रवी गावंडे - अवलिया ग्रामसेवक


रवी गावंडे हा माणूस अफलातून आहे. ते रूढार्थाने ग्रामसेवक नाहीत. मात्र त्यांनी स्वीकारलेली जबाबदारी तीच आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्‍या नेर तालुक्‍यातील त्यांच्या पाथ्रड गावात शेती आणि पाणी व्यवस्थापन यांच्या संदर्भात 'आदर्श ग्रामविकास' योजनेअंतर्गत 2012 सालापासून काम करत आहेत. ते काम जेवढे विशेष वाटते, तेवढाच रवी गावंडे यांचा जीवनप्रवास सुद्धा!

रवी गावंडे यांनी आयुष्याची बारा वर्षे वर्ध्याच्या ‘सेवाग्राम’मध्ये दिली. ‘सेवाग्राम’ हा गांधी आश्रम. गावंडे 2002 साली ‘सेवाग्राम’मध्ये दाखल झाले. त्यावेळी त्यांचे वय होते चोवीस वर्षे! गावंडे तेथील ‘निवेदिता निलयम युवा केंद्र, साटोडा’चे अविभाज्य भाग होऊन गेले. त्यांच्यावर विनोबांच्या विचारसरणीचा प्रभाव मोठा पडला. त्यांनी स्वतःला प्रविणाताई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गीताई आणि गीता प्रवचन यांचा प्रसार आणि प्रचार यांसाठी वाहून घेतले. त्यांनी भारतभरातील वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांचा अभ्यास करण्यासाठी यात्रा 2009 साली केली. त्यात त्यांना एका अमराठी साथीदाराची सोबत लाभली. त्यादरम्यान त्यांच्या गावाची 'आदर्श ग्रामविकास' योजनेअंतर्गत निवड झाली आणि गावंडे गावाचा विकास साधण्या‍चा हेतू मनात ठेऊन पाथ्रड गावी परतले.

रवी गावंडे ग्रामविकास योजनेअंतर्गत काम करतील असा निर्णय पाथ्रड ग्रामसभेत घेण्याात आला आणि त्या योजनेवर गावातर्फे गावंडे यांची नेमणूक झाली. गावंडे यांची कार्यदृष्टी अशी, की ते जेथे काम करणार तो परिसर, तो जिल्हा त्यांच्या माहितीचा असायला हवा या विचारातून गावंडे यांनी यवतमाळ जिल्ह्याचा दौरा सायकलवरून केला. त्यांना त्याकरता तीन महिने लागले. त्यांनी प्रत्येक तालुक्यात पाच दिवस मुक्काम केला. त्यानंतर रवी परिसराच्या नव्या आकलनासह गावी परतले.

गावंडे ग्रामविकास योजनेअंतर्गत गावासाठी झटत आहेतच. मात्र तरीही त्यांचा स्वतःचा शोध काही थांबलेला नाही. ते एकेचाळीस वर्षांचे आहेत. त्यांनी लग्न केले नाही. ते करणारही नाहीत. त्यांच्या घरात आई, वडील, भाऊ आणि भावाचे कुटुंब अशी मंडळी आहेत. गावंडे म्हणतात, की मला घर सोडून बाहेर कुटीमध्ये (झोपडी) राहावेसे वाटते. कारण घरात कुटुंबासोबत राहताना सामाजिक कार्य करण्यावर मर्यादा येतात. तसा प्रयत्न गावंडे यांनी करून पाहिलादेखील. त्यांनी गावात कुटी उभारली. मात्र त्यात काही कायदेशीर अडचणी आल्या. ती कुटी त्यांना तोडावी लागली. गावंडे पुन्हा एकदा कुटी उभारण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांना तेथे राहून गावासाठी काम करण्याची इच्छा आहे. तसेच तेथे कुटिरोद्योग, खादीप्रचार असे काही उद्योग सुरू करावेत अशी त्यांची मनीषा आहे.

रवी गावंडे - 88 06 938584

- किरण क्षीरसागर

लेखी अभिप्राय

रवि.गावंडे.साहेब.हेअभिनंदनास.पातृ.आहेत.सामाजिक.कायॅ. मोलाचेआहे.संपूणॅ.आयूष.समाजासाठि.खचीकेलेआहे..पूढील.कायासाठि.हादि क.शुभेच्छा.

सौनंदाभगत30/09/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.