ऋतुसंहार

प्रतिनिधी 01/07/2011

षांताराम पवार ह्यांनी आपल्‍या शोकाकुल अवस्थेतही पर्यावरणबिघाडाविरुद्धच्या ‘कँपेन’चा ध्यास आर्ततेने व आवेगाने घेतला. त्यांच्‍या एका होर्डिंगवाल्‍या मित्राला त्यांनी सोबतची कविता देऊन, शक्य तेथे प्रदर्शित कर असे सुचवले; दुस-याला ह्या कवितेचा आधार घेऊन पथनाट्य लिहिण्यास व करण्यास सांगितले आणि तिस-याला कवितेची हॅंडबिले तयार करून ती वाटण्याचा कार्यक्रम दिला. पवारांनी आपल्या दु:खाचे उन्नयन असे साधले आहे.! आम्ही ‘थिंकमहाराष्ट्र'तर्फे ती कविता येथे सादर करत आहोत.

 

मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टस मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात ज्या दुस-या पिढीने चैतन्य आणले त्यात नाट्यदिग्दर्शक दामू केंकरे व चित्रकार-कवी षांताराम पवार ही दोन महत्त्वाची नावे. कॉलेजचे तास संपले की ह्या दोन प्राध्यापकांच्या केबिन जाग्या व्हायच्या. तो काळ प्रायोगिक नाटकांचा होता. त्यामुळे त्या दृष्टीने धमाल असायची. आर्टजत्रेसारखे वेगळे उपक्रम म्हणजे तर विद्यार्थ्यांना आव्हानच वाटे! ह्यामधून पवार ह्यांचे एक पीठ तयार झाले. ह्यातूनच त्यांचा मोठा विद्यार्थिगण बनून गेला. तो आजही ‘पवारसरां’कडे आदराने पाहतो. हे नाते संगीतातील गुरुशिष्यांच्या नात्यासारखे जाणवते..
 

पवारांनी कलेच्या क्षेत्रात अनेक गोष्टी साधल्या तरी त्यांचे प्रयोगशील व सामाजिक मन सतत सजग राहिले. ते ब-याच वेळा त्यांच्या कवितांमधून व्यक्त होई. परंतु गेल्या वर्षीपासून, त्यांच्या चिंतेच्या व चिंतनाच्या विषयांत ‘पर्यावरणा’स प्रमुख स्थान आले. त्यांनी ‘ऋतुसंहार’ ही कविता लिहिल्यानंतर तर त्यांचा तो ध्यास बनला. त्यांच्या मनात ह्या विषयावर ‘कॅंपेन’ कशी करता येईल हेच सतत येई.
 

परंतु तो काळ त्यांच्यासाठी व्यक्तिगत तीव्र दु:खाचा आणि म्हणून ताणाचाही होता. त्यांची पत्नी लिना ही त्याआधी काही महिन्यांपासून कॅन्सरग्रस्त होती. पवार कुटुंबीयांवर तो मोठाच आघात झाला. लिना हीदेखील पवारसरांची विद्यार्थिनी. कलेचे मर्म व महत्त्व जाणणारी. तिने पूर्वी परळला राहात असताना टाटा रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक ह्यांना साहाय्यभूत होतील अशा अनेक गोष्टी केल्या होत्या. तिच्यावरच ह्या रोगाने झडप घातली, परंतु ती नामोहरम झाली नाही. तशाही अवस्थेत, तिने उपचारासाठी टाटा हॉस्पिटलमध्ये जाये करत असताना, कॅन्सर रुग्णांना मदत करण्याचे तिचे प्रयत्न चालू ठेवले. किंबहुना, पवारांची सॉफ्टवेअर तज्ज्ञ मुलगी, गीताली हिने ते हिरिरीने पुढे नेले. आईच्या शुश्रूषेसाठी गीतालीला नोकरी सोडावी लागली. राहती जागा गोरेगावला, उपचार परळ मुक्कामी! अशी धावपळ करता करता तिने आईच्या व्रताचा पाठपुरावा केला. वेगवेगळ्या धनिकांकडून खाऊ-औषधे ह्यांची जमवाजमव करून, त्यांचे वाटप कॅन्सरग्रस्त मुलांमध्ये केले. तिने आईला जरा बरे वाटताच, अशा त-हेचे तीन मेळावेतरी संघटित केले. लिना पवारला नंतर मृत्यू आला.
 

षांताराम पवार ह्यांनी त्या शोकाकुल अवस्थेत पर्यावरणबिघाडाविरुद्धच्या ‘कँपेन’चा ध्यास आर्ततेने व आवेगाने घेतला. ते समाचाराला येणा-या माणसांशी त्याच मुद्यावर बोलू लागले. त्यांचा होर्डिंगवाला एक मित्र आला, तर त्यांनी त्याला सोबतची कविता देऊन, शक्य तेथे प्रदर्शित कर असे सुचवले; दुस-याला ह्या कवितेचा आधार घेऊन पथनाट्य लिहिण्यास व करण्यास सांगितले आणि
तिस-याला कवितेची हॅंडबिले तयार करून ती वाटण्याचा कार्यक्रम दिला. पवारांनी आपल्या दु:खाचे उन्नयन असे साधले आहे.! आम्ही ‘थिंकमहाराष्ट्र'तर्फे ती कविता येथे सादर करत आहोत.

 

‘ऋतुसंहार’प्रदर्शन

कवी-चित्रकार षांताराम पवार यांची कारकीर्द धगधगती आहे. त्यांनी वयाचा अमृतमहोत्सव साजरा केला तरी त्यांची निर्मिती-ऊर्जा शांत झालेली नाही. उलट, सभोवतालच्या परिस्थितीच्या दारूणतेबरोबर तिचा तडफडाट वाढलेला आहे. त्यांचा पूर्वीचा कलासक्त सोस आता भेदकतेने व्यक्त होतो. त्यांनी योजलेले ‘ऋतुसंहार’ हे प्रदर्शन म्हणजे त्यांच्या अस्वस्थेतेचे प्रतीक होते. प्रदर्शन जे.जे. उपयोजित कला शिक्षणसंस्थेच्या दालनात भरले होते. प्रदर्शनाला निमित्त होते पवार यांच्या कवितेचे. ती कविताच मुळी अस्वस्थतेमधून जन्माला आली. माणसाने सध्या निसर्गनाश चालवला आहे आणि वर मानभावीपणे तो पर्यावरणरक्षणाच्या गोष्टी बोलत आहे! हा जो मानवी जीवनातला खोटेपणा आहे त्यामधून पवार यांच्या ‘ऋतुसंहार’ या कवितेचा जन्म झाला. ती कविता ‘थिंक महाराष्ट्र’ या आपल्या वेबसाईटवरच सार्वजनिकरीत्या प्रथम अवतरली! त्यानंतर पवार यांना ती एक कॅम्पेनच व्हावी असे वाटले. त्याचाच एक भाग म्हणजे हे प्रदर्शन. पवार स्वत: या कवितेबद्दल आणि त्यांच्या तडफडाटाबद्दल आवेगाने अनेक लोकांशी बोलत राहिले. त्यांची भूमिका ढोबळपणे अशी मांडता येईल:

“मी गिरणगावातला माणूस. तिथं पाण्याचं दुर्भीक्ष्य. ज्या दिवशी आमच्या गावात पाणी असे तो आमचा दिवाळसण! लोक सतत पाण्याची वाट बघत असत. एक दिवस, असाच पाण्याची वाट बघत, पेपर वाचत बसलो होतो. पेपरमध्ये छोटीशी बातमी होती बिहारमध्ये महापूर आल्याची. कारण काय, तर हिमालय वितळत होता! पण याचं मला विशेष काही वाटलं नाही, कारण त्या महापुराचं पाणी माझ्या दारापर्यंत पोचणार नव्हतं. आमच्याकडे एखादी पाईपलाईन फुटली तर महापूर यायचा, तसंही काही झालं नव्हतं. मग त्याचाही फार विचार केला नाही. नंतर मी विसरूनच गेलो. विशेष म्हणजे त्याच दरम्यान मी पुणे-महाबळेश्वरला जाऊन आलो होतो. तिकडचं वातावरण बदलल्यासारखं वाटलं, पुण्या-महाबळेश्वरला असणा-या तापमानापेक्षा ते अधिक जाणवायला लागलं आणि मला ‘टाइम’ मॅगझीनमधल्या बातमीची -‘ओझोन वायुथराला भोकं पडलीत’ त्याबद्दल वाचलं होतं, त्याची लिंक लागली ती हिमालय पर्वत वितळू लागल्याच्या आणि त्यामुळे बिहारमध्ये महापूर आल्याच्या बातमीशी.
 

मी कवी असल्यामुळे पुढचं व्हिजन इमॅजिन करू लागलो म्हणजे जर हे असंच चाललं... म्हणजे हे कशामुळे झालं तर पर्यावरणामुळे, जसं की पृथ्वीचं कवच जो ओझोन वायू, त्याचा थर पातळ होऊन व वृक्षतोडी वगैरेंसारख्या आपल्याच चुकीमुळे सूर्याची प्रखरता वाढली. त्यामुळे पृथ्वीच्या कवचाला म्हणजे ओझोन वायूच्या थराला भोकं पडली. त्यातून ‘ऋतुसंहार’ कविता सुचली नाही तर ‘झाली’! हे खूप महत्त्वाचं.
 

षांताराम पवार यांची जे.जे. कॉलेजमधील प्राध्यापक म्हणून कारकीर्द अनेक कारणांनी गाजली. त्यांचा वावर कॉलेज वगळता नाटय व साहित्य-संस्कृती क्षेत्रात सर्वत्र असे. त्यातून काही नाटकांचे नेपथ्य, काही पुस्तकांची मुखपृष्ठ–मांडणी, काही प्रदर्शनांसाठी उभे केलेले स्टॉल्स असे त्यांचे विविधढंगी कर्तृत्व होते. त्या ओघात ते कविताही लिहीत राहिले व फाडत गेले. त्यांना गप्पांचा सोस भारी; पुन्हा सर्व गोष्टींवर त्यांचे आसुसून बोलणे असते. त्यांच्या एके काळच्या मैफलीत एका बाजूला दामू केंकरे आणि दुस-या बाजूला सदानंद रेगे, अशोक शहाणे, दिलीप चित्रे असे मात्तबर असत. ते सर्व पुढे आपापल्या क्षेत्रात ‘स्वयंभू श्रेष्ठ’ ठरले. पवारांची खासियत व्यक्त झाली ती शिक्षकी पेशातून. त्यांच्याइतका बांधील राहिलेला शिष्यपरिवार दुस-या कोणाही शिक्षकाला लाभला नसेल. रघुवीर कुल त्यांना गुरूजी म्हणूनच संबोधतो तर रंजन जोशी त्यांचे वर्णन ‘मानगुटी बसलेला वेताळ’ असे करतो. विनय नेवाळकर हा बहुगुणसंपन्न परंतु लौकिकविन्मुख कलाकार पवारसरांच्या दिमतीस असलेला गेली कित्येक वर्षे आढळून येतो. याशिवाय अरूण काळे, विकास गायतोंडे, नलेश पाटील असे पवारसरांचे शिष्य उच्चपदी जाऊन पोचले आहेत.


 

पवार यांच्या ‘ऋतुसंहार’ या कवितेचा अर्थ त्यांच्या पंचवीस विद्यार्थ्यांना जसा भावला तसा त्यांनी तो प्रदर्शनात प्रगट केला. त्या चित्रांचे प्रदर्शन म्हणजे ‘ऋतुसंहार’!  त्यामध्ये कोणी चित्रे काढली तर कोणी मांडणीशिल्प रचले. हे वेगवेगळे आविष्कार पाहत असताना मन थक्क होऊन जात होते. अविनाश गोडबोले यांनी उभे केलेले कॉक्रिटचे जंगल, अरूण काळे यांनी साक्षात ढगावरच घातलेला कु-हाडीचा घाव, रतन गोडबोले यांनी फाशीला टांगलेला पक्षिसमूह, दिलीप शिवलकर यांनी छायाचित्र व संगणकीय प्रणाली यांमधून उभे केलेले मातीचे दालन, दीपक घारे यांनी कवितेचे भीत्तिचित्र मांडून घडवलेली कारणमीमांसा, रंजन जोशी यांनी भावव्यक्त केलेली अधोगतीची कमान..., प्रत्येक नमुना निसर्ग–हासाची प्रत्ययकारी जाणीव देणारा. सर्वांत सहज कळणारे परंतु भेदक चित्र होते ते गंगाधरन यांचे, तीन फोटोफ्रेम्सचे. पहिल्या फ्रेमध्ये निर्माता ब्रम्हा, दुस-या फ्रेमध्ये पालनकर्ता विष्णू आणि तिस-या फ्रेमच्या जागी त्यांनी आरसा टांगला होता, म्हणजे संहारकर्त्या शंकराच्या जागी प्रत्येक प्रेक्षकाला आपलीच छबी दिसत असे! यापेक्षा वेगळा ‘ऋतुसंहार’ तो काय असणार?

- प्रतिनिधी thinkm2010@gmail.com

षांताराम पवार – (022) 28491123, गीताली पवार – 9833985435

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.