ज्ञानेश्वर बोडके - अभिनव प्रयोगशील शेतकरी


भारतीय समाज शेतीकडे ‘डबघाईला आलेला व्यवसाय’ म्हणून पाहत असताना ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतकऱ्यांना शेतीतून प्रत्येकी लक्षावधींचे उत्पन्न मिळवण्याची ‘सिस्टिम’ शोधून काढली आहे! ती यशस्वीपणे राबवली जात आहे. त्यांच्या प्रयत्नाचा परिणाम असा, की त्यांच्याशी जोडले गेलेले महाराष्ट्रातील आणि देशभरातील पंचेचाळीस हजार शेतकरी गेल्या सतरा वर्षांच्या काळात सुस्थित झाले आहेत. सर्वांच्या गाड्या आहेत, सर्वांचे परदेश दौरे झाले आहेत.

ज्ञानेश्वर बोडके हे पुण्यात मुळशी तालुक्यातील हिंजवडी परिसरात राहतात. मुळशी तालुका सगळा भाताचा पट्टा मानला जातो. ज्ञानेश्वर यांचे वडील तेथे परंपरागत पद्धतीने शेती करत. त्यांना शेतीतून वर्षभर पुरेल एवढे पीक मिळत असे. पण फक्त भातावर कुटुंब कसे जगवणार? ज्ञानेश्वर यांच्या घरी कमी फायद्याच्या शेतीमुळे दारिद्र्य नांदे. त्यांची परिस्थिती पायात चप्पल घालता येऊ नये अशी होती. ज्ञानेश्वर यांनी दहावीचे शिक्षण १९८५ साली पूर्ण केले. त्यांनी शेतीत फायदा नाही म्हणून पुण्यात डेक्कन जिमखान्यावर ऑफिस बॉयची नोकरी पत्करली. ते दररोज सायकलवरून मुळशी ते डेक्कन असा बावीस किलोमीटरचा प्रवास करत. त्यांनी बारा वर्षें नोकरी केली. त्यांच्या आयुष्यास कलाटणी मिळाली ती एका बातमीमुळे!

ज्ञानेश्वर यांना वर्तमानपत्रात कोल्हापूरच्या एका यशस्वी शेतकऱ्याची कहाणी वाचण्यास मिळाली. त्या शेतकऱ्याने दहा गुंठे जमिनीत शेती करून बारा लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले होते! ज्ञानेश्वर त्या शेतकऱ्यास जाऊन भेटले. तो फुलांची शेती करत असे. ज्ञानेश्वर त्या शेतकऱ्याचे यश पाहून भारावले. त्यांनी स्वतःच्या शेतीत तोच प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. घरची मंडळी त्यांनी हातची नोकरी घालवल्यामुळे त्यांच्यावर रागावली. वडील घर सोडून मुलीकडे राहण्यास गेले. मात्र ज्ञानेश्वर बधले नाहीत. त्यांनी फुलांची शेती करण्याचा चंग बांधला होता. ते पैशांची जमवाजमव करण्यात गुंतले.

ज्ञानेश्वर यांना शेतीसाठी कर्ज काढताना विचित्र अनुभव आला. शेतीसाठी कर्ज देणारा अधिकारी नकात्मकच बोले. तो ज्ञानेश्वर यांना त्यांच्या माहिती आणि ज्ञान कक्षेबाहेरील प्रश्न विचारे. ज्ञानेश्वर म्हणत, ‘मी तुमच्याकडे फुलांच्या शेतीचा प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहे. तुम्ही मला त्याबाबतचे प्रश्न विचारा’. मात्र ते अधिकारी ऐकत नसत. मग ज्ञानेश्वर त्यांना कोल्हापुरातील त्या शेतकऱ्याची छापून आलेली कहाणी दाखवत. त्यावर अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया असे, “असं कुठं असतं का?”

ज्ञानेश्वर पुण्यातील एच.टी.आय. या शेतीसंबंधातील प्रशिक्षण देणाऱ्या सरकारी संस्थेसोबत १९९८ साली जोडले गेले. त्यांना तेथे काम करता करता शेतीसंबंधातील प्रशिक्षण मिळाले. मात्र तेथे पगार मिळत नसे. ज्ञानेश्वर यांनी त्यांच्याकडे उपलब्ध पुंजीतून वर्षभर घर चालवले. त्यांनी स्वतः शेतीत प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांचे कर्ज मिळवण्याचे प्रयत्न‍ फळास आले. त्यांना शेतीसाठी कॅनरा बँकेकडून दहा लाख रुपयांचे कर्ज मिळाले. त्या दरम्यान, घरच्यांनी त्यांचे लग्न लावून दिले. मग ज्ञानेश्वर आणि त्यांची बायको, दोघे शेतात काम करू लागली. ज्ञानेश्वर यांनी फुलांची हायटेक शेती सुरू केली. त्यांनी पाणी, वीज, खतं आणि मजूर या सगळ्या गोष्टींचा वापर कमीत कमी केला. ज्ञानेश्वर सांगतात, “मी तयार केलेलं ते पुणे परिसरातलं पहिलंवहिलं पॉलिहाऊस होतं.”

ज्ञानेश्वर यांच्या दहा गुंठ्याच्या शेतीला दररोज दोन हजार लिटर पाणी लागे. ज्ञानेश्वर आणि त्यांची पत्नी पूजा सकाळ-संध्याकाळ दोन-दोन तास शेतात काम करत. ते त्या प्रयत्नांतून दररोज दीड हजार रुपये कमावू लागले. ज्ञानेश्वर यांनी शेतीसोबत बाजारपेठेवरही लक्ष केंद्रित केले होते. त्यांनी दिल्लीची बाजारपेठ हेरली. ते स्वतःच्या शेतातील फुले विक्रीसाठी दिल्ली मार्केटमध्ये विमानाने पाठवू लागले. त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळे. त्या जोरावर ज्ञानेश्वर यांनी दहा लाख रुपयांचे कर्ज वर्षभरात फेडले.

ज्ञानेश्वर बोडके यांच्यासंदर्भात कॅनरा बँकेच्या मासिकामध्ये लेख छापून आला. पाठोपाठ, दूरदर्शन वाहिनीवरील 'आमची माती आमची माणसं' या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश्वर यांच्या शेतीसंबंधातील माहिती प्रसारित करण्यात आली. आसपासचे शेतकरी हळुहळू ज्ञानेश्वर यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी येऊ लागले. ज्ञानेश्वरही त्यांना मोकळ्या मनाने मदत करत असत. त्यांनी परिसरातील इतर काही शेतकऱ्यांच्या नर्सरी तयार करून दिल्या; त्यांनी शेतकऱ्यांना फक्त शेती नव्हे. तर बाजाराचेही ज्ञान किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. ज्ञानेश्वर शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज काढण्याची कागदपत्रे कशी तयार करावीत येथपासून विक्रीसाठी पाठवण्याचा माल कसा पॅक करावा इथपर्यंतची माहिती इत्यंभूत देत असत. ज्ञानेश्वर यांनी शेतकऱ्यांना करून दिलेली आखणी इतकी व्यवस्थित असे, की शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज दोन वर्षांत पूर्ण फेडले जाई. मात्र ज्ञानेश्वर यांचे स्वतःच्या शेतीकडे इतरांना मदत करण्याच्या नादात दुर्लक्ष झाले. ते पाहून बँकेच्या अधिकाऱ्यांनी ज्ञानेश्वर यांना शेतकऱ्यांचा ग्रूप तयार करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ज्ञानेश्वर बोडके यांनी १५ ऑगस्ट २००४ रोजी ‘अभिनव फार्मर्स क्लब’ची रचना केली.

तोपर्यंत ज्ञानेश्वर यांच्यासोबत परिसरातील तीनशे पाच शेतकरी जोडले गेले होते. ज्ञानेश्वर यांनी त्यांची शेतीची घडी व्यवस्थित बसवून दिली. परिणामी त्या शेतकऱ्यांना शेतीतून फायदा होऊ लागला. त्या सर्व तीनशेपाच शेतकऱ्यांनी एकाच दिवशी ‘तीनशेपाच मारुती 800’ गाड्या विकत घेतल्या. ‘अभिनव फार्मर्स क्लब’ची प्रगती पाहून इतर शेतकरीही आकर्षित होत गेले आणि ग्रूप सघन होत गेला.

‘अभिनव फार्मर्स क्लब’चे महाराष्ट्र, तेलंगण, आंध्रप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यांमध्ये एकूण दोनशे सत्तावन्न ग्रुप्स तयार झाले आहेत. ‘अभिनव...’चे लोण महाराष्ट्रातील तीस जिल्ह्यांपर्यंत पोचले असून तेथे प्रत्येक जिल्ह्यांत कमीत कमी दोन तर जास्तीत जास्त पंधरा ग्रूप्स आहेत. देशभरातील सर्व ग्रूप्समध्ये‍ मिळून पंचेचाळीस हजार शेतकरी आहेत. आधी फुले, त्यानंतर परदेशी भाजीपाला, मग देशी भाजीपाला असे करत ‘अभिनव...’ ग्रुप सर्व तऱ्हेचा भाजीपाला, फळे आणि धान्य यांचे उत्पादन काढू लागला आहे. ग्रूपकडून केलेली जाणारी शेती पूर्णतः सेंद्रीय पद्धतीने केली जाते. ‘अभिनव फार्मर्स क्लब’ला त्याच्या कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वर सांगतात, की “शेतकऱ्याची दयनीय अवस्था हे पूर्ण वास्तव नाही. पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांना काम न करता फुकट पैसे मिळण्याची वाईट सवय लावली आहे. त्यांना काम द्या आणि त्यानंतर कामाचे पैसे द्या. आमच्यासारख्या शेतकऱ्यांना मजुरांची मोठी अडचण भासते. मात्र लोकांना शेतकऱ्यांकडे काम करण्यास कमीपणा वाटतो. त्यांना सरकारी नोकरीचे अधिक आकर्षण आहे. मला स्वतःला पाच लाख माणसे हवी आहेत. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांना एकशेतीस पत्रे लिहिली आहेत. मी त्यात त्यांना म्हटले, की हवी तर यासाठी सरकारी भरती करा आणि ती माणसे शेतकऱ्यांकडे धाडा. त्यांनी आमच्याकडे सकाळी नऊ ते सहा अशा सरकारी वेळेतच काम करावे. आम्ही त्यांचा पगार देऊ. मात्र मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला अद्याप उत्तर नाही.”

ज्ञानेश्वर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर हरियाणातील कर्नाल येथे शेतीसंदर्भातील एका कार्यक्रमात शेतीविषयक कल्पनांचे बावीस मिनिटे सादरीकरण केले होते. ते मोदी यांना आवडले. त्यांनी त्यांच्या शेतीविषयक संशोधकांना बोडके यांच्या मॉडेलचा वापर करण्यास सुचवले होते.

ज्ञानेश्वर बोडके यांचा मुलगा प्रमोद मॅकेनिकल इंजिनीयर आहे. त्याला मजूरांचे श्रम कमी करणारी यंत्रे तयार करायची आहेत. ज्ञानेश्वर व पूजा यांची मुलगी प्रिया बी.एस्सी. (अॅग्रीकल्चंर)च्या शेवटच्या वर्षाला शिकत आहे. ती आठवड्यातील दोन दिवस कॉलेज करून पाच दिवस शेतात काम करते. तिला ‘प्रयोगशील महिला शेतकरी’ या पुरस्काराने नोव्‍हेंबर २०१६ साली सन्मानित करण्यात आले आहे. ती टेम्पो-ट्रॅक्टर सहजतेने चालवते. मुले शिकलेली असली तरी त्यांचा ओढा शेतीकडे असल्याचे ज्ञानेश्वर सांगतात.

ज्ञानेश्वर निवृत्ती बोडके
अभिनय फार्मर्स क्लब
मु. पो. माण, हिंजवडी आयटी पार्क जवळ,
फेज वन, बोडकेवाडी, तालुका मुळशी, जिल्हा पुणे - ४११ ०५७
९४२२० ०५५६९, abhinavfarmersclub@gmail.com

- किरण क्षीरसागर

लेखी अभिप्राय

माऊलीला(ज्ञानेश्वर)मी 2006 पासून ओळखतो आम्ही दोघे तेव्हापासून शेती नी समूह शेती करत आहोत पण माऊलीने अफलातून काम केले आहे त्याला तोड नाही शेती साठीच्या योजना कशा राबवाव्या ते त्यांच्या कडूनच शिकावे.लय भारी कार्य .माउली शुभेच्छा.

Kalyan Kate.Ph…29/11/2016

Sir,You have done very nice work for the society.I am saluting you.( you showed marketing is very important in agriculture field.)

pawar Rajendra…29/11/2016

मला शेती करायची आहे सल्ला हवा आहे क्रुपया मदत करा

संतोष पावर 29/11/2016

Mast

Shailesh tarle02/12/2016

साहेब मला गुलाब आस्टर बैगलोर शेवंती लिली गाजरा नेवाळी काकडा विदाऊट सेडनेट| मोकळ्या जमीनित करायचे आहे तरी मला फुल शेती विषयी माहिती द्यावी

आंधळे संतोष भागाजी12/12/2016

माहीती वाचली या मागे बोडके सर यांचे कष्ट काय घेतले असतील याची कल्पना करूच शकत नाही सुंदर कार्य हाथी घेतले आहे धन्यवाद

गणेश बाळाराम भगत 23/02/2017

सर मला शेती फायदायची करायची आहे.

पंकज वसंतराव क…23/02/2017

कृपया गृप विषयी माहिती द्यावी (जिल्हा नाशिक)
गृप join करण्यासाठी काय करावे लागेल

gorakh aher 29/01/2018

Hii sir ,

Mala agricultural project karaychay please gide me 8600223602

Ganesh mahajan04/02/2018

मला पण शेती करायची आहे मार्गदर्शन हवे आहे ते कुठे मिळेल

Ghuge Sanjay Sukdev 23/02/2018

मी शेती करतो पण मला विष मुक्त शेती करायची आहे मार्गदर्शन करावे ही विनंती

sunil vishnu d…16/03/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.