‘चाळेगत’ - नेमाडेपंथातील नवी पिढी


     डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्याकडून लेखक प्रविण बांदेकर पुरस्कार स्विकारताना... डावीकडून : प्रा. गो.तु.पाटील, हरिश्चंद्र थोरात, वसंत आबाजी डहाके,  प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे, लेखक प्रविण बांदेकर, सुधा जोशीअनुष्टुभ प्रतिष्ठान आयोजित ‘विभावरी पाटील स्मृती वाङमयीन पुरस्कार’ प्रवीण बांदेकर यांच्या ‘चाळेगत’ या पहिल्याच कांदबरीला मिळाला. त्यासाठी मुंबईत मुलुंड (पूर्व) येथील केळकर एज्युकेशन संस्थेच्या वझे कॉलेजात रविवारी ११ जुलै २०१० रोजी समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे, पुरस्कारासाठी परीक्षक म्हणून काम केलेले सुधा जोशी व वसंत आबाजी डहाके, हरिश्चंद्र थोरात, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. गो. तु. पाटील व लेखक प्रवीण दशरथ बांदेकर व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालनासाठी अरूण म्हात्रे कार्यरत होते.

     परीक्षक म्हणून ‘चाळेगत’ या पुस्तकाची निवड करताना वसंत आबाजी डहाके यांनी सांगितले, की याउपर काही असेल असे हे पुस्तक वाचल्यानंतर वाटले नाही. इतके वास्तव, निर्भीड म्हणणार नाही तर वाचकाला निर्भय बनवणारे हे पुस्तक लेखकाने धोका पत्करून लिहिले आहे. प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनीसुद्धा असाच धोका पत्करला होता. त्यांच्या ‘कोसला’ने इतिहास घडवला व ते मैलाचा दगड ठरले, हे सर्वांना माहीत आहे.

     ‘चाळेगत’ या पुस्तकाचे प्रकाशन २६ ऑक्टोबर २००९ रोजी झाले. त्या प्रकाशन समारंभाला उपस्थित असलेले हरिश्चंद्र थोरात यांनी त्या पुस्तकाचे केलेले गुणगान व वर्तवलेली भविष्यवाणी या पुरस्काराने खरी ठरली! त्यांनी लेखक प्रवीण बांदेकरांना, उत्तम समीक्षक असल्याची ग्वाहीही त्यावेळी दिली होती.

लेखक प्रविण बांदेकर     कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी त्यांच्या नेमाडपंथी ढंगाने भाषणात रंगत आणली. त्यांनी कादंबरी लेखनाबाबत मांडलेले विचार, त्या अनुषंगाने इतिहासाला केलेला स्पर्श यामुळे श्रोते मुग्ध होऊन गेले, बांदेकरांचे कष्ट, त्यांची जिद्द व त्यांच्या अभ्यासुपणाची महती श्रोत्यांना पटली.

     नेमाडे यांनी सांगितले, की या कादंबरीस A आणि A+ देण्याच्यामध्ये मी अडकलोय. तरीही मी तिला A ग्रेडच देईन आणि बांदेकरांकडून पुढील कादंबरी ही A+ दर्जाचीच असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो.

     सद्यकाळातील माहोल पाहिला तर मराठी भाषेचा विनाश अटळ आहे असे जाणवतं. मराठीसाठी भित्र्या लोकांच्या सेना काही करू शकत नाहीत असा टोला त्यांनी हाणला. तमाशातील काही गैर गोष्टी काढून, त्याकडे सजगपणे पाहून तिचा उत्कर्ष केला असता तर आज तिलाही इतर प्रांतांसारखा भरतनाट्यम, यक्षगान, कुचीपुडी वगैरेंसारखा राष्ट्रीय सन्मान प्राप्त झाला असता. परंतु आपण महाराष्ट्रीय करंटे! वास्तविक भरतनाट्यम हा प्रकार आपल्या कोकणातील दशावतारावरून उचलला गेला आहे. इतर प्रांतांनी महाराष्ट्रातील कलेचा अभ्यास करून, तो आपापल्या प्रांतात वेगळ्या ढंगाने पेश करून, त्याला नावलौकिक प्राप्त करुन दिल्याचे जाणवेल आणि तो त्यांचा त्या त्या प्रांतांचा राष्ट्रीय सन्मान ठरलेला आढळून येईल.

     औद्योगिक क्रांतीने शेती नष्ट केली नाही तर शेतीमुळेच निसर्गाची हानी झाली असे नेमाडे यांनी सांगितले. उलट, माणूस हा अगोदर समुद्रशेतीवर अवलंबून होता व त्यात पर्यावरणाला कोणताही धोका नव्हता. समुद्राचे मासे हे माणसाचे प्रामुख्याने अन्न असायचे, त्यामुळे निसर्गाला त्याच्यापासून कोणताही उपद्रव नव्हता.

     सिंधुदुर्गची माणसे ही इंग्रजांसारखीच चिवट! त्यांनी इंग्रजांना इकडे कोकणात पाय ठेवू दिला नाही. जर ते इकडे आले तर त्यांच्या जहाजांना लुबाडण्यात येई. म्हणून इंग्रज हे दूरवरून वळसा घालून कलकत्ता बंदरात जात व व्यापार करत. वखारी टाकत. त्यांनी कोकणातील भांडकुदळ माणसांचा धसकाच घेतला होता. हे शिवाजी महाराजांनी बरोबर हेरले व आपले आरमार तेथे सुसज्ज केले. मराठे आंग्रे आरमार पाहत. परंतु देशावरील माणसांनी म्हणजे पेशवाईने घात केला. त्यांनी इंग्रजांना महाराष्ट्रात पाय रोवण्यास मदत केली. नानासाहेब पेशवे यांनी इंग्रजांना कलकत्त्याहून बोलावून घेऊन आपल्या आरमाराचा ताबा घेण्यास साथ दिली व महाराष्ट्र अशा रीतीने इंग्रजांच्या ताब्यात गेला.

     मराठी माणूस वास्तवाचा अंगीकार करण्यापेक्षा भाषेला आणि लिपीला शरण जातो, त्यामुळे येणा-या लेखक पिढ्यांनी सकस कादंबरीलेखनाचा मार्ग चोखाळावा असे आवाहन नेमाडे यांनी केले.

महाजालावरील इतर दुवे –

रंगनाथ पठारे- प्रवीण बांदेकर
- आशुतोष गोडबोले
इमेल – thinkm2010@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.