पंचाळे गावचा शिमगा

प्रतिनिधी 17/05/2017

_Panchale_gavcha_Shimga_1.jpgपंचाळे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील गाव. गावामध्ये थोरात, तळेकर, माळोदे, मोरे, आसळक, सहाने, रहाने, जाधव अशी मराठा कुळे आहेत. परंतु विविध समाजांचे व धर्मांचे लोक गावात राहतात. एरवी, गावात सर्व देव-देवतांची मंदिरे आहेत. जीर्ण झालेली मंदिरे गाववर्गणीमधून नव्याने बांधण्यात आलेली आहेत. गावामध्ये पंचलिंगेश्वराचे मंदिर मात्र प्राचीन आहे. तेथे महादेवाची पाच लिंगे आहेत. पंचलिंगेश्वर मंदिरामुळे सभोवतालच्या सामूहिक वस्तीस पंचाळे असे नाव पडले.

पंचाळे गावाने पिंपळगाव (धनगरवाडी) व श्रीरामपूर (शिंदेवाडी) या दोन वाडयांना जोडलेले आहे. पंचाळे गावचे क्षेत्रफळ सिन्नर तालुक्यात प्रथम क्रमांकाचे आहे. पंचाळे गावाची लोकसंख्या सुमारे सहा हजार एवढी आहे. गावामध्ये ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, प्राथमिक, माध्यमिक शाळा, आरोग्य केंद्र इत्यादी सोयी आहेत.

पंचाळे गावातील शिमग्याच्या सणास आगळीवेगळी परंपरा लाभली आहे. त्यातून सर्वधर्मसमभावाची जपणूक गावाकडून पिढ्यान् पिढ्या सुरू आहे. शिमग्याच्या निमित्ताने श्री कानिफनाथ यात्रोत्सव साजरा होतो. शिमग्याच्या यात्रेची परंपरा जोपासण्यासाठी गावच्या लोकसंख्येचे वर्गीकरण करून गावाचे विभाजन चार वाडयांमध्ये केले गेले आहे. त्या चार वाड्यांना अनुक्रमे एक, दोन, तीन, चार असे क्रमांक दिले गेले आहेत. शिमगा सण साजरा करण्याचा मान दरवर्षी एकेका वाडीकडे असतो.

कानिफनाथ यात्रोत्सवाचा कालावधी शिमगा-होळी ते रंगपंचमी असा पाच दिवसांचा असतो. होळी पौर्णिमेच्या दिवशी गावातील सर्व लोक गावच्या चौकामध्ये शेणाच्या गोवर्‍या, ऊसाची बांडी, खोबर्‍याची वाटी आणि देवपूजेचे साहित्य घेऊन जमतात. गोवर्‍यांचा ढीग बनवून ब्राह्मणाच्या हस्ते होळी केली जाते. होळीला गावातील लोक पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात, पूजाअर्चा करतात.

होळीचा दुसरा दिवस म्हणजे धुलिवंदन. त्या दिवशी दुपारी चार वाजता वीर मिरवण्याची प्रथा आहे. वीर मिरवताना जुनी वाद्ये वाजवली जातात. त्यात डफाचा समावेश असतो. वीरांची मिरवणूक काढली जाते.

शिमग्याचा पाचवा दिवस म्हणजे रंगपंचमी. गावातील तरूण त्या दिवशी सकाळी गंगेवरून पाणी आणतात. कावड करून गंगेचे पाणी गावातील सर्व देवतांना वाहिले जाते व त्यांना स्नान घातले जाते. त्याला कावडी असे म्हणतात.

रंगपंचमीच्या दिवशी गोपालकाला असतो. संपूर्ण गावातील जाती-धर्माचे लोक स्वयंपाक घेऊन कानिफनाथ मंदिराजवळ येतात. कानिफनाथांना नैवेद्य दाखवून सर्वजण जेवण करतात. त्याला गोपाळकाला असे म्हणतात. त्याद्वारे सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडून येते.

रंगपंचमीच्या दिवशी सायंकाळी चार वाजता कानिफनाथ मूर्तीची मिरवणूक काढली जाते. तर दुसऱ्या एका रथातून कलावंताची मिरवणूक काढली जाते. त्यांनी तमाशा पाच दिवस सादर केलेला असतो ना! सर्वत्र रंगांची उधळण सुरू होते. ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक निघते. आजच्या काळात मिरवणुकीसाठी डी. जे. बँडपथकाला पसंती अधिक दिली जाते. रंग उडवण्यासाठी पिकाला फवारणी करण्याचे यंत्र वापरले जाते. त्यामुळे गावातील लोक जणू काही रंगांत न्हाऊनच निघतात!

मिरवणूक संपल्यानंतर शोभेची दारू उडवली जाते. ते नवीन आकर्षण आहे. शिमग्याचा शेवटचा दिवस असल्याने तमाशाचाही शेवटचा दिवस असतो. रंगपंचमीच्या दुसर्‍या दिवशी तमाशा कलावंतांचा मंदिराजवळ हजेरीचा कार्यक्रम होतो. तमाशा कलावंत हजेरी देऊन शिमग्याच्या यात्रेची सांगता करतात!

- बाळासाहेब चांगदेव तळेकर

(‘लोकपरंपरेचे सिन्नर’ पुस्तकावरून सुधारित)

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.