कुरूंदवाड संस्थान

प्रतिनिधी 15/10/2015

पटवर्धन घराणे पेशवाईत प्रसिध्दी पावले. त्यांचा मूळ पुरूष हरिभट. त्यांचा मुलगा त्र्यंबकराव. त्यांना दोन मुलगे -निळकंठराव आणि कोन्हेरराव. ते दोघे पराक्रमी होते अशी इतिहासात नोंद आहे. त्यांनी घोडनदी, मोतीतलाव व सावशी या लढायांमध्ये पराक्रम गाजवला. मात्र ते दोघे शेवटच्या लढाईत कामी आले.

पटवर्धन घराण्याच्या मिरज, सांगली, तासगाव, जमखंडी, मिरजमळा, बुधगाव अशा शाखा होत्या. पटवर्धन घराण्यातही पुढे फाटाफूट झाली आणि मोठी पाती व धाकटी पाती तयार झाली. मोठ्या पातीची राजधानी कुरूंदवाड येथे होती, तर धाकट्या पातीची माधवपुर-वडगाव (बेळगाव जिल्हा). स्वातंत्र्यानंतर, पुढे ही संस्थाने मुंबई राज्यात विलिन झाली.

कोकणातील इतर गावच्या पटवर्धन घराण्यापेक्षा कोतवडेकर पटवर्धन घराणे विस्तीर्ण व शूर मानले जाते.

हरिभटबाबाचे तिसरे पुत्र त्रिंबकराव यांचा वंश म्हणजे कुरुंदवाड घराणे

त्रिंबकरावांचे दोन पुत्र निळकंठराव व कोन्हेरराव

निळकंठराव यांचे पुत्र रघुनाथराव व कोन्हेररावांचे पुत्र गणपतराव यांच्यामध्ये कुरुंदवाडचा सरंजाम समान वाटला गेला. रघुनाथभट यांना कुरुंदवाडकर तर त्यांचे कनिष्ठ बंधू शिवराय हे वाडीस राहत म्हणून त्यांना वाडीकर म्हणतात.

गणपतराव कागवाडास राहू लागले. त्यामुळे त्यांना कागवाडकर म्हणतात.

रघुनाथभटांच्या वंशातील बाजीपंत पटवर्धन हे सातारा रोड स्टेशनास लागून असलेल्या डोंगरी(नांदगीर) किल्ल्याचे किल्लेदार होते.

कोतवडे हे कोकणातील रत्नागिरीपासून अंदाजे अकरा मैल गाव आहे. पटवर्धन घराण्यातील पहिले हरिभट पटवर्धन यांनी तेथील खोत सहस्त्रबुद्धे यांच्या उपाध्येपणाची वृत्ती संपादून ते कोतवडे गावीच राहिले.

भास्कर हरी हा हरिभटबाबांचा सर्वात लहान पुत्र. तो बाबांचा लाडका होता. बाबांच्या आज्ञेवरून तो श्रीमंतांची चाकरी करू लागला. भास्कर हरी यांनी कागवाड हे गाव विश्रांतीचे ठिकाण केले. पाण्याच्या सोयीकरता मोठी विहीर खणली. फुलझाडे लावली. कागवाडपासून एक-दीड मैल असलेल्या कृष्णाकाठी घाट बांधला. घाटावर दगडी देवालय बांधले. त्यामध्ये आपल्या आजोबांच्या (बाळंभट) नावे ‘बाळेश्वर’ या नावाची लिंगस्थापना केली.

तासगावकर परशुरामभाऊ यांच्याकडून देवास अभिषेक, पूजन वगैरे क्रम चालू झाला.

गोविंदपत (श्रीमंत पेशवे) यांच्या दरबारी सेवेसाठी होते.

कापशीकर राणोजी घोरपडे यांच्याकडून कुरुंदवाड हा गाव त्रिंबक हरी यांच्याकडे गहाण (कर्जासाठी) ठेवला गेला होता.

‘हरिपूर’ हे सांगलीजवळ असलेले गाव. हरिभटबाबांचे स्मरण चिरकाल राहण्यासाठी श्रीमंत पेशव्यांनी गोविंद हरी यांच्या नावे कृष्णा व वारणा या नद्यांच्या संगमाजवळील जमीन दिली. त्यांनी हे हरिपूर गाव वसवले. ( त्यांचे पुत्र गंगाधरराव गोविंद ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन)

चिमाजीअप्पा यांच्या दरबारी रामचंद्रपंत सेवेसाठी होते. १७३९ साली श्रीमंत चिमाजी अप्पांनी वसईवर स्वारी केली. या स्वारीत रामचंद्र हरी यांनी मोठ्या शौर्याने किल्ल्यात शिरून, किल्ल्यावर पेशव्यांचे निशाण लावले.

हरिभटबाबांचे पहिले पुत्र कृष्णभटबापा याचे वंशज मंगळवेढे आंबे व जमखिंडी येथे आहेत.

द्वितीय चिरंजीव बाळंभटआण्णा यांचे पुत्र ‘मोरोबा आबा’

गोविंद हरी यांचे पुत्र गोपाळराव

हरिभटबाबा यांचे तृतीय त्रिंबकपंत आप्पा हे प्रथम अक्कलकोटकर भोसले यांच्या पदरी होते. ते पुढे १७३६ साली कुरुंदवाड येथे राहू लागले. १७५० पर्यंत हरिटबाबांचे सर्व पुत्र कुरुंदवाडी येथे राहत होते.

तासगावचे भाऊसाहेब पटवर्धन

पटवर्धन अलिकडे प्रसिद्धीस आले ते त्यांच्यापैकी भाग्यश्री सिनेनटी झाली तेव्हा, पण ती सांगलीच्या पटवर्धनांपैकी.

पटवर्धन घराण्याचे सध्याचे वंशज अण्णासाहेब पटवर्धन हे पुण्यात निवास करतात. भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संपर्क केला, पण त्यांच्याकडून माहिती उपलब्ध झाली नाही. राजमाता विजयादेवी पटवर्धन (राणीसाहेब) त्यांच्या राजघराण्यावर दोन पुस्तके लिहित आहेत. त्यांच्याकडूनही या घाटाविषयी माहिती उपलब्ध झाली नाही.

आधार : लेखासाठी माहिती कुरुंदवाडचे ज्येष्ट नागरिक सुधाकर लठ्ठे (गुरूजी), कुरुंदवाड नगरपालिका अभियंता आर.बी.गवळी, पाणीपुरवठा विभाग प्रमुख ए.के.शेडबाळे, कुरुंदवाड नगर वाचनालयातील शहर विषयाच्या कात्रण फाईल्स, काही ग्रंथ, तसेच इंटरनेटवरील वेबसाईटस् इत्यादींच्या आधारे संकलित करण्यात आली आहे.

संस्थानिक पटवर्धन घराण्याचा इतिहास
लेखक व प्रकाशक : गोविंद विनायक आपटे.

लेखी अभिप्राय

खुपच छान माहिती मिळाली.

राजेंद्र भूपाल कडाळे04/12/2018

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.