रोहिडा ऊर्फ विचित्रगड - शिवकाळाचा साक्षीदार


सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा सुरेख डोंगरमार्ग आहे. त्‍या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीड खो-यामध्‍ये हिरडस मावळात ‘किल्ले रोहीडा’ वसलेला आहे. रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खो-यात वसलेले आहे. त्‍या खो-यात बेचाळीस गावे होती. त्यापैकी एकेचाळीस गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहिडा किल्ला हे रोहिड खो-याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे, सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दूधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोचल्या आहेत.

रोहिडा किल्ल्याला ‘विचित्रगड‘ किंवा ‘बिनीचा किल्ला‘ असे देखील संबोधले जाते. तो किल्‍ला भोरच्‍या दक्षिणेस आठ किलोमीटर अंतरावर स्थित आहे. भोर तालुक्‍याजवळ बाजारवाडी नावाचे गाव आहे. त्‍या गावातून रोहिडा किल्‍ल्यापर्यंत वाट जाते. पूर्वीच्‍या काळी गडाचा बाजार या वाडीमध्‍ये भरत असे. आज तालुक्‍यांना असलेले महत्त्व पूर्वीच्‍या काळी गडाखालच्‍या बाजारवाडीसारख्‍या गावांना होते. अनेक ठिकाणी या गावांचा उल्‍लेख 'पेठ' म्‍हणून केला जातो.

भोर तालुक्यातील हिरडस मावळ तेथील डोंगर आणि गड-किल्‍ल्यांप्रमाणे त्‍या परिसरातील ऐतिहासिक व्‍यक्तिमत्त्वे आणि घराणी यांच्‍यासाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्‍म याच परिसरातला! तर जेधे, बांदल, कंक, मालुसरेसारखी नामांकित लढाऊ घराणीसुद्धा याच भागातली!

रोहिडा किल्‍ला समुद्रसपाटीपासून तीन हजार सहाशे साठ फूट उंचीवर आहे. गडावर जाण्‍यासाठी खडी चढाई करून जावे लागते. गडावर पोचण्‍यासाठी सुमारे दीड तास लागतात. त्‍यानंतर गडमाथ्यावर जाणा-या मार्गात तीन दरवाजे लागतात. गडावरील तिन्‍ही दरवाजांची रचना परस्‍परांशी काटकोनात आहे. यापैकी पहिला दरवाजा हा गोमुख पद्धतीचा असून त्यावर गणेशपट्टी आहे. ते द्वार साध्‍या बांधणीचे आहे. त्‍या दरवाजानंतर पहारेक-यांच्या देवड्या दिसतात. दुसरा दरवाजादेखील गोमुख पद्धतीचा असून त्यावर दोन्ही बाजूला काल्पनिक पशू शरभाचे चित्र कोरलेले दिसून येते. तो दरवाजा आलांडून पुढे जाताच उजव्या बाजूला भूमिगत पाण्याचे टाके दिसून येते. पाणी भूपृष्‍ठाखाली असल्‍याने ते उन्‍हामुळे तापत नाही. त्‍यातील पाणी पिण्‍यायोग्‍य आहे. पाण्‍याच्‍या टाक्‍याशेजारी गणेशाची मूर्ती आढळते.

गडावरील तिसरा, मुहम्मद आदिलशाहच्या कालावधीत बांधलेला दरवाजा विशेष सुंदर आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस बसण्यासाठी ओटे आहेत. कमानीच्या दोन्ही अंगास उमलती कमळे, मत्स्य आकृती व कमानीबाहेर दोन्‍ही बाजूस कोरलेले हत्तींचे शीर असा तो सुरेख दरवाजा आहे. तेथे देवनागरी आणि फारसी भाषेत कोरलेले शिलालेख दिसून येतात. ज्‍येष्‍ठ इतिहास संशोधक डॉ. ग. ह. खरे यांनी त्या फारसी शिलालेखाचे वाचन केले आहे. ‘हा दरवाजा मुहम्मद अदिलशहाच्या कारकीर्दीत सु. १०१६ दुर्मुख संवत्सर, शके १५७८, चैत्र ते ज्येष्ठ शु. १० (म्हणजेच १६ मार्च ते २३ मे १६५६) या कालावधीत बांधला आहे. या वेळी रोहिड्याचा हवालदार विठ्ठल मुदगलराव हा होता.’ असा मजकूर शिलालेखावर लिहिलेला आढळतो. ‘बुरहाने मासीर’ या फारसी ग्रंथात बुरहान निजामशहा याने जिंकून घेतलेल्या अठ्ठावन्‍न किल्ल्यांच्या यादीत रोहिड्याचा उल्लेख आला आहे. शिलालेखावरून मे १६५६ नंतर रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. त्‍यात कृष्णाजी बांदल मारला गेला. त्‍यावेळेस बाजीप्रभू देशपांडे हे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहका-यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. पुढे तो किल्ला मोगलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे रोहिडा किल्ला भोरकरांकडे होता.

तिसरा दरवाजा मागे टाकल्‍यानंतर गडावरील महत्त्वाची वास्तू असलेल्या सदरेवर पाचता येते. त्‍या सदरेमागेच किल्लेदाराच्या वाड्याचे अवशेष पाहण्‍यास मिळतात.

गडमाथ्‍यावर पोचल्यानंतर गडाचे आराध्‍यदैवत रोहीडमल्‍ल अर्थात भैरोबाचे मंदिर दिसते. मंदिराच्या समोर छोटे तळे आहे. तळ्याच्या बाजूला दगडी दीपमाळ आणि अवतीभोवती चौकोनी थडगी दिसतात. देवळात शिवलिंगाच्‍या सोबतीने गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. भोर येथील रायरेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने साधारण २००६ साली श्रमदान, मदत आणि अनेकांच्या सहकार्यातून त्‍या ऐतिहासिक मंदिराचा जिर्णोद्धार करण्‍यात आला. गडावर एखादा मुक्काम करायचा असेल तर त्‍या मंदिरातही सोय होऊ शकते.

रोहिड्याचा घरे लहान आहे. त्‍याचा आकार चौकानी आहे. गडाची तटबंदी मजबूत आहे. गडाला एकूण सहा बुरूज असून आग्नेय दिशेला शिरवले बुरुज, पश्चिमेस पाटणे बुरुज व दामगुडे बुरुज, उत्तरेस वाघजाईचा बुरुज व पूर्वेस फत्ते (फतह) बुरुज व सदरेचा बुरुज अशी त्‍यांची रचना आहे. ते सर्व सुस्थितीत आहेत. वाघजाई बुरुजाच्या समोरच्या डोंगर धारेवर वाघजाई देवीचे स्‍थान आहे. त्‍यावरून त्‍या बुरुजाला वाघजाई हे नाव पडले. तेथील शिरवले बुरुजाच्या तटातील शौचकूप उत्तम अवस्थेत आहे. गडावरील फत्ते बुरुजावर गडाचे निशाण लावले जाई. ते लावण्‍यासाठी असलेला वाटोळा चौथरा आणि निशाणाची काठी उभारण्‍यासाठीचा दगड तेथे पाहता येतो. गडमाथ्‍याच्‍या मध्यावर दगडात कोरलेली अणि एकमेकांशी जोडलेली पाण्याच्या टाक्यांची सुरेख रांग आहे. यातील एकाच्या काठावर शिवलिंग आणि सेवकाची मूर्ती आहे. टाक्‍याजवळ चुन्याचा दगडी घाणा आहे. किल्ल्यावरून पूर्वेस वज्रगड-पुरंदर, उत्तरेस सिंहगड, वायव्येस राजगड-तोरणा, पश्चिमेस केंजळगड तर दक्षिणेस रायरेश्वराचे पठार नजरेस पडते.

रोहिडा किल्‍ला पाहण्‍यासाठी दोन ते तीन तास पुरतात.

रोहिगडावर जाण्‍यासाठी बाजारवाडीपर्यंत एस.टी.ची सोय आहे. बाजारवाडीपासून मळलेली वाट गडाच्‍या पहिल्‍या दरवाजापर्यंत जाते. गडाकडे जाण्‍याचा आणखी एक मार्ग आहे. भोर ते अंबवडे गाव अशी एस.टी. सेवा उपलब्ध आहे. तर पुणे - भोर - पानवळ - अंबवडे अशा मार्गावरही बससेवा आहे. अंबवडे गावी उतरल्‍यानंतर गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करता येते. ती वाट लांबची आणि निसरडी आहे. त्‍या वाटेने गडावर पोचण्यास सुमारे अडीच तास लागतात. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गे जावे आणि उतरताना नाझरे किंवा अंबवडे मार्गे उतरावे. म्हणजे रायरेश्वराकडे जाण्यास सोपे जाते.

पुण्‍याहून रोहिडा किल्‍ल्‍याकडे जाताना वाटेत नीरा नदीचा वक्राकार प्रवाह दिसतो. ते दृश्‍य पाहण्‍याजोगे आहे. यास नेकलेस पॉईंट असेही म्‍हणतात.

- आश्‍ुातोष गोडबोले

लेखी अभिप्राय

लेख छान आहे पण काही मुद्दे पटत नाहीत. कानोजि हे सरदार कानोजी जेधे देशमुख होते ते नीट लिहावे ही विनंती.

संग्राम जेधे ९…21/04/2016

छान लेख उपयुक्त माहिती

प्रदीप कासुडेँ 06/11/2016

बांदळ नाही बांदल असे लिहा.

गिरिष बांदल13/12/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.