प्रतिभावंत कवी संजीव!

प्रतिनिधी 29/07/2015

मराठी काव्य जगतात सोलापूरचे नाव ठळकपणे घेतले जाऊ लागले ते प्रथम कुंजविहारी व त्यांच्यानंतर संजीव यांच्यामुळे. ख्यातनाम कवी, गीतकार संजीव यांचा १२ एप्रिल हा जन्मदिन. त्यांचे नाव कृष्ण गंगाधर दीक्षित. त्यांचा जन्म दक्षिण सोलापूरपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्‍या वांगी गावी झाला. ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या मातेचे निधन झाले. गंगाधर दीक्षित हे त्‍यांचे वडिल. आईविना वाढणारे संजीव सोलापूरात मोठे झाले. ते खेळण्या-बागडण्याच्या वयात सुंदर चित्रे रेखाटत असत. छोटी छोटी गाणी, कविता कागदावर उतरवीत असत. त्‍यांच्‍या वडिलांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखली हाेती. संजीवांनी साकारलेली चित्रे, कविता त्‍यांचे वडील जपून ठेवत असत. संजीव यांनी त्‍या वयात चित्रकलेबरोबर शिल्पकलाही आत्मसात केली होती. या दरम्यान श्रोत्रिय गुरुजी नावाच्या शिक्षकांनी संस्कृत विषयात त्यांना पारंगत केले. संजीवांचे पालनपोषण त्यांच्या चुलत्यांनी केले. त्‍यांना घरामध्‍ये बाबू या एकेरी नावाने संबोधले जात असे. त्‍यांचे प्राथमिक शिक्षण १९२१ ते १९२७ या काळात म्युनिसिपल शाळा क्रमांक १, सोलापूर येथे झाले.

संजीव यांनी १९३९ साली ‘बॉम्बे स्कूल ऑफ आर्ट’मधून जी. डी. आर्ट.ची पदवी घेतली. त्‍यानंतर त्‍यांनी कलाशिक्षक म्हणून काही काळ म्युनिसिपल मुलींच्या शाळेत नोकरी केली. पण त्‍यांचे मन नोकरीत रमले नाही. त्‍यांनी 'दीक्षित फोटो स्‍टुडिओ' नावाने व्‍यवसाय सुरू केला. त्या काळात त्यांच्यातल्या चित्रकार आणि शिल्पकार वृत्तीमुळे त्यांनी अनेक शिल्पे तयार केली. ते त्‍या कलेमध्ये अधिक रस घेत राहिले. गणेशोत्सवात ते गणपतीच्या रेखीव मूर्ती तयार करीत असत. शब्दांवर निर्भेळ प्रेम करणारा हा कलावंत याही क्षेत्रात नावारूपास आला. त्यांनी केलेली तैलचित्रे, व्यक्तिचित्रे व पुतळे सोलापूर शहरात व जिल्ह्यात आहेत. संजीव यांचा विवाह दक्षिण सोलापूर तालुक्यातील एका खेड्यातील कै. नागनाथ ऊळेकर यांच्या विमल या कन्येशी १९४१ साली पार पडला. त्‍या विवाह सोहळ्यात सुप्रसिध्द अभिनेत्री शशिकला संजीव यांच्या समवेत मिरवणुकीत घोड्यावर बसली होती. त्या वेळी तिचे वय अगदी लहान होते.

छायाचित्रकाराचा व्यवसाय म्हणजे हातावर पोट, पण संजीव काव्याच्या नादात असत. लेखनाची, वाचनाची प्रचंड आवड आणि संस्कृतचा गाढा अभ्यास यामुळे लहानपणीच त्यांचे काव्यलेखन सुरू झाले.  ते एकवीस वर्षांचे असताना त्‍यांचा पहिला कवितासंग्रह 'दिलरुबा' प्रसिद्ध झाला. त्‍या काव्यसंग्रहाला औंध संस्थानचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांची प्रस्तावना आहे. संजीव यांना तात्यासाहेब श्रोत्रीय यांनी काव्यशास्त्राचे धडे दिले व त्यांच्यामध्ये वृत्तछंदाची रुची निर्माण केली. संजीव यांचा ठसकेबाज लावण्या लिहिण्यात हातखंडा होता. अनेक अभंग, भक्तिगीते, भावगीते प्रचंड ताकदीने लिहिणारे सोलापूरचे कवी रा. ना. पवार त्‍यांचे मित्र होते. कै. दत्ता हलसगीकर सुरुवातीच्या काळात संजीव यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येत असत.

स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवामध्ये राबवलेल्या चळवळींना मूर्त स्वरूप प्राप्त झाले होते. संजीव यांनी मनोरंजनाद्वारे देशाभिमान जागृत करण्यासाठी अनेक रचना कागदावर साकारल्या. त्यांची गीते ठिकठिकाणी आयोजित केलेल्या मेळ्यांमधून सादर होत असत. साहित्य हा त्यांचा स्थायीभाव होता. लौक‌िक प्रपंचापेक्षा ते साहित्य प्रपंचात अधिक रमले. त्यांनी गणेशोत्सवातील मेळ्यासाठी विपुल गाणी लिहिली; गद्यपद्यसंवाद लिहिले. त्यांच्या साहित्याची दखल घेऊन 'गझल गुलाब' या संग्रहास महाराष्ट्र शासनाकडून पुरस्‍कार देण्‍यात आला. त्‍यांनी लिहिलेल्‍या सासर माहेर, भाऊबीज, चाळ माझ्या पायात आणि पाटलाची सून या सर्व चित्रपटांच्या कथांसाठी त्यांना शासनाचे पारितोषिक प्राप्त झाले.

संजीवांचे 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे गाणे मेहबूबजान या ख्यातनाम गायिकेने १९३० - ३२च्या सुमाराला गायले व ते लोकप्रिय झाले. त्यांचे एकूण बारा कवितासंग्रह प्रकाशित आहेत. त्यांचा दिलरुबा (१९३५) हा पहिला कवितासंग्रह. त्यांपैकी प्रियंवदा (१९६२), माणूस (१९७५), अत्तराचा फाया (१९७९), आघात (१९८६) हे त्यांचे गाजलेले कविता-संग्रह.

संजीवांनी वेगवेगळ्या प्रकारची कविता लिहिली, त्यात गझलगुलाब (१९८०), रंगबहार (१९८३), देवाचिये व्दारी (१९८६) असे गझल, शायरी आणि अभंग हे प्रकार आहेतच, शिवाय त्यांनी चित्रपट गीते व लावण्याही लिहिल्या. त्यांनी 'सासर माहेर' (१९५६), 'भाऊबीज' ( १९५७), 'चाळ माझ्या पायात' ( १९५७), 'पाटलाची सून' (१९६७) या चित्रपटांच्या कथा त्‍यांनी लिहिल्‍या. या चित्रपटांशिवाय सुख आले माझ्या द्वारी, सौभाग्यकांक्षिणी, हात लावीन तिथं सोनं, मराठा तितका मेळवावा, थोरातांची कमळा, वाट चुकलेले नवरे, रंगपंचमी, सुधारलेल्या बायका, जन्मठेप, ठकास महाठक अशा अनेक चित्रपटांची गाणी त्यांच्या लेखणीतून साकार झाली.

'कवळ्या पानाला केशरी चुना', 'अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया ', 'चाळ माझ्या पायात, पाय माझे तालात' अशी शृंगाररसयुक्त गीते आणि 'सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती', 'अखेरचा हा तुला दंडवत', 'आवाज मुरलीचा आला' अशी भावोत्कट गीते ते सारख्याच सहजपणे लिहीत.

कवी संजीव यांचे 28 फेब्रुवारी 1995 साली वृद्धापकाळाने निधन झाले. त्‍याच्‍यामागे त्‍यांचे भाऊ सुभाष दीक्षित आणि धनंजय, अजित, कांचन आणि डॉ. शंतनू हे त्यांचे चार सुपूत्र असा परिवार आहे.

लेखी अभिप्राय

खुप सुंदर माहिती .
ते आमचे मामा होते ' आमच्या बालपणी त्यांचा छान सहवास व प्रेम मिळाले .
त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन .

शरद कुमार ज्ञा…28/02/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.