मकर संक्रात - सण स्‍नेहाचा (Makar Sankrant)


मकर संक्रांतीस तिळगुळ वाटण्‍याची प्रथा आहे.मकर संक्रात हा भारतात साजरा होणारा महत्त्वाचा सण. उत्तरायणारंभ आणि त्याचबरोबर थंडीचा भर असल्याने आयुर्वेदाचा विचार, अशा दोन कारणांनी मकर संक्रांत हा सण साजरा होऊ लागला. तो सण हिवाळ्याच्या मध्यात येतो. भारतातील हिंदू सण-समारंभ हिंदू पंचांगाच्‍या तिथीप्रमाणे साजरे केले जातात. पण मकर संक्रांतीचा त्‍याला अपवाद आहे. मकरसंक्रांत हिंदू पौष महिन्‍यात येते. तो सण १४ जानेवारीला साजरा करतात.

हिंदू सणांना महत्त्व आयुर्वेदाच्‍या विचारामुळे प्राप्‍त होते. तीळ हे उष्ण प्रकृतीचे आहेत आणि मकर संक्रांत हिवाळ्याच्या मध्यावर साजरी करणे अपेक्षित आहे, तेव्हा तिळाच्या वापराने थंड व उष्ण यांचा समतोल राखण्यास मदत होते. ते आरोग्यास हितावह आहे. त्यासाठी मकर संक्रांतीस तिळाचे महत्त्व आहे.

तिळाचा सहा प्रकारे उपयोग करणे हे संक्रांतीचे वैशिष्टय म्हणावे लागेल. ते सहा प्रकार म्हणजे -

१. तीळ पाण्यात घालून त्या पाण्याने स्नान करणे.
२. तिळाचे उटणे अंगास लावणे.
३. तिळाचा वापर करून होम करणे.
४. तिळाने तर्पण करणे.
५. तीळ भक्षण करणे.
६. तीळ दान करणे.

संक्रांतीच्‍या सणाच्‍या आदल्‍या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. तो आनंदाचा आणि उपभोगाचा सण अशी लोकधारणा आहे. त्‍या दिवशी तीळ लावलेल्‍या बाजरीच्‍या भाक-या, लोणी, पापड, वांग्‍याचे भरीत, मूगाची डाळ, चटणी, तांदूळ घालून केलेली खिचडी आणि खेंदाटाची भाजी असा भोगीचा खास पारंपरिक स्‍वयंपाक केला जातो.

भारतात मकर संक्रांतीचा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो. महाराष्ट्रात संक्रांतीच्या दिवशी सवाष्णीला वाण देण्याची प्रथा आहे. सुगडात (तो ‘सुघट’ या शब्दाचा तो अपभ्रंश असावा.) हळद-कुंकू, ऊसाचे करवे, हरभऱ्याचे घाटे, तीळ-गूळ घालून घरच्या देवांसह पाच ‘वायने’ म्हणजेच वाणे दिली जातात. विवाहानंतर पहिली पाच वर्षे अनुक्रमे हळद-कुंकू, तीळ-गूळ, कंगवा, बांगड्या लुटण्याची पद्धत खूप ठिकाणी आहे. महिला हळदीकुंकू समारंभ साजरा करून उपयोगी वस्तू लुटतात. नवविवाहित जोडप्याला संक्रांतीच्या दिवशी मान असतो. सुनेला हलव्याचे दागिने, काळी साडी भेट दिली जाते. तर जावयाला हलव्याचा हार, अनारसे किंवा बत्तासे अशी सच्छिद्र मिठाई देण्याची प्रथा आहे. संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करतात. लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवले जाते. महिला त्यांचे औक्षण करतात. बोरे, ऊस, हरभरे, चुरमुरे, बत्तासे, हलवा, तिळाच्या रेवड्या वगैरे पदार्थांनी बाळाला अंघोळ घातली जाते. त्याला बोरन्हाण म्हणतात. संक्रांतीला गूळ आणि तीळ यांची तीळपोळी तयार करतात. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदीकुंकू समारंभ साजरा केला जाऊ शकतो. एकमेकांना तिळगूळ देऊन 'तिळगूळ घ्या आणि गोड बोला' असे सांगून स्नेह वृद्धिंगत होण्याची शुभेच्‍छा दिली जाते.

मकर संक्रांतीला कोकणात मार्लेश्वराची यात्रा भरते. त्या दिवशी शंकर-पार्वतीचा विवाह लावला जातो. मकर संक्रांतीनिमित्त नाशिकमधील येवला येथे दोन दिवस ‘पतंगोत्सव’ साजरा करतात. तेथे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण बँड, हलगी, ढोल पथक यांच्या तालावर पतंग उडवले जातात. पतंग काटण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. येवल्यात सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन तो सण साजरा करतात. तेथे ती परंपरा शंभर-दीडशे वर्षांपासून चालत आली आहे. येवल्यात गुजराती समाज सुमारे तीनशे वर्षांपूर्वी स्थायिक झाला. त्‍या समाजाकडूनच हा पतंगोत्सव तेथे आल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्या दोन दिवसांत पतंगाची दुकाने सोडली तर संपूर्ण येवल्यात अघोषित संप असल्यासारखी स्थिती असते. संक्रांतीचा दुसरा दिवस ‘कर’ दिन म्हणून पाळला जातो.

या सणाला उत्तर प्रदेश व बिहार राज्‍यात ‘खिचडी संक्रांत’ म्हणतात. त्या दिवशी नदीमध्ये स्नान केले जाते. सूर्याची पूजा करून तांदूळ व उडदाची डाळ यांची खिचडी, दही, गुळाचे लाडू दान करण्याची पद्धत आहे. गोरखपूरमध्ये गोरखनाथ मंदिरात ‘खिचडी मेळा’ लागतो, तर वृंदावनमध्ये ठाकूर रामवल्लभ मंदिरात महिनाभर ‘खिचडी महोत्सव’ साजरा करतात. बिहार-झारखंडमध्ये अशी समजूत आहे, की मकर संक्रांतीपासून सूर्याचे स्वरूप तिळातिळाने वाढते, म्हणून त्या दिवसास ‘तीळ संक्रांती’ म्हणतात. पिठोरागढमध्ये पाच नद्यांच्या संगमावर असलेल्या पंचमेश्वर महादेवाच्या मंदिरात देवापुढे खिचडी ठेवतात.

हिमाचल प्रदेश व पंजाब राज्‍यांत भोगीचा दिवस ‘लोहडी’ म्हणून, तर लोहडीचा दुसरा दिवस म्हणजेच संक्रांतीचा दिवस 'माघी' म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसापासून नवीन पिकाची काढणी सुरू होते. पुरुष व महिला पारंपरिक वेशभूषा करतात. लोहडीच्या दिवशी शेकोटी करून त्याभोवती नातेवाइक व मित्रमैत्रिणी एकत्र जमतात. सार्वजनिक ठिकाणी ‘गिद्धा’ व ‘भांगडा नृत्य’ केले जाते. मक्याची पोळी, मोहरीची भाजी व उसाच्या रसाची खीर करून नैवेद्य दाखवतात, भोजन एकत्र करतात. 'सरसो का साग' आणि 'मक्की की रोटी' हा लोहडीचा विशेष खाद्यपदार्थ असतो.

मकर संक्रांत मध्य प्रदेशात ‘ओंकारेश्वर संक्रांत’ या नावाने प्रसिद्ध आहे. पश्चिम बंगालमध्ये असंख्य भक्त ‘गंगा-सागर’ द्वीपावर एकत्र जमतात. तर तामिळनाडूत संक्रांत ‘पोंगल’ या नावाने साजरी करतात. त्या निमित्ताने पोंगल हा गोड भात केला जातो. पहिल्या दिवशी पोंगल प्रसाद चढवून पावसाची प्रार्थना केली जाते. दुसऱ्या दिवशी सूर्याला पोंगलचा प्रसाद चढवून आध्यात्मिक प्रगती आणि समृद्धी यासाठी प्रार्थना केली जाते. तिसऱ्या दिवशी घरातील पाळीव प्राणी, गुरे यांना पोंगल प्रसाद दिला जातो.

गुजरातमध्ये 'उत्तरायण' या नावाने ओळखला जाणारा तो सण विशिष्ट पद्धतीने दोन दिवस साजरा केला जातो. तो 'उत्तरायण' आणि 'वासी उत्तरायण' अशा नावांनी अनुक्रमे १४ आणि १५ जानेवारी या दिवशी साजरा करतात. गुजरातमध्ये संक्रांतीच्या सणाची विशेषत: पतंग उडवण्यासाठी वाट पाहिली जाते. वजनाने हलक्या कागदाचे पतंग बनवले जातात. वडोदरा, अहमदाबाद, भावनगर यांसारख्या मोठ्या शहरांत संक्रांतीचे दोन दिवस पतंग उडवण्याचा आनंद घेतला जातो. एकमेकांचे पतंग कापण्याच्या स्पर्धा लावल्या जातात. हिवाळी भाज्यांचे प्रकार व तिळापासून बनवलेली गोड चिक्की हा त्‍या काळातील विशेष खाद्यप्रकार असतो.

आसाममध्ये 'भोगी बिहू', काश्मीर मध्ये ' शिशुर सेंक्रात', तर कर्नाटकमध्ये 'मकर संक्रमणा' अशा वैविध्यपूर्ण नावांनी मकर संक्रांत साजरी केली जाते. भारताव्यतिरिक्त नेपाळ, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, श्रीलंका या देशांमध्येही मकर संक्रांत वेगवेगळ्या पद्धतींनी आणि नावांनी साजरी केली जाते.

- आशुतोष गोडबोले

लेखी अभिप्राय

great information

Abhijeet Khandekar14/01/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.