वंदना करंबेळकर : समाजसेवेतील आनंद

प्रतिनिधी 28/07/2014

वंदना करंबेळकरवंदना करंबेळकर या, ‘त्यांनी स्वार्थापोटी समाजसेवेचा मार्ग पत्करला’ असे प्रामाणिकपणे व नि:शंकपणे सांगतात! त्या म्हणाल्या, की  स्वत:साठी आनंद मिळवणे हा माझा स्वार्थ आहे आणि तो आनंद मिळवण्यासाठी मी जे उपद्व्याप करते त्याला जर का कोणी ‘समाजसेवा’ म्हणत असेल, तर तो त्याचा प्रश्न आहे. त्याला रोखणारी मी कोण? वंदना अशा शेलक्या शब्दांत ‘समाजसेवेची झूल’ पांघरण्यास नकार देतात. त्यातच वंदना यांचे वेगळेपण उठून दिसते.

वंदना करंबेळकरत्यांनी कोकणच्या सावंतवाडी परिसरात ग्रामीण भागातील मुलामुलींसाठी निरामय विकास केंद्राच्या माध्यमातून कार्य चालवले आहे. सामाजिक प्रवाहापासून दूर गेलेल्या सावंतवाडीतील लाखे समाजासाठी त्यांच्या वस्तीवर जाऊन करत असलेले कार्य, मुलांसाठी बालदरबार, ग्रामीण भागातील मुलींसाठी जीवनकौशल्य वर्ग, शाळेतील मुलांसाठी सुंदर मन घडवण्याकरता पुस्तक प्रदर्शने, जबाबदार पालकत्व, शारीरिक आरोग्यजागृती इत्यादी योजना...  असे बहुविध कार्यक्रम वेळोवेळी हाती घेत वंदना जवळपास पाच ते सहा हजार मुलांपर्यंत पोचल्या आहेत. त्यांचे कार्य प्रसिद्धीपासून चार हात दूर राहत केलेले असते. त्यांनी त्यांचा टार्गेट ग्रूप ‘सहा ते सव्वीस’ या वयोगटातील मुले-मुली हा निवडला आहे. त्यांनी त्यांच्या कार्याचा फोकस प्रबोधन करणे, विचार देणे, ज्ञान देणे व आनंदी प्रवृत्तीने जगणे यावर ठेवला आहे.

वंदना श्रीकृष्ण करंबेळकर या पूर्वाश्रमीच्या घाणेकर. त्यांनी भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेत पंचवीस वर्षे सेवा बजावली. नंतर त्यांनी त्यांच्या चांगल्या पगाराच्या नोकरीवर पाणी सोडले. कारण काय तर, ‘आत्मिक समाधान मिळवण्या’साठी! मग त्यांनी समाजसेवेस वाहून घेतले. त्यांचा तो निर्णय अचूक ठरला. त्यांचे कामही जिद्दीने झाले व त्यामुळे त्यांच्या कार्याच्या माध्यमातून सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण भागातील घराघरात पोचलेले असे ते अभ्यासू व्यक्तिमत्त्व ठरले!

वंदना यांचा जन्‍म २८ डिसेंबर १९६० चा. त्या म्हणजे घाणेकर कुटुंबातील शिस्तबद्ध वातावरणात परंतु तेवढ्याच ममतेत वाढलेली एकुलती एक लाडकी लेक. मात्र त्‍यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. वडील पोस्टमास्तर तर आई शिक्षिका, भाऊ बँकेत, घरात सुशिक्षित वातावरण. परंतु लाडात वाढलेल्या वंदना यांचे मन मात्र शिक्षणात रमत नव्हते. स्वच्छंदी जीवन ही त्यांची विचारसरणी. त्यांचे बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण उत्तम गुण मिळवत पूर्ण होताच, त्यांनी नोकरीच्या मागे न लागता प्रथम काय केले असेल तर त्यांनी ‘कोसबाड’ या ठाण्यातील आदिवासी पाड्यात सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने अनुताई वाघ यांना थेट पत्र लिहिले. मात्र, अनुताईंनी त्यांना त्यांचे वय आणि शिक्षण पाहून कोसबाडला येण्यास परवानगी नाकारली. शिवाय, त्यांनी वंदना यांचे बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पाहून त्यांना राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्यानुसार वंदना यांनी नोकरी मिळवली व वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वाढदिवसाला नोकरीचा राजीनामा दिला, तो सामाजिक सेवेचे व्रत हाती घेण्यासाठी.

वंदना करंबेळकरवंदना यांचे वैवाहिक जीवन म्हणजे एक स्वप्न ठरले! त्यांचा बँकेतील सहकारी व ‘जिवाभावाचा मित्र’ श्रीकृष्ण करंबेळकर हाच जीवनसाथी बनला. वंदना म्हणजे स्वच्छंदी वादळ, तर श्रीकृष्ण शांत, संयमी, परोपकारी वृत्तीचे. मात्र त्यांनी एकमेकांना परस्परांतील मित्रत्वाचा धागा मजबूत असल्यामुळे सांभाळून घेतले. वंदना यांच्या पतींचे (श्रीकृष्ण यांचे) त्यांची कन्या भक्ती अवघी सहा वर्षांची असताना हृदयविकाराने निधन झाले.

वंदना करंबेळकर नोकरी सोडून समाजकार्यात पडल्‍या याबद्दल समाधानी आहेत. माणसे घडवणे हे त्‍यांचे आवडते काम, त्‍यासाठी त्‍यांना ‘निरामय’सारखा प्‍लॅटफॉर्म मिळाला. वंदना त्‍या संस्‍थेच्‍या संचालक म्‍हणून काम पाहतात. डॉ. शालिनी सबनीस यांच्‍यासारखा खंदा पुरस्‍कर्ता त्यांना लाभला आहे. त्‍यांनी वंदना यांना सावंतवाडीजवळ कोलगाव येथे वास्‍तू उपलब्‍ध करून दिली आहे. तिचा योग्य लाभ उठवत वंदना यांनी एकट्या जीवनशिक्षण वर्गामधून सेहेचाळीस शालेय मुलींना (दहावीची परीक्षा दिलेल्या) गेल्‍या चार वर्षांत शहाण्‍या करून सोडले आहे. तो वर्ग दरवर्षी मार्च-एप्रिलमध्‍ये होतो. वर्गातील बारा-पंधरा मुली महिनाभरात पंचवीस-तीस व्‍यक्‍तींबरोबर संवाद साधतात, अनेक तऱ्हेची कौशल्‍ये संपादन करतात. गरीब लोकांना आरोग्य सेवा देणे, मुलांना शिष्यवृत्ती-शिक्षणासाठी बिनव्याजी कर्ज यांसारखे उपक्रम तेथे राबवले जातात. वंदना यांनी संस्थेच्या कार्याची व्याप्ती वाढवत नेली. त्यांनी जीवनशिक्षण कौशल्य वर्ग, बालदरबार यांसारखे मार्गदर्शक व उपयुक्त उपक्रम तेथे राबवले. त्यांनी शहर-स्वच्छतेचे काम करणाऱ्या सावंतवाडीतील लाखे समाजाच्या उन्नतीकरता कार्य करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या त्या कार्याची बांधणी उत्तम व्हावी यासाठी त्यांनी व्यावसायिक समाजकार्याचा अभ्यासक्रम (एम.एस.डब्ल्यू.) पूर्ण केला. जीवनशिक्षण वर्गाची संकल्‍पना पसरत आहे व वंदना यांना शाळा-कॉलेजांकडून त्‍यांच्‍या संयोजनासाठी बोलावणी येत आहेत. 'निरामय'चे सर्व आर्थिक व्यवहार संस्थेच्या अध्यक्ष डॉ. शालिनी सबनीस व त्यांचा परिवाराच्या देणगीमधून होतात. संस्‍थेकडून सरकारी वा परदेशी मदत स्‍वीकारली जात नाही .

वंदना यांनी बॅकेत नोकरी करत असतानाच लिखाण सुरू केले. सावंतवाडीत १९९२ साली झालेल्‍या वासनाकांडाच्‍या संदर्भात प्रतिक्रिया म्‍हणून त्‍यांचा पहिला लेख ‘तरुण भारत’ वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाला. त्‍यानंतर त्‍यांनी २००० साली ‘तरुण भारत’मध्‍येच ‘एैसपैस’ हे सदर सहा महिने चालवले. त्‍या पुण्‍याहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकातूनही वेळोवेळी लेखन करतात.

वंदना सावंतवाडी परिसरातील जाणिवजागृतीच्‍या साऱ्या प्रयत्‍नांत सहभागी असतात. उदाहरणार्थ, धामापूर येथील ‘स्‍यमंतक’च्‍या सचिन देसाई यांनी उभा केलेला सजग नागरिक मंच. वंदना त्‍यात आहेत. माहितीचा हक्‍क व शिक्षणविषयक जाणीव याबाबत मंच जागरूकपणे काम करत असतो. अशा कामांखेरीज वंदना वेगवेगळे प्रकल्‍प चालवणाऱ्या लोकांना भारतात जेथे असेल तेथे जाऊन भेटी देत असतात. त्‍या ओघात नवनवीन व्‍यक्‍तींना भेटत असतात. त्‍यामधून व्‍होल्‍गा या लेखिकेचे साहित्‍य त्‍यांच्‍यासमोर आले व त्‍यांच्‍या कथांचा अनुवाद त्‍यांनी सुरू केला. त्यामधून त्यांचे काही स्फुट लेखन झाले व प्रकाशवाट आणि राजनैतिक कथा हे दोन अनुवादित कथासंग्रह तयार झाले.

त्या म्हणतात, की समाजसेवेत परोपकार, उपकार, कृतज्ञता या संकल्पना मला मान्य नाहीत. कुटुंबात एकमेकांना मदत करणे हा संस्कार मला घरातून मिळाला, तर समाजात रंजल्यागांजलेल्यांना मदत करणे हा संस्कार नवऱ्याकडून मिळाला. रोजगार मिळवून देणे वा संधी उपलब्ध करून देणे हे माझे काम नाही. त्या उलट प्रबोधन करणे, चांगले विचार देणे, ज्ञान देणे, आनंदी व निरामय जीवन जगण्यासाठी जीवनमूल्ये शिकवणे हे माझे काम आहे व त्यावरच माझा फोकस आहे असे त्या बजावून सांगतात.

टिप -

लाखे समाज - सावंतवाडी शहरात हमाली करणारे पुरुष व कचरा गोल करणाऱ्या त्यांच्या बायका अशा कुटुंबांची वस्ती आहे. त्यामध्ये लाखे आणि पाटील  आडनावाची कुटुंबे राहतात. पण लाखे कुटुंबांची संख्‍या जास्त आहेत. त्यामुळे ती वस्ती लाखे वस्ती या नावाने ओळखली जाते. तिथे सुमारे साठ कुटुंब राहतात.
 

वंदना करंबेळकर,
९८५०७४३०१२

शेखर सामंत, सिंधुदुर्ग
९४२२३७३०३६

लेखी अभिप्राय

Very good.Ideal social work

Bhavna Pradhan29/07/2014

dhanyvad

अज्ञात04/08/2014

wonderful

Pravin Shinde31/07/2014

वंदना करंबेळकर हे एक दुर्मिळ व्यक्तीमत्व आहे. सर्वांवर माया ममता करणारे आनंदी आणि हसरे... कामाचा झपाटा फार मोठा व व्यासंगही मोठा. पुढील वाटचालीला खुप शुभेच्छा!!

सुप्रिया पाटणकर08/11/2015

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.