पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास


पंडिता रमाबाईंची चरित्रे वाचली, की त्यांच्या ग्रंथसंपदेत ‘इंग्लंडचा प्रवास’ या पुस्तिकेचा उल्लेख वाचायला मिळतो. काही महिन्यांपूर्वी चर्नीरोड येथील सरकारी उपक्रमाच्या विक्री दालनात रमाबाईंचे कुठलेच पुस्‍तक उपलब्ध नाही असे समजले. अचानक घराजवळच्या वाचनालयात ते मिळाले आणि सुखद धक्का बसला. प्रस्तुत प्रतीत दोन पुस्तिका एकत्र केल्या आहेत असे म्हणता येईल. पहिली पुस्तिका म्हणजे खुद्द रमाबाईंचे लिखाण. ते आहे सत्‍तावीस पृष्ठांचे. त्यानंतर द्वारकानाथ गोविंद वैद्य यांनी लिहिलेले पंडिता रमाबाईंचे जीवनचरित्र (अत्यंत छोटेखानी) असे आहे.

त्‍या लिखाणाचे – खास करून पंडिता रमाबाईंच्या लिखाणाचे प्रकाशन वर्ष प्रस्तुत आवृत्तीत दिलेले नाही. परंतु साधारण ते ऑगस्ट १८८३ मध्ये प्रसिद्ध झाले असावे. त्यावर १६ ऑक्टोबर १८८३च्या केसरीत स्फुट आले होते.

ते लिखाण पत्र स्वरुपात आहे. पत्रावर मायना फक्त ‘प्रिय. बांधव’ असा आहे. पण हे बांधव कोण हे स्पष्ट नाही. सरकारी प्रकाशनाच्या सुरुवातीस दिलेल्या निवेदनात हे पत्ररुप वर्णन ‘द्वारकानाथ गोविंद वैद्य’ यांना लिहीले होते असे म्हटले आहे.

रमाबाईंचा इंग्‍लंडचा प्रवास २०.४.८३ ते १७.५.८३ या काळात प्रथम ‘बुखारा’ या बोटीने व नंतर कैसर-इ-हिंद या बोटीने मुंबई ते लंडन असा झाला. पत्राचा सुरुवातीचा मोठा भाग रमाबाईंनी आपण इंग्लंडला जाण्याविरुद्ध काय आक्षेप, विरुद्ध मते होती ते मांडून, ती मते चुकीची कशी आहेत किंवा आक्षेप निराधार कसे आहेत हे सांगण्यासाठी खर्च केला आहे.

रमाबाईंना त्‍यांना पोचवायला बंदरावर आलेल्या माणसांच्या संबधी त्या लिहीतात-

माझ्या जन्मभूमीचा आणि देशबंधू व भगिनींचा दीर्घ वियोग होते वेळीस मला परम दु:ख व्हावे हे तर स्वाभाविकच आहे. परंतु, माझ्याकरता ज्या कित्येक निस्वार्थ प्रेमिक बंधु-भगिनींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या त्या निरंतर माझ्या ध्यानात आहेत. त्यावेळेस त्या मनुष्यांस पाहून मला फारच दु:ख झाले हे खरे, परंतु, आता त्याच दु:खातून एक अननुभूतपूर्व आणि अनिर्वचनीय सुख उत्पन्न होत आहे. हे वाक्य ऐकून तुम्हाला कदाचित खरे वाटणार नाही, कारण तुम्हाला तसा अनुभव नाही... आपण लोकावर प्रीति करुन लोकांपासून प्रीति मिळण्याची इच्छा करणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. (दुसरा कोणाचा नसला तर नसो, पण माझा आहे.) मला जेव्हा त्या निष्कारण मित्रांची आठवण होते तेव्हा खरोखरच अनिर्वचनीय सुख होते. या जगात काही एक स्वार्थ आणि संबंध नसताना लोकांवर ज्यांची प्रीति असते. तेच धन्य आणि तेच सुखी मनुष्यामध्ये कोठे जर देव शांती असली तर मी तसल्या मनुष्यासच देव म्हणते. (अधोरेखन माझे) यातले भाषेचे इंग्रजी वळण जाणवण्याइतके स्पष्ट आहे.  (पृष्ठे, १२)

यानंतर रमाबाई प्रत्यक्ष प्रवासाचे वर्णन करतात. बोटीवर स्वच्छतेच्या अभावाने व चवीतील बदलापोटी त्‍यांना अन्न पुरेसे जाईना.

‘युरेपिअन व चवीतील प्रत्यक्ष प्रवासाचे (अर्धा शिजलेला भात) जेवणाची आम्हाला सवय नव्हती हे एक आणि आमच्या चालीच्या भाज्या, वरण, कढी वगैरे नसताना स्वंयभू अन्न ब्रह्न सेवनाने आमची तृप्ती होईना अथवा आमच्याने पोटभर जेववेना हे दुसरे. या दोन कारणांमुळे आगबोटीत सत्‍तावीस दिवस आम्हाला अर्धवट उपासात काढावे लागले’ (पृष्ठ १५)

यानंतर रमाबाई म्हाता-या युरोपिअन गृहस्थाचा उल्लेख करतात. बोटीवर भेटलेल्या त्‍या गृहस्थाने एकोणिस महिन्यात पृथ्वी प्रदक्षिणा केली होती. त्यासाठी ५००० पौंड खर्च केले होते. पुढे त्या लिहितात – ‘या वृद्ध गृहस्थाचा कित्ता आमच्या देशातील विलासप्रिय, आळशी, श्रीमंत लोकांनी जर वळविला तर किती लाभ होईल’

समुद्रप्रवास करत असताना सारेच प्रवासी समुद्र पाहिल्यावर काय वाटते अथवा समुद्र कसा दिसला ते सांगतात. रमाबाईही त्याला अपवाद नाहीत. 'एकीकडे सूर्य अस्ताला जात आहे, त्याची सायंकालीन कोमल प्रभा, अनंत नील नभोमंडलात जिकडे तिकडे, विशेष करुन पश्चिमेकडे पसरलेल्या, पिंजलेल्या शुभ्र कापसाच्या ढिगासारख्या मेघराशींवर प्रतिबिंबित होऊन, आमच्या पुराणातील काल्पनिक सुवर्णगिरी मेरुची शृंगे चोहोकडे समुद्रातून आपली डोकी उचलून आकाशाचे चुंबन घेत आहेत कां काय अशी भ्रांती होत असे किंवा सुमद्रादरात कल्पिलेली कृष्णाची सुवर्णद्वारका अथवा रावणाची लंका माझ्यासमोर आहे की काय असे वाटत असे. (१७)'

'खवळलेल्या समुद्रातील कल्लोळांच्या परस्पर संघर्षाने उद्भवलेल्या फॉस्फरस नावाचे अग्नीच्या ठिणग्या जेव्हा झळकत तेव्हा आमच्या पूर्व कवींनी कल्पिलेल्या वडवाग्नीचे प्रकाशंतराने दर्शन होत असे... त्या वेळेस. माझ्या मनात या अनंत जगाला सृष्ट करणा-या ईश्वराचे महत्त्व, आपल्या नश्वर परमाणुमात्र वैभवाच्या अहंकारात गुंग असणा-या मनुष्याचे क्षुद्रत्व, माझी हल्लीची स्थिती, माझ्या आयुष्यात जे जे घडून आले, त्यापैकी मुख्य सुखाच्या आणि दु:खाच्या गोष्टी, मी आपला देश सोडून कशासाठी इतक्या दूरदेशी जात आहे, पुढे मी काय करणार? कोणत्या रीतीने मी मातृभूमीची सेवा करावी आणि कदाचित दैवयोगाने हे जहाज समुद्रात बुडाले तर माझे सर्व मनोरथ एका क्षणात कसे बुडून जातील, इत्यादी गोष्टींचा एकसारखा विचार चालत असे (१८/१९)'

पुस्‍तकातील पृष्ठ १२ व १७/१८ /१९ / या मजकूराच्या शैलीचा निराळेपणा आपल्याला स्पष्ट जाणवतो. केसरीत प्रकाशित झालेल्या स्फुटातही रमाबाईंच्या भाषेसंबंधी अभिप्राय येतो. ‘पंडितेला संस्कृत विद्येचा पुष्कळ संस्कार घडला असल्यामुळे हिची भाषा व विचारशैली शास्त्र्यांच्या वळणावर जाते, पण त्यांच्याप्रमाणे वाक्ये आवरुन धरण्याचे किंवा आरंभापासून शेवटापर्यंत त्याची प्रौढता ढळून देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे, त्यात अयोग्यस्थळी संस्कृत शब्द व समास येऊन ती बेढब दिसतात’. (१)

मात्र प्रारंभी रमाबाईंच्या विदेश प्रवासावर टीका करणा-या केसरीकारांचे मत रमाबाईंचे प्रवासवर्णन वाचून बदलले.

‘इग्लंडचा प्रवास हे पंडिताबाईकृत ४६ पानांचे एक लहानसे पुस्तक वाचून आमच्या मनावर या बाईंच्या संबंधाने चांगला ग्रह झाला.’ यापुढचे वर्णन प्रवासवर्णनाच्या नेहेमीच्या आराखड्याप्रमाणे आहे. एडन बंदराचे वर्णन, तिथली घरे, पाणी पुरवठा, वृक्ष संपत्ती, इत्यादी. त्यानंतर तसेच काहीसे वर्णन सुटझ गावाचे.'

रमाबाई माल्य द्विपाचे विस्तृतवर्णन करतात. तिथल्या स्त्री पुरुषांच्या पोशाखाच्या त-हा, चालीरीती, इतिहासकालीन शस्त्रांचे वर्णन, एवढे सगळे लिहील्यावर बाईंनी रोमन कॅथॉलिक चर्च मधल्या ‘कन्फेशन’चा अर्थ समजावून सांगितला आहे. या वेळेपर्यंत बाईंना ख्रिस्ती धर्माची ओळख होती, ओढ लागायला सुरुवात झाली होती असेही म्हणता येईल. पण धर्मांतर झालेले नव्हते. मनाने त्या भारतीय होत्या. त्यामुळे कन्फेशनची प्रथा समजावूनही ती बरी. वाईट यावर त्या भाष्य करीत नाहीत फक्त लिहितात, ‘इतर मूर्तिपुजकात व यांच्यात भेद इतकाच की ते लोक ख्रिस्त व मेरी या दोघांच्याच मूर्तीचीच पूजा करतात आणि इतर अनंत देवांच्या मूर्ती करुन पूजतात’ (पृष्ठ,२४)

लंडन शहरातील बगीच्यांचे वर्णन करुन हे प्रवास वर्णन संपते.

सर्व पुस्तक ( पुस्तिका) वाचल्यावर प्रश्न पडतो की बाईंना बहुधा स्वत:च्या विदेशी जाण्यामागची भूमिका प्रामुख्याने स्पष्ट करायची होती आणि इतर गोष्टी अनुषंगिक म्हणून त्‍यांनी लिहील्या. त्याच बरोबर ख्रिस्ती धर्माबद्दल मोठ्या संयमाने लिहीले हे विशेष म्हणावे लागते.

इंग्लंडचा प्रवास- पंडिता रमाबाई
मूळ लिखाण १८८३, पुस्तिका रुपात प्रसिद्ध १९८३
पृष्ठे २८
उपलब्ध प्रत. पंडिता रमाबाई यांचा इंग्लंडचा प्रवास
प्रकाशक-महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळ. प्रकाशन १९८८.

- मुकुंद वझे

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.