विश्वास येवले यांच्या ध्यासाची जलदिंडी
विश्वास येवले. पेशाने डॉक्टर. नामांकित स्त्री-रोगतज्ज्ञ. पण त्यांनी त्यांच्या बालपणापासून पाण्याशी झालेल्या मैत्रीतून, पाण्यावर असलेल्या निस्सीम भक्तीतून आळंदी ते पंढरपूर अशी जलदिंडी सुरू केली. तिला २०१६ साली पंधरा वर्षें होऊन गेली. दिंडी दर वर्षी ऑक्टोबरच्या दुसऱ्या रविवारी निघते आणि बारा दिवसांच्या जलप्रवासानंतर पंढरपूरला पोचते. त्यातून नदिस्वच्छतेच्या अभिनव उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म असा त्रिवेणी संगम म्हणजे येवले यांची जलदिंडी असे वर्णन करता येईल. त्यांच्या त्या उपक्रमाचे लोण महाराष्ट्रात स्थिरावले असून चक्क भारतभर पसरत आहे! अनेक गट व संस्था यांनी त्यांच्या त्यांच्या प्रदेशात नदीपात्र-स्वच्छतेचा मंत्रजागर सुरू केला आहे.
त्यांचा यात्रेतील आळंदी ते पंढरपूर नदीतून प्रवास हा चित्तथरारक व मनोज्ञ तर आहेच; शिवाय पाणी, पर्यावरण आणि जलशुद्धिकरण यांचे महत्त्व सांगणारा-प्रबोधनात्मदेखील आहे; तो कृतिशीलतेला आवाहन करणारा आहे. पाण्याच्या योग्य वापरासंबंधी संदेश देणारादेखील आहे. येवले यांनी आणखी एका घटकाची त्यात भर घातली आहे. ती म्हणजे या अनोख्या दिंडीद्वारे होणारे दिंडीतील ‘वारक-यां’चे आणि दिंडीच्या मार्गावरील गावागावातील नागरिकांचे आध्यात्मिक उन्नयन! तो सामाजिक भान आणि विज्ञानदृष्टी यांचा एकत्रित असा प्रयोग आहे. विश्वास येवले यांनी त्यांच्या कामाच्या स्वरूपाविषयी पुस्तकांतून मांडणी केलेली आहे. त्यांची 'उवाच', 'योगार्थु' आणि 'जलदिंडी' अशी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांचा 'नावाडी' नावाचा कवितासंग्रह आहे.
विश्वास येवले यांचे व्यक्तित्व भावना, बुद्धी, विचार आणि आत्मिक अनुभव यांच्या समग्र संयोगाने संपृक्त आहे. त्यापाठी आहे त्यांची त्यांच्या आईवर असलेली नितांत श्रद्धा. येवले यांच्याशी तासभर बोलले किंवा त्यांनी लिहिलेले कोठलेही पुस्तक वाचले तरी लक्षात येते, की हा आधुनिक काळातील ‘श्याम’ आहे. त्यांच्या 'जलदिंडीची गोष्ट' या पुस्तकाच्या ब्लर्बवर साहित्य समीक्षक नागनाथ कोतापल्ले यांनी म्हटले आहे, 'सानेगुरुजींनंतर मातृत्वाचा एवढा गौरव प्रथमत:च होत आहे.' त्यांच्या जीवनाचा प्रेरणास्रोत म्हणजे त्यांची आई. मग लहानपणी तिने केलेले स्वच्छतेचे, आरोग्याचे संस्कार असोत किंवा तिच्या निर्गुण स्पंदनांनी त्यांच्या स्वत:च्या मनाला अहंकाराचा थारा न देण्याचा पोचवलेला संदेश असो, त्यांची आई हयात नाही पण येवले यांनी त्यांची आई त्यांच्याशी ‘संवाद’ साधते अशी श्रद्धा मनोमन जपली आहे. आईने त्यांच्यावर 'शरीर, मन आणि बुद्धीचे आरोग्य राखणे हीच खरी संपदा' असे बिंबवले. त्यांनी आईचे ते मनोगत आयुष्यभर जपले. ते आईकडून मिळालेल्या धाडस, निर्णयशक्ती आणि कौशल्य या गुणांविषयी नेहमीच कृतज्ञतेने बोलतात. मात्र त्यांनी त्यातून साकारली आहे ती सगुण कृती.
येवले यांचे आईवडील, दोघेही डॉक्टर. त्यांची उत्तम वैद्यकीय प्रॅक्टिस मुंबईला सुरू होती, पण आईने निर्णय घेतला आणि दोघांनीही मुंबई सोडून थेट उरण गाठले. तेथे त्यांच्या नात्यागोत्याचे, परिचयाचे कोणी नव्हते. वीज, पाणी, चांगल्या रस्त्यांचा अभाव अशा त्या आडगावात आईवडील चाळीस वर्षें राहिले. ती माऊली मुसळधार पावसात, रात्री-अपरात्री चिखल तुडवत मिठागरांतील वस्तीत अडलेल्या बाळंतिणींची सुटका करण्यास धावून जात असे. उरण हे बंदराचे गाव. त्यामुळे विश्वास येवले यांचे बालपण पाण्यात सळसळत गेले. ते मोरा बंदरावरच्या नावा, होड्या, मचवे, जहाजे, बोटी पाहत पाहत मोठे झाले. तेही तांडेल आणि कोळी यांच्याबरोबर पाण्याचे सखेसोबती झाले. त्यांचे छंद नावा वल्हवणे, निसर्गाची विविध रूपे मनात साठवणे हे होऊन गेले.
मोठेपणी, एका छोट्याशा प्रसंगाने त्यांच्या अंत:करणाला जलप्रदूषणाचे वास्तव भिडले. ते त्यांच्या सहा-सात वर्षांच्या मुलाला नौका वल्हवायला शिकवत होते. मुलगा घाबरत होता. तेव्हा येवले यांनी त्याची ‘भित्रट’ अशी निर्भर्त्सना केल्यावर तो लहानगा ताड्कन म्हणाला, “मला खडकवासल्याच्या स्वच्छ पाण्यात घेऊन चला. मी येथे भित आहे तो या घाण पाण्यात पडीन म्हणून.” त्या उत्तरामुळे येवले पाण्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. त्यांच्या लक्षात आले, की त्यांचे बालपण ते मुलाचे बालपण यांमधील काळात पाण्याचे प्रदूषण प्रचंड वाढले आहे. नदीचे जे पाणी पूर्वी पिण्यासाठी वापरले जाई, त्याला स्पर्शही करावासा वाटू नये इतके ते दूषित झाले आहे. पाण्याचा रंग, त्यावर तरंगत असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, अमर्याद जलपर्णी, घाणीने काळे पडलेले खडक, काठावरील दलदल, उग्र दर्प, पाण्यावर काळ्या सायीप्रमाणे चढलेला गाळ... त्यांना वाटले, नदीचे सौंदर्य आणि पावित्र्य शहराच्या निष्काळजीपणामुळे डागाळले आहे. ते पुढील पिढ्यांना कोणता वारसा दिला जाणार या विचाराने अस्वस्थ झाले. त्यांनी त्या अस्वस्थतेतून त्यांच्या उत्तम नावाडी असलेल्या मित्रापाशी - बबनरावांशी त्यांचे मन मोकळे केले.
येवले यांनी त्यांच्या 'उवाच' या पुस्तकात पुणे शहरातील नदीचे वास्तव रेखाटले आहे. त्यांनी लिहिले आहे, “नदीकडे पाठ करून लोकांनी त्यांचे त्यांचे संसार थाटले होते. नदीला सोबत करत शहराची घाण काठाकाठाने वाहून आणणारा सिमेंटचा पाईप, बहुधा जास्त ताण पडल्यामुळे मध्येच तुटला होता. त्यातून धबधब्यासारखे पडणारे सांडपाणी नदिपात्रात येऊन मिसळत होते. नदीचे पाणी तरी कोठे वेगळे होते?” ते पुढे सांगतात, “खराब पाण्याने भाजीपाल्याचे पीक पडले. त्याची चव गेली. पाण्यात मासे कमी झाले. त्यांना रॉकेलचा वास येऊ लागला. ते खाऊन लोक आजारी पडू लागले. अतिक्रमणांनी नदी आक्रसली, एखाद्या आजाऱ्यासारखी क्षीण झाली.”
त्या सगळ्या चिंतनातून येवले यांच्या लक्षात आले, की नदीचे जिवंतपण हे संस्कृतीच्या स्वास्थ्याशी, माणसांच्या आरोग्याशी निगडित आहे. म्हणूनच नदीचे पात्र स्वच्छ केले पाहिजे. ते काम एकट्यादुकट्याचे नव्हतेच; त्यांनी मित्र-सवंगड्यांसोबत पुण्यातील संगम पुलाजवळ -जलपर्णी निर्मूलनाची सुरुवात करावी असे ठरवले. कामाला प्रारंभ कसा करावा याचा विचार करताना त्यांना समस्येचे उग्र रूप दिसू लागले. म्हणून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलण्यास सुरुवात केली, परंतु त्यांचा सरकारी पद्धतीचा प्रतिसाद अस्वस्थ करणारा होता. शेवटी एक दिवस, त्यांनी सरळ काठावरील झाडीत अडकलेले प्लॅस्टिक काढण्यास सुरुवात केली. बबनराव व इतर मित्रही सरसावले. सर्वजण जलपर्णी आणि तरंगता कचरा काढू लागले. नदीचे प्रदूषण अनेक प्रकारचे होते - मैलापाणी, सांडपाणी, गाडीच्या चाकापासून चपलांपर्यंत तरंगणाऱ्या टाकाऊ वस्तू...
नदीचे पात्र पुन्हा पुन्हा अस्वच्छ होई. एका भागातील कचरा काढला, तरी दुसऱ्या दिवशी दुसऱ्या भागातून वाहत आलेल्या कचऱ्याने नदिपात्र पुन्हा भरून जाई. त्यांना ते काम सतत चिकाटीने करण्याचे आहे हे जाणवले. मग त्यांनी काठावरील स्थानांच्या आधारे नदीचे वेगवेगळे विभाग करून मित्रांच्या वेगवेगळ्या गटांत ते काम वाटले. त्याच प्रयत्नांत, चिंतन करता करता, नदीमार्गे आळंदी ते पंढरपूर असा प्रवास करण्याचा विचार त्यांच्या मनात स्फुरला. ते त्या विचाराने झपाटून गेले.
येवले यांच्या व्यक्तित्वाची खासियत अशी आहे, की ते बोलताना त्यांच्या मनाचा स्वच्छ तळच जणू उघडून दाखवतात. त्यांना पाण्यासारखे स्वच्छ, पारदर्शक मन लाभले आहे. लोकांना त्यांच्या विचारांतील सच्चाई साफ दिसते, भिडते आणि तेही त्यांच्या विचारांनी भारावून जातात, प्रेरित होतात. अनेक मित्र, सहकारी, परिचित-अपरिचित त्यांच्या भोवती गोळा होऊ लागले. प्रदूषणाचे परिणाम साऱ्यांना दिसत होते. प्रवासाच्या मार्गाची ओळख करून घेण्याचे ठरले. वाटेत बंधारे, धबधबे, अडथळे, भोवरे, खडक यांची नोंद झाली. वाटेतील गावांना, गावकऱ्यांना विश्वासात घेतले गेले. स्थानिक लोकांनी सर्व गावांमध्ये त्यांच्या चमूला छान प्रतिसाद दिला. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. त्यात सामाजिक भान तर होतेच, शिवाय तरुणांची ती टीम करत असलेल्या कामाविषयी, माणसांविषयी आपुलकी, प्रेमही होतेच. येवले माणसांचा पूल बांधत निघाले होते, ते लोकांच्या मनाला स्पर्शत होते.
जलप्रवासात अनेक गोष्टी टिपल्या गेल्या. उदाहरणार्थ, एके ठिकाणी वाटेतील पूल गाळाने व्यापला होता. तो दीड-दोन वर्षांपासून बंद होता. गाड्यांना चाळीस मैलांचा जास्तीचा वळसा पडायचा. रोज तेथून हजार-दीड हजार गाड्या जात. येवले यांनी हिशोब केला, लोकांसमोर मांडला. पाण्याच्या प्रदूषणाशी जीवनविषयक अनेक प्रश्न जोडले गेले आहेत. आळंदी ते पंढरपूर नदीमार्गे प्रवास हे त्यावरील एक छोटे उत्तर आहे असे ते मानतात.
पंढरपूरच्या ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांसारखीच स्वच्छतेची, पर्यावरणाची, सामाजिक-आत्मिक आरोग्याची पालखी दरवर्षी नेली जाते.
काठावरील गावागावांमध्ये दिंडीचे मनापासून स्वागत झाले. दिंडीतील वारकऱ्यांची विचारपूस, जेवणखाण, हवे-नको, मुक्काम याची सुंदर व्यवस्था आस्थेने करण्यात येते.
येवले यांच्या दृष्टीने त्या जलप्रवासाचा आणखी एक फायदा म्हणजे आत्मज्ञानाची प्राप्ती, म्हणजे स्वत:ला स्वत:ची ओळख होणे. पंढरपूरच्या वारीत वारकऱ्यांची हृदये जशी आत्मिक भावनेने उजळून निघतात, अहंभाव विरून एकत्वभाव निर्माण होतो, तोच अनुभव जलदिंडीतही येतो असा येवले यांचा अनुभव आहे. ‘मी हे सारे करत आहे’ हा भाव तेथे विरून जातो असे ते सांगतात.
‘अहम् विरले, ब्रह्म उरले
ब्रह्म दिसले, अहम् कळले’
येवले, बबनराव, मामी, राजा, सुहास, संतोष, आशीष, आरती आणि त्यांच्या भारतभर पसरलेल्या संवेदनशील ‘जलदिंडी वारकऱ्यां’चे रिंगण असेच विस्तारत राहो!
एरवी, विश्वास येवले स्वत: पेशाने डॉक्टर आहेत. त्यांच्या काश्मिरी पत्नीही डॉक्टर आहेत. त्यांचे पुणे येथे नगर रोडवरील कल्याणी नगर परिसरात हॉस्पिटल आहे. मुलगा-मुलगी देखील त्याच व्यवसायात आहेत.
- अंजली कुळकर्णी
लेखी अभिप्राय
जलदिंडीच्या उपक्रमाला सलाम
Add new comment