कॉण्टिनेण्टलचा अमृतवृक्ष!


_Continental_1.jpg‘कॉण्टिनेण्टल’ प्रकाशन प्रतिभासंपन्न साहित्यिकांचे दर्जेदार साहित्य प्रकाशित करून मराठी साहित्याचे दालन समृद्ध करण्याचे काम गेली पंचाहत्तरहून अधिक वर्षें निष्ठेने करत आहे. गोपाळ पाटणकर, जनार्दन महाजन आणि अनंतराव कुलकर्णी या जुन्नरच्या न्यू स्कूलमधील मित्रांनी १ जून १९३८ रोजी ‘कॉण्टिनेण्टल’ची स्थापना केली. त्यांनी दत्त रघुनाथ कवठेकर यांचा ‘नादनिनाद’ हा कथासंग्रह प्रथम प्रकाशित केला. साहित्यसम्राट न.चिं.केळकर यांच्या हस्ते त्या कथासंग्रहाचे १ जानेवारी १९३९ रोजी प्रकाशन झाले. त्यावर दीनानाथ दलाल यांचे चित्र होते. पहिली आठ पाने दोन रंगांत छापलेली होती. पृष्ठसंख्या एकशेशहात्तर. किंमत दीड रुपया. पुस्तकाच्या एक हजार प्रतींच्या पहिल्या आवृत्तीला साडेतीनशे रुपये खर्च आला होता. न.चिं.केळकरांनी ‘कॉण्टिनेण्टल’ ‘हे तुमचे पहिले पुस्तक अंतर्बाह्य चांगले झाले आहे’ अशी शाबासकी जाहीर समारंभात दिली आणि तिघे मोठ्या उत्साहाने कामाला लागले. तिघांपैकी अनंतरावांचा उत्साह टिकून राहिला. अनंतरावांनी साहित्याची उत्तम जाण व आवड, सकस साहित्याचा शोध घेण्याची वृत्ती, दर्जेदार पुस्तकनिर्मितीसाठी अपार कष्ट घेण्याची तयारी, उमदा स्वभाव आणि साहित्यिकांशी मैत्र जोडण्याचे कसब या गुणांच्या बळावर अल्पावधीतच ‘कॉण्टिनेण्टल’ला मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान मिळवून दिले. ‘कॉण्टिनेण्टल’ने वि.स. खांडेकर, ना.सी.फडके, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, श्री.ना.पेंडसे, वि.वि. बोकील, चिं.वि.जोशी, पु.ग. सहस्रबुद्धे, पं. महादेवशास्त्री जोशी, श्री.म.माटे, नाथमाधव, ना.सं. इनामदार, शंकरराव खरात, केशव मेश्राम, द.मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, शिवाजी सावंत, गंगाधर गाडगीळ, वामनराव चोरघडे, शांता शेळके, संजीवनी मराठे, दिपा गोवारीकर, शशिकला जाधव, प्रतिभा रानडे, विजया देशमुख आदि नामवंत साहित्यिकांचे साहित्य प्रकाशित केले. अनेक मान्यवर लेखक ‘कॉण्टिनेण्टल’शी जोडले गेले आहेत. ‘कॉण्टिनेण्टल’ची धुरा अनंतरावांनंतर अनिरुद्ध कुलकर्णी आणि रत्नाकर कुलकर्णी या त्यांच्या पुत्रांनी समर्थपणे पुढे नेली आणि प्रकाशनाच्या प्रतिष्ठेत मोलाची भर घातली. देवयानी अभ्यंकर, देवेश अभ्यंकर, ऋतुपर्ण कुलकर्णी व अमृता कुलकर्णी ही ‘कॉण्टिनेण्टल’ची तिसरी पिढी ‘कॉण्टिनेण्टल’च्या नावलौकिकात भर घालत प्रकाशन परंपरा पुढे नेत आहे.

अनंतरावांनी प्रकाशन व्यवसायाला आरंभ केला तो काळ ललित साहित्याचा होता. त्यामुळे ‘कॉण्टिनेण्टल’तर्फे ललित साहित्याची पुस्तके मोठ्या प्रमाणावर प्रकाशित झाली. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी नंतरच्या काळाची गरज लक्षात घेऊन शेती, बागा, वनविज्ञान, प्राणी-प्राणीपालन, पर्यावरण अशा विषयांवरची पुस्तकेही प्रकाशित केली. अनिरुद्ध कुलकर्णी यांनी दोस्तोवस्की, गॉर्की, चेकॉव्ह या रशियन लेखकांचे साहित्य मराठीत आणण्याचे काम केले. मराठी प्रकाशनविश्वात अनुवादित साहित्य मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होताना दिसते. ‘कॉण्टिनेण्टल’ने तत्पूर्वीच ते प्रकाशित केले आहे. ‘कॉण्टिनेण्टल’ने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची संख्या सोळाशेहून अधिक आहे.

जीवनाच्या सर्व क्षेत्रांत ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेत. वाचकांमध्ये प्रत्येक नवी गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता वाढत आहे. ती गरज लक्षात घेऊन ‘कॉण्टिनेण्टल’ने अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, राजकारण, विज्ञान, तंत्रज्ञान, मानसशास्त्र, आहार, आरोग्य, व्यायाम, परदेशप्रवास, भाषा अशा अनेक विषयांवरची पुस्तके प्रसिद्ध केली आहेत.

वाढते शहरीकरण, रस्त्यावरील वाहनांची गर्दी आणि वाहतुकीची कोंडी, शहरापासून दूर विकसित होऊ लागलेली उपनगरे या साऱ्या गोष्टींचा विचार करून ‘कॉण्टिनेण्टल’ने वाचकांपर्यंत पुस्तके पोचवण्यासाठी ‘बुक्स ऑन व्हील्स’ ही अभिनव कल्पना राबवली. ‘कॉण्टिनेण्टल’ने इ-बुक्स निर्मितीतही पाऊल टाकले आहे. ‘कॉण्टिनेण्टल’ मराठी विश्व साहित्य संमेलन अमेरिका, दुबई, लाहोर बुक फेअर, फ्रँकफर्ट बुक फेअर, अबुधाबी बुक फेअर यांसारख्या उपक्रमांत सहभागी होऊन नवे अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यांचा साहित्य संमेलनांत आणि महाराष्ट्रभर होणाऱ्या ग्रंथोत्सवांत सहभाग असतोच. ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’, ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’, ‘अखिल भारतीय प्रकाशक संघ’ यांसारख्या संस्थांनी ‘कॉण्टिनेण्टल’ला सन्मानित केले आहे. भारत सरकारचा उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीचा पुरस्कार ना.सं. इनामदारांच्या ‘शहेनशहा’ या ‘कॉण्टिनेण्टल’ प्रकाशित ग्रंथाला मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाड्मयनिर्मितीच्या पुरस्कारांत ‘कॉण्टिनेण्टल’च्या लेखकांनी नेहमी बाजी मारलेली दिसते. ‘कॉण्टिनेण्टल’ने पुस्तके प्रकाशित करणे आणि विकणे एवढेच ध्येय कधीच ठेवले नाही. ती प्रकाशन संस्था साहित्य व्यवहाराकडे गांभीर्याने पाहते. नव्या लेखकांचा शोध, आवश्यकता वाटल्यास पुनर्लेखन-संपादन, पुस्तकनिर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्तापूर्ण कामगिरी व्हावी यासाठी नियोजन, विक्री आणि वितरण यांचे योग्य व्यवस्थापन या गोष्टींना ‘कॉण्टिनेण्टल’ने प्राधान्य दिले आहे. त्यांच्या पाठीशी विश्वासार्हतेची मोठी पुण्याई आहे. म्हणूनच संस्थेने त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला आहे. ’कॉण्टिनेण्टल’ने केवळ लेखक घडवले नाहीत तर ते जोडलेही. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन लेखकांशी जोडलेले स्नेहबंध ही ‘कॉण्टिनेण्टल’ची श्रीमंती आहे.

श्री.ना.पेंडसे यांचे ‘तुंबाडचे खोत’ ‘कॉण्टिनेण्टल’ने प्रकाशित करण्याचे ठरवले. श्री.ना.पेंडसे त्या काळात दीड महिना अनंतरावांच्या घरी मुक्कामाला होते. अनंतराव आणि ते यांच्यामध्ये वादही होत. कादंबरीतील कोकणी शिव्यांवरून दोघांमध्ये असाच वाद झाला. पेंडसे रागाने म्हणाले, ‘मी येथे थांबणार नाही. हस्तलिखित घेऊन जाणार आहे.’ त्यावर अनंतराव म्हणाले, ‘तुम्ही जा, पण जेवल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही.’ पेंडसे विरघळले. अशी जिवाभावाची नाती! कुसुमाग्रज, चिं.वि.जोशी तशाच धाग्यांनी अनंतरावांशी जोडले गेले होते.

शिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’सारखी अजरामर ठरलेली महाकादंबरी वयाच्या तेविसाव्या वर्षी लिहिली. गदिमांनी कादंबरीतील काही भाग वाचून अनंतरावांना ‘कॉण्टिनेण्टल’तर्फे ती कादंबरी प्रकाशित करण्याचे सुचवले. अनंतरावांनी ती प्रकाशित केली. सावंतांच्या ‘मृत्युंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या कादंबऱ्यांनी मराठी व हिंदीदेखील प्रकाशन जगात इतिहास घडवला. शिवाजीरावांना लेखक म्हणून उभे करण्यात अनंतरावांचे मोठे योगदान होते. सावंत त्याची जाणीव व्यक्त करत. अनंतरावांचा वाढदिवस अनंत चतुर्दशीला. शिवाजी सावंत महाराष्ट्रात कोठेही गेलेले असले तरी त्या दिवशी शिवाजीराव पुण्यात हजर असत. ते अनंतरावांच्या शेवटच्या आजारात दिवसच्या दिवस दवाखान्यात जाऊन बसत. लेखक-प्रकाशकमधील असा स्नेह विरळाच! ना.सं. इनामदार आणि अनंतराव सर्व साहित्य समेलनांना मिळून जात. अनंतरावांच्या पत्नी अंजनीबाई आणि इनामदारांच्या पत्नी मालुताई या बरोबर असत. व्यवसायाच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची त्या संस्थेची परंपरा बाजारू जगातही टिकून आहे.

अनंतरावांनी लावलेल्या रोपट्याचा विशाल वटवृक्ष झाला आहे. वटवृक्षाच्या सावलीत सर्जनाची पूजा होत राहवी, लेखकांच्या प्रतिभेला मोहोर यावा, वाचकांचा गाव उजळून जावा आणि साहित्याचा प्रांत अधिक श्रीमंत व्हावा!

‘कॉण्टिनेण्टल’च्या साऱ्या कामावर १९६१ साली जुलै महिन्यात पानशेत धरण फुटल्यामुळे शब्दशः पाणी पडले. छापखान्यात असलेली ‘कॉण्टिनेण्टल’ची पुस्तके, ब्लॉक्स, कागद सारे नष्ट झाले होते. गोडाऊनमधील पुस्तकांचा लगदा झाला होता. धरणग्रस्त व्यावसायिकांना मदत मिळावी यासाठी अनंतरावांच्या अध्यक्षतेखाली समिती तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भेटली. धरणग्रस्त व्यावसायिकांना मदत मिळाली. त्या संकटाच्या प्रसंगीही ज्या ज्या छापखान्यातील जी जी कामगार मंडळी धरणग्रस्त झालेली होती, त्या प्रत्येकाला थोडी थोडी का होईना, रोख रक्कम देऊन मदतीचा हात ‘कॉण्टिनेण्टल’ने पुढे केला होता.

अनंतराव आणि पंडित नेहरू यांची भेट होण्याचाही योग आला. अनंतरावांनी ‘Discovery of India’च्या मराठी अनुवादासाठी पंडितजींकडे संमती मागितली. नेहरूंनी विचारले, ‘रॉयल्टी किती देणार?’ अनंतराव म्हणाले, ‘जास्तीत जास्त पंधरा टक्के देऊ शकतो. त्यापेक्षा जास्त देणे परवडत नाही.’ अनंतरावांच्या त्या बोलण्यावर पंडितजी खळखळून हसले आणि म्हणाले, ‘At least you know your business. परवा एक प्रकाशक मला तेहतीस टक्के रॉयल्टी द्यायला निघाला होता!’ ते पुस्तक ‘कॉण्टिनेण्टल’ने प्रकाशित केले.

- मिलिंद जोशी

रविप्रकाश कुळकर्णी यांनी पुढे जोडून लिहिले :

सुरुवातीच्या तिघा भागीदारांपैकी पाटणकर व महाजन हे दोघे प्रकाशन सोडून का गेले ते कधी स्पष्ट झाले नाही, परंतु अनंतरावांनी स्वत:च्या हिंमतीवर प्रकाशन व्यवसायात बैठक निर्माण केली. त्यांनी स्वत:चे नॉर्म्स मराठी प्रकाशन विश्वात प्रस्थापित केले. ते जसे पुस्तक लेखनाच्या, पुस्तक निर्मितीच्या बाबतीत होते तसेच व्यावसायिक बाबतीतही होते. त्यांनी विक्रीचे कमिशन ठरावीक पंचवीस टक्क्यांच्या वर कधी जाऊ दिले नाही. खरे तर, प्रकाशकांनी मिळून तसा ठराव केला होता. पण बाकी प्रकाशक विक्रीच्या मोहाने पाघळले, अनंतराव नाही.

अनंतरावांचे वजन फार मोठे होते व त्यांच्या शब्दाला किंमत होती. त्यांच्या सांगण्यावरून पु.ग.सहस्रबुद्धे यांच्यासारख्या विद्वानाने गाइड लिहिले होते!

दोन मुलगे अनिरुद्ध व रत्नाकर. अनिरुद्ध उच्चशिक्षित. त्याने उत्तम पुस्तके अनुवादित केली. तो थोडा स्वत:त रमलेला असे. रत्नाकरकडे वितरण असल्याने तो मिळून मिसळून राही. साहित्यपरिषदेच्या कामकाजात आस्थेने सहभागी होई. अनिरुद्धने व्यवहारोपयोगी पुस्तके निर्माण करणे आरंभले. त्यामुळे योग, शेती अशी पुस्तके मराठीत येऊ लागली. नंतर त्या प्रकारच्या प्रकाशनात खंड पडला होता, तो धागा अनिरुद्धचा मुलगा ऋतुपर्ण याने जोडून घेतला आहे. देवयानी फ्रेंच भाषेची जाणकार आहे. ती फ्रेंच क्लासेस घेते. खूप ‘बिझी’ असते. ऋतूची पत्नी अमृता देखील आता या व्यवसायात आली आहे. ती पुस्तके संपादनात विशेष लक्ष घालते. अनंतरावांची ही तिसरी पिढी त्याच व्यवसायात आली आहे. ढवळे वगळता असे दुसरे उदाहरण मराठी प्रकाशन उद्योगात नाही.

(३ जून २०१२ लोकसत्ता (लोकरंग पुरवणी) वरून उद्धृत)

लेखी अभिप्राय

उत्तम पिढ्यांन पिढ्यांनी हे प्रकाशन चालू टेवावे जसे सोनार आपल्या दुकानात जन्मसाल देतात तसे काॅनटिनेटल प्रकाशन 1938

रामचंद्र जाधव ट26/07/2017

Very informative article on a publisher in marathi

Sandhya joshi26/07/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.