बहुगुणी सिनेमावाले नानासाहेब सरपोतदार


नरहर दामोदर ऊर्फ नानासाहेब सरपोतदार हे भारतीय चित्रपटसृष्टीचे आरंभकाळातील एक शिल्पकार होते. नानासाहेबांचा जन्म ११ फेब्रुवारी १८९६ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नांदवली गावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ते नोकरी करत शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेले, पण त्यांचे मन शिक्षणात रमले नाही. ते वाचनाची व अभिनयाची आवड असल्यामुळे ‘महाराष्ट्र नाटक मंडळी’त जाऊन राहिले. त्यावेळी त्यांचे वय तेरा वर्षांचे होते. त्यांनी तेथे ‘वत्सलाहरण’, ‘सैरंध्री’, ‘दामाजी’ या नाटकांमध्ये छोट्यामोठ्या भूमिका केल्या. ते आईच्या आग्रहाखातर इंदूरला एका नातेवाईकाकडे गेले. तेथेही अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. ते २१ ऑक्टोबर १९१९ रोजी, नव्यानेच स्थापन झालेल्या बाबुराव पेंटर यांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त दाखल झाले. तेथे त्यांनी ‘सैरंध्री’ हा पहिला चित्रपट लिहिला. ‘सैरंध्री’ने चांगले यश संपादन केले. नानांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’साठी ‘वत्सलाहरण’, ‘सिंहगड’, ‘कल्याण खजिना’, ‘सती सावित्री’, ‘दामाजी’, ‘शहाला शहा’ चित्रपट लिहिले, काहीत भूमिकाही केल्या. नाना स्त्री कलाकारांच्या भूमिका हुबेहूब वठवत. त्यांनी ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’मधील पाच वर्षांच्या वास्तव्यात दिग्दर्शनातील बारकावे शिकून घेतले. नानासाहेबांनी मुंबईला ‘डेक्कन पिक्चर्स’च्या ‘प्रभावती’ या मूकपटाचे दिग्दर्शन केले. दिग्दर्शक म्हणून नानांचा तो पहिला चित्रपट होता. छायालेखक पांडुरंग तेलगिरी यांनी ती संस्था स्थापन केली होती. तेलगिरींनी पुढे पुण्यात खडकीला ‘युनायटेड पिक्चर्स’ ही संस्था स्थापन केली. नानासाहेबांनी त्या संस्थेसाठी दोन वर्षांत ‘रायगडचे पतन’, ‘चंद्रराव मोरे’, ‘रक्ताचा सूड’ असे चित्रपट दिग्दर्शित केले.

नाशिकजवळच्या येवले गावातील अंबू सगुण ही मुलगी मूकपटात बालकलाकाराची भूमिका करत असे. नानासाहेबांच्या ‘आर्यन फिल्म कंपनी’त अंबू सगुण प्रथम नायिका झाली. त्याच ललिता पवार या नावाने पुढे ख्यातनाम अभिनेत्री झाल्या. नानांनी ‘महाराची पोर’ हा चित्रपट लिहून दिग्दर्शित केला होता. त्यांनी ऐंशी वर्षांपूर्वी असा संवेदनाशील सामाजिक विषय हाताळला होता. ललिता पवारने महाराच्या मुलीची भूमिका केली होती. तो चित्रपट पाहण्यास सरोजिनी नायडू गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमात आल्या होत्या. त्या चित्रपटाची महात्मा गांधी, मौलाना शौकत अली, बॅ. बाप्टिस्टा, अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. मद्रासच्या ‘हिंदू’, ‘जस्टिस’ या वृत्तपत्रांनीदेखील अग्रलेख लिहून नानांचे कौतुक केले होते.

नानांनी ‘आर्यन फिल्म कंपनी’ची स्थापना १९२७ सालच्या विजयादशमीच्या मुहूर्तावर पर्वतीच्या पायथ्याशी, आदमबाग येथे एक रुपया भांडवलावर केली. आठ आणे जमिनीचे भाडे व बाकी आठ आण्यांचे पेढे, नारळ, हार-फुले घेऊन मुहूर्त केला. मुंबईच्या कोहिनूर थिएटरचे मालक, चित्रपट प्रदर्शक बाबुराव कान्हेरे ‘आर्यन फिल्म कंपनी’च्या भागीदारीत आले. नाना अनुभवी नट, लेखक, दिग्दर्शक होतेच, त्या शिवाय ते छायालेखनही शिकले होते. आता, ते निर्मातेही झाले होते! ‘हरहर महादेव’ हा ‘आर्यन’चा पहिला चित्रपट. पण चित्रपटाच्या नावावर ब्रिटिश सेंसॉर बोर्डाने हरकत घेतली. त्यामुळे त्यांनी नाव बदलले व ‘निमक हराम’ केले. त्यांनी त्या चित्रपटाची जाहिरात मोठ्या कल्पकतेने केली होती. त्यानंतर त्यांनी मद्याचे दुष्परिणाम दाखवणा-या ‘आर्य महिला’ (१९२८) चित्रपटाची निर्मिती केली. त्यामध्ये ललिता पवार नायिका तर भारतमाता थिएटरचे मालक भोपटकर हे नायक होते. त्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी नानासाहेबांचा बालगंधर्व व अच्युत बळवंत कोल्हटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ‘आर्यन कंपनी’चा ‘राजा हरिश्चंद्र’ (१९२८) हा मुख्य नायिका म्हणून भूमिका असलेला ललिता पवार यांचा पहिला मूकपट.

नानांनी ‘मराठ्याची मुलगी’, ‘गनिमी कावा’, ‘उडाणटप्पू’, ‘पतितोद्धार’, ‘पारिजातक’, ‘राजा हरिश्र्चंद्र’, ‘सुभद्राहरण’, ‘भीमसेन’, ‘भवानी तलवार’ अशा चोवीस मूकपटांची निर्मिती व दिग्दर्शन १९२८ ते १९३० या काळात केले. त्यातील सहा मूकपटांची नायिका ललिता पवार होत्या. त्यातील बहुतेक मूकपट चांगले चालले. नानासाहेबांनी बोलपटांचा जमाना चालू झाल्यावर (१९३१) चित्रपट निर्मिती थांबवली.

नानांनी अर्देशीर इराणी यांच्या ‘इंपीरियल कंपनी’चा ‘रुक्मिणीहरण’ (१९३३) हा बोलपट दिग्दर्शित केला. त्यामध्ये डी. बिलिमोरिया, पंडितराव नगरकर, भाऊराव दातार यांनी भूमिका केल्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘देवकी’ या बोलपटात भाऊराव दातार, मिस दुलारी व राजा सॅण्डो यांच्या भूमिका होत्या.

नानासाहेबांनी चित्रपट व्यवसाय हा बिनभरवशाचा धंदा आहे हे ओळखले. त्यांनी १९३६ च्या अनंत चतुर्दशीला लक्ष्मी रोडवरील गणपती चौकाजवळ ‘पूना गेस्ट हाऊस’ची स्थापना केली; नानासाहेबांचा बोलका, मिस्कील स्वभाव, स्वस्त आणि रुचकर अन्नपदार्थ यांमुळे ‘पूना गेस्ट हाऊस’ कलावंत आणि साहित्यिक यांची आवडती मठी बनून गेली.

त्यानंतरही, नानासाहेबांनी १९३८ साली, ‘रविंद्र पिक्चर्स’साठी ‘संत जनाबाई’ व ‘सरस्वती सिनेटोन’साठी ‘भगवा झेंडा’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. भारतीय चित्रपटांच्या इतिहासात पहिला रौप्य महोत्सव साजरा करण्याचा मान ‘सरस्वती सिनेटोन’च्या त्या बोलपटाला जातो. ‘आर्यन’ फिल्मसाठी नानासाहेब ‘श्यामसुंदर’ चित्रपटाची निर्मिती करणार होते. त्यासाठी शांता आपटे, शाहू मोडक, भाऊराव दातार अशा कलाकारांची निवड करण्यात आली होती. तशी जाहिरातही ‘ज्ञानप्रकाश’मध्ये प्रसिद्ध झाली. परंतु त्यांच्या भागीदारांना ती कल्पना रूचली नाही म्हणून त्यांना तो विचार सोडून द्यावा लागला. भालजी पेंढारकरांच्या ‘सरस्वती सिनेटोन’ने तेच कलाकार घेऊन ‘श्यामसुंदर’ यशस्वी करून दाखवला. तो मुंबईच्या वेस्ट एंड (सध्याचे नाज) थिएटरमध्ये सत्तावीस आठवडे चालला.

नानासाहेबांना वाचनाचा नाद होता, साहित्याची आवड होती. त्यांनी ‘चंद्रराव मोरे’, ‘बाजीरावचा बेटा’, ‘उनाड मैना’ ही नाटके लिहिली; ‘मौज’मध्ये परखड लेख लिहिले. त्यांनी शाहू मोडक, ललिता पवार, राजा सॅण्डो, रत्नमाला, भाऊराव दातार, पार्श्वनाथ आळतेकर, डी. बिलिमोरिया आदी कलाकारांना प्रथम संधी दिली. पुण्याच्या आदमबाग रस्त्याला ‘नानासाहेब सरपोतदार पथ’ असे नाव देण्यात आले होते.

नानासाहेबांचा अंत, वयाच्या अवघ्या चव्वेचाळिसाव्या वर्षी मधुमेहाच्या विकाराने, २३ एप्रिल १९४४ रोजी झाला. त्‍यांच्‍या मृत्‍यूनंतर त्‍यांच्‍या पत्‍नी सरस्‍वतीबाई सरपोतदार यांनी 'पुना गेस्‍ट हाऊस'ची जबाबदारी सांभाळली.

नानासाहेबांचा वारसा त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे चालवला आहे. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव बंडोपंत यांनी ‘ताई तेलीण’ या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती केली. दुसरे चिरंजीव चारूदत्त ‘पूना गेस्ट हाऊस’चा कारभार सांभाळतात. विश्वास सरपाेतदार यांनी निर्माता व वितरक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. ते चित्रपट महामंडळाचे अध्यक्षही होते. गजानन सरपोतदार हे चित्रपट निर्मिती, लेखन व दिग्दर्शनही करत. कन्या उषा दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये अध्यापनाचे काम करतात.

नानसाहेब सरपोतदार यांचे वंशज - किशोर सरपोतदार (942 208 0220)

- अरूण पुराणिक

लेखी अभिप्राय

नानासाहेबां विषयी खुप ऐकलेले आहे, प्रत्यक्षात जेष्ठ विनोदी नट कै.वसंत शिन्देनी नानासाहेंबा विषयी कै.विश्वास आणी चारुकाका सरपोतदार यांचे विषयी खुप बोलायचे. नानांचे कोल्हापुरचे ''अन्नपुर्णा" पुण्यातिल "पूना गेस्ट हाउस" ही मराठी कलाकारांची माहेरघरं होती.नानांचा वारसा  चारु आणी बालासाहेबांनी पुढे जपला असेही कै. शिन्दे आवरजुन सांगत.. असेच बोल कै. सुर्यकांत यांचेही होते. चारुकाका त्याच्या सौभाग्वती यांची भेट कलानगर मधे व्हायची तर विश्वास उर्फ बालासाहेब अलका प्रभात व अन्य ठिकाणी होत असे. बालासाहेबांचे चारुकाकांचे विचार फार स्पष्ट असत अगदी समोरा समोर मागे पुढे कांही नसे. नानासाहेंबा विषयी बोलायला मी फार लहान आहे, पण एक निश्चित संपुर्ण सरपोतदार परिवार अगदी आजची पिढी धरुन नानांच्या नातवंडांसह खुप छान गरजुंना मदत करणारी दिलदार आहेत.

Vilas K Pansar…28/12/2016

nanasahebanche junya marathi chitrapatsrushtitil karya vishesh ullekhaniya aahe. Tyanche vanshaj aslelyana pudhil karyasathi shubheccha !

Pragati Ranjit…28/12/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.