श्रीकाळभैरव जोगेश्वरी

प्रतिनिधी 27/06/2016

श्री कालभैरव आणि त्याच्या बगलेत श्रीजोगेश्वरी अशी मुख्य मूर्ती आमच्या घरात कुलस्वामी/कुलस्वामिनी म्हणून इतर मूर्तींबरोबर पूजेत आहे. ती कुलपरंपरा आहे. मूर्ती गेल्या पाच-सहा पिढ्यांपासून पूजेत आहे.

साधारणत:, काळभैरवाची आणि जोगेश्वरीची स्थाने स्वतंत्र आहेत, पण आमची मूर्ती पाहून माझे कुतूहल जागे झाले. पुण्यातच मला माहीत असलेल्या दोन देवस्थानांत व पुणे जिल्ह्यात, विशेषत: मावळात (वडगाव) तसेच श्रीक्षेत्र हरीहरेश्वर येथे ‘काळभैरव-जोगेश्वरी’ची मूर्ती आहे. आमचे मूळ गाव कसबा देवपाट (संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी) येथे परिस्थिती थोडी वेगळी आहे. तेथे काळभैरवाच्या डाव्या बाजूला ऋद्धी-सिद्धी असून अगदी डाव्या कोपऱ्यात बहिरी (भैरीभवानी) आहे. भैरवाची बायको ती मैखी-बहिरी-भैरी असावी. शंकराच्या बऱ्याचशा देवळांत किंवा परिसरात भैरवाचे किंवा मारुतीचे देवालय ‘क्षेत्रपाळ’ म्हणून असते (तसे ते काशीस आहे) तर काही ठिकाणी, भैरवाचे स्थान स्मशानभूमीतही आढळते ते तांत्रिक पंथ परंपरेमुळे असावे.

‘श्री योगेश्वरीदेवी नित्य स्मरण’ या नावाची पोथी माझे ज्येष्ठ स्नेही अच्युतराव जोगळेकर यांनी संपादित केली आहे. शंकराच्या तेजापासून निघालेली शक्ती म्हणजे ‘योगेश्वरी’ व ती पार्वतीच्या शक्तिअंशाने उत्पन्न झाल्यानंतर जगाला प्रकाशभूत होणाऱ्या आणि सर्व देवी-देवतांमध्ये अंतर्भूत असणाऱ्या पंचभौतिक परमाणूयुक्त चैतन्यशक्तीला ‘योगिनी’ असे म्हणतात. वसुधा परांजपे त्या पोथीच्या प्रस्तावनेत म्हणतात, की  ‘योगी लोकांची ईश्वरी ती योगेश्वरी.’ इतिहासकार व व्युत्पत्तीकार कै. वि.का. राजवाडे योगेश्वरी व जोगेश्वरी ही देवता एकच असून स्थल, काल, उपयोग यामुळे ते शब्दपरिवर्तन झाले असे सांगतात.

कोकणात बऱ्याच ठिकाणी योगेश्वरी अगर जोगेश्वरीची (बहिरी/भैरी भवानी) स्थाने आहेत. अडिवऱ्याला शके १२०० पावेतो योगेश्वरीचे देऊळ होते असा खुलासा ना.गो. चापेकर यांच्या पुस्तकात आहे. दुर्दैवाने त्या बाबींचा खुलासा तेथील सेवक मंडळींना करता आला नाही. जोगेश्वरी व योगेश्वरी ही देवता एकच असून उच्चार मात्र वेगवेगळा आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे ओक यांचे ‘पेशवे घराण्याचा इतिहास’ पान नंबर ४०/४१ पाहवे.

योगेश्वरीच्या बाबतीत सौ. मुळावकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात पुढील ओवी आहे.

‘भरल्या गं बाजारात | नाही काही देणं घेणं |
जोगाबाई माय माझी-तुझ्यासाठी केलं येणं ||

‘श्री दुर्गासप्तशती कथासार’ या अंजली प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात पान ६०/६१वर ‘मूर्तिरहस्य’ यामध्ये रक्तदंती/रक्तचामुंडा/योगेश्वरी या देवता एकच आहेत असे स्पष्ट केले आहे. तसेच, ‘श्री श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथा’त त्रिपुरभैरवीचे नाव आहे. ती भैरवी अथवा योगिनी असावी. तंत्रशास्त्रात त्या देवीचे महात्म्य आहे.

श्रीकालभैरव (क्षेत्रपाल) : श्री. चापेकर यांच्या प्रतिपादनानुसार काळभैरव ही देवता मुख्य नसून उपदैवत (गौण) आहे. ते खरे असावे कारण श्री शंकराने व पार्वतीने कालानुसार, कार्यानुसार जे अवतार घेतले त्यात भैरव, योगेश्वरी, खंडोबा, तुळजाभवानी, एकविरा, यमाई या देवता येतात.

कालभैरवाच्या अवताराची सर्वांत प्रसिद्ध कथा म्हणजे ब्रह्मदेवाने शंकराची निंदा केली व त्याला शासन करण्यासाठी त्याच्या स्वत:च्या अंगापासून क्रोधपुरुष निर्माण केला. त्याने ब्रह्मदेवाचे पाचवे डोके नखाने कापले, त्याला ब्रह्महत्येचा शाप मिळाला व काशीमध्ये जाऊन पापमुक्ती असा उ:शाप मिळाला. नंतर तो काशीचा कोतवाल (क्षेत्रपाल) म्हणून राहू लागला. काशियात्रेची सांगता त्याच्या दर्शनाशिवाय पूर्ण होत नाही. त्याचे वाहन कुत्रा किंवा मोर असून त्याचे सर्व पूजा-उपचार प्रदक्षिणेखेरीज श्री शंकरासारखे आहेत. त्याला प्रदक्षिणा पूर्ण आहे.

काळभैरवाच्या उत्पत्तीची दुसरी कथा आपद राक्षसाशी संबंधित आहे. तो रावणासारखा होता. त्याच्या पापाचा घडा भरल्यावर शंकराने आधी दिलेल्या वरानुसार सर्व देवदेवतांच्या तेजामधून एक बालभैरव (बटुकभैरव) उत्पन्न केला व त्याच्या करवी त्याचा वध केला. एकदा शंकर पार्वती एकांतात असताना काळभैरव पहारा देत होता, पण त्याने पार्वतीकडे विषयीदृष्टीने पाहिले. पार्वतीने त्याला तू मनुष्ययोनीत अवतार घेशील असा शाप दिला. तो पृथ्वीवर ‘वेताळ’ या नावाने अवतीर्ण झाला!

वराह कल्पान्तात शतघ्न दैत्याचा वध करण्यासाठी शंकराने अतिउग्र रूप घेतले तेच काळभैरव होय असेही म्हणतात. शतघ्नाचा वध करण्यासाठी काळभैरवास योगमायेचे (जोगेश्वरी) स्मरण करावे लागले. तीच जोगेश्वरी त्याच्या डावीकडे आहे अशी कथा ‘श्रीहरिहरेश्वर कथा’ या पुस्तकात आहे. कापालिकपंथ (तांत्रिक-मांत्रिक) काळभैरवाचे एकूण चौसष्ट अवतार असून त्याची आनंदभैरव, बटुकभैरव, रुरुभैरव इत्यादी नावे ज्ञात आहेत. त्या सर्व अवतारांत कालभैरव हा मुख्य व श्रेष्ठ आहे. तसेच, तो भूत, पिशाच्च इत्यादी शक्तींना नियंत्रित करतो अशी श्रद्धा आहे. पुण्यामध्ये श्री मयुरेशशास्त्री थिटे यांनी ‘काळभैरव महात्म्य’ नावाची त्यांच्या घरी असलेली पोथी प्रकाशित केली होती. उत्तर भारतात त्याचे महात्म्य पुष्कळ आहे. नित्यपूजेमध्ये व महाकार्यातही कालभैरवाची अनुज्ञा घ्यावी लागते.

ही दैवते सर्वथा पूजनीय मानली जातात.

- रविराज फाटक

(आदिमाता मासिक मे २०१६ वरून उद्धृत)

Last Updated On - 13th FEB 2017

लेखी अभिप्राय

Sir, aamche mulgav kirbat aahe aani kuldevta bhairi bhavani aahe aapnaskadun kahi ajun mahiti milu shakel ka kuldevta aani taak baddal.

Swati mestry25/06/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.