साठाव्या वर्षी पुन्हा कॉलेजमध्ये!

प्रतिनिधी 02/06/2011

उमा सहस्‍त्रबुद्धेकाय? साठाव्या वर्षी परत कॉलेजमध्ये? शीर्षक वाचून बुचकळ्यात पडलात ना? साठाव्या वर्षी कोणी परत कॉलेजमध्ये जायला लागते का? होय, हे घडू शकते. नव्हे, माझ्या बाबतीत हे घडले आहे. ‘रामनारायण रुईया ‘ हे माझे कॉलेज. मी तिथून ग्रॅज्युएट झाले. मी आता, चाळीस वर्षांनंतर पुन्हा तिथे जायला सुरूवात केली आहे. काही शिकण्यासाठी किंवा शिकवण्यासाठी नाही, तर मी जात आहे मला मिळणार्‍या निर्मळ आनंदासाठी. तिथे माझा दिवस सार्थकी लागतो, ह्या समाधानासाठी.

निवृत्तीनंतर नुसते आरामखुर्चीत विसावण्यापेक्षा काहीतरी वेगळे करायची संधी मिळाली आणि ती मी लगेच उचलली; आणि म्हणूनच मी कॉलेजमध्ये जाते, अगदी नियमितपणे, जवळजवळ रोज.

महाविद्यालयीन अंध विद्यार्थ्यांसाठी वाचक आणि लेखनिक म्हणून काम करायची कल्पना मला ‘स्नेहांकित’ या संस्थेमुळे मिळाली आणि मी रुईयामध्ये पुन्हा पाऊल ठेवले. अंध मुले शाळेचे शिक्षण ब्रेल लिपीतून वेगवेगळ्या शाळांतून घेतात. त्यांचा अभ्यासक्रम ठरावीक असतो आणि त्यांचे शिक्षकही विशेष प्रशिक्षित असतात, पण त्यांना महाविद्यालयीन शिक्षण सर्वसामान्य मुलांप्रमाणे घ्यावे लागते. वर्गात बसून लेक्चर्स ऐकायची, ती कानांत साठवून ठेवायची. नंतर कोणी रीडर मिळाला तर परीक्षेची तयारी होणार. अभ्यासक्रमाच्या कॅसेटस् रेकॉर्ड करून दिल्या तर त्या ऐकून परीक्षेची तयारी करणार, या पध्दतीने अंध मुले अभ्यास करतात. ती डोळस मुलांकडून अभ्यासाच्या नोट्स घेतात, त्या रीडरकडून वाचून घेतात. कोणी त्याच्या सी.डी. करून दिल्या तर त्या ऐकून त्या मुलांना अभ्यास करायला सोपे पडते.

रुईया कॉलेज अंध मुलांना अभ्यासात विशेष सहाय्य करते. त्यासाठी स्वतंत्र केंद्र आहे. अंध मुलांच्यासाठी संगणक आहेत, त्यावर वेगळे, बोलणारे सॉफ्टवेअर आहे. तिथे बसून सोशल वर्कर त्या मुलांना वाचवून दाखवू शकतात. कॉलेजमधली डोळस मुलेही या केंद्रामध्ये अंध मुलांना मदत करतात.

मी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष आर्टसला शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे व तिसर्‍या वर्षाच्या ऑक्टोबरच्या परीक्षांचे पेपर्स गेली चार वर्षे लिहीत आहे. आता जेव्हा मी माझ्या समवयीन मैत्रिणींना हे सांगते तेव्हा त्या जरा साशंक असतात. “आम्हाला कसं जमेल? शाळा-कॉलेज सोडून इतकी वर्षं झाली आम्हांला, आता लिहायला स्पीड कमी पडेल, मग उगीच आपल्यामुळे मुलांचं नुकसान नको व्हायला” वगैरे. पण या सगळ्या पळवाटा आहेत, बहाणे आहेत. मला या मैत्रिणींना सांगावेसे वाटते, की एकदा करून तर बघा हे काम, खूप स्पीड वगैरे लागत नाही लिहायला. मुले उत्तरे जुळवून जुळवून सांगतात. आपण ती फक्‍त लिहायची.

मी तिसर्‍या वर्षाला असलेल्या काही विद्यार्थ्यांची प्रॉजेक्टस लिहायचे काम केले. त्यांनाही सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे प्रॉजेक्ट्स कॉलेजमध्ये ठरावीक वेळात सबमिट करायची असतात. वीस-बावीस पानी प्रॉजेक्टस चित्रांसहित आकर्षक पध्दतीने सजवून द्यायची असतात. ह्यात काही वेळा पुस्तकाचे परीक्षण, थोर लोकांची चरित्रे, कवितासंग्रह असे विषय असतात. या कामात त्यांना मदत करतांना मला सतत नवीन अनुभव मिळाले. आम्ही कॉलेजमध्ये शिकताना असे काही नव्हते. अंध मुले प्रॉजेक्टसच्या नोट्स ब्रेल लिपीत तयार करतात. आपण त्या कागदावर चांगल्या अक्षरांत नीटनेटकेपणे उतरवून, जरा सजवून योग्य पध्दतीने द्यायच्या. एकदा एका अंध मुलीने प्रॉजेक्ट म्हणून एका प्रसिध्द कवीची मुलाखत कॅसेटवर रेकॉर्ड करून घेतली होती. मी तिला ती मुलाखत लिहून दिली. ती मुलाखत, त्या कवीचे विचार, यांमुळे मला मी संपन्न झाल्यासारखे वाटले. पुढे त्या कवींशी संपर्क साधून त्या मुलाखतीची एक कॉपी मी त्यांना पाठवून दिली. त्यांना त्याचा फार आनंद झाला व कौतुक वाटले.

एकदा बी.एड. करत असलेल्या एका मुलाला मी आधीच्या काही वर्षांतल्या प्रश्नपत्रिका वाचून दाखवत होते. ते सगळे पेपर्स ऑब्जेक्टिव होते आणि उत्तरासाठी प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय होते. ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाप्रमाणे असलेले ते पेपर्स वाचताना ऐकून बारा-पंधरा विद्यार्थी जमा झाले आणि पर्याय शोधून उत्तरे देताना पुढचे दोन-अडीच तास अशी काही मैफील रंगली की माझ्या कायमच्या स्मरणात राहिला तो प्रसंग!

अंध विद्यार्थी महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतून मुंबईला आलेले असतात. शासकीय वसतिगृहांत राहतात आणि वेगवेगळ्या महाविद्यालयांत शिकतात. अपंगत्वावर मात करून जिद्दीने, कौशल्याने आणि मेहनतीने आपले आयुष्य यशस्वीपणे जगता येते हे दाखवून देतात. आपले कॉलेज लाइफ एंजॉयही करत असतात. हास्यविनोद, चेष्टामस्करी चालू असते. कॉलेजचा परिसर रोजचा, सवयीचा असल्याने आपली पांढरी काठी फोल्ड करून बॅगेत ठेवतात आणि सहजपणे वावरायचा प्रयत्न करतात. तरूण वयच ते! त्यांचे उत्साहाने भरलेले चेहरे आपल्याला सांगत असतात, की आम्हांला नुसती तुमची सहानभूती नको आहे. जमले तर आम्हांला मदत करा, आमची वाट सुकर करा. नाही तरी आम्ही पुढे चालत राहणार, आमच्या यशाचा मार्ग शोधत राहणार. कुठून येत असेल एवढा जोम, एवढा आशावाद, एवढी उमेद?

‘रुईया’ खेरीज ‘झेव्हियर्स ’, ‘सिध्दार्थ’, ‘एस.आय.ई.एस’ अशी इतर काही कॉलेजेस आहेत की जिथे असे ‘ब्लाइंड सेल’ आहेत. ‘रुईया’मध्ये पासष्ट ते सत्तर अंध विद्यार्थी शिकतात व बाकी कॉलेजेसमध्ये प्रत्येकी वीस ते तीस अंध विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. साधारणत: अंध मुले आर्टसला अॅडमिशन घेतात. मराठी, इतिहास, राज्यशास्त्र असे विषय असतात. मुंबईबाहेरून आलेली, मराठी मिडियममध्ये शालेय शिक्षण घेऊन आलेली ही मुले इंग्रजीला घाबरत असतात. त्यांना मराठीची जाण असते. काही जण कविता करतात, लेख लिहितात आणि मग ब्रेल लिपीतून आपल्याला सांगून लेखन करतात. त्यांनी सांगितलेल्या कविता कागदावर उतरवतांना मुलांच्या कल्पनाशक्तीचे कौतुक वाटते. त्यांत गावाकडच्या समस्या नेमक्या शब्दांत प्रभावीपणे मांडलेल्या दिसतात. एका मुलाची ‘शब्द’ ही कविता लिहिताना माझ्याच डोळ्यांत पाणी आले, कारण शब्द म्हणजेच सर्व काही, आकाश, जमीन, तारे, वारे, डोंगर, दर्‍या असा त्या कवितेचा आशय होता. एका मुलाच्या तर इतक्या कविता आहेत आणि सगळ्या चांगल्या आहेत की उत्तम कवितासंग्रह छापून होईल! काही मुले संगीतात हुशार असतात. काही गिर्यारोहण करतात, काही ज्युडो-कराटेमध्ये प्राविण्य मिळवतात. संगणकातही प्रगती करतात. दिसत नसले तरी आपल्या शरीरातील अन्य सुप्त शक्तिस्रोतांचा उपयोग कौशल्याने करतात. डान्स बसवतात, नाटके बसवतात, भाषणेही देतात.

दरवर्षी जानेवारी महिन्यात ‘ब्रेल डे’ असतो. त्यांचे गॅदरिंगच ते! ‘रुईया’मधील NSSची मुले त्यांना कार्यक्रम बसवायला, प्रमुख पाहुणे बोलावायला मदत करतात, अंध मुले स्टेजवर सफाईदारपणे वावरत असतात. एका वर्षी आठ अंध मुलींनी सादर केलेला भांगडा बघून मी थक्क झाले. चार मुलींनी जोमदार, भरभर हालचाली करत नृत्य सादर करता करता कमानी टाकल्या आणि उरलेल्या चौघी सुरकन त्या कमानींतून गेल्या . सगळे प्रेक्षक श्वास रोधून ही कमाल बघत होते. स्टेजवरचा त्यांचा वावर इतका सराईतासारखा होता, की सिने-नाट्य सृष्टीतले आलेले कलाकारही अचंबित होऊन गेले. दुसर्‍या एका ग्रूपने हातात पेटते दिवे घेऊन नृत्य सादर केले.

मुलांबरोबर वेळ कसा निघून जातो ते कळतही नाही. मुले, मुली व्यवस्थित पोशाख करून आलेली असतात. मुलींचे मॅचिंग इतके परफेक्ट असते की मला त्यांना विचारावेसे वाटते, की कसे काय जमते हे? पण विचारत नाही. त्या आपल्याला आपल्या आवाजावरून, लावलेल्या परफ्यूमवरून अचूक ओळखतात; मुली तर बांगड्या चाचपतात, विचारतात, ‘आज वेगळी बांगडी घातलीत, ताई? आज ड्रेस घातला आहे- की साडी? केसाला पिन कुठची लावली आहे?’ तरुणाईची निर्मळ उत्सुकता मन मोहून जाते. मनाला नवीन उभारी मिळते. त्यांची जिद्द, धडपड, आनंदी वृत्ती, सकारात्मक दृष्टी बरेच काही शिकवून जाते. सर्वसाधारणपणे ऑक्टोबरच्या व एप्रिलमधल्या परीक्षांच्या आधी महिनाभर मुलांना वाचून दाखवले तरी पुरते. बाकीच्या काळात त्यांच्या संपर्कात राहणे हा आपला आनंद.

उमा सहस्रबुध्दे
५९,वेणू अपार्टमेन्ट,
देवरुखकर रस्ता, दादर,
मुंबई – ४०००१४
०२२ २४१४६१८७

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.