जलदुर्ग कोर्लई

प्रतिनिधी 14/06/2015

कोर्लई हा दोनशेएकाहत्तर फूट उंचीचा जलदूर्ग आहे. तो कोकणातल्‍या रायगड जिल्ह्यातील अलिबाग डोंगररांगेत आहे. तो किल्ला ट्रेकर्सच्या दृष्टीने मध्यम समजला जातो. किल्ल्यावरून अलिबागचा समुद्रकिनारा आणि कुलाबा किल्ला पाहता येतात. तेथून दक्षिणेस म्हणजे मुरूड-जंजिऱ्याच्या दिशेने पंधरा-वीस किलोमीटरवर रेवदंड्याचा कोट आणि पुढे तीन-चार किलोमीटरवर कोर्लईचा किल्ला. रेवदंड्याहून कुंडलिकेच्या खाडीवरचा पूल पार करून कोर्लईच्या पायथ्याशी असलेल्या कोळीवाड्यात पोचता येते. कोर्लई किल्ला थोडा वेगळा आहे, कारण तो स्थित आहे कुंडलिका खाडीच्या मुखाशी. म्हणून पंडित महादेवशास्त्री जोशींनी त्याला ''कुंडलिकेने सिंधुसागराला अलिंगन दिले, त्या प्रीतीसंगमावरचा हा तीर्थोपाध्यायच आहे'' असे म्हटले आहे. ते वर्णन महादेवशास्‍त्री जोशी यांच्‍या 'महाराष्ट्राची धारातीर्थे' या पुस्तकात येते.

कोर्लई किल्ला दियोगु लोपिश दि सिकैर या पोर्तुगीज गव्हर्नरने निजामशहाकडून 1521 मध्ये घेतला. त्याला रेवदंड्याजवळ चौलच्या खडकावर धक्का आणि क्रुसाची बातेरी बांधायची होती. त्याने निजामशहाची परवानगी घेऊन ते बांधकाम केले. रेवदंडा हे पोर्तुगीजांच्या मुख्य ठाण्यांपैकी एक. तेथे मजबूत कोट आहे. पहिला बुऱ्हाण निजाम 1594 साली गेल्यावर निर्माण झालेल्या अस्थिरतेचा फायदा उचलून फिरंग्यांनी चौलच्या खडकावर तटबंदी बांधण्याचा प्रयत्न केला. हुसेन निजामने त्यास नकार दर्शवला आणि स्वत:च बळकट दुर्ग उभारण्याचे ठरवले. एका संघर्षात दोघांनी पड खाल्ली आणि तह झाला. पोर्तुगीज गडाखालच्या पेठेत घुसले आणि त्यांनी निजामाचा हत्ती मारला. शेवटी, त्यांनी कोर्लई गड घेतला; मात्र गड घेतल्यावर त्यांना तेथे कडक बंदोबस्त करावा लागला. कोर्लई किल्ला पोर्तुगिजांच्या ताब्यात अनेक वर्षे राहिला. शिवाजी महाराजांच्या काळातली तो त्यांच्याकडेच होता. संभाजी महाराजांनी 1683 मध्ये तो किल्ला ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर चिमाजी अप्पा यांनी शेजारच्या तळगडाचा हवालदार सुभानजी माणकर यांच्या मदतीने 1739 च्या सुमारास तो किल्ला मिळवला. इंग्रजांसोबतच्या अखेरच्या लढाईपर्यंत तो किल्ला मराठ्यांकडे होता. पुढे 6 जून 1818 मध्ये तो इंग्रजांकडे गेला.

किल्‍ल्‍याच्‍या पायथ्याशी कोर्लई नावाचे गाव आहे. गावात हिंदू, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय लोक रहातात. त्यापैकी ख्रिश्चन लोक जी भाषा बोलतात तिला 'क्रीओल' असे संबोधले जाते. स्थानिक लोक तिला 'नी लींग' (आमची भाषा) असे म्हणतात. या भाषेचा उद्भव मराठी, उर्दू, तुळू, संस्कृत, बंगाली आणि पोर्तुगीज अशा भाषांच्‍या मिश्रणातून झाला आहे. त्या भाषेवर पोर्तुगिज भाषेचा प्रभाव असला तरी त्यात इतर भाषांचे संदर्भ येतात. ती केवळ बोलीभाषा असल्याने तिला स्वतःची लिपी अथवा व्याकरण नाही. कोर्लई गावाशेजारी असलेल्या कोळीवाड्यातून किल्‍ल्‍याकडे जाता येते. किल्‍ल्‍याचा डोंगर एखाद्या भूशिरासारखा पाण्यात शिरलेला आहे. किल्‍ल्‍याच्या तिन्ही बाजूंनी पाणी असून तो दक्षिणेकडे जमिनीशी सांधलेला आहे. किल्ला पूर्व-पश्चिम सुमारे एक किलोमीटर, तर दक्षिणोत्तर फक्त सत्तावीस मीटर अशा आकारात विस्तारलेला आहे. पश्चिमेकडे समुद्रात शिरलेल्या एका टोकापासून ते पूर्वेकडे उंच होत गेलेल्या पर्वतापर्यंत कोर्लईचा हा गड वर चढत गेलेला आहे.

कोर्लई हा पोर्तुगीज धाटणीचा किल्ला आहे. गडाच्या पायथ्याशी सुंदर समुद्रकिनारा आहे. गडावर दोन वाटांद्वारे जाता येते. समुद्रकिनाऱ्यावरून पायऱ्या चढून चाळीस मिनिटांत कोर्लई गडमाथ्यावर पोचता येते. किल्‍ल्‍याच्‍या प्रवेशद्वारावर None passes me but fight (लढल्याशिवाय आत प्रवेश नाही) असा इशारा कोरलेला आहे. गडावर प्रवेशद्वारातून आत गेल्यावर फक्त दहा मीटर रुंद अशा जागेवर फिरणे शक्य असते. तो बालेकिल्ला. त्याच्या शिखरावर गरुड पक्षी असून तेथे ‘माझ्या तावडीतून उडणाऱ्या माशांशिवाय कुणाचीही सुटका नाही ’ असे वाक्य कोरलेले आहे.’ बालेकिल्‍ल्‍यावरून दर्शन होते ते एका विहंगम दृश्याचे. एका बाजूला निळ्याशार सागरावर छोट्या-छोट्या होड्या दिसतात. दुसरीकडे खाडी आणि सागर यांची भेट झालेली दिसते. तेथे उत्तराभिमुख चर्चचे अवशेष आहेत. उत्तरेकडे दोन बुरूजांनी संरक्षित दरवाज्यातून आत जावे लागते. त्यापैकी समुद्राकडे तोंड करून असलेल्या बुरूजाचे नाव आहे सां दियागो आणि खाडीकडे असणाऱ्या बुरूजाचे नाव आहे सां फ्रांसिस्कु. तेथे काही अवशेष आहेत. मुख्य बालेकिल्ल्याच्या खाली पश्चिमेकडे तटबंदीजवळ दारुकोठा आहे. पश्चिम आणि उत्तर तटबंदीला तोफा स्थानापन्न केल्या आहेत. तेथे सत्तर तोफा आणि आठशे शिबंदी असल्याचे उल्लेख आढळतात. उत्तरेकडे माचीवर पोचता येते. किल्‍ल्‍याला एकूण सात दरवाजे आहेत. किल्‍ल्‍यावर पोर्तुगिज भाषेतील शिलालेख आहे. त्याशिवाय तोफा, पाण्याचे हौद, टाक्या, कोठारे, चर्च, महादेवाचे मंदिर, चौथरे असे किल्‍ल्‍याचे अनेक पुरातन अवशेष पाहता येतात. किल्‍ल्‍याच्‍या पायथ्याशी समुद्रालगत जुने दीपगृह आहे.

किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. ती गावात होऊ शकते. जेवणाची सोय स्वत: करावी. किल्ल्यावर पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. रेवदंड्याला राज्य परिवहन मंडळाची सेवा उपलब्ध आहे. तेथून कोर्लई गावात व तेथून रिक्षाने वीस मिनिटांत गडाच्या पायथ्याशी पोचता येते. अथवा मुरूड-जंजिऱ्याला जाणारी बस गावाच्या वेशीवर सोडते.

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.