पंचेंद्रियांनी शिक्षण - राजू भडकेचा प्रयोग


_Raju_Bhadke_1.jpgविनोबांच्या ‘मधुकर’ या पुस्तकात शिक्षणावर एक सुंदर वाक्य आहे: ‘अश्व या शब्दाचा अर्थ कोशात घोडा दिला आहे, पण त्याचा खरा अर्थ तबेल्यात बांधला आहे असा आहे. कोशातून बाहेर पडून तबेल्यात गेल्याशिवाय घोडा कळणारच नाही.’ हे वाक्य शिक्षणाच्या प्रयोजनाचे मर्म जणू अधोरेखित करते. ज्ञानार्जन जर पाच ज्ञानेंद्रियांचा वापर करून, प्रत्यक्ष कामातून आणि मूर्त संकल्पनेतून अमूर्त संकल्पनेकडे अशा प्रवासातून केले तर ते चिरकाल टिकणारे आणि सामर्थ्यशील असते असे शिक्षणशास्त्र सांगते, पण किती ज्ञानशाखांमध्ये अभ्यासक्रम शिकवताना त्या सूत्राचा आधार घेतला जातो? किती विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या विषयांतील घोडे हे कोशात नाही तर तबेल्यात शिकण्यास मिळतात? तसेच, असे विद्यार्थी घडवण्याची क्षमता आणि मानसिकता लाभलेले शिक्षक दुर्मीळच असतात. राजू भडके हा असा दुर्मीळ शिक्षक आहे.

राजू मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्याचा. त्याला डी.एड.चा अभ्‍यासक्रम सुरू असताना डॉ.अभय आणि राणी बंग यांनी सुरू केलेल्या 'निर्माण' या युवा चळवळीत सहभागी होण्याची संधी मिळाली. तेथील शिक्षण आणि इतर विषय यांतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने काहीतरी वेगळे करण्याच्या मनातील सुप्त इच्छेला मूर्त रूप प्राप्त झाले. तो शिक्षणक्षेत्रातील प्रयोगशील संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राध्यापक रमेश पानसे यांच्या 'ग्राममंगल' या संस्थेत रुजू झाला. संस्थेला ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांसारख्या नावाजलेल्या शिक्षणतज्ज्ञांनी सुचवलेल्या तत्त्वज्ञानाची पार्श्वभूमी लाभली आहे. शिक्षण प्रत्यक्ष कामातून व खेळातून आणि मनोरंजन शिक्षणातून ही ‘ग्राममंगल’च्या शैक्षणिक पद्धतीची विशेषता. राजू भडके डहाणू तालुक्यातील 'ऐना' या आदिवासी पाड्यामध्ये शिक्षक म्हणून दाखल झाला. राजूचे त्या शाळेतील सर्व विद्यार्थी आदिवासी. वारली, कातकरी आणि मल्हारकोळी या जमातीचे. बोलीभाषा वारली! त्यांच्या घरात शिक्षणाचे वातावरण नाही. त्यांना शिकून सक्षम होण्याचे स्वप्न दाखवणारे कोणी नाही. राजूसमोरील आव्हान तशा मुलांना त्यांची त्यांच्या आदिवासी संस्कृतीशी असलेली नाळ कायम जोडलेली ठेवून आजूबाजूच्या परिस्थितीला अनुरूप असे शिक्षण देऊन शहाणे करणे हे होते.

आदिवासी बालशिक्षणाची परिमाणे वेगळी होती. त्यांना जाणवणारा प्रमाण भाषेचा अडसर, पाठयपुस्तकातील संदर्भ आणि त्यांच्या व्यावहारिक जीवनातील दारूचा संबंध या सर्व मर्यादांचे भान ठेवून मुलांना शिकवणे ही खरी गरज होती आणि त्यातच राजूच्या शिक्षकी पेशाचा कस खरा लागणार होता.

_Raju_Bhadke_2.jpgलहान मूल हे अनुकरणातून शिकते. ते बालवाडीत शिक्षकाकडून शिकते, तसे घरी आई-वडिलांकडून शिकते. त्यामुळे राजूने आदिवासींची कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था समजावून घेण्यासाठी आदिवासी लोकांमध्ये अधिक वावरण्यास सुरुवात केली. तो आदिवासी संस्कृतीशी ग्रामसभांना उपस्थित राहणे, पालकांच्या सभा घेणे, आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे, मुलांशी वारली भाषेत संवाद साधणे यांतून परिचित होऊ लागला. ती त्याची त्याच्या आदिवासी विद्यार्थ्यांना ‘माणूस’ म्हणून समजून घेण्याची पहिली पायरी ठरली!

‘ग्राममंगल’ने आदिवासी मुलांच्या शिक्षणातील अंतर्भूत मर्यादांना डोळ्यांसमोर ठेवून अभिनव उपक्रम आणि शैक्षणिक साहित्य तयार केले आहे. ‘मुक्तशाळा’ हा तसा एक उपक्रम. ती शाळा कधी झाडाखाली भरते तर कधी नदीकाठी. विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्व इंद्रियांनी ज्ञानार्जन करण्याची संधी मुक्तशाळेत मिळते. राजू मुलांना त्यांनी त्यांच्या मराठीच्या पुस्तकामधील कधीही न पाहिलेले सफरचंद हाताळण्यास देतो, चव घेण्यास लावतो. पुस्तकातील भेळेचा उल्लेख हा मुक्तशाळेत अमूर्त संकल्पना न राहता सर्व मुले कांदा, टोमॅटो, चुरमुरे एकत्र करून खातात व तशा तर्‍हेने मुलांना भेळेचा परिचय करून दिला जातो. सहकार्यातून शिक्षण, समूह शिक्षण, विविध टप्प्यांतील शिक्षण हे शिक्षणातील सर्व सिद्धांत मुक्तशाळेत प्रत्यक्षात उतरताना दिसतात. ‘ग्राममंगल’मधील शैक्षणिक पद्धतीचा लाभ तेथे न शिकणाऱ्या इतर मुलांनाही मिळावा, या हेतूने सुरू करण्यात आलेल्या ‘विकासघर’ या उपक्रमातही राजूचा सहभाग होता. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना, त्यांची शाळा झाल्यावर ‘विकासघरा’त गणित व भाषा हे विषय अभिनव पद्धतीने शिकवले जातात.

विद्यार्थ्यांना पंचेंद्रियांनी शिक्षण देताना, राजूचेही सर्व अंगांनी शिक्षण होत होते. मुक्तशाळेत शिक्षकाची जबाबदारी पार पाडता पाडता एक वर्षानंतर त्याच्याकडे मुक्तशाळेच्या मुख्याध्यापकाची जबाबदारी आली. सोबत, तो वसतिगृहप्रमुख व परिसरातील बालवाड्यांचा समन्वयक असे कामही पाहू लागला. तसेच, त्याचा सहभाग संस्थाभेटीसाठी येणाऱ्या तज्ज्ञांना संस्थेची माहिती देणे या कामामध्येही वाढू लागला. राजूने साडेतीन वर्षें ‘ग्राममंगल’सोबत काम केले. तो त्यानंतर ‘प्रथम’ या संस्थेशी निगडित आहे. तो ‘प्रथम’मध्ये ‘गणित’ या विषयावरील राष्ट्रीय समितीमध्ये प्रशिक्षक आणि पाठ्यक्रम विकसन या कामात कार्यरत आहे. तसेच, तो ‘प्रथम ओपन स्कूल’ या उपक्रमांतर्गत कमीत कमी चौथी पास असलेल्या मुलांना सतरा क्रमांकाचा अर्ज भरून दहावीच्या परीक्षेसाठी तयार करणे व त्यांची शिक्षणाची गाडी परत रुळावर आणण्याच्या जोखमीच्या कामात सध्या सहभागी आहे. ‘ग्राममंगल’मधील बालशिक्षणाच्या तुलनेत प्रौढ शिक्षणाची आव्हाने वेगळी! फार पूर्वी शाळा सोडलेले, मध्यंतरीच्या काळात अभ्यासाची बैठक मोडलेले, नापास झाल्यामुळे परीक्षेची भीती असलेले… असे सर्व राजूचे विद्यार्थी आहेत. राजूच्या कामाचे स्वरूप बदलले असले तरी शिक्षण का, कसे आणि कोणासाठी या विचारांची त्याची बैठक पक्की झाल्यामुळे ‘ग्राममंगल’चा अनुभव त्याला पायाभरणीइतकाच महत्त्वाचा वाटतो.

राजू चार भिंतींच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत रमत नाही. त्याला गांधीजींची नई तालीम पद्धत अधिक भावते आणि म्हणूनच त्याला जीवन व शिक्षण यांना अद्वैत मानून ज्ञानदान करणाऱ्या संस्था ही काळाची गरज वाटते.

कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये असा आग्रह ‘शिक्षक हक्क कायद्या’मध्ये धरला गेला आहे. परंतु त्या कायद्याअंतर्गत निव्वळ इमारत, वर्गातील बाके-पुस्तके-गणवेष या पायाभूत सोयीसुविधा यांचा विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ अभिप्रेत नाही तर शिक्षणाची खरी गुणवत्ता ही शाळेतील शिक्षक, त्यांचा शिकवण्याचा दर्जा यावर अवलंबून आहे. राजू आणि त्याच्यासारखे तरुण शिक्षक एकत्र मिळून कदाचित ‘शिक्षण हक्क कायदा’ खऱ्या अर्थाने अमलात आणण्यास हातभार लावतील. अन्यथा जॉर्ज बर्नाड शॉ यांनी म्हटल्याप्रमाणे, येथील विद्यार्थ्यांवरही ‘मला खूप शिकायचे होते, पण शाळा आडवी आली’ असे म्हणण्याची वेळ येईल.

राजू भडके - 9594424841

- चारुता गोखले

charutagokhale@yahoo.co.in

लेखी अभिप्राय

It is inspiring to other.?

santosh wankar21/06/2017

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.