प्रकाश होळकरची निसर्गप्रतिभा


प्रसिद्ध कवी प्रकाश होळकर हे नाशिक जिल्ह्याच्या निफाड तालुक्यातील लासलगावचे. त्यांची लासलगावला त्यांच्या राहत्या घरी भेट घेतली, तेव्हा ते व्यग्र होते ते त्यांच्या गाईला औषधोपचार करण्यात. होळकर मूळ आहेत शेतकरी. त्यांच्या चेहऱ्यावर गाईच्या प्रकृतीची काळजी दिसत होती. त्यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेती हेच आहे व त्यांनी शेतीत अनेक प्रयोग केले आहेत. त्यांची शेती दहा एकर आहे.

होळकरांचा जन्म ५ मे १९६३ चा. त्यांचे बी.ए.पर्यंतचे शिक्षण लासलगावलाच झाले.  त्यांनी एम.ए. नाशिकमधून केले. घरात साहित्यिक वारसा जरी नसला तरी कुटुंबावर लोकसंस्कृतीचा प्रभाव होता. त्यांच्या पत्नी एम. ए. (इंग्रजी) आहेत. त्या  घर सांभाळून होळकरांना शेती व्यवसायात सहकार्य करतात. त्यांनाही साहित्याची जाण व आवड आहे. मुलगी सृष्टी दहावीमध्ये व मुलगा सृजन नववीमध्ये शिकत असून दोघेही  मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत.

ते शेतीत प्रामुख्याने कांदा, मका व सोयाबीन ही पिके घेत असतात. त्यांनी मक्याचे विक्रमी उत्पादन घेतलेले आहे. ते कुक्कुटपालन व पशुपालन हेदेखील पूरक व्यवसाय म्हणून करत असतात. कुक्कुटपालनासाठी त्यांच्याकडे पंधराशे कोंबड्या होत्या. ते तो व्यवसाय नवीन तंत्रज्ञान वापरून करत असत. कुक्कुटपालन यशस्वीही झाले होते. पण कांद्याच्या खळ्यामुळे व तेथे वावरणाऱ्या मजुरांमुळे कोंबड्या रोगाला बळी पडू लागल्या, म्हणून तो फायदेशीर व्यवसाय त्यांना बंद करावा लागला. सध्या त्यांच्या डेअरीमध्ये नऊ जर्सी, कंधार व गिर जातीच्या गाई आहेत. त्यात दोन संकरीत गाई आहेत. त्यांचा तो व्यवसायही चांगला नफा मिळवून देतो.

प्रकाश होळकर हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. मात्र विशेष करून ते कवी म्हणून ओळखले  जातात. त्यांनी अनेक कवी संमेलनांत सहभाग घेतलेला आहे. प्रथम त्यांनी लोकगीताच्या अंगाने लेखन केले. त्याचे कौतुक झाल्याने ते त्याच पद्धतीने लिखाण करत राहिले. अर्थात तो प्रारंभीचा काळ होता. नंतर त्यांना त्यांची वाट सापडत गेली. ज्येष्ठ लेखकांनीही त्यांना अवतीभवतीच्या वास्तवाकडे बघण्याचे भान दिले व त्यातूनच केवळ  स्वैर कल्पनाविलास व मुक्त भावनाविष्कार यांना प्राधान्य देणारे लेखन न करता त्यांनी भोवतलाकडे नजर वळवली व ती जाणीव कवितेतून व्यक्त होऊ लागली.

त्यांची निमंत्रित कवी म्हणून निवड १९९० मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’त प्रथमच कविता वाचण्यासाठी नीरजा, महेश केळुस्कर आदी कवींबरोबर झाली. तेव्हापासून त्यांना अनेक कवी संमेलनांत सहभागी होण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. त्यांना ‘साहित्य अकादमी’मार्फतही काही कवी संमेलनांत सहभागी करून घेण्यात आले.

त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी ‘साहित्य परिषदे’च्या ‘लासलगाव’ शाखेची स्थापना केली. त्यासाठी त्यांना मुख्यत: विजय काचरे यांचे सहाय्य लाभले. शकुंतला परांजपे, अ. ना. कुलकर्णी यांचेही सहकार्य मिळाले. त्यांनी त्या शाखेमार्फत वेळोवेळी व्याख्याने व कवी संमेलने आयोजित केली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांनी लासलगावला मराठी कवी व इतर भाषिक कवी यांची ‘कवी संमेलने’ ‘साहित्य अकादमी’ उपक्रमांतर्गत घेतले; तसेच, नवकवी कार्यशाळा घेतली. त्यांनी सौमित्र, श्रीधर तिळवे, दासू वैद्य व प्रफुल्ल शिलेदार यांच्या समवेत बाहेरच्या राज्यांमध्ये देखील वीस ठिकाणी कवितावाचनाचे कार्यक्रम केले.

त्यांची ‘वाकल्या झाडाचा पाचोळा भुईला फाटल्या भुईचा आधार राईला’ ही पहिली लोकगीतासारखी कविता ‘अनुष्टुभ’ या अंकात १९८४-८५ मध्ये प्रसिद्ध झाली. प्रकाश होळकरांची ‘कोरडे नक्षत्र’ (काव्यसंग्रह), ‘मृगाच्या कविता’ (काव्यसंग्रह), ‘रानगंधाचे गारुड’ (महानोर यांच्या पत्रसंग्रहावर आधारित ग्रंथ) ही पुस्तके प्रसिद्ध झालेली आहेत. त्यांचा ‘कोरडे नक्षत्र’ हा पहिला कवितासंग्रह पॉप्युलर प्रकाशनाने प्रसिद्ध केला. त्यांच्या ‘रानगंधाचे गारुड’ या ग्रंथाला भा.ल.भोळे यांची प्रस्तावना लाभली आहे.

त्यांनी ‘सर्जेराजा’ या ग्रामीण कथानक असलेल्या मराठी चित्रपटासाठी प्रथमच गीतलेखन केले. त्या चित्रपटाच्या गीतांना उत्कृष्ट गीतलेखनाचा ‘गदिमा’ हा पुरस्कार २००० मध्ये मिळाला. गीतलेखक म्हणून त्यांच्याकडे या चित्रपटामुळे चित्रपट निर्मात्यांचे लक्ष वेधले गेले व त्यांना ‘टिंग्या’ या चित्रपटाचे गीतलेखनाचे काम मिळाले. ‘टिंग्या’ या चित्रपटाच्या गीतलेखनास २००८ मध्ये ‘गदिमा’ पुरस्कार; तसेच, ‘महाराष्ट्र शासना’चा ‘राज्य’ पुरस्कार व ‘व्ही शांताराम’ नामांकन मिळाले. त्यानंतर आलेल्या ‘बाबू बेंडबाजा’ या चित्रपटाच्या गीतलेखनासही २०११ मध्ये पुन्हा ‘गदिमा’ व ‘राज्य’ पुरस्कार मिळाले. त्याच चित्रपटाच्या गीतलेखनास म.टा. सन्मान, मिर्ची रेडिओ पुरस्कार, फिल्म फेअर अॅवॉर्ड असे बहुमान मिळाले. शिवाय, सह्याद्री या दूरदर्शन वाहिनीची नामांकनेही मिळाली. त्यांना ‘टपाल’ या मराठी चित्रपटाच्या गीतलेखनासही ‘राज्य’ पुरस्कार प्राप्त झाला. त्याशिवाय त्यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘चिनू’, ‘प्रियतमा’ अशा वीस चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. त्यांना लेखक व साहित्यिक विजय तेंडुलकर, ना.धों. महानोर यांच्याकडून कौतुकाची थाप मिळाली. पाडगावकर, सुर्वे अशा दिग्गज कवींचा त्यांना सहवास मिळाला. त्यांनी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’वर नऊ वर्षें काम केले आहे.

लासलगावसारख्या छोट्या गावात व शेतीसारख्या व्यवसायात राहूनही प्रकाश होळकरांची साहित्यिक कामगिरी प्रशंसनीय आहे. त्यांनी साहित्यिक वर्तुळाबाहेर राहूनही, साहित्य-व्यवहार गांभीर्याने घेतल्याचे ते द्योतक आहे. त्यांची वाटचाल ना.धों. महानोर यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालू आहे असेच म्हटले जाते.

सरोज जोशी स्वत: कवयत्री आहेत. त्यांनी समकालीन कवींच्या कवितांचा अभ्यास केलेला आहे. त्या म्हणतात – प्रकाश होळकरच्या कवितेतून शेताचा स्वर स्पष्टपणे ऐकू येतो. त्याने एम.ए. पर्यंत शिकूनदेखील नोकरीधंदा न करता, पिढीजात शेतीचा व्यवसाय सुरू केला आहे, कारण त्याला त्याच्या मातीची ओढ आहे. प्रकाशच्या लासलगावचा निसर्ग रुखासुखा असल्यामुळे पावसाचे नक्षत्र कोरडे गेले, की शेतीची धुळदाण होते. सर्व भिस्त पावसावर. कोरडवाहू शेतीचा उदासीन पसारा प्रकाशला घेरू लागला. ओलीताची जमीन आणि बागायती पिके कमी झाल्यामुळे अभयारण्याकडे जाणरे करकोचे लासलगावला नुक्काम न करता गोदावरीच्या तीराला वेगाने जाऊ लागले, तेव्हा प्रकाशच्या तोंडून सहजोद्गार आले, ‘मी उधळून देतो नभाला पाचूच्या ओंजळीत.’

मनात दाटलेली करूणा शब्दरूप झाली. कवितेतून व्यक्त होणारा कवी व कवीचे लौकीक जीवन यांत काहीच अंतर उरले नाही. प्रकाशची कविता नुसती पारदर्शी व बोलघेवडी नाही, तर परिसरासाठी सक्रिय होण्याचा प्रकाशचा विचार आहे.

प्रकाशची व्यथा ही वैयक्तिक व्यथा नाही, तर सर्वच शेतकऱ्यांच्या व्यथेचा जाहीर उच्चार प्रकाशच्या काव्यात होतो. ‘कविता विसाव्या शतकाची’ (संपादक प्र.ना. परांजपे, शांता शेळके, वसंत आबाजी डहाके व नीलिमा गुंडी) या संग्रहात प्रकाशच्या कवितेचा समावेश झाला आहे.

ग्रामीण भाषेबाबत मोटेच्या गाण्यात वापरली जाणारी लय आणि तुटणाऱ्या आतड्यांचा चित्कार यामुळे प्रकाशची कविता वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. प्रकाशच्या कवितेत चघलचावळ्या पोरी भिजपावसाची गाणी गात रानोमाळ भटकू लागल्यामुळे त्याच्या ‘कोरडे नक्षत्र’मधील कविता एकसुरी, एकरेषीय झालेल्या नाहीत.

- अनुराधा काळे

लेखी अभिप्राय

त्यांना अनेकदा सा वा ना मध्ये एैकले आहे .
रसिकांच्या मनाची चांगलीच पकड घेतात हे अनुभवले आहे.प्रकाशाच्या वाटा अशाच ऊजळून निघोत .हीच शुभेच्छा

अशोक पाटील नासिक22/08/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.