उगवता रवी!

प्रतिनिधी 16/10/2013

रवी दातार रवी दातारचा जन्म १३ नोव्हेंबर १९९४ रोजी टोरांटोस झाला. त्याच्या ओठावर मिसरूड नुकती फुटत आहे, अशा वयात कोणाकडून अपेक्षा तरी किती करायच्या? पण ‘तेजसां हि न वय: समीक्ष्यते’ (तेजाचा, कर्तृत्वाचा आणि वयाचा संबंध नसतो) असे कविकुलगुरू कालिदासांनी म्हणून ठेवले आहे . रवी कॉम्प्युटर वापरण्यात तरबेज आहे. कोणी म्हणेल त्यात काय विशेष? त्याच्या पिढीची सारीच मुले तशी असतात. रवी अभ्यासात खूप हुशार आहे, शालेय अभ्यासक्रमात त्याला सतत पंचाण्णव टक्क्यांच्या आसपास गुण मिळत आले आहेत. त्याची आय.बी.च्या कोर्ससाठी निवड इयत्ता दहावीपासून झाली. तो कोर्स अतिशय कठीण आहे. शाळेच्या अभ्यासासाठी सामान्यत: जेवढे कष्ट करावे लागतात त्याच्या जवळ जवळ दुप्पट कष्ट त्या कोर्ससाठी करावे लागतात. त्या कोर्सला गेल्यानंतर त्या कष्टांना कंटाळून कितीतरी मुलांनी तो कोर्स मध्येच सोडून दिलेला आहे. रवीने चिकाटीने तो कोर्स यशस्वी रीत्या पूर्ण केला आहे. कोणी म्हणेल, त्यात काय विशेष? तशीही पुष्कळ मुले आहेत!

रवी केवळ दोनदा भारतात गेला आहे. एकदा पाच-सहा वर्षांचा असताना आणि दुस-या वेळेस पंधरा-सोळा वर्षांचा असताना. दोन्ही वेळेस मुक्काम फक्त दोन-तीन आठवड्यांचा. तरीही रवी अस्खलित मराठी बोलतो, लिहितो व वाचतो! त्याने वयाच्या आठव्या वर्षी त्याच्याच सुवाच्य अक्षरांत मराठीत लिहिलेला मजकूर बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या वार्षिकात प्रसिद्ध झाला होता. मला सांगा, अशी किती मुले कॅनडा-अमेरिकेत आहेत? थोडी का होईना पण अशीही काही मुले कॅनडा-अमेरिकेत आहेत यात शंका नाही. तरी या सर्व गोष्टी एकाच मुलात एकत्र सापडणे कठिणच नव्हे का?

रवीने स्वत:च्या सुवाच्य अक्षरांत रामरक्षा व मनाचे दोनशेपाच श्लोक लिहून ठेवलेले आहेत. त्याला गीतेचे दहा अध्याय पाठ आहेत. रामरक्षा, भीमरूपी स्तोत्र, कित्येक संस्कृत श्लोक, गणपती-अथर्वशीर्ष, गायत्री मंत्र, हे सर्व त्याला पाठ आहे. त्याला मराठी चित्रपट समजतो, मराठी विनोद कळतात. आता मला सांगा, अशी किती मराठी मुले कॅनडा-अमेरिकेत आहेत?

आणि आता, त्याच्याहीवर केवळ रवीचे आणखी एक वैशिष्ट्य. रवी उत्तम गातो. त्याला गायनात लहानपणापासून उत्तम गती आहे. स्वर आणि ताल यांची त्याला उपजत चांगली समज आहे. त्याचे संगीताचे शिक्षण त्याचे वडील पंडित नरेंद्र दातार यांच्याकडे बालपणापासून चालू आहे.

 बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सारेगम स्पर्धेच्या ग्रॅंड फिनालेमध्ये गाताना भारतातील ‘संगम कला ग्रूप’ या संस्थेने २००५ साली प्रथमच अमेरिका विभागात गायनाच्या स्पर्धा घेतल्या. रवीने त्यात पाच ते बारा वयोगटाच्या सब्-ज्युनियर (फिल्म) या विभागात प्रथम क्रमांक मिळवला. संस्थेने मग दिल्लीत होणा-या एकोणतिसाव्या अंतिम राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याला दिल्लीस जाण्या-येण्याचे भाडे देऊन पाठवले, त्याची उतरण्याची सोयही दिल्लीत हॉटेलमध्ये केली. रवीने तालकटोरा सभागृहात झालेल्या अंतिम स्पर्धेत २००६ साली दुसरे पारितोषिक मिळवले.

रवीची पाच-सात वर्षांतील गायनातील प्रगती आश्चर्यजनक आहे. त्याने टोरांटोच्या ‘स्वरगंध’ गायनवृंदातील चतुरस्र आणि यशस्वी गायक म्हणून मान्यता मिळवली आहे. त्याचे स्वतंत्र कार्यक्रमही होत असतात.

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या फिलाडेल्फिया येथील अधिवेशनात २००९ साली ‘स्वरगंध’चा जो अप्रतिम कार्यक्रम झाला त्यात साडेचौदा वर्षांचा रवी चमकलाच, पण त्यानंतर पुढल्याच दिवशी तेथे ‘संगीत पालवी’ या नावाने त्याचा स्वतंत्र गायनाचा कार्यक्रम झाला. सभागृहात आठशे आसनांची सोय होती, पण ‘स्वरगंध’च्या आदल्या दिवशीच्या कार्यक्रमास श्रोत्यांची झाली होती तशी, सभागृहाच्या क्षमतेहून अधिक गर्दी सभागृहात होऊ नये म्हणून संयोजकांनी आधीपासूनच प्रवेश नियंत्रक तैनात केले होते. सभागृह तुडुंब भरले होते हे सांगणे नकोच! रवी उत्तम गायला. अनेकांना त्याचे गाणे ऐकता आले नाही, म्हणून संयोजकांनी ‘रवी आणखी एक कार्यक्रम करू शकेल का?’ अशी विचारणाही केली होती.

रवीने त्याची कला दाखवून टोरांटोशिवाय टेक्सास, रॉचेस्टर, डेट्रॉइट, शिकागो इत्यादी ठिकाणी आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड येथेही शाबासकी, वन्स मोअर्स आणि श्रोत्यांनी खूश होऊन आपणहून दिलेली बक्षिसे मिळवली आहेत.

 बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या सारेगम स्पर्धेत प्रथम पारितोषिक स्वीकारताना बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शिकागो येथील अधिवेशनात २०११ साली विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम केलेल्या निवडक व्यक्तींचा विशेष सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला होता; त्या निवडक व्यक्तींत रवीचे नाव होते. त्याला तो सन्मान आर्ट, कल्चर अॅण्ड लिटरेचर या विभागातील महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल देण्यात आला होता.

बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे अधिवेशन बॉस्टनजवळील प्रॉव्हिडन्स या शहरात पार पडले. भारतात टेलिव्हिजनवर ‘सारेगमप’ ही संगीत स्पर्धा घेतली जाते. त्या प्रकारची स्पर्धा त्या अधिवेशनाच्या निमित्ताने उत्तर अमेरिकेत गेल्या वर्षभरात घेतली गेली. प्राथमिक स्तरावरील दोनशेहून अधिक स्पर्धकांमधून केवळ सहा स्पर्धक अंतिम फेरीसाठी निवडले गेले होते. अंतिम फेरीच्या गायक स्पर्धकांच्या साथीसाठी भारतातून ‘सारेगम’चा वाद्यवृंद आला होता. अंदाजे साडेतीन हजार श्रोत्यांच्या उपस्थितीत अधिवेशनाच्या मुख्य रंगमंचावर झालेल्या त्या अंतिम स्पर्धेत रवीने प्रथम क्रमांक पटकावला!

इतके मोठे यश लहान वयात संपादन करणे, हे रवीचे आगळे वैशिष्टय आहे. कॅनडात जन्मून कॅनडातच वाढलेल्या या मुलाचे हे चित्र किती विलोभनीय आहे! रवीने वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून भारतीय संगीताचा जो आविष्कार दाखवला आहे, तो तर कोणालाही थक्क करणारा आहे!

भारतीय संगीताच्या क्षेत्रात क्षितिजावर नुकता उगवलेला हा ‘बाल-रवी’ भविष्यात पूर्ण तेजाने तळपावा, त्याच्या गायनाने भारतीय संगीताची प्रतिष्ठा आणखी वाढावी, यापरते देवाकडे आणखी काय मागावे!

ना. भा. दातार
ndatar@gmail.com

२७ गिलिंगहॅम स्ट्रीट, स्कारबरो,
ओंटॅरिओ, M1B 5X1, कॅनडा.
फोन – (४१६) २१७ – ८१०१
इमेल – ravidatar@hotmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.