अंधांची पदयात्रा


मुंबई (अँटाप हिल) ते शिर्डी

निघाली साईंची पालखी

     अंधांची पदयात्राआम्ही शिर्डीला जाण्यासाठी 'ॐ साई'च्या जयघोषात पालखीबरोबर चालू लागलो आणि क्षणार्धात पुढील आठ दिवसांचा प्रवास नजरेसमोर तरळला, अंत:करण भरून आले. डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. मी माझ्या अंध मैत्रिणीला - पारूला सोबत करण्यासाठी म्हणून ह्या पालखीबरोबर निघाले होते. पारूसारखे सतरा पदयात्री, सारे अंध, पायी प्रवास करून साईचं ‘दर्शन’ घेऊ इच्छित होते!

     पालखी शिर्डीला पोचेपर्यंत, मी त्यांच्या श्रद्धेने भारावून गेले आणि माझी परमेश्वर/परमार्थ ह्याबाबतची अलिप्तता गळून पडली!

     ज्यांना कुठल्याही गोष्टीचे ‘दर्शन’ अशक्यप्राय आहे, त्यांनी साईंच्या दर्शनासाठी एवढा कष्टमय आणि कठिण प्रवास करावा आणि त्याला आपण साक्षी असावे हा माझ्यासाठी अपूर्व अनुभव होता! जेव्हा आम्ही साईदरबारात पोचलो तेव्हा त्यांना नेमके काय वाटले? ह्या माझ्या प्रश्नावर त्यांची उत्तरे अशी होती: "खूप श्रद्धेनं इथपर्यंत चालत यावं असं वाटतं. इथं येतो तेव्हा छान वाटतं. खूप शांत वाटतं. त्‍या कठिण प्रवासानंतर आपण काहीही करू शकतो असा विश्वास वाटू लागतो. परत परत यावं असं वाटतं."

     सत्तरीचे जयवंत डोईफोडे ह्यांनी हा पल्ला तिस-यांदा गाठला! अंधार पडला, की त्यांना अजिबात दिसत नसे. ते रोज सकाळी लवकर उठून थंड पाण्यानं आंघोळ करून, तेल सांडून खराब झालेली पालखीतली तबके वगैरे साफ करत, नंतर पालखीतल्या साईंची पूजा करत आणि उत्साहाने आरती करून पालखीबरोबर निघत; सतत पालखीबरोबर राहात. पालखी मुक्कामावर पोचली, की त्याच उत्साहाने आरती पार पाडत.

पदयात्रेला सायनवरून सुरूवात     आम्ही एकंदर बावीस जण निघालो होतो. त्यात पाच जण पूर्ण अंध होते. बाकी व्यक्तींत थोडे जण अंशत: दिसणारे होते. मोहिमेचे प्रमुखही पूर्णत: अंध, त्यांचा साहाय्यक अंशत: दिसणारा. अंधांपैकी आठ जणांनी (आम्हा डोळसांबरोबर) दोनशेऐंशी किलोमीटरचा प्रवास यशस्वीपणे पार पाडला.

     डोळसांपैकी रवी आणि अनिल हे दोघे अधून-मधून टेंपोत बसत, पण तिसर्‍या आशुतोषने (अंध माता-पित्याचा मुलगा असल्यामुळे त्याला सर्वांबद्दल वेगळीच कळकळ होती) हा सर्व प्रवास पायांत चप्पल न घालता केला. नंतर नंतर त्याला पाऊल टाकणेही जड जात होते, पण तो सतत सर्वांना मदत करत होता. चालताना आणि मुक्कामावर पोचल्यावरसुद्धा. त्याने अंधांच्या पालखीबरोबर जाऊन त्यांना मदत करण्याचे हे व्रत सतत तीन वर्ष पाळले आहे.

     मला त्‍या प्रवासात सतत जाणवत होते ते गावोगावच्या लोकांचे प्रेम, श्रद्धा आणि कौतुक. आम्ही जेव्हा मुंबईत चालत होतो तेव्हा साईबाबांची पालखी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सकाळची घाई-गडबडीची वेळ होती ती, तरीही जवळजवळ प्रत्येकजण पालखीसमोर येताच नतमस्तक होत होता. अगदी मोटारसायकलस्वार, कारवाले, बसमधले प्रवासीही, असतील तिथून नमस्कार करत होते. सर्व थरांतल्या लोकांमध्ये साईबाबांबद्दलची (की एकूणच?) श्रद्धा किती खोलवर रुजली आहे, याचे प्रत्‍यंतर येत होते!

     मोहिमेला उत्तम लोकाश्रय लाभला होता. यात्रेला मंत्री वर्षा गायकवाड ह्यांनी विशेष मदत केली होती, यात्रेचे प्रस्थान ठेवण्याच्या आदल्या दिवशी रात्री त्या सभासदांना भेटण्यासाठीही आल्या होत्या. लोक पालखीतल्या दानपेटीत सढळ हाताने पैसे टाकत होते. मुक्कामाच्या सर्व ठिकाणी खाण्याची उत्तम सोय होती. भांडुप, कल्याणजवळचे माणकोली, नाशिकअगोदरचे वाडीवरा, नाशिक ह्या ठिकाणी लोकांनी स्वत: कष्ट करून सर्व व्यवस्था केली होती. सर्वत्र पक्वान्नासहित भोजन मिळाले.

अंध पदयात्रींसह ज्योती शेट्ये      नाशिक शहरात रात्री बारानंतर पोचलो तेव्‍हा स्वागतासाठी बरीच माणसे ताटकळत थांबली होती. त्यांनी फटाके वाजवले, रांगोळ्या घातल्या. त्यांनी थकलेल्या अंध बांधवांच्या पायांना मालिश वगैरेपण केले. ते खूप धावपळ करत होते. दुसर्‍या दिवशी आम्ही निघालो तेव्हा संपूर्ण नाशिक शहरात (जवळजवळ पाच किलोमीटर रस्ता) आमची मिरवणूक निघाली.

     नाशिकनंतर रस्ते अरुंद होते आणि समोरून दिंड्या सतत येत होत्या. त्या पालख्या आसपासच्या गावांतून त्र्यंबकेश्वरला एकादशीला असलेल्या संत निवृत्तिनाथ महाराज पुण्यतिथीच्या सोहळ्यासाठी चालल्या होत्या. ते कष्टप्रद दिनचर्येतून वेगळ्या वाटेवर अशा प्रकारे जात असावेत. प्रवासाची धर्माशी सांगड घालून वेगळी अनुभूती घेण्याची ही प्रथा किती छान आहे! आम्हाला त्या दिवशी जवळजवळ दहा-बारा दिंड्या भेटल्या. टाळ-मृदुंगाच्या साथीने छान भजन करणारे वारकरी, डोक्यावर तुळशीवृंदावन घेऊन चालणार्‍या स्त्रिया, हातात दिंड्या म्हणजे पताका घेतलेले वारकरी आणि बरोबर छान सजवलेली साजिरी-गोजिरी पालखी असा तो गोतावळा बघायला छान वाटत होता. सर्व शिस्तीत चालत होते.       

विश्रांती स्थळावर पालखीची पूजा     सिन्नरकडे जाताना महानुभवपंथीयांच्या आश्रमात दुपारचे भोजन होते. छान, स्वच्छ, मोकळे वातावरण होते. देवळात काळ्या देवांची स्थापना होती आणि तिथे वावरणार्‍या स्त्रिया काळ्या वस्त्रांत होत्या. तिथल्या दोघींशी बोलले. तरुण वयाच्या त्या दोघी स्वेच्छेने, आपले घरदार सोडून तेथे रहायला आल्या होत्‍या. शाळेत जाण्यार्‍या मुलीही तिथे खूप संख्‍येने असल्‍याचे समजले. त्या शाळेत गेल्या होत्या. अनाथ मुलांना तेथे आश्रय मिळतो. अठरा वर्षांची असताना ह्या पंथाची दिक्षा घेतलेली, पण आता वृद्ध झालेली स्त्री तेथे होती. त्या सगळ्या गीतापठण करतात, गीतेचा अभ्यास करतात. त्यांना बंधने दोनच. एक म्हणजे काळे कपडे घालायचे आणि केस कापून टाकायचे, त्या दोघी आनंदात वाटत होत्या. विशेष म्हणजे त्यांनी आजुबाजूच्या जीवनाशी फारकत घेतलेली नव्हती. त्या टीव्ही वगैरे पाहतात. खाण्यापिण्याचेही काही बंधन नाही. मी मला पडलेला प्रश्न त्यांना विचारला, ‘तुम्हाला आजुबाजूला सगळ्यांचे संसार बघून, टीव्ही मालिका बघून सर्वसामान्यांसारखे जगावे, वागावे असे वाटत नाही का? मोह होत नाही का कसला?’ तर त्या म्हणाल्या, ‘आम्ही आहोत अशाच सुखात आहोत. नणंदा, नवरा, सासू ह्यांचा त्रास आम्हाला नाही. आम्ही मजेत राहतो.’

     शिर्डीला चालत जाणा-या पदयात्रींची संख्या लक्षणीय आहे. आमच्याबरोबर डोंबिवलीचा मोठा ग्रूप होता. ते चारशे लोक होते. मी परत आल्यावर, डोंबिवलीहून अजून दोन ग्रूप गेले आणि अजून एक ग्रूप लगेच पुढच्या आठवड्यात रवाना झाला. त्या ग्रूपचे वारीचे हे विसावे वर्ष आहे. आम्ही निघालो तेव्हा भांडुपवरून एक ग्रूप निघाला होता. असे किती लोक रोज शिर्डीला जात असतील, असा विचार मनात येऊन गेला.

     वाटेवरच्या ऊसाच्या रसाचे दुकान चावणा-यांशी बोलले. त्यांनी सांगितले, की पूर्वी ठरावीक दिवशी काही लोक यायचे. शिर्डीला रामनवमीला मोठी यात्रा असते. त्यावेळी नियमाने येणारे लोक आहेत, पण आता, ह्या पालख्या, पदयात्रा वर्षांचे बारा महिने येत असतात. सगळेजण प्लॅस्टिकचे कप, बाटल्या आणि ताटासारख्या डिशेस सर्रास वापरतात. वापरून त्या तिथेच फेकून देतात. रस्त्याच्या कडेला त्‍यांचे ढीग जमलेले दिसतात. ह्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणारे लोक जो कचरा निर्माण करत आहेत त्याचे काय होईल? हा कचरा योजनापूर्वक गोळा करून त्याची विल्हेवाट लावायला हवी. मात्र हा मुद्दा, मी आमच्या ग्रुपलासुद्धा पूर्णपणे पटवून देऊ शकले नाही. आमच्या साथीदारांपैकी सगळेजण बसल्या जागी कप वगैरे टाकून देते होते!

     वाहत्या रस्त्यावर अंधांना घेऊन चालणे सोपे नव्हते. रात्री चालणे तर महाकठिण! अवजड सामान लादलेले ट्रक, अवजड वाहने इतक्या वेगाने जात, की त्यांनी आपण पदयात्री दूर फेकले जाऊ असे वाटायचे. कधीकधी, पाचपाच मिनिटे एकही वाहन नाही, मग अंधारात थांबण्यावाचून पर्याय नसायचा. पालखीवाले खूप भराभर चालायचे, म्हणून त्यांच्या अगोदर आम्ही निघायचो, पुढे जायचो. कधी कधी, आमच्यात आणि पालखीत खूप अंतर पडायचे. आम्ही रोज बरेच अंतर कापत होतो. विठ्ठल व य़शपाल हे अंध माझ्यासोबत असायचे. एकदा तर एका मोठ्या घाटात, अंध पदयात्री प्रभा ह्यांनी मी चालणारच असा हट्ट धरल्यामुळे रात्री आम्ही खूप वेळ दोघीच चालत होतो. त्यांच्या मनात साईबाबांच्‍या कृपेने आपल्‍याला काही होणार नाही असा विश्वास होता. पण माझ्या मनात आपण बाई असल्याची भीती खोलवर दबा धरुन बसलेली होती. मी देवावर विश्वास ठेवू शकत नाही.

     अंधांच्या पालखीयात्रेचे ते तिसरे वर्ष होते. यात्रेत त्‍या वर्षी प्रथमच ते लोक पालखी घेऊन आले होते. पालखी लाकडाची आणि जड होती. आतापर्यंत ते फक्त फोटो घेऊन येत. डोंबिवलीकरांची पालखी वेताची, सुबक आणि हलकी होती. त्यांच्या पालखीत साईची मूर्ती होती आणि मूर्तीच्या डोक्यावर बहुधा हि-यांचा मुकुट होता. आमच्या यात्रेची पालखी चारचाकी ढकलगाडीवर ठेवली होती. पण कधी कधी, रस्ते खराब असतील तर आतल्या दिव्यांसह ती गाडी पुढे नेणे कठिण व्हायचे. गाडीनं खेप वेळा दगा दिला. अनेक तास ती दुरुस्त करण्यात जायचे. कसारा घाट रात्रीच पार करायचा असे ठरवले आणि रात्री दोन वाजता निघालो तर गाडीचे दोन टायर पंक्चर! शेवटी, ते दुरुस्त करुन पहाटे तीन वाजता निघालो!

पालखी शिर्डीजवळ आली

     आमच्याबरोबर पाटील नावाचे सर्वात वयस्कर गृहस्थ होते. ते सांगलीचे होते. त्यांचा मुलगा सोबत होता, पण तो तरुण असूनही सतत टेम्पोत बसायचा. त्याला अंशत: दिसत होते. त्याचा खाक्या खायला आधी आणि चालायला कधी कधी असा होता, पण त्याचे वडील मात्र चालण्यात सर्वात पुढे असायचे. त्यांनी झेंडा धरण्याची जबाबदारी शेवटपर्यंत पार पाडली. अशा या म्‍हातारबुवांनी त्‍या रात्री विश्रांतीसाठी थांबल्‍यानंतर खूप मजा आणली. त्‍यांचे चहाचे प्रकार खूप गमतीदार होते.  

     रात्री केलेला घाटातला प्रवास फार सुंदर होता. घाट वळणावळणाचा, पण रस्ते छान होते. वाहने वेगाने ये-जा करत होती. एके ठिकाणी विश्रांतीसाठी चंद्र-चांदण्यात शांतपणे बसलो होतो, तेव्हा छान वाटले. घाट पार करताना दूरवर दिसणारे दिवेसुद्धा दिलासा देत होते. रस्त्यात काहीही उपलब्ध नव्हते. इगतपुरीच्या जवळ पोहोचेपर्यंत पालखी वाहणार्‍या चार-पाच शिलेदारांनी मात्र खडतर प्रवास केला, त्यांचे म्हणणे, ते खूप मजा करत (म्हणजे बोलण्याची फक्त) आले! आम्ही इगतपुरीच्या आश्रमात पावणेतीनला पोचलो आणि ते चार वाजता पोचले. त्यांचे खूप कौतुक वाटले. पालखीचे महत्त्व हेच, की ती एकदा निष्ठेनं खांद्यावर घेतली की काहीही करून मुक्काम गाठायचा!

      शिर्डीजवळचे रस्ते आणि आसपासची खेडी वर्षानुवर्षे आहेत तशीच आहेत. शिर्डींच्या मंदिरात सिंहासन सोन्याचे, खांब चांदीचे, आसपास सगळे चांदीने मढवलेले! मी खूप वर्षांपूर्वी जेव्हा मामांबरोबर शिर्डीला गेले होते, तेव्हा आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि साईबाबांच्या मूर्तीपर्यंत काही मिनिटांत पोचलो होतो. साईबाबांच्या वेळच्या सगळ्या जपून ठेवलेल्या गोष्टी, तेव्हा मोकळ्या वातावरणात होत्या आणि त्यांचा काळ जिवंत करणार्‍या वाटत होत्या; आता मात्र मंदिराला राजवाड्याचे रूप आलं आहे आणि बाबांचे दर्शन राजाच्या दर्शनासारखे दुर्लभ झाले आहे.

     अंध मित्रांबरोबरचा तो प्रवास खूप काही शिकवणारा होता. एकंदरच, अंध व्यक्तींचे जीवन कठिण, पण ते त्या कमतरतेपुढे हार न मानता जिद्दीने जगत असतात. त्यांच्या नजरेला काही दिसत नसले तरी त्यांचे सभोवतालच्या परिस्थितीचे, परिसराचे आकलन विलक्षण असते. आवाजावरून, गंधावरून आणि स्पर्शाने ते अचूक कयास बांधत असतात. ते आहे त्या परिस्थितीत आनंद शोधत असतात. स्वत:चे कमीपण हसत-हसत स्वीकारतात. त्यांच्यापैकी बहुतेकांना चांगल्या आवाजाची देणगी असते. त्यांच्याबरोबर राहणे बोअर होत नाही.

     पण त्या आठ दिवसांत वेगळाच विचार सतत मनात घुसत होता, की जगण्यासाठी काय लागते माणसाला? हवा, दोन-तीन वेळा अन्न, लागेल तेव्हा पाणी आणि थोडी थोडी विश्रांती; ती विश्रांती घ्यायला देहापुरती जागा आणि चालत असताना पावलांपुरता प्रकाश!

ज्योती शेट्ये,
भ्रमणध्वनी – 9820737301,
इमेल - jyotishalaka@gmail.com

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.