पुसेगावचा रथोत्सव


सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे दरवर्षी मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला, सेवागिरी महाराजांचा रथोत्सव साजरा केला जातो. सेवागिरी महाराजांनी त्यांचे कार्य संपल्यानंतर (10 जानेवारी 1948 या दिवशी, मार्गशीर्ष वद्य चतुर्दशीला) पुसेगाव येथे समाधी घेतली. त्यानंतर पुसेगावात रथोत्सव साजरा केला जाऊ लागला.

पुसेगावचे मूळ नाव पुसेवाडी असे होते. सातारा-पंढरपूर मार्गावर वेदावती नदीच्या तीरावर वसलेले, जेमतेम पन्नास-शंभर उंबर्‍यांचे खेडेगाव. पुसेवाडी हा रामायणकालीन दण्‍डकारण्याचा भाग समजला जातो. अंदाजे पाचशे वर्षांपूर्वी एका धनगर कुटुंबामुळे पुसेवाडी ही वसाहत झाली. पुसेवाडीची दुसरी नोंद नेर-पुसेवाडी अशी आहे. धनगर कुटुंबाच्या जोडीला असणारी शहाण्णव कुळी मराठा जाधव मंडळी ही बारामती तालुक्यातील परिंचे या गावाहून येथे आली असे समजतात.

पुसेवाडीच्या पूर्वेला अडीच किलोमीटर अंतरावर समाजक्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांचे कटगुण हे जन्मस्थान, पश्चिमेला शिवकालीन प्रसिद्ध वर्धनगड किल्ला, दक्षिणेला रामेश्वराचा डोंगर -त्याच्या पायथ्याला वसलेले विसापूर हे गाव आणि उत्तरेस तीन किलोमीटर अंतरावर 1870 साली ब्रिटिशांनी बांधलेला नेर तलाव, पाच किलोमीटर अंतरावर घाटावरील आंब्‍यांसाठी प्रसिद्ध असलेले बुध (पाचेगाव), अशी पुसेवाडीला भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक परिसराची चतु:सीमा आहे. जवळून वाहणार्‍या वेदावती नदीच्या काठावर नाथपंथीयांच्या अकरा लिंगांपैकी पहिले लिंग आहे. ते सिद्धेश्वराचे देवस्थान आहे.

सेवागिरी महाराजांचा जन्म गुजराथमधील जुनागड येथे रजपूत घराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव शिवसिंग असे होते. शिवसिंगांच्या वयाच्या सातव्या वर्षी त्यांना पूर्णगिरी महाराज आपल्यासोबत घेऊन गेले. त्यानी शिवसिंगांना दशनाम संप्रदायाच्या जुन्या आखाड्याच्या पद्धतीने पंचगुरूंकडून संन्यासदीक्षा दिली. त्यांना साष्टांग योगसाधनेचे नियम, आसने, प्राणायाम, ध्यानधारणा, समाधी इत्यादींची सखोल माहिती दिली. त्याचप्रमाणे संन्याशाचा आचारधर्म शिकवला. चारधाम यात्रा, सप्तपुरी, द्वादश ज्योतिर्लिंगे, बद्रिनाथ, केदारनाथ अशा देशाच्या निरनिराळ्या भागांतील तीर्थक्षेत्रांच्या दर्शनाचा लाभ सेवागिरी महाराज घेत होते. जनसामान्यांचे अवलोकन करत होते. मग गुरुशिष्य (पूर्णगिरी महाराज व सेवागिरी महाराज) जुनागड येथील गिरनार पर्वतावर राहण्‍यास आले. शिष्य पूर्ण तयार झाला अशी खात्री झाल्यावर, पूर्णगिरी महाराजांनी, ‘वेदावती तीरी दंडकारण्यात जा, तिथे सिद्धेश्वराचे स्वयंभू शिवलिंग आहे. तीच तुझी कर्मभूमी आहे’ असा आदेश दिला. सेवागिरी महाराजांचे भक्त, पुसेगावचे जोतीराव जाधव, श्रीरंगकाका, बोंबाळ्याचे निंबाळकर, वर्धनगडचे काशीराम मोरे यांनी सेवागिरी महाराजांना 1905 साली पुसेगावला आणले.

पुसेगावात आल्‍यानंतर सेवागिरी महाराजांनी शिकवण देऊन जागृती निर्माण केली. क्रोधाऐवजी दया, असत्याऐवजी सत्य, वैर्‍यावर प्रेम करा अशी त्यांची शिकवण होती. माणसाने आळशी न बसता सतत उद्योगी राहिले पाहिजे हा त्यांचा मंत्र. महाराज म्हणत असत, ‘लेनेको हरिनाम l देनेको अन्नदान l

सेवागिरी महाराजांनी माणसांत देव पाहिला. त्यांनी माणसांची सेवा करण्यात धन्यता मानली. धर्म याचा अर्थ कर्मकांड नव्हे तर मानवी कल्याणाचा विचार हा आहे. पुसेगावच्या विकासासाठी महाराज भक्तांच्या बरोबरीने झटत असत. मग ते बंधारे बांधणे असो, विहीर खोदणे असो, वृक्षारोपण असो, गरिबांना अन्नदान असो, वा शिक्षणाचा प्रसार असो.... त्यांनी अशी कामे करून समाजसेवा केली. महाराजांना बलोपासनेच्या उपक्रमांबद्दल जिव्हाळा वाटायचा. व्यायाम, कुस्ती, मैदानी खेळ, शर्यती अशा प्रसंगी ते आवर्जून उपस्थित राहात असत.

रथोत्सवात सुरुवातीची तीन वर्षे महाराजांचा फोटो शृंगारलेल्या बैलगाडीत ठेवून गावातून रथयात्रा काढली जात असे. सेवागिरी महाराजांनंतरचे पहिले मठाधिपती श्रीसंत नारायणगिरी महाराज यांनी 1950 साली सागवानी लाकडाचा देखणा रथ तयार करवून घेतला. सेवागिरी महाराजांच्या चांदीच्या पादुकाही तयार केल्या व तेव्हापासून महाराजांच्या समाधीदिनी रथात, महाराजांच्या पादुका व फोटो ठेवून वाजतगाजत यात्रा निघू लागली. रथोत्‍सवाच्या दिवशी भाविकांची अलोट गर्दी जमते. त्यावेळी रथावर फुले उधळावी त्याप्रमाणे नोटा उधळल्या जातात. नोटांचेच हार घातले जातात. भक्तजनांनी अर्पण केलेल्या नोटांची रक्कम तीस-पस्तीस लाखांच्या घरात जाते. निधीचा उपयोग शैक्षणिक व लोकोपयोगी विकासकार्यासाठी केला जातो.

रथोत्सवाच्या वेळी भरणार्‍या यात्रेत कुस्त्यांचे फड, खिलार जनावरांचे प्रदर्शन, बैलगाड्यांच्या शर्यती, तसेच खेळांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. यात्रा दहा दिवस चालू असते. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजराथ अशा राज्यांतून भाविक येतात. यात्रेच्‍या वेळचे गावातील वातावरण चैतन्‍याने भारलेले असते.

यात्रेकरता दोन महिने आधीपासून नियोजन चालू होते. विविध समित्या स्थापन केल्या जातात. सेवागिरी महाराज असताना, त्यांनी व ग्रामस्थांनी मिळून दत्‍तमंदिर बांधले. तिथे वर्षभर सण साजरे केले जातात, उत्सव, पारायण, संगीत सेवा, व्याख्यानमाला इत्यादी.

सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टतर्फे रथोत्सवात जमा होणार्‍या पैशांतून, तसेच देणगीरूपाने मिळणार्‍या पैशांतून समाजोपयोगी कामे केली जातात. भक्‍तगणांच्‍या सुविधेसाठी ट्रस्टकडून पाच मजली धर्मशाळा व मंदिरासमोर भक्तनिवास बांधण्‍यात आले आहेत. भक्तनिवासातील हॉल विवाहकार्यासाठी दिला जातो. भक्तगणांसाठी धार्मिक ग्रंथालयही सुरू करण्यात आले आहे. सेवागिरी महाराज पूर्वी पुसेगावजवळ करंजाळा येथील महादेव मंदिरात जात होते. ट्रस्‍टकडून त्‍या मंदिराचे आकर्षक बांधकाम करण्‍यात आले आहे. ट्रस्टकडून वेदावतीच्या तीरावर दगडी घाट बांधून तिथे ‘सेवागिरी महाराज उद्याना’ची निर्मिती करण्‍यात आली आहे. तसेच रथयात्रेच्या मार्गाचेही बांधकाम केले आहे.

ग्रामीण भागातील व तळागाळातील शेतकर्‍यांना आधुनिकरीत्या शेती कशी केली जाते, निरनिराळी कोणती साधने वापरली जातात याची माहिती व्हावी यासाठी ट्रस्टतर्फे वर्षातून दोन वेळा भव्‍य कृषी प्रदर्शन भरवले जाते.

रथोत्सव यात्रेसाठी येणार्‍या लाखो भाविकांना ट्रस्टतर्फे दोन लाख रुपयांचे बुंदीचे लाडू प्रसाद म्‍हणून वाटले जातात. तसेच प्रत्येक अमावस्येला व गुरुवारी महाप्रसाद वाटप केला जातो. दर आषाढी यात्रेनिमित्‍त पुसेगाव ते पंढरपूर अशी दिंडी निघते. ट्रस्टतर्फे दरवर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर संगीत सेवा सप्ताह साजरा केला जातो. त्यावेळी अनेक प्रसिद्ध गायक-गायिका आपली कला सादर करतात. ट्रस्टतर्फे आयोजित केल्‍या जाणा-या व्याख्यानमालेत अनेक विचारवंतांची धार्मिक, सामाजिक व ऐतिहासिक विषयांवर व्याख्याने होतात.

ट्रस्टतर्फे शैक्षणिक संस्थांना मदत पुरवली जाते. 1967 साली पुसेगावात शासकीय शाळा उभारणीसाठी सरकारकडून ट्रस्‍टकडे जमिनीची मागणी करण्‍यात आली त्‍यानुसार ट्रस्‍टने एकशेदहा एकर जमीन खरेदी करून शासनाला बक्षिसपत्राने दिली व रोख साडेतीन लाख रुपये देणगी दिली. ट्रस्टने तेथे अद्ययावत क्रीडासंकुल बांधून देण्याचे ठरवले आहे.

गरजू विद्यार्थ्यांना, ते शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून मंदिरात ठेवून घेतले जाते. त्यांच्या शिक्षणाचा खर्च ट्रस्ट करते. समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ट्रस्टतर्फे वह्या, पुस्तके, गणवेषाचे मोफत वाटप केले जाते. ट्रस्‍टतर्फे गुजरात भूकंपग्रस्तांना भरीव आर्थिक मदत करण्यात आली होती. ट्रस्टतर्फे संधिवात विकारासाठी, तसेच अॅक्युपंक्चर आणि नेत्ररोगासंबंधी मोफत शिबिरे भरवली जातात.

सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पंचक्रोशीतील गावांना टँकरने पाणी पुरवण्‍याचा तात्पुरता उपाय केलाच, पण कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून जलसंधारणाचे कार्यही हाती घेतले. सिमेंट, खडी, वाळू, गवंडी, मजुरी हा वाटा ट्रस्टने उचलला. अनेक शेतकर्‍यांनी डबर, खुदाई, बांधकामाची देखभाल या माध्यमातून ट्रस्टला मदत केली.

ट्रस्टने आतापर्यंत लोकसहभागातून सत्तावीस सिमेंट बंधारे, सव्वाशे माती बंधारे, तीन ग्रामतळी तीन विहिरी व बोअर पुनर्भरण. पाच पाझर तलावातील गाळ काढणे अशी एकशेचौसष्ट कामे पूर्णत्वाला नेली आहेत.

संपर्क : श्री सेवागिरी महाराज ट्रस्‍ट, मु. पो. पुसेगाव, ता. खटाव, जि. सातारा, पिन कोड – 415502

दूरध्‍वनी - (02375)260347.

पद्मा कर्‍हाडे : भ्रमणध्वनी : 9223262029,

इमेल : padmakarhade@rediffmail.com

पुसेगावच्‍या यात्रेसंबंधीचा आणखी एक लेख वाचण्‍यासाठी येथे क्लिक करावे.

{jcomments on}

लेखी अभिप्राय

Very nice information. I am totally unknown about this. Thanks a lot.
I will definitely visit this new place and collect more information.

Deepak Ahiray18/03/2015

रामकृष्णहरि!!! रथाचेसुद्धा खुप छान नियोजन आणि दररोज पहाटे आणि रात्रि होणाऱ्या आरतीचे सुद्धा खुप छान नियिजन असते.हि पवित्र वास्तु पाहुन मन प्रसन्न होते.तासंतास वाटते इथेच बसून नामस्मरण करावे नित्य स्वामींचे ध्यान करावे.

प्रसन्न गोडसे तरडफ06/01/2019

Add new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.