अभिवाचन – नवे माध्यम!


अभिवाचन - एक स्‍वतंत्र माध्‍यममहाराष्‍ट्रात ठिकठिकाणी अभिवाचनाचे कार्यक्रम होत असतात. त्‍यांचे वृत्तांत, बातम्‍या वर्तमानपत्रांतून अधुनमधून प्रसिद्धही होतात. अभिवाचनात प्रामुख्‍याने कविता आणि कथा यांचा समावेश असतो. काही ठिकाणी स्‍वरचित साहित्‍याचेही अभिवाचन केले जाते. विजया मेहता यांचे ‘झिम्मा’ प्रसिध्द झाले तेव्हा नाना पाटेकर, सुहास जोशी यांनी त्यातील उतारे वाचले, तेदेखील अभिवाचन म्हटले गेले. प्रकाशक अभिवाचन नव्या पुस्तकांच्या प्रसिध्दीसाठी उपयोगात बर्‍याच वेळा आणतात. ते तो प्रकाशन कार्यक्रमाचा भाग समजतात. तेवढ्यापुरते ते खरे असतेही.

 परंतु ऐरोलीचे (नवी मुंबई) किशोर पेंढरकर यांना अभिवाचन हे नवे ‘माध्‍यम’ म्हणून गवसले व त्‍यांनी ते स्वतंत्र माध्यम म्हणून प्रयोगात आणले! त्यांनी तसा सिद्धांत मांडला व तो विकसित केला. त्यांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या देवनार शाखेची साथ लाभली. त्या दोघांनी मिळून शोध मोहीमच उघडली. त्यातून त्यांच्या साहित्य अभिवाचन स्पर्धेस आरंभ झाला. पेंढरकर नवनव्या कलाकारांना प्रशिक्षण देऊ लागले. अभिवाचनासाठी साहित्या्चे जसेच्या तसे वाचन करण्याऐवजी त्यासाठी नव्याने संहिता लिहिण्याची गरज किशोर पेंढरकर यांनी सर्वप्रथम ठामपणे मांडली. त्यांनी संहितेचे सादरीकरण, त्यासाठी कालावधी यांचाही विचार केला.

 योगायोग असा, की चाळीसगावचे (जळगाव जिल्हा ) डॉ. मुकुंद करंबळेकर तसाच खटाटोप तिकडे खानदेशात गेली दहा वर्षे स्पर्धारूपाने करत आहेत. डॉ. करंबेळकर यांनीदेखील अभिवाचनाचा विचार नाट्य आणि वाचन यापेक्षा वेगळ्या पद्धतीने केला आणि त्याप्रमाणे साहित्य अभिचावनास गती दिली. त्यांनी अभिवाचनाचे माध्यम रूढ करण्यासाठी कार्यशाळा देखील योजल्या. डॉ. करंबळेकर त्यांच्या लेखात नमूद करतात, की नाटक बसवताना संहितेचा, भूमिकेचा जेवढा विचार करावा लागतो, तिचा सराव करावा लागतो तेवढाच विचार, सराव अभिवाचनातही करावा लागतो. तरच सादरीकरण उत्तम होऊ शकते.

कामसापच्या देवनार शाखेच्या अभिवाचन स्पर्धांमध्ये परिक्षक म्हणून काम सतत करत आलेले अभ्यासक अशोक ताम्हणकर यांना या माध्य‍मामध्ये दिग्दर्शन अधिक प्रभावीपणे राबवले जाण्याची गरज जाणवते.

गम्मत अशी, की साहित्य अभिवाचन करणा-या बहुतांश व्‍यक्‍तींना अशा प्रकारचा विचार व काही प्रमाणात संघटन इतरत्र होत असल्‍याचे ठाऊक नसते. त्‍यांनी स्वत:च्या हौसेने अभिवाचनास सुरूवात केलेली असते आणि त्यात ते मग्न राहातात. ‘थिंक महाराष्‍ट्र’ ने राज्‍यात अभिवाचनाचे प्रयोग करणा-या शक्य तेवढ्या व्‍यक्‍ती-संस्थांशी संपर्क साधून, त्‍यांच्‍याकडून त्‍यांचे प्रयत्‍न आणि विचार जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला. तो प्रयत्‍न जारी राहील. ते प्रयत्‍न आणि विचार त्‍या त्‍या व्‍यक्‍तींकडून शब्दबद्ध करून ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’वर मालिकास्‍वरूपात सादर करत आहोत.

 समाज जाणते-अजाणतेपणी जी गोष्‍ट स्‍वीकारतो किंवा ज्‍या गोष्‍टी नाकारतो तो एकतर स्थित्‍यंतराचा भाग असतो किंवा त्‍या त्‍या वेळच्या समाजाची ती गरज असते. महाराष्‍ट्रात जागोजागी होत असलेले साहित्य अभिवाचनाचे वाढते प्रयोग काळाची गरज म्‍हणून होत आहेत का? समाजावर माध्‍यमांचा वारेमाप मारा होत असताना एकाच वेळी साहित्य वाचन आणि नाटक यांच्याशी नाते सांगणारे अभिवाचन हे नवे माध्‍यम भोवतालच्‍या गोंधळात समाजाला थोडा विसावा देण्‍यास हातभार लावू शकेल का? ‘थिंक महाराष्‍ट्र’ वेबपोर्टलवरील अभिवाचनासंबंधीची ही मालिका सादर करण्‍यामागे परस्‍परांपासून दूर राहणार्‍या, मात्र एकाच उद्देशाने प्रयत्‍नशील असलेल्‍या या व्‍यक्‍तींचे नेटवर्क व्‍हावे ही इच्‍छा आहे. तसे घडल्‍यास अभिवाचनाबद्दलचे ठिकठिकाणचे विचारमंथन आणि प्रयत्‍न परस्‍परांना उपयुक्‍त आणि पूरक ठरतील आणि त्‍या नेटवर्कचा फायदा या नव्‍या माध्‍यमाला आणि पर्यायाने समाजाला होऊ शकेल.

वेगवेगळ्या सांस्कृतिक क्षेत्रांतील संस्था आणि छांदिष्ट्य, अभ्यासक, रसिक व्यक्ती यांच्यात नेटवर्क बांधले जावे म्हणून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’च्या वतीने ‘झिंग सायबर क्लब’ सुरू करत आहोत. ही अगदी अभिनव अशी कल्पना आहे. छांदिष्ट , कलावंत , अभ्यासक, जिज्ञासू, रसिक यांना एका जाळ्यात आणण्याची कल्पना! बघताय काय? सामील व्हा!

-किरण क्षीरसागर
इमेल – thinkm2010@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.