेश घटनेत होता हे मोठे आश्चर्य मानले जाते. गावाच्या गरजेतून क्रियाकर्म ही सुविधा वास्तूत१९४२ मध्ये सुरू झाली. त्याचे नवे स्वरूप देखणे आहे. प्रतिदिन किर्तन, प्रवचन ही बोधपर सेवा १९५० पासून नित्यनेमाने चालू आहे. मात्र त्यांचे स्वरूप बदलले आहे. ज्ञानयज्ञात कै. शिरवळकरबुवा, निजामपूरकरबुबा, करमरकरबुवा, पटवर्धनबुवा, कोपरकरबुवा यांसारख्या दिग्गज कीर्तनकारांनी कीर्तनसेवेच्या समिधा घातल्या. त्यांना कोणताही मोबदला दिला जात नव्हता. उलट, कीर्तनकारच आठ आणे दान देऊन कीर्तन-प्रवचने करत असत. निष्काम सेवेचा तो अनुभव विलक्षणच!

संस्थेची आर्थिक स्थिती जसजशी सुधारू लागली तसतशी मंदिराची सुरक्षिततेच्या दृष्टीने पुनर्रचना/पुनर्बांधणी करणे आवश्यक वाटू लागले. विश्वस्त मंडळाने नागरिकांची सभा बोलावून पुनर्रचनेचा प्रस्ताव मांडला. प्रभुराम ओतुरकरांनी आराखडा देऊन कामास सुरुवात केली. रेल्वे चीफ इंजिनीयर माधवराव भिडे हे त्या वर्षी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. वास्तुविशारद मेसर्स एस. के. गोडबोले आणि आठल्ये यांच्या आराखड्याप्रमाणे सध्याचे मंदिर उभे राहिले. वास्तूची उल्लेखनीय बाब अशी, की मंदिरावरील कळसाची रचना ही पूर्णपणे आधुनिक पण त्याच बरोबर श्रद्धा व भावना यांची जपणूक करून त्यांचा समन्वय साधणारी आहे. मंदिरामध्ये एके काळी शेकडोंनी जमणारे भक्तगण लक्षात घेऊन सभामंडपात मोकळी व स्वच्छ हवा कशी खेळती राहील याचा विचार केला गेलेला आहे. तसेच, भजनप्रसंगीचा टाळांचा गजर, प्रवचने व व्याख्याने यांच्या वेळी ध्वनिक्षेपकाचा वापर या संदर्भातील तांत्रिक परिपूर्णता कळसाच्या उंचीशी स्पर्धा करणारी आहे. मंदिराच्या तीस फूटांच्या गाभाऱ्यात कोठेही खांब नाही! दगडाचा वापर कोठेही केलेला नाही! सगळीकडे संगमरवरी बांधकाम आहे. त्यामुळे मंदिरात स्वच्छता राखली जाते आणि प्रसन्नता वाटते.

_Dombivali_Ganesh-Mandir_1.jpgमंदिराचा पूर्ण कायापालट झाला आहे. श्रीगणेश मंदिराच्या कार्यालयाचे संगणकीकरण, तसेच तेथे छायाचित्रण, लिफ्ट अशा आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. मंदिराची कार्यक्षेत्रे विकसित होत आहेत, त्यांच्या कक्षा रूंदावत आहेत. विशेष म्हणजे गुढीपाडव्यासारख्या निसर्गाची साद आणि पराक्रमाची प्रेरणा देणाऱ्या सणाच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरांतील लोकांना एकत्रित आणून हिंदू संस्कृतीचे भव्य दर्शन घडावे यासाठी ‘श्रीगणेश मंदिर संस्थान’ व तत्कालीन अध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी मंदिराच्या हीरक महोत्सवी वर्षी, १९९९ साली शोभायात्रेचे आयोजन केले. तो पायंडा सुरू आहे. नववर्ष शोभायात्रेची कल्पना महाराष्ट्राला नवचैतन्य देणारी ठरली आहे. तिचे अनुकरण सर्वत्र होत असते. वर्ष प्रतिपदेला निघणारी यात्रा ही जातीचे, पक्षाचे व इतर विचारांचे जोखड बाजूला ठेवून निघालेली शोभायात्रा असते. तीत स्त्री-पुरूष, श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ अशा सर्व मंडळींनी पारंपरिक वेश धारण करावा अशी अपेक्षा स्वागत समितीची असते.

मंदिरातर्फे विविध उपक्रम केले जातात. त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक उपक्रम म्हणून दिलासा, व्यसन-मुक्तीद्वारे व्यसनी व्यक्तींच्या वाईट सवयींपासून मुक्तीचे प्रयत्न, निर्माल्यापासून गांडुळ खतनिर्मिती, सर्व वयोगटातील मुलांच्या विविध विषयांच्या स्पर्धा व बक्षीस वितरण, रविवारीय संगीत सेवेद्वारे नवोदित कलाकारांना दर रविवारी व्यासपीठ, रुग्णवाहिका सेवा व स्ववाहिका (हातगाडी) व्यवस्था, आरोग्य चाचणी शिबिर, रक्तदान शिबिर, वनवासी बंधुभगिनींना साड्या व धान्य यांचे वाटप अशा विधायक कामांचा समावेश असतो. ‘विद्या समिती’च्या माध्यमातून निरनिराळ्या विषयांच्या विद्वज्जनांची व्याख्याने व मार्गदर्शन, भारतीय संस्कृतीची माहिती, संस्कार केंद्राद्वारे लहान मुलांवर संस्कार, योगवर्ग, ज्योतिषवर्ग, स्वतंत्र ध्यानकक्ष अशाही व्यवस्था आहेत. समाजातील विकलांग, मूकबधिर, मंदबुद्धी, वनवासी अशा परावलंबी असलेल्यांना मदत करणार्‍या व त्यांची देखभाल करणार्‍या सेवाभावी संस्थांना प्रत्येक वर्षी संस्थानातर्फे आर्थिक अनुदान देण्यात येते, गरीब व गरजू महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दरवर्षी दिली जाते, मंदिर संस्थानातर्फे ‘श्री गणेश अल्ट्रासोनोग्राफी सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. तेथे अल्प दरात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध आहे, ते अक्षय हॉस्पिटल मानपाडा रोड येथे असून तेथे अद्ययावत सोनोग्राफी मशीन आहे. तेथे इन्व्हर्टर, वातानुकूल यंत्रणा इत्यादी सोयी आहेत.

श्री गणेश मंदिर संस्थानाला मिळालेल्या भूखंडावर श्री गणेश वाटिका सुरू केलेली आहे. वाटिकेत सकाळ-संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक विसावा घेऊन मनन चिंतन करत असतात. आंतरराष्ट्रीय युवा केंद्राद्वारे परदेशी जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी त्या-त्या देशाची संस्कृती, आचार-विचार यांची माहिती करून देणे, शिक्षण/नोकरीच्या अथवा अन्य क्षेत्रांत असणाऱ्या संधींची माहिती करून देणे आदी कार्य केले जाते. मंदिराने स्वतःचे ‘ग्रामदैवत’ हे त्रैमासिक चालू केले आहे. जुनी आणि नवी डोंबिवली यांचे प्रतीक म्हणजे गणेश मंदिर संस्थान आहे.

श्री गणेश मंदिर संस्थानचे सहा हजार सभासद आहेत. अध्यक्ष - अच्युत कऱ्हाडकर, उपाध्यक्ष - प्रविण दुधे, कोषाध्यक्ष - डॉ. अरूण नाटेकर, कार्यवाह-राहुल दामले, तर सहकार्यवाह-जयश्री कानिटकर आदी पदाधिकारी कार्यरत आहेत.

www.shreeganeshmandirsansthan.org

- राधिका वेलणकर

----------------------------------------------------------------

प्रभाकर भिडे यांनी ‘गणेश मंदिर संस्था’नाबद्दल दिलेली जादा माहिती अशी –

‘गणेश मंदिर’ ही केवळ धार्मिक संस्था न राहता गावातील एक ‘सांस्कृतिक केंद्र’ म्हणून विकसित झाले आहे. त्या दृष्टीने पूर्वीच्या मंदिराला जोडून दोन-तीन नवीन सभागृहे बांधली गेली आहेत. त्यांत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मग ते ‘गीत रामायण’ असो किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासंबंधी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला असो. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे वाचनालयाची दोन मजली सुरेख वास्तू २०१६ च्या एप्रिलमध्ये बांधण्यात आली. तेथील ‘आचार्य प्र.के. अत्रे वाचनालय’ ‘गणेश मंदिर संस्थान’ व्यवस्थापनाला चालवण्यासाठी देण्यात आले आहे. त्यामध्ये नवीन पुस्तके, सर्व मासिके अल्प वर्गणीमध्ये वाचकांना उपलब्ध आहेत. सर्व वृत्तपत्रे मोफत वाचनासाठी ठेवली गेली आहेत. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आहे. तसेच, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेषत: घरगुती महिलांसाठी संगणक अभ्यासवर्ग; तसेच, तरुण वर्गासाठी कौशल्य विकास केंद्रातर्फे वेगवेगळे अभ्यासक्रम गणेश मंदिरातर्फे चालवले जातात. वाचनालयामध्ये दोन सभागृहे असून तेथे पुस्तक प्रकाशने व तत्सम साहित्यिक कार्यक्रम आयोजले जातात.

गणेश मंदिर संस्थान व्यवस्थापनाने ३-५ फेब्रुवारी २०१७ रोजी झालेल्या साहित्य संमेलनांमधील निघणार्‍या ग्रंथदिंडीच्या आयोजनाची जबाबदारी घेतली होती. त्यामध्ये विविध शाळांमधील विद्यार्थी आणि विविध कलासंस्थांचे कार्यकर्ते यांचा सहभाग होता. त्याची सर्व व्यवस्था ‘गणेश मंदिर संस्थाना’ने केली होती. इतकेच नव्हे तर ग्रंथदिंडी गणेश मंदिर ते साहित्यनगरीपर्यंत गावातील सर्व महत्त्वाच्या रस्त्यावरून शिस्तीने व डौलाने निघून संमेलनस्थळी पोचली. अशा रीतीने शहरातील विविध सामाजिक व साहित्यिक उपक्रमांमध्ये गणेश मंदिर संस्थानाच्या व्यवस्थापनाचा सहभाग असतो. धार्मिक संस्थांनी त्यांचे अग्रक्रम व उद्देश सद्य काळात अशाचप्रकारे बदलले तर ते समाजोपयोगी ठरतील!

- प्रभाकर भिडे, ९८९२५६३१५४

लेखी अभिप्राय

वाचून मला खूप आनंद झाला

Manoj Vaidya 05/08/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.