पण्डिता रमाबाई सरस्वती - प्रबोधनकार के.सी.ठाकरे


प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे हे बहुसंख्य वाचकांना शिवसेनेप्रमुखांचे वडील म्हणून ठाऊक असावेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांचे वडीलही ‘हिंदुत्व’वादी असतील असा समज सर्वसाधारणपणे होऊ शकतो. आणि मग आश्चर्य वाटते, की अशा गृहस्थांनी हिंदू धर्म त्यजून ख्रिस्ती धर्म स्वीकारणाऱ्या व नंतर ख्रिस्ती धर्माचा प्रसार करत असल्याच्या आरोपामुळे वादळात सापडलेल्या पंडिता रमाबार्इंचे चरित्र कसे व का लिहिले?

त्या पुस्तकाची अर्पण पत्रिका म्हणते.

“भारतातील सिनेक्षेत्रातील अग्रेसर व्यवसायी, ललित-संगीत कलावंतांचे आश्रयदाते, पुरोगामी विचार-प्रणालीचे पुरस्कर्ते, इंग्रजी भाषेचे मार्मिक लेखक आणि नामवंत कवी स्नेही महाशय जमशेटजी बी.एच.वाडिया, एम.ए.एल.एल.बी. यांच्या मजवरील अखण्ड स्नेहादराला या अर्पणपत्रिकेने मी कृतज्ञतेचा प्रणाम करत आहे.”

पुस्तकाला प्रस्तावना नाही. मात्र पहिल्या प्रकरणापूर्वी ‘शंभर वर्षांपूर्वी’ असे शीर्षक देऊन काही पार्श्वभूमी सांगितली आहे.

प्रस्तावना मोठी नसली तरी लेखक 1850च्या काळातील स्त्रियांची विवाह परिस्थिती व विधवांची अवस्था कशी होती ह्याचे अगदी थोडक्यात निवेदन करतात. शेवटी लिहितात, पंडिता रमाबाई अग्रेसर अबलोद्धारक म्हणून महाराष्ट्राच्या अर्वाचीन इतिहासात चिरंजीव झाल्या आहेत. अनाथ-अपंगांच्या सर्वांगीण उद्धारासाठी त्यांनी केलेली चळवळ आणि मिळवलेले ठळक यश यांची चित्त थरारुन सोडणारी कहाणी आता वाचा”

ह्या शेवटच्या वाक्यातून संपूर्ण लिखाणाची धाटणी वाचकाला जाणवू लागते. रमाबार्इंच्या वडिलांची - अनंतशास्त्री डोंगरे यांची जन्मापासून मृत्यूपर्यंत हकिगत पहिल्या प्रकरणात (‘शुद्ध बीजापोटी’) येते. अनंतशास्त्र्यांचे पांडित्य, संस्कृतवरील प्रभुत्व, त्यांचा चारी दिशांत झालेला सन्मान आणि त्यांनी स्त्रियांनीही शिकले पाहिजे याचा केलेला अंमल व्यवस्थित रीतीने प्रबोधनकार सांगतात. अनंतशास्त्र्यांची पहिली पत्नी काशियात्रेत मरण पावल्यावर काही वर्षांनी त्यांनी वयाच्या चव्वेचाळीसाव्या वर्षी नऊ वर्षे वयाच्या मुलीशी पुनर्विवाह केला. एवढेच नव्हे तर त्यांनी स्वत:च्या मोठ्या मुलीचा – कृष्णाबाईचा- विवाहही तिच्या दहाव्या वर्षी केला.

अनंतशास्त्र्यांचे कौतुक करताना प्रबोधनकार लिहितात-

“स्वत:चे घर आणि सारा गाव बायकोच्या शिक्षणाला विरोध करतो असे दिसताच अनंतशास्त्री त्यांच्या अल्पवयी बायकोला बरोबर घेऊन एका वस्त्रानिशी वनवासाला निघाले. याला म्हणतात कडवी तत्त्वनिष्ठा ! सत्याचा शोध बिनचूक झाला, तत्त्व मनाला खासखूस पटले की त्याच्या सिद्धीसाठी सर्वस्वावर निखारे ठेवायला जो तयार होतो तोच पुरुषोत्तम, तोच खरा पंडित आणि तोच मानवतेचा उद्धारक. जगातील सगळ्या सुधारणा अशाच तत्त्वाने सत्यशोधकांनी घडवून आणलेल्या आहेत.”

अनंतशास्त्री विद्वान होते पण कर्मकांडवादी होते. ‘प्रतिष्ठा’- ब्राह्मणवर्गाने काही विशिष्ट कामेच करावीत हा आग्रह-अगदी अन्नान्न दशा होण्याची वेळ आली तरीही तशी संकल्पना बाळगणारे त्यामुळे कुटुंबाची वाताहत झाली. अखेर रमाबाई व त्यांचा भाऊ सोडला तर बाकी सारे जण शारीरिक कष्ट व उपासमार यामुळे मृत्युमुखी पडले. त्याबद्दल स्वत: रमाबार्इंचे शब्द लेखकाने उद्धृत केले आहेत. तसेच, रमाबार्इंची वडिलांसंबंधीची अंतिम आठवणही त्यांच्याच शब्दांत दिली आहे. पुढेही काही उतारे येतात. पण त्यांचा स्रोत मात्र दिलेला नाही.

कोलकाता येथे रमाबाई व त्यांचे बंधू आले आणि त्यांच्या विद्वत्तेचे कौतुक होऊ लागले. प्रबोधनकारांनी रमाबार्इंचे कौतुक, त्यांचा सत्कार, संस्कृत भाषेतील त्यांचे शीघ्रकवित्व यांचे धावते वर्णन करून नंतर रमाबार्इंनी ख्रिस्ती धर्मातील प्रार्थना पहिल्यांदा पाहिली तेव्हा त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दांत दिली आहे. “थोड्या वेळाने एका इसमाने एक पुस्तक उघडले, काही वाचले आणि एकदम सगळ्या स्त्रीपुरुषांनी त्यांच्या स्वत:च्या खुर्च्यांपुढे भडाभड ढोपरे टेकून डोळे मिटून, तोंडाने काही पुटपुटण्यास सुरूवात केली. त्यांच्यापुढे आम्हाला देवाची एकही मूर्ती दिसेना! जणू काय ते त्यांच्या त्यांच्या पुढच्या खुर्च्यांचीच आराधना करत आहेतसे आम्हाला दिसले. ख्रिस्ती ईश प्रार्थनेचा हा विचित्र प्रकार आम्हाला चमत्कारिकच वाटला.”(पृष्ठ 23)

पुढे, रमाबार्इंचा विवाह बाबू बिपिन बिहारी दास मेधावी यांच्याशी कोलकात्यानजीक बंकिमपूर येथे नोंदणी पद्धतीने झाला. (ऑक्टो.1880) “त्यांचा किंवा माझा हिंदू धर्मावर अगर ख्रिस्ती धर्मावर मुळीच विश्वास नव्हता, म्हणून आमचे लग्न सिव्हिल मॅरेज कायद्याप्रमाणे झाले” असे रमाबाई सांगतात. मात्र पुढे, रमाबार्इंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यासंबंधी ‘माझी साक्ष’ या पुस्तकात त्यांनी लिहिले आहे  - “आता माझी श्रद्धा पूर्वीच्या धर्मावरून उडाली होती. काही अधिक चांगले मिळावे याकरता मन भुकेलेले होते. म्हणून मी या ख्रिस्ती धर्माची जितकी माहिती मला मिळवता येईल तितकी मिळवली. या नवीन धर्मात पूर्ण समाधान प्राप्त होत असल्यास मी ख्रिस्ती होण्यास तयार असल्याचे मी जाहीर केले. माझ्या पतीचे शिक्षण मिशन शाळेत झाले असल्याने त्यांना पवित्र शास्त्राचा चांगला परिचय होता. परंतु ख्रिस्ती म्हणवून घेणे त्यांना पसंत नव्हते. शिवाय, त्यांना त्यांच्या पत्नीने तुच्छ मानलेल्या ख्रिस्ती समाजात जाहीर बाप्तिस्मा घेऊन प्रवेश करणे हे त्याहून अधिक नापसंत होते. ते फार संतापले आणि म्हणाले, “मी अँलन यांना सांगणार आहे की त्यांनी आमच्या घरी यापुढे कधीही येऊ नये. ते आणखी जगले असते तर काय झाले असते ते मला सांगता येत नाही.” (अपराजिता रमा - ताराबाई साठे. प्रथमावृत्ती 1975-पृष्ठ 44) रमाबाई व बिपिनबिहारी मेधावी यांच्यातील या मतभेदांचा उल्लेखच प्रबोधनकार करत नाहीत. त्यामुळे रमाबार्इंचे धर्मांतर वैधव्यानंतर झाले याला पतीचा विरोध असण्याची शक्यता होती का असा प्रश्न ते उपस्थित करतच नाहीत.

याचे कारण बहुधा प्रबोधनकारांना रमाबार्इंचे कर्तृत्व सांगायचे होते. त्यांचा शोध घ्यायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी रमाबार्इंचे पुण्यात आगमन - त्यांना तेथे मिळालेला पाठिंबा व झालेला विरोध - हंटर कमिशनसमोरची साक्ष - ती साक्ष व्हिक्टोरिया राणीच्या वाचनात येणे - डफरीन फंड व फंडाने उभारलेले दवाखाने - रमाबार्इंचे इंग्लंडला प्रयाण – धर्मांतर - रमाबाई असोसिएशन इत्यादींची माहिती ओघवल्या भाषेत दिली आहे. नंतर शारदा सदनाचे कार्य, आश्रमांची व्यवस्था, मुलींना रमाबार्इंबद्दल आदर व माया कशी वाटत असे - रमाबार्इंचे व्यवस्थापकीय कौशल्य इत्यादींचे साद्यंत वर्णन आहे. रमाबार्इंनी 1896 व 1900 च्या दुष्काळात केलेले कार्य - केडगावचे मुक्तिसदन व त्याचे कार्य आदींचा गौरवपूर्ण उल्लेख प्रबोधनकार करतात.

त्यांचे लिखाण वाचनीय व्हावे, वाचकाशी संवाद केल्यासारखे वाटावे अशी वाक्यरचना बऱ्याच ठिकाणी आहे. त्यांच्या लिखाणात आलेली शीर्षके त्या दृष्टीने नमुनेदार आहेत – ‘सद्वचनांना कुंपणे कशाला?’, ‘टिळकांनीसुद्धा प्रायश्चित घेतले’, ‘अल्पवयी विधवेचा छळ’, ‘आई-बहिणीच्या काळजीने पाहा ‘मा से बेटी सवाई’, ‘शारदा सदनास शारदाच आली’, ‘श्रद्धा हे एक चमत्कारिक रसायन आहे’ हे लिखाण कसलेल्या वृत्तपत्रकाराचे आहे हे अशा शीर्षकांवरून लगेच जाणवते.

जाता जाता प्रबोधनकार म्हणतात -

“रमाबाई प्रचलित सर्व धर्मपंथांचा त्याग करुन येशू ख्रिस्ताला शरण गेल्या. जो या भवसागरी आमचा वाटाडी, आमचा संबोधक, आमचा सहाय्यक, त्याची परिपूर्ती प्राप्त झाली म्हणूनच आम्हाला अजब सामर्थ्य लाभले” अशी त्यांची खरोखरच श्रद्धा होती. आणि त्या श्रद्धेचे फळही त्यांच्या पदरात पडले. या मुद्याविषयी शंका घेण्याचे मला किंवा कोणालाही प्रयोजन नाही. परंतु चालू घडीच्या अखिल जगतातील मानवांनांही त्याच येशूवर श्रद्धा ठेवावी हा जो त्या भगिनींच्या सूचनेतला गर्भितार्थ उघड दिसतो, तो देवधर्माच्या कल्पनेला विज्ञानाच्या मुशीत टाकून तिचे वायफळपण सिद्ध करण्याच्या सध्याच्या बुद्धिवादी समाजरचनेला कितपत ग्राह्य अथवा मान्य होईल याची मात्र शंका येते. (पृष्ठ 69, अधोरेखित माझे)

पुस्तकाची अखेर ते असे करतात- पंडिता रमाबार्इंच्या क्रांतिकारक तुफानी कर्तबगारीच्या चरित्राने फार वर्षांपूर्वी मनाला आकर्षणाचा जो झटका बसला तो मऱ्हाटबंधू-भगिनींपुढे नऊ प्रकरणांच्या शब्दांनी ठेवला आहे. उपेक्षितांच्या देवडीवरचा भालदार या नात्याने हे एका लोकोत्तर मऱ्हाठी वीरांगनेचे विस्मृत चरित्र प्रकाशात आणून ठेवत आहे. (पृष्ठ 71)

वृत्तपत्रकाराने एखादा प्रदीर्घ लेख लिहावा तसे हे चरित्र. त्यामुळे लेखकाने चरित्रलेखनाची पठडी स्वीकारलेली नाही. स्रोत दिलेले नाहीत. चरित्रनायिकेचा हा अभ्यास नाही तर आरती आहे. नमुन्यादाखल पुढे काही प्रश्न दिले आहेत- त्यांची उत्तरे अशा छोटेखानी चरित्रात मिळत नाहीत.

1. पंडिता रमाबाई या केवळ मराठी आईबापांच्या पोटी जन्मल्या म्हणून मराठी म्हणायच्या का? कारण त्यांच्या वडिलांचा जन्म दक्षिण कानडा जिल्ह्यातील. त्यांचे बालपण सारे वणवण भटकण्यात गेले. प्रसिद्धी मिळाली कोलकात्यात. लग्नही तिथेच झाले. पुण्यात काही कार्य झाले पण तेथील वास्तव्यही कमीच.

2. ‘सर्वाभूती प्रेम, भेदाभेद भ्रम अमंगळ’ असा जोरदार पुकारा करणारा भागवत धर्म म्हणजे मागासलेल्या ब्राह्मणेतर लंगोट्या व घोंगडीवाल्या समाजाचा धर्म. ब्राह्मणादि वरिष्ठ वर्गाच्या पांढरपेशांचा त्याच्याशी काही संबंध नाही. ब्राह्मणाची कर्मे तेवढी वेदोक्त बाकीच्यांची फक्त पुराणोक्त या कट्टर समजुतीप्रमाणे भागवत धर्माला ब्राह्मणांनी अर्ज्जाबात वाळीत टाकलेला होता. या विधानाला आधार काय?

3. रमाबाईंचे शारदा सदन 1889मध्ये निघाले. कर्व्यांचा आश्रम 1900 च्या आसपास निघाला. त्याची जुळवाजुळव खूपच अगोदर चालू झाली होती. खरे तर ते दोन्ही प्रयत्न समकालीन. अशा वेळी रमाबार्इंच्या पावलावर पाऊल टाकूनच महर्षी धोंडोपंत कर्वे यांनीही .... (पृष्ठ 69, अधोरेखन माझे) असे म्हणणे कितपत युक्त?

नवलाची गोष्ट अशी की रमाबार्इंच्या ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यावर प्रबोधनकार फार सांमजस्याची भूमिका घेतात.

“श्रद्धा हे एक असे चमत्कारिक रसायन आहे की ते सगळ्यांनाच सारखे एकजिनसी एकरकमी मानवणारे किंवा पचनी पडणारे नाही. जो तो त्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे त्याची निवड करतो आणि समाधान मानतो. त्याची इतरांनी चर्चा-चिकित्सा करण्यात स्वारस्य नाही. श्रद्धेच्या हट्टवादाने सुखापेक्षा दु:खांची आणि समाधानापेक्षा असंतोषाची पेरणी मानव समाजात आजवर फार झाली आहे.”

प्रबोधनकारांचे वंशज हे वाचून त्यावर अंमल करतील काय?

“पण्डिता रमाबाई सरस्वती” - प्रबोधनकार के.सी.ठाकरे
प्रकाशक रामकृष्ण बुक डेपो. प्रथमावृत्ती 1950
पृष्ठे 71 किंमत – दोन रुपये

मुकुंद वझे

लेखी अभिप्राय

Mahiti changli aahe

anil more28/08/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.