आदर्श ग्रंथालयासाठी झटणारे सुधाकर क्षीरसागर

प्रतिनिधी 30/08/2015

सर ज.जी. उपयोजित कला संस्थेचे (जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट) ग्रंथपाल म्हणून काम केलेले सुधाकर शांताराम क्षीरसागर हे पुस्तकवेडे आहेत. उपयोजित कलेची लायब्ररी सुरू झाली ती देणगीदाखल मिळालेल्या काही पुस्तकांवरून. प्रा. हणमंते यांनी कला विषयांवरील जुनी पुस्तके मिळवून दोन कपाटांमध्ये स्थानापन्न करण्याचे काम केले. हळुहळू, त्यांमध्ये ग्राफिक, मॉर्डन पब्लिसिटी, नोवम अशा परदेशी तसेच, कॅग, मार्गसारख्या देशी नियतकालिकांची भर पडू लागली. हणमंते यांनी यामध्ये व्यक्तिश: लक्ष घातले. जाहिरात कलेवरील बहुतांशी पुस्तके त्यात जमा तर झालीच, शिवाय पेंटिंग, वास्तुशास्त्र, शिल्पकला आदी विषयसुद्धा वाचनालयाने आपलेसे केले व जे.जे.च्या वाचनालयाला ‘संदर्भ वाचनालय’ म्हणून महत्त्व प्राप्त झाले. स्वतंत्र असे ग्रंथपाल व साहाय्यक ग्रंथपाल अशी पदेही निर्माण झाली.

क्षीरसागर यांची नेमणूक १९७८ साली साहाय्यक ग्रंथपाल म्हणून झाली. आल्या दिवसापासून क्षीरसागर यांची शोधक वृत्ती जाणवू लागली. त्याला कारण होते, ते त्यांचे पुस्तकप्रेम. ती गोडी त्यांना शालेय स्तरावर लागली होती. क्षीरसागर प्रथम पुणे जिल्ह्यातील त्यांच्या मंचर या गावी  ग्रामपंचायतीच्या वाचनालयात काम करू लागले. तेथे येणारी वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक, पुस्तके यांच्या सान्निध्यात वाचनाची गोडी वाढली. त्यातूनच अनेक लेखकांच्या शैलीची ओळख पटू लागली. वाचकही चोखंदळ असत. त्यांच्याशी चर्चा होऊ लागल्या. क्षीरसागर यांनी जोडीला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. क्षीरसागर यांना १९७८च्या फेब्रुवारीमध्ये संधी चालून आली ती जे.जे.मध्ये साहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम करण्याची आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले.

जे.जे.चे वाचनालय विचार प्रसारण कलेला वाहिलेले असल्याने तेथील वेगळे विषय क्षीरसागर यांनी आत्मसात केले. सर्व पुस्तके, त्यांतील लेख, त्यांतील संदर्भ, बाहेरील क्षेत्रांमध्ये नवीन काय घडत आहे याची जाणीव ठेवली, अन् विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमानुसार त्यांना आवश्यक असणारे संदर्भ व त्यांची सूची करण्यास आरंभ झाला. हळूहळू तेथील सर्व पुस्तके त्यांच्याशी बोलू लागली. संदर्भ हवा असल्यास फक्त क्षीरसागर यांना सांगायचे. चटकन, ते हव्या त्या कपाटापाशी जायचे, अन् नेमके पुस्तक उघडून तो संदर्भ वाचकाच्या हाती द्यायचे. त्यानंतर कलेवरील पुस्तके हवी असल्यास ते क्षीरसागर मिळवून देणार हे समीकरणच ठरून गेले.

ते हळुहळू कोणते शिक्षक काय वाचतात, कोणती पुस्तके पाहतात याचे निरीक्षणही करू लागले व त्याप्रमाणे पुस्तके निवडून ते स्वत:च त्या त्या शिक्षकांकडे पाठवू लागले. त्यांच्या त्या धडपडीमुळे शिक्षकही स्वत:च्या ज्ञानात भर टाकू लागले. क्षीरसागर यांनी नेहमी येणारी असंख्य वृत्तपत्रे, नियतकालिके यांतून कात्रणे करून एकेक विषयांचा संग्रह आरंभ केला. तोही कोणी न सांगता. कात्रणांमध्ये संत, भारतीय मंदिरे, सुपुत्र अशा विविध विषयांची जाहिरात मोहीम होती. ‘हिंदुस्थान लिव्हर’च्या निरनिराळ्या उत्पादनांच्या जाहिराती होत्या. त्यात ‘एशियन पेंट’, ‘नेरोलक पेंट’, ‘शालिमार पेंट’ अशा स्पर्धात्मक कंपन्याचा तुलनात्मक अभ्यास त्यातून करता येतो. ‘बाटा’ ही बुटांची कंपनी त्यांचे साहित्य नेहमी आकर्षक पद्धतीने प्रसिद्ध करत आली आहे. मग त्यात गणपती, दिवाळी, नाताळ हे सण असोत, संक्रांत, पोळा, नवरात्री असोत, त्यांचे वैशिष्ट्य दर्शवणारी प्रसिद्धी माध्यमे रंगीबेरंगी स्वरूपात ‘बाटा’ने तयार केली. क्षीरसागर यांनी ‘बाटा’ कंपनीच्या विविध प्रकारच्या जाहिराती अगदी १९७९ सालापासूनच्या एकत्र केल्या आहेत. अशी असंख्य ‘पुस्तके’ क्षीरसागर यांनी अक्षरश: एकट्याने ‘जे.जे.’च्या लायब्ररीसाठी तयार केली आहेत. त्यात राजकीय व्यंगचित्रे आहेत, ज्यात आर.के. लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे, विकास सबनीस आदी व्यंगचित्रकारांची चित्रभाष्ये पाहायला मिळतात. तशीच, ‘पंच’मधील विनोदी कॅरिकेचर आहेत. मारिओ मिरांडाची व्यंगचित्रे आहेत. एअर इंडियाच्या नर्मविनोदी जाहिराती आहेत. त्यांचा फायदा संस्थेतील एम.एफ.ए. हा पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना होतो. क्षीरसागर यांनी प्रयत्नपूर्वक संग्रह केलेले हे एकेक विषय स्वतंत्रपणे प्रबंध तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतात. विद्यार्थ्यांना ते जसे उपयुक्त आहेत तसे शिक्षकांनाही आहेत.

जे.जे. उपयोजित कलेच्या संदर्भ ग्रंथालयात आठ हजार पुस्तके आहेत. शासनाकडून त्या ग्रंथालयाला मिळणारे तुटपुंजे अनुदान पुस्तकांच्या किंमती पाहता अक्षरश: काहीच नाही. शासनाच्या उदासीनतेमुळे सर्व संस्थेचाच डोलारा कोसळायच्या बेतात आहे. तेथे टेकू तरी कोठून लावणार!

क्षीरसागर यांनी जे.जे.चे हे ग्रंथालय एक आदर्श ग्रंथालयात रूपांतरीत करण्यासाठी एक प्रकल्प तयार केला. तो संस्थेमार्फत कला संचालकांकडून शासनाला सादर होणे अपेक्षित आहे. या ग्रंथालयाला सदैव भेट देणाऱ्या व्यक्तींत सदाशिवराव तिनईकर, न.नि. पटेल, रवी परांजपे, पंढरीनाथ सावंत, सुरेश लोटलीकर यांचा समावेश असे. ते ग्रंथालय आदर्श बनेल तेव्हा जे.जे.च्या शिरपेचात ते एक मानाचे पान ठरेल. तसेच, त्यासाठी एकाकी धडपड करणाऱ्या क्षीरसागर यांच्या परिश्रमाचेही चीज होईल.

प्रा. मं.गो. राजाध्यक्ष (०२२) २६६५५०४७

लेखी अभिप्राय

अतिशय छान लेख.
क्षीरसागर साहेबांच्या कार्याला सलाम.

शैलेश दिनकर पाटील30/08/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.