पोखरबाव येथील शांततेची अनुभूती


देवगड तालुक्यातील दाभोळे गावाच्या तिठ्याजवळील पोखरबाव येथील श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर पांडवकालीन स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. सागरी महामार्गावरून कुणकेश्वर मंदिराकडे जाताना आधी त्या गणरायाचे दर्शन घडते.

इतिहासाच्या अभ्यासकांच्या मते, पोखरबावच्या गुहा अथवा लेणी हा अनमोल ठेवा आहे. तिठ्यावरून आत वळल्यावर मार्गालगतच अध्यात्माचे नितांतसुंदर शिल्प दृष्टीस पडते. अरबी समुद्राच्या काठावर प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिर आहे. त्या मंदिरापासून अलिकडे वीस किलोमीटर अंतरावर दाभोळेत श्रीसिद्धिविनायकाचे मंदिर आहे.

पूर्वी, त्या स्थानी छोट्याशा दगडात गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली होती. काजरा आणि आंब्याच्या झाडांच्या पोखरीमध्ये गणेशाला वंदन केले जाई. झाडापासून जवळ एक विशाल गुहा होती. त्या गुहेजवळून हमरस्ता जायचा. अगदी काही वर्षांपूर्वीपर्यंत बैलगाडीतून वाहतूक केली जायची. बैलगाड्यांतून विजयदुर्ग बंदरातून निघालेले व्यापारी, शेतकरी गणरायाच्या सान्निध्यात घडीभर विसावायचे आणि पुढील प्रवास सुखाचा होवो यासाठी प्रार्थना करायचे. मग त्यांचा पुढील प्रवास सुरू व्हायचा. गणपतीच्या मूर्तीशेजारी असलेल्या त्या गुहेतील कुंडामधील बारमाही पाण्याचे स्रोत तेथून ये-जा करणा-या वाटसरूंची तृष्णा शांत करायचे. कालपरत्वे, वाहतुकीची साधने बदलली. हमरस्त्यावरून वाहने धावू लागली आणि गणेशाची ख्याती सर्वदूर पसरू लागली.

पोखरबावच्या स्थानावर निसर्ग आणि परमेश्वर यांच्या सान्निध्यात क्षणभर सारे काही विसरायला होते. गणरायाला वंदन करून, उजव्या बाजूला असलेल्या पाय-या उतरून खाली आल्यावर निसर्गरम्य वातावरणात स्वर्गीय सुख अनुभवता येते. समोर शेष, गोकर्ण, द्रौपदी आणि पांडव अशी नावे असलेली कुंडे दृष्टीस पडतात. ती कुंडे कोणी तयार केली याचे उत्तर कोणालाही सापडलेले नाही. मंदिर परिसरात पाण्याची वानवा नसते. कितीही कडक दुष्काळ पडो, तेथील पाणी कधीही संपलेले नाही. दाभोळे गावातील नदीचा उगम मंदिरापासून काही अंतरावर होतो. दाभोळेच्या डोंगरातून झिरपणारे पाणी तेथील गोमुखातून वर्षानुवर्षे वाहत आहे.

मंदिर परिसरात कासवाच्या पाठीवर शिवलिंग आहे, असा दृष्टान्त श्रीधर राऊत यांना १९७९ च्या दरम्यान झाला. त्यांनी ग्रामवासीयांना त्याबद्दल सांगितले. त्या जागी उत्खनन केले आणि खरोखरच, त्या ठिकाणी शिवलिंग दिसून आले. शिवलिंगाकडे उत्तर दिशेकडून पाहिल्यास विष्णूच्या वराहअवताराचा भास होतो, तर दक्षिणेकडून पाहिले असता कासवाच्या पाठीवर शिवलिंग असल्याचे पाहण्यास मिळते. आग्नेय दिशेकडून पृथ्वी आणि चंद्र यांचा भाग दिसतो. उत्खननादरम्यान तेथे कुंडेही सापडली असे राऊत सांगतात. उत्खननानंतर राऊत यांनी स्वत:ला गणेशसेवेसाठी पूर्णपणे झोकून दिले. गुहेच्या मूळ ढाच्याला धक्का न लावता भाविकांना सुलभतेने गुहा पाहता यावी अशी रचना तेथे करण्यात आली आहे. गुहेकडच्या भागात शेष आणि हनुमान यांचा आकार कोरण्यात आला आहे. त्यामुळे गणपती मंदिर आणि डोंगर जणू हनुमंताने त्याच्या हातावर पेलला असल्याचा भास होतो.

दर संकष्टीला, विशेषत: अंगारिकेला तेथे भाविकांची गर्दी उसळते. माघी गणेश जयंतीला तर तेथे जत्राच भरते. होम, गणेशयाग, पूर्णाहुती असे धार्मिक विधी होत असतात. जत्रा तीन दिवस सुरू असते. तेथे काही छोटी मंदिरेही बांधण्यात आली आहेत. पाय-या उतरून जलकुंडांकडे जात असताना गजानन महाराज, दत्त महाराज यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केलेली पाहण्यास मिळते. गगनबावड्याचे गगनगिरी महाराजही त्या स्थळी आले होते. त्यांची स्मृती जपण्यासाठी त्यांची प्रतिमाही तेथे लावण्यात आली आहे. त्या ठिकाणाची चोख व्यवस्था श्रीधर राऊत ठेवतात. मंदिराचा कारभार ट्रस्टच्या माध्यमातून चालतो.

दाभोळेच्या सड्यावरून जात असताना एका ठिकाणी चित्त स्थिरावते. प्रवास सुरू असतो. घनदाट हिरवाईत चिमण्यापाखरांचा किलकिलाट, झ-याचा खळखळाट कानांवर पडतो आणि डोळ्यांसमोर येतो तो श्रीसिद्धिविनायक... कासवाच्या पाठीवरचे शिवलिंग आणि नितळ निळ्याशार पाण्याच्या सान्निध्यात असलेली 'पांडवां'ची कुंडे! गूढ असे ते वातावरण गजबजलेल्या जगापासून काही काळ खूप लांब आल्याचे समाधान देते. शांतता उपभोगता येते.

-किशोर राणे

(‘दैनिक प्रहार’ ७ मे २०१४ वरून उद्धत )

Last Updated on - 4th Sep 2016

लेखी अभिप्राय

आपल्या. पोरटवर.पाठविलेला.लेख.अतीशयसुदर.आहे.अशिच.चागलि.माहिती.आम..लापाठित.जा

एन.पि.भगत04/09/2016

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.